News Flash

माझं शिक्षण आणि आई

‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत.

| July 13, 2013 01:01 am

‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत. त्या लिहीत असताना कुणी भेटायला आले तर शांतपणे उठत अन् आदरातिथ्य करत. सून वीणाने जेवायला हाक मारली तरी पेनाला टोपण लागे. ‘मी आणि माझे शब्द यांचे एक सुंदर जग आहे अन् त्यावर माझी पूर्ण हुकमत आहे. गृहिणीपद मला तेवढेच प्रिय आहे किंबहुना तीच माझी प्राथमिकता आहे’ हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून इतरांर्पयंत  पोचत असे..
प्रतिभासंपन्न कवयित्री इंदिरा संत यांची आज पुण्यतिथी. यंदाच्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त हे दोन लेख. कवयित्री म्हणून त्यांची प्रतिभा साऱ्यांनाच माहीत आहे. परंतु त्याही पलीकडच्या त्यांच्या आई म्हणून, घरातील कर्ती म्हणून ठाम, निग्रही, पण संयत रूपाचं हे दर्शन.
मा झ्या आईनं माझा अभ्यास नक्की कधी घ्यायला सुरुवात केली हे आता आठवत नाही. पण हा विषय मनात आला की एक दृश्य नेहमी मनासमोर उभं राहतं. मी माजघरात भिंतीला टेकून मांडी घालून बसलो आहे. हातांचे विनाकारण होणारे चाळे आणि हालचाली थांबून मन अभ्यासावरच चिकटून राहावं म्हणून छातीवर हात बांधलेले आहेत. आई माझ्या शेजारी बसलेली आहे. तीही काहीही काम न करता बसलेली आहे. माझं लक्ष इकडेतिकडे जाऊ नये म्हणून एकूण कडेकोट बंदोबस्त आहे आणि त्यात मी सरस्वतीच्या दरबारात पहिली पावलं टाकत आहे.
‘‘चला, बाराखडय़ा सुरू करू या. म्हण, ‘‘ककाकिकी’’ ती म्हणे.
पण ‘बाराखडय़ा म्हण’ हा परवलीचा शब्द कानांवर आल्यावर मी लगेच सुरू करतो. अगदी दणदणीत आवाजात: ‘‘ह: हा: हि: ही: ..’’ तो हाहाकार ऐकताना ती डोळे मिटून घेते (बहुधा कान मिटून घेता येत नाहीत, म्हणूनच असणार.) आणि संपल्यावर माझ्याकडे पाहते.
मी ‘क’ची बाराखडी सुरू करून ‘ज्ञ’ची नाकाच्या बुडख्याला खाज आणणारी बाराखडी म्हणता म्हणता संपवतो. थोडी विश्रांती झाल्यावर ती म्हणते, ‘‘चला, आता एक ते शंभपर्यंत अंक आणि नंतर विसापर्यंत पाढे.’’
तिचं वाक्य संपेपर्यंत मी पट्टा सुरू केलेला असतो. ‘‘एक्क्याण्णव, बॅण्णव..’’ शंभर हा आकडा शक्य तितका जोरदार म्हटल्यावर मी हळू आवाजात ‘एऽक’ – दोऽन, तीऽन.. सुरू करून ‘श्शंभ्भर’ला विश्रांतीसाठी पोचलेला असतो.
बरीच ‘हाहाहिही’ केल्यानं आणि ‘अ‍ॅण्णव’चा पाढा दोनदा म्हणायला मिळाल्यानं मी अगदी खुशीत आलेला असतो. अभ्यासात मजा आलेली असते. पुढं विसापर्यंतच्या पाढय़ाची सुरुवात दहाच्या पाढय़ांची नांदी म्हटल्याशिवाय कधी नाहीच.
ही अभ्यासातली अशी मागे-पुढेची आंदोलनं तिनं पूर्वानुभवानं घेऊ दिलेली होती. लहानपणी माझा स्वभावच तसा होता. मी पहिलाच मुलगा असल्यानं कौतुकाचा माझ्यावर बराच वर्षांव झाला असणार. माझ्या आवडीनिवडी बऱ्याच तीव्र बनल्या असणार. याच्या कलानं गेल्यास शिस्तीत जराशी लवचिकता ठेवल्यास याला ‘मॅनेज’ करणं सोपं आहे. नाही तर झटापटी कराव्या लागणार. अभ्यास करून घेण्यातला आपला आणि करण्यातला याचा आनंद हरपून जाणार, हे तिनं फारच लवकर ओळखलं असणार. त्यामुळं तिनं हे असं लवचीक धोरण आखलं असणार. परिणाम असा झाला की, मी अभ्यासाला कधी कंटाळलो नाही.
हा क्रम मी इंग्रजी पहिलीत जाईपर्यंत सुरू राहिला. या सुमारास माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं. सर्व संसार वाहायची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर आली. माझ्यावरही काही नव्या जबाबदाऱ्या एकदम येऊन कोसळल्या. त्यातली एक अतिशय महत्त्वाची म्हणजे लहान भावंडांचा अभ्यास घेण्याची.
शाळेतून घरी येऊन खेळायला अंगणात उतरलेल्या लहान मुलांना घरात येऊन अभ्यासासाठी कंदिलाच्या भोवती बसायला लावणं खरोखरच अवघड, आणि आपल्या भावंडांचा अभ्यास घेण्याची जबाबदारी, अवघड गुणिले दहा!
मी माझ्या बहिणीला आणि भावाला अंगणातून आणून त्यांचा अभ्यास सुरू करत असे. दिवसभरातल्या अनेक गमती मनात येत. उद्या काय काय करायचं हे विचार असत. आणि आपलाही अभ्यास व्हायचाय ही टोचणी. केव्हा एकदा यांचा अभ्यास संपेल असं मला व्हायचं. एक दिवस त्या दोघांचे पाढे सुरू होते. सतरा आणि एकोणीसचे पाढे माझे शत्रू होते! मी म्हटलं, ‘‘तुम्ही पाढे म्हणत राहा, मी पाच मिनिटांत आलोच,’’ आणि माडीवर गेलो. योग्य वेळानं खाली येऊन मी म्हणालो. ‘‘चला, मघाशी आपला एकोणीसचा पाढा संपला. आता वीसचा सुरू.’’ त्या दोघांनी वीसचा पाढा मोठय़ा उत्साहानं म्हणून संपवला. माझ्या लक्षात आलं की, दोघांनाही ही उडी पसंत आहे. मग रोजच हा प्रयोग सुरू झाला. सोळाच्या पाढय़ानंतर मी पाच मिनिटं बाहेर जाऊन आलो की मी काही विचारायच्या आतच ते ‘‘आपण विसापर्यंत आलो होतो.’’ म्हणत. मग वीसच्या पाढय़ाचा गजर होऊन अभ्यास ‘समाप्त!’ आम्ही तिघंही खुशीत होतो. आईच्या लक्षात ही गोष्ट आली होती की नाही माहीत नव्हतं. पण माझ्या मनात सारखी रुखरुख होती. हे बरं नाही म्हणून.
एक दिवस सकाळी ती मला म्हणाली, ‘‘आपला श्यामराव वाणी सगळ्यांना, विशेषत: लहान लहान मुलांना फसवतो की नाही? त्याचं -’’ मी म्हणालो. ‘‘परवा मी त्याच्याकडे गेलेलो तर चार आण्यांची पाच चॉकलेटं द्यायच्या ऐवजी त्यानं मला चारच दिली. मी त्याला सांगितलं तर तो म्हणाला, ‘मी तुला पाचच दिली होती. तू एक खाल्लंस आणि आता खोटं बोलतोस. तुला-’’ मी एवढं म्हणेपर्यंत आई म्हणाली, ‘‘श्यामरावप्रमाणं तूही तुझ्या भावंडांना अभ्यासात फसवत आहेस हे माझ्या लक्षात केव्हाच आलं आहे. तुला पाढे नीट पाठ नसतील तर अंकलिपीतून वाचून तू त्यांचा अभ्यास घे. म्हणजे तुलाही बरं वाटेल आणि त्यांचा अभ्यास व्यवस्थित होईल. शिवाय आणि मलाही कितीतरी आनंद होईल. नाहीतर मग तेही काम मलाच करावं लागेल, लागू दे का?’’
माझ्या डोळ्यात पाणीच आलं.
बेळगावपासून जवळच खानापूर नावाचं गाव. तिथं आईला काही कामासाठी जायचं होतं. त्या वेळी कवयित्री संजीवनीबाई मराठे आणि त्यांचे पती रामभाऊ मराठे खानापूरला राहत असत. काम पूर्ण करावं, संजीवनीबाईंकडे एक रात्र राहावं आणि दुसऱ्या दिवशी परत यावं असा कार्यक्रम ठरला. मी त्या वेळी इंग्रजी तिसरी-चौथीत असेल. खानापूरला जाणारी गाडी सकाळी लवकर होती. टांगेवाल्यानं थोडासा दगा दिल्यानं आम्हाला घरातून निघायला उशीरच झाला. आमचा टांगा स्टेशनवर पोचला तेव्हा गाडी स्टेशनमध्ये उभी होती. गार्डसाहेब उत्साहानं शिटय़ा वाजवत होते आणि इंजिन वाफ जोरातच सोडत होतं. आम्ही धावतपळत तिकीट काढलं आणि फ्लॅटफार्मवर समोरच दिसणाऱ्या डब्यात शिरलो. मी आत घुसून जागा धरायच्या धांदलीत होतो आणि आई डब्याच्या पायऱ्या चढत होती. एवढय़ात माझ्या शेजारचा एक माणूस कुणाला तरी म्हणाला, ‘‘काऽय हो हे रेलवेऽ! यायचं आणि जायचं टाइम एकदम कंडम करून सोडणार बगा! आता आमचं हे गाडी मिरजला केव्हा जाणार आणि आम्ही लग्नाला केव्हा जाणार-’’ वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मी त्याला विचारलं.
‘‘ही गाडी खानापूरला जाते ना?’’
‘‘कुठलं हो! खानापूर तिकडं दक्षिणला राहिलं आणि हे कासवछाप गाडी हिकडं उत्तरला निगायलंय बगा. तुमाला कुठे-’’
पुढचं वाक्य ऐकायच्या आतच मी आईला म्हणालो, म्हणजे ओरडलो, ‘‘आक्का, ही गाडी खानापूरची नाही. मिरजेची. खाली उतरू या.’’ मी परत डब्याच्या दाराकडे यायच्या आत ती धावत्या गाडीतून खाली उतरलीही होती. माझ्या हातात एक छोटीशी बॅग होती. मी खाली पाहिलं फ्लॅटफॉर्म हळूहळू मागे निघाला होता. आई फ्लॅटफॉर्मवर उभी होती. ती मला काहीतरी सांगत होती. मी विचार न करता उडी मारली. तीनचारदा कुशी बदलूनच मी उताणा पडलो. प्लॅटफॉर्मवर लोकाची धांदल सुरू होती.. ‘‘पोरगा पडला, पोरगा पडला-’’ असं कोणीतरी ओरडत होतं. मी डोळे  उघडले तोपर्यंत आई माझ्या शेजारी येऊन बसली होती. मला प्रश्नावर प्रश्न विचारत होती. मी ठीक आहे ना, हे पाहण्यासाठी.
डोकं गरगरायचं थांबल्यावर मी सावकाश उठून बसलो आणि नंतर चक्क उभा राहिलो. खरचटण्यापलीकडे मला काहीही झालं नव्हतं. ती तर अलगदच उतरली होती. आजूबाजूला जमलेल्या लोकांकडून अमूल्य माहिती मिळाली. ‘‘आता गेलं ते गाडी हुबळी-मिरज बगा. तीन तास लेट होऊन आलेलं. आता ते बाहेर पडल्यावर मिरज-हुबळी येतंय बगा.’’
मी आईला विचारलं, ‘‘आता काय करायचं खानापूर गाठायचं?’’
आम्ही दोघेही चांगलेच हादरलो होतो. मी उभा होतो, पण माझे पाय लटपटत होते. आईला काय वाटत असेल असं मला वाटत असतानाच आमचा टांगेवाला म्हणाला, ‘‘पहिल्या पेट्टालाच आक्षीदेन झाल्यावर? अपशकुनच म्हणून सोडा, चला परत ठळकवाडीला, घरला.’’
मी आईकडे पाहत होतो. ती नेहमीप्रमाणेच अगदी व्यवस्थित होती. टापटिप! ती म्हणाली, ‘‘प्रवास करायचा म्हटल्यावर असले बारीकसारीक अपघात व्हायचेच. यात अपशकुन काय आहे? चालत्या गाडीतून पडूनही तुला काहीही झालं नाही. हा केवढा तरी शकुनच आहे. संजीवनीबाई, रामभाऊ वाट पाहत असतील. शिवाय माझं काम आहे त्याचं काय? ते कोण करणार? आता खानापूरची गाडी येईलच. आपण त्या तिथल्या बाकावर बसू या. गाडी आली की सावकाश आत बसू या.’’
माझे लटपटणारे पाय ठाम झाले होते.
पुढच्या गाडीनं आम्ही खानापूरला गेलो. परत सुखरूप बेळगावला घरी आलो. सर्व काही ठीक झालं.
फक्त एक गोष्टी झाली. त्यानंतर कोणत्याही बसमध्ये किंवा रेल्वेत बसल्यावर तिचा पहिला प्रश्न असायचा. ‘‘आपण जाणार तीच गाडी ना ही? परत कुणाला तरी विचार.’’ मग बरोबर जो कुणी असेल त्यानं चौकशी करायची आणि तिला सांगायचं, ‘‘होय.’’ ‘‘चला,’’ ती म्हणायची. आणि प्रवास सुरू व्हायचा.
काही वर्षांपूर्वीच ती शेवटचं कऱ्हाडला आली होती. परतताना तिला आम्ही मुंबई-बेळगाव बसमध्ये बसवून दिलं. अगदी पुढे डावीकडची, खिडकीकडची सीट, सामान लावलं आणि कंडक्टरसाहेब घाई करायला लागल्यावर खाली उतरलो. मी खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. मला जवळ बोलावून ती म्हणाली, ‘‘ही गाडी बेळगावलाच जाते ना?’’
‘‘मुंबई – बेळगाव अशी पाटी आहे, काळजी करू नकोस,’’ मी म्हणालो.
‘‘या एसटीच्या लोकांचं काही सांगता येत नाही. कधी कधी ते गाडीच्या पाटय़ा उलटय़ासुद्धा लावतात. तू ड्रायव्हरला विचार,’’ ती म्हणाली. तोपर्यंत ड्रायव्हरसाहेब सीटवर बसलेलेच होते. मी त्यांना विचारलं तेव्हा ते खास बेळगावी आवाजात म्हणाले, ‘‘बेळगाव! दुपारी एकपर्यंत पोचणार बगा. रैट्टाइम्!’’ एवढय़ात डबल बेल वाजली आणि गाडी सुटली.
आई माझ्याकडे पाहून हसली. मीही तिच्याकडे पाहून हसत होतो. आमची खानापूरची सहल मला नीटच आठवत होती.
वडिलांच्या मृत्यूनंतर आमची आर्थिक परिस्थिती बिकटच झालेली असणार. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शिफारशीमुळे बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजमधील वडिलांच्या जागीच आईला नेमणूक मिळाली होती. ते कॉलेज तेव्हा बेळगावातल्या महिला विद्यालय या शाळेत भरत असे. शाळेच्या कामात अडथळा न आणता कॉलेज चालवलं जायचं. त्यामुळे आईला सकाळ-संध्याकाळ काम करावं लागे. बसनं येण्याजाण्यातही खर्च होई. वडिलांच्या आजारीपणातही बराच खर्च झाला असावा. आम्हा भावंडांच्या अंगावर साधेच कपडे असायचे. तीही बहुधा एकच जोडी असायची.
शाळेतले बरेच मास्तर माझ्या वडिलांचे ट्रेनिंग कॉलेजमधले विद्यार्थी होते. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी आणि सहानुभूती वाटत असे. मला ते नेहमी मदत करत असत. एकदा हेडमास्तरांनी मला त्यांच्या ऑफिसात बोलावलं. माझी चौकशी वगैरे केली आणि ते मला म्हणाले, ‘‘बाळ, माझं तुझ्याकडे लक्ष असतं. तू नेहमी चपला न घालता शाळेत येतोस. चपला का घालत नाहीस?’’
‘‘माझ्याकडे चपला नाहीत.’’ मी म्हणालो.
‘‘त्यासाठीच मी तुला बोलावलं. चल, आतल्या खोलीत ये,’’ ते मला आतल्या एका खोलीत घेऊन गेले. तिथे एक लाकडी पेटी होती. ती त्यांनी उघडली. ती चपला आणि बूट यांनी भरलेली होती.
‘‘या सगळ्या, पोरांच्या शाळेत विसरलेल्या चपला आहेत. तुझ्या पायाला येणाऱ्या चपला तू घेऊन जा. पण अनवाणी फिरू नकोस.’’ त्यांनी ती पेटी उलटी केली. खाली पडलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारांच्या चपला ते पाहायला लागले. एक पठाणी चपलांची जोडी त्यांनी माझ्या हातात दिली. ‘‘पायात घालून बघ’’ ते म्हणाले. मी त्या चपलांत पाय सरकवला. माझ्या पायाच्या चपला होत्या त्या. जवळजवळ नवीन. मला खूप आवडल्या. त्यांनी उरलेल्या चपला पेटीत भरल्या, त्या पठाणी चपला एका फडक्यानं साफ केल्या आणि मला दिल्या. त्या दिवशी त्या चपला घालूनच मी घरी गेलो. ऐटीत!
आईला मी ते सर्व सांगितलं. तिला राग काही आला नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ‘‘त्यांनी दिल्या आणि तू घेतल्यास.’’ ती म्हणाली. नंतर ती गप्पच बसली. मला काही समजेनासं झालं होतं. त्या चपला घालून मित्रांच्या घरी जाऊन यायचं असं मी ठरवलं होतं. पण मी गेलो नाही.
दिवेलागणीच्या सुमारास आमच्या घरासमोर सायकलची घंटा वाजली. मी दार उघडलं. दारात हेडमास्तर उभे होते. आई माझ्या शेजारी उभी होती. ‘‘बाई, मी सरांचा विद्यार्थी, सरांनी मला जितकं दिलं त्यातलं अंशभरही मी फेडू शकत नाही. मध्यंतरी शाळेची सफाई करताना ही जोडी मी पाहिली. आणि मला वाटलं, ही याला हवी का विचारलं. त्याला दाखवल्यावर त्याला आनंद झाला. मी त्याला देऊन टाकली. पण घरी गेल्यावर मनाला टोचणी लागली. आपण हे असं परस्पर करायला नको होतं. चुकलो. म्हणून तुम्हाला भेटायला आलो. केवळ प्रेमाखातर मी हे केलं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा रागावू नका. तुम्हाला आवडलं नसेल तर माफी मागून परत घेऊन जातो.’’
‘‘आधी आत या आणि या खुर्चीवर बसा. चहा घ्या, मग जा.’’ ती म्हणाली. मास्तरांना चहा करून दिल्यावर ती म्हणाली. ‘‘मास्तर, यानं मला सगळं सांगितलं होतं. थोडा वेळ मला वाईट वाटलं, ते अशी परिस्थिती आमच्यावर, याच्यावर यावी म्हणून. तुम्ही चपला स्वत: शोधून त्याला आपल्या हातानं स्वच्छ करून दिल्या असं तो म्हणाला होता. त्याच्या डोळ्यांतल्या आनंद मलाही दिसला होता. तुम्ही योग्य तेच केलंत. हा त्या चपला आनंदानं वापरेल.’’ ती म्हणाली.
मास्तरांनी डोळ्यांवर रुमाल धरला होता. बऱ्याच वेळानं त्यांनी तो काढला. आईला वाकून नमस्कार केला आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून ते निघून गेले. त्या पठाणी चपला चांगल्याच कडक होत्या. पण हट्टानं बरेच दिवस वापरल्यावर त्या एकदम मऊ झाल्या. नंतर कधीतरी माझे पाय त्यात मावेनासे झाले. त्या आम्ही घराच्या माळ्यावर टाकून दिल्या. अधूनमधून घरसफाईच्या वेळी त्या दिसायच्या.
(प्रकाश नारायण संत यांच्या ‘मौज प्रकाशन’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘चांदण्याचा रस्ता’ या पुस्तकातून साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:01 am

Web Title: kaviyatri indira sant
Next Stories
1 संगीत ‘मराठेशाही’
2 ‘मनगंगे’च्या निमित्ताने
3 माझं नववं अपत्य!
Just Now!
X