17 February 2020

News Flash

नशा

..तरीही त्या दिवसाची मी ऋणी आहे. त्यानं माझी आणि नशेची ‘तोंडओळख’ करून दिली. त्या ओळखीनं मला शिकवलं ‘नशा प्रामाणिक असते.

| January 25, 2014 06:09 am

..तरीही त्या दिवसाची मी ऋणी आहे. त्यानं माझी आणि नशेची ‘तोंडओळख’ करून दिली. त्या ओळखीनं मला शिकवलं ‘नशा प्रामाणिक असते. ती कुणालाही फसवत नाही. ती स्पष्टवक्ती आहे. तिचा हात हातात घेतलेल्या प्रत्येकाला ती ‘ती काय चीज आहे’ हे पहिल्याच भेटीत सांगते.
मुळातच मला सिगरेट, दारूची आवड नाही. त्यामुळे त्यापासून लांब राहायला फारसा ‘संयम’ ठेवावा लागत नाही. आपोआपच होतं. सिगरेटचा तर मला विशेष तिटकारा आहे. पण तरी ती ओढावी लागली. एकदाच फक्त. मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात असताना कुठल्याशा नाटकात मला एका मवाली मुलाची भूमिका दिली गेली. तो विडय़ा ओढत मुलींची छेड काढतो असा प्रसंग होता. त्यासाठी मी माझ्या काही सिगरेटी ओढणाऱ्या ‘झुरकेबाज’ मैत्रिणींकडून बिडी ओढण्याचं शिक्षण घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण नाहीच जमलं नीट. रंगमंचावरही नाही. माझ्या झुरकेबाज मैत्रिणींनी मी रंगमंचावर बिडी ओढताना ‘** या लग रही थी!’ अशी माझी निर्भर्त्सना केली. मला आयुष्यात सिगरेट ओढताना आवडलेली एकमेव व्यक्ती म्हणजे आमच्या सौंदर्यशास्त्राच्या शिक्षिका निमा मॅडम. वय पंच्याऐंशी. त्या सिगरेट ओढताना मूर्तिमंत सुंदर दिसायच्या. लांब, शांत झुरके. तेव्हा त्या कुणाशीही बोलायच्या नाहीत. सिगरेट आणि त्यांच्यात एक शांत संवाद चालू आहे असं वाटायचं. झुरका आत घेतला की त्यांचे डोळे बंद व्हायचे. भुवया सुखावल्यासारख्या वर जायच्या. जणू त्यांची समाधीच लागायची. तेवढय़ा काळापुरत्या त्या दुसऱ्या प्रदेशात निघून गेल्यासारख्या वाटायच्या. शोपॅं किंवा बेथोवनच्या संगीतानं कसा शांत माहौल तयार होतो तसा माहौल ती सिगरेट त्यांच्या आत तयार करते आहे असं वाटायचं. सिगरेट ओढून संपल्यावर त्या डोळे उघडायच्या तेव्हा त्यांच्या डोळय़ांत एक शांत सुखाचं हसू असायचं. ती ओढून संपल्यावरही काही काळ तिची सिंफनी त्यांच्या मनात वाजते आहे असं वाटायचं. त्या एकापाठोपाठ एक अशा खूप कधीच नाही ओढायच्या. पण जेव्हा ओढायच्या तेव्हा तादात्म्यानं. सिगरेट ओढावी तर त्यांनीच असं मला अजूनही वाटतं.
 विद्यालयातून बाहेर पडलेला एक फार उत्तम नट होता. तो दिल्लीतच इतर संस्थांच्या नाटकांमधून कामं करायचा. पण खूप दारू प्यायचा. त्याची जीभ हळूहळू जडावत चालली होती. रंगमंचावर काय बोलतो ते कळेनासं होत चाललं होतं. त्याच्यावर आमच्या विद्यालयात शिकणारी एक मुलगी फार प्रेम करायची, सुंदर मुलगी. बारीक डोळे. बाहुलीसारखा गोल चेहरा. गोरी, तेज कांती. तिच्यामुळे तोही बऱ्याचदा विद्यालयाच्या आवारातच असायचा. दिवसा तिच्याशी माणसासारखं वागणारा तो रात्री प्यायला की तिला मारायचा. तिचं हसणं फार सुंदर होतं. त्याचा मार खाऊन ते विझत चाललं होतं. शांत पानगळ पाहताना आत किती खोल, उदास वाटत राहातं. ती उदासी हळूहळू तिच्या हसऱ्या डोळय़ांत झिरपत चालली आहे. तिचं त्याचं दररात्री विद्यालयातल्या नाटय़रंगमंचाबाहेर भांडण चालायचं. ती त्याला त्याच्या हाताला धरून तिच्याकडे ओढू पाहायची. तो तिला झिडकारत रंगमंचासमोरच्या आवारात नशेत झुलत चालत राहायचा. तो मुंबईला आला असता तर त्याचं खूप मोठं नाव झालं असतं. पण तो दारूत बुडून तिथेच राहिला. त्याला समजावून समजावून, दमून अखेर नाइलाजानं ती मुलगी एकटीच मुंबईला आली. तिचे उदास डोळे घेऊन. हे सगळं बघून मला सिगरेट इतकाच दारूचाही तिटकारा वाटायला लागला. पण या दोन्हीपेक्षाही ‘डेंजर’ अशी गोष्ट एका होळीच्या दिवशी माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे अर्थातच ‘भांग’!
 माझे या क्षेत्रातले काही अनुभवी मित्रमैत्रिणी दरवर्षी होळीला ‘भांग’ बनवायचे. पहिली दोन र्वष मी ती न पिता ठाम राहिले, पण विद्यालयातलं शेवटचं र्वष आलं. तेव्हा माझे हे ‘अनुभवी’ मित्रं-मैत्रिणी मला म्हणाले, ‘‘हे शेवटचं वर्ष आहे, तू प्यायलीच पाहिजेस!’’ मी नेहमीसारख्या अनेक नकारघंटा वाजवल्या, पण या वेळी त्या मित्रमैत्रिणींचा आवाज जरा जास्तच मोठा होता. मलाही मग वाटलं, अभिनेत्री म्हणून आपल्याला एकदा तरी अनुभव हवा! (व्यसनाची तकलादू कारणमीमांसा!) मी तेव्हा लहानच होते, कुणी तरी मला सांगितलं, ‘‘भांग जपून पी हं, नंतर मुलं फायदा उठवतील तुझा, कळायचं पण नाही!’’ झालं! घाबरूद्दीन शर्मा झाला माझा. माझ्या एका न पिणाऱ्या मैत्रिणीची नेमणूक मी होळीच्या दिवशी माझ्यावर लक्षं ठेवण्यासाठी केली. मी पीत असताना तिनं माझ्यावरून डोळे हटवायचे नाहीत अशी तिला सक्त ताकीद होती. हळूहळू वातावरण तापू लागलं. मोठय़ांदा गाणी लावून लोक भांग पीत नाचू गाऊ लागली. मी पहिला ग्लास तोंडाला लावला. अप्रतिम चव होती. आनंदात प्यायले. काहीच झालं नाही. मैत्रीण जवळच्याच एका दगडी बाकावर बसली होती. तिच्या दिशेनं पाहिलं. तिनं ‘मी पाहाते आहे’ अशा अर्थाचा हात केला. दुसरा ग्लास घेतला. स्वर्गीय चव. पिऊन टाकला. खरं तर सगळय़ा ‘अनुभवी’ लोकांनी आधीच सांगितलं होतं, ‘‘भांग उशिरा चढते. पहिल्यांदा पिते आहेस फक्त दोन ग्लास पी.’’ पण माझं डोकं आणि त्याच्या आतली बुद्धी दोन्ही आता तरंगायला लागलं होतं. मला वाटायला लागलं ‘वा! आपण भन्नाट शक्तिमान दिसतो आहे, आपल्याला तर चढतच नाही!’ तिसरा ग्लास घेतला. तो अर्धा प्यायला तोच कुणी तरी मिठाई हातात ठेवली. ती खाल्ली आणि अचानक.. अचानक ब्रह्मानंदी टाळी लागली! एरवीच्या आयुष्यात आपण आपल्याशी जोडलेले असतो, एका अदृश्य धाग्यानं. तो धागा आपला हात आपल्या हातात ठेवत असतो. याआधी मी दारू प्यायले होते, पण आवाक्यात, तोल ढळू न देता. माझा माझ्या हातातला हात सुटू न देता. भांगेनं मात्रं काही अजबच केलं आत.. मला माझ्याशी जोडणारा धागा कुणीतरी एका क्षणात कात्रीनं सप्कन् तोडला आहे असं वाटलं. माझा हात माझ्याच हातातून सुटल्यासारखं वाटलं. मीच माझ्यापासून एका जत्रेत हरवले आहे असं वाटलं. घाबरले.
मैत्रीण बसलेल्या दगडी बाकाकडे पाहिलं. ती नेमकी कुठल्याशा निमित्तानं तिथून गायब होती. नशेतही धाबं दणाणलं. जगलेलं सगळं आयुष्य मेंदूत वेडेवाकडे फिरते आहे, असं वाटायला लागलं. विचार हवेत वेडेवाकडे तरंगायला लागले. मी घायकुत्या अधाशीपणानं, घाबरून कुठल्याशा एकाच विचाराला हातात घेऊन घट्ट पकडून बसायला लागले. पहिल्यांदा कुणीसं सांगितलेलं आठवलं, ‘‘नशेनंतर मुलं फायदा उठवतात.’’ त्या विचारानं माझा ताबा घेतला. मी घाबरून समोर उभ्या असलेल्या माझ्या एका मित्राच्या दिशेने गेले. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या खांद्यावर हात मारून ते वेधलं आणि म्हणाले, ‘‘ए, सुन, मेरा फायदा मत उठा हां! बहुत बुरा होगा!’’ तो आधी काहीच न कळून माझ्याकडे पाहात राहिला. मग मला चढलीये हे कळून हसला. त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाला, ‘‘ना रे बच्चा! बिल्कुल नही उठाऊंगा तेरा फायदा!’’ नंतर माझ्या नशेच्या भरात मी जवळ जवळ प्रत्येक आसपासच्या मुलाला ‘‘फायदा मत उठा!’’ अशी तंबी दिली. मी फार सुदैवी मुलगी होते. माझ्या तिथे असलेल्या एकाही मित्रानं माझा फायदा तर उठवला नाहीच, उलट एका मित्रानं माझ्यावर लक्ष ठेवण्याचं काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीला शोधलं आणि तिला माझ्या रूमवर घेऊन जायला सांगितलं. माझी ती मैत्रीण मला रूमवर नेत असतानाच अचानक माझ्या पायाखालची जमीन दरीसारखी खोल जाते आहे, असं वाटायला लागतं. मी मरणार असं वाटायला लागलं. हाच तो मृत्यू! असाच दिसतो तो. मी एकदम त्या मैत्रिणीला घट्ट पकडलं, म्हटलं, ‘‘यार, मैं मर रही हँू! मुझे नही मरना यार.. मुझे बचा, मुझे बचाओ!’’ मी जिवाच्या आकांतानं ओरडत असताना त्याच्यावर आवाज चढवून ती ओरडली, ‘‘चूप! कुछ नही मरती तू!’’ तिच्या ओरडण्यानं मी एकदम जमिनीवर आले. मग तिनं अंघोळ घातली, बिछान्यावर झोपवलं, पांघरुणात लपेटून म्हणाली, ‘‘चल, सो जा अभी, सब ठीक हो जायेगा.’’ मला नशेतही तिच्याविषयी भरून आलं.
दुसऱ्या दिवशी डोळे उघडले आणि मी जिवंत आहे याचं हायसं वाटलं. आदला दिवस आठवला. तो वेगळा नक्कीच होता. अनुभव म्हणून मी तो नक्की जपेन. पण म्हणून तो दिवस मला पुन पुन्हा आयुष्यात यायला हवा आहे का? असं मी स्वत:ला विचारलं तेव्हा माझ्या आतून एक घाबऱ्या आवाजात नकार उमटला. तरीही त्या दिवसाची मी ऋणी आहे. त्यानं माझी आणि नशेची ‘तोंडओळख’ करून दिली. त्या ओळखीनं मला शिकवलं ‘नशा प्रामाणिक असते. ती कुणालाही फसवत नाही. ती स्पष्टवक्ती आहे. तिचा हात हातात घेतलेल्या प्रत्येकाला ती ‘ती काय चीज आहे’ हे पहिल्याच भेटीत सांगते. निमा मॅडम, सारखे काही जण तिला पुरते ओळखून मगच तिच्या हातात हात ठेवतात. त्यामुळे तिच्या मादक नृत्याबरोबर तिच्याच डौलात नृत्य करू जाणतात, पंच्याऐंशीच्या वर्षीसुद्धा. माझ्यासारखे काही ‘ये अपने बस की बात नही’ म्हणून कानाला शांत खडा लावतात आणि दारूत बुडलेल्या त्या उत्तम नटासारखे काही तिनं दाखवलेला मृत्यू पाहूनही न पाहिल्यासारखा करून तिच्यामागे जातच राहतात, परतीची वाट बंद होईपर्यंत. परवाच कळलं, तो उत्तम नट गेला. अकाली. पुन्हा एकदा, खूप वर्षांनी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या हसऱ्या मैत्रिणीचे उदासून गेलेले डोळे आठवले मला.. आठवतच राहिले..  

First Published on January 25, 2014 6:09 am

Web Title: intoxication
Next Stories
1 फिरकी
2 एक उलट.. एक सुलट : निरोप
3 अस्तु
Just Now!
X