20 September 2020

News Flash

मनाकडून अंत:करणाकडे

मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त सजीव आणि संवेदनक्षम. म्हणूनच मनाच्या

| November 17, 2012 04:31 am

मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्यांचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त सजीव आणि संवेदनक्षम. म्हणूनच मनाच्या स्तरावरून मुलांशी साधलेला संवाद हा संवेदनहीन ठरू शकतो, म्हणूनच घातकही. मुलांशी संवाद साधण्यासाठी आपण मनाकडून अंत:करणाकडे वळायला हवं..
पालक आणि शिक्षकांकडून मुलांना देण्यात येणारा शारीरिक मार या विषयावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र अनेक जणांकडून आपल्या पाल्याला मिळणारा मानसिक मार दूरगामी नकारात्मक परिणाम करीत असतो. त्या पाश्र्वभूमीवर हा खास लेख.
मनोविकारशास्त्राने आपल्याला आयुष्य नावाच्या एका शाळेची असंख्य दालनं उघडून दिली आहेत, असं माझ्याकडे आलेली प्रत्येक केस बघताना जाणवतं. माणसाच्या जडणघडणीबद्दलचं कुतूहल आणखीनच गडद व्हायला लागतं. रोजच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचं महत्त्व कधी कधी वेगळय़ा प्रकारे जाणवतं. समोर बसलेल्या विवेककडे पाहून परवा असंच काहीतरी झालं. ‘‘मनात लहानपणापासून जो न्यूनगंड रुतून बसलाय तो काही केल्या जात नाही. माझे आई-वडील दोघेही खूप अहंकारी होते. त्यांची आपापसात खूप भांडणं व्हायची. घरात सतत एक प्रकारचा ताण असायचा. मी या ताणातच वाढलो. मला त्या दोघांनी कधी मारलं नाही. पण ते मला इतकं घालूनपाडून बोलायचे की त्यापेक्षा मारलेलं बरं.’’ चाळीस वर्षांचा विवेक आपली कहाणी सांगत होता. विवेक आज एका बँकेत चांगल्या पदावर कामाला आहे. ‘‘खरं म्हणजे मी माझ्या कामात चांगला आहे. पण माझी चूक होईल या भीतीने माझं काम बिघडतं. मला साधे साधे निर्णय घेता येत नाहीत. माझा आत्मविश्वास कमी पडतो. मला माझ्या बॉसचीसुद्धा भीती वाटते. माझ्या हे लक्षात आलंय की मला माझ्या बॉसच्या ठिकाणी मला माझे वडील दिसतात आणि मला थरथरायला होतं. माझ्या वडिलांची काही तत्त्वं होती. मुलांना धाकातच ठेवायचं. त्यांचं कौतुक करायचं नाही, त्यांना चांगलं म्हणायचं नाही. ते येता-जाता माझ्या चुका काढायला टपलेले असायचे. चुका दाखवण्याची त्यांची पद्धत आठवली तरी अंगावर काटा येतो. माझ्या हातून एखादी चूक झाली की संपलं. पुढचा एक तास मला त्यांचं व्याख्यान ऐकावं लागायचं. चूक होतेच कशी, इथून त्यांची सुरुवात असायची. मग ते माझी अक्कल काढायचे. तुला कसं काही कळत नाही हे ते वेगवेगळय़ा पद्धतींनी सांगायचे. आईची वेगळय़ाच गोष्टींवरून टीका असायची. ती मला रंगरूपावरून बोलायची. ‘तू कसा काळा आहेस. तुझं कपाळ किती लहान आहे. तुझे केस किती राठ आहेत. तू कसा पोक काढून चालतोस वगरे वगरे. आपण कशातच चांगले नाही हे माझ्या मनावर इतकं ठसलंय की विचारूच नका. ज्या अर्थी पुढे मी शिकलो आणि नोकरी मिळवली त्या अर्थी माझ्यात काही तरी चांगलं असणार हे माझ्या बुद्धीला पटतं, पण आतून असं वाटत राहतं की आपण कमी आहोत. आपण जिथे असायला हवे होतो तिथे आपण कधी पोहोचू शकणार नाही, हा विचार आतून पोखरत राहतो..’’ विवेकच्या मनातली सल त्याने उघडपणे व्यक्त केली होती. विवेकवर लहानपणी झालेल्या मानसिक अत्याचारांचं वर्णन ऐकून आणि त्याचे परिणाम पाहून मुलांच्या जडणघडणीचा एक वेगळा पलू समोर आला.
मुलांना शिस्त कशी लावावी, त्यात शिक्षेचं स्थान कोणतं, शिक्षा कशी करावी किंबहुना शिक्षा करावी की करू नये, याविषयी बरंच बोललं जातं. मुलांना मारण्याचे दुष्परिणाम सर्वश्रुत आहेत. मुलांना मारू नये, याबद्दल बहुतेकांचं एकमत आहे. शिक्षा शरीराला नको, मनाला हवी, हे वाक्यही चांगलंच लोकप्रिय आहे. ‘शहाण्याला शब्दांचा मार’ या नावाखाली अनेकदा मोठी माणसं मुलांवर शब्दांचा यथेच्छ भडिमार करतात. सतत झेलाव्या लागणाऱ्या नकारात्मक शब्दांचे किती गंभीर दुष्परिणाम होतात त्याचं विवेक हे बोलकं उदाहरण आहे. विवेक बोलता बोलता पटकन हे बोलून गेला की इतकं बोलण्यापेक्षा मारलेलं बरं. त्याची ही प्रतिक्रिया या पाश्र्वभूमीच्या संदर्भात घ्यायला हवी.
 विवेक त्याच्या आईवडिलांच्या टीकात्मक शब्दांचं लक्ष्य ठरला. मुलांच्या संदर्भात संवादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संवादातला ६०टक्के भाग देहबोलीचा असतो, ३० टक्के भाग आवाजांचा असतो आणि १० टक्केभाग शब्दांचा असतो. आकडय़ांच्या भाषेत हा भाग कमी आहे. पण ज्या वेळी संवादासाठी शब्दांचाच आधार जास्त प्रमाणात घेतला जातो त्या वेळी शब्द खूप महत्त्वाचे ठरतात. कुणाच्या तरी टी-शर्टावर वाचलेलं एक गमतीशीर वाक्य आठवतं. ‘.. बोलल्याशिवाय जर राहवतच नसेल तरच बोला.’’  पालकांना मुलांच्या बाबतीत ‘बोलल्याशिवाय राहवतच नाही’ अशीच परिस्थिती असते. पालकांना स्वत:चे ताण असतात. त्यांना मुलांबरोबर कमी वेळ मिळतो. तुटपुंज्या वेळात मुलांचे अभ्यास, त्यांचं वर्तन या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी हाताळताना पालक कठोर शब्दांचा वापर करतात. हे अनवधानाने होतं. त्यानंतर त्यांना त्याबद्दल पश्चात्तापही होतो. पण त्या पश्चात्तापातून आत्मपरीक्षण होतंच असं नाही. त्यांची बोलण्याची एक नेहमीची नकारात्मक पद्धत ठरून जाते. सातत्याने ऐकाव्या लागणाऱ्या नकारात्मक शब्दांचे मात्र मुलांवर निश्चितच दूरगामी परिणाम होतात. पालकांच्या आणि शिक्षकांच्या मानसिक ताणाला मोकळी वाट मिळावी म्हणून जर मुलांचा वापर होत असेल तर ते मुलांसाठी अधिकच घातक आहे. प्रत्येक मुलाची आत्मप्रतिमा त्याला त्याच्या वातावरणातून-परिस्थितीतून मिळणाऱ्या संदेशांवर अवलंबून असते. निरोगी आत्मप्रतिमा तयार होण्यासाठी मोठय़ा माणसांकडून सकारात्मक संदेश मुलांना मिळणं नितांत जरुरीचं आहे.
 सात वर्षांच्या अभिनवने रागाच्या भरात आपलं शाळेचं दप्तर फेकून दिलं. त्यावर त्याच्या वडिलांनी ते उचललं आणि आणखी दूर भिरकावलं आणि ते त्याच्यावर बरसले, ‘‘खरं म्हणजे मी तुलाच फेकून द्यायला हवं. ते मी करीत नाहीए हे तुझं नशीब समज. तुझ्यासारखा मुलगा या घरात आहे हे दुर्दैव म्हणायला हवं. अशाने तुला विद्या येईल कशी?  हे हल्ली फार वाढत चाललंय तुम्हा मुलांचं. सगळं मिळतंय आयतं म्हणून किंमत नाहीए कसली तुम्हाला. आमच्या लहानपणी असं नव्हतं. आम्ही नमस्कार करायचो नुसता पाय लागला पुस्तकांना तर.. तुमच्या या पिढीला.. ’’ वगरे वगरे बरंच काही. हे सुमारे दहा मिनिटं चाललं. अभिनव या एकपात्री प्रयोगाकडे भेदरलेल्या नजरेने बघत होता. या वाक्यांकडे नीट बघितलं तर लक्षात येईल की ही अनेक वर्षांच्या घडणीतून तयार झालेल्या मनातून आलेली आहेत. अभिनवला या वाक्यांतून काय संदेश मिळाला? दप्तर फेकणं योग्य की अयोग्य? आपण या घरात आहोत हे दुर्दैव म्हणजे नेमकं काय? मला एरवी आयतं सगळं मिळतं त्याचा या सगळय़ाशी काय संबंध? पिढी म्हणजे काय? या सर्व गोंधळात आपले वडील नेमके का चिडले?  याऐवजी त्यांनी जर फेकलेलं दप्तर नीट उचलून ठेवलं असतं आणि त्याला नेमक्या शब्दांत ‘तुला खूप राग आलाय हे मला कळतंय.’ एवढं सांगून थोडंसं थांबले असते तर कदाचित अभिनवला स्वत:चा राग शब्दांत व्यक्त करण्यासाठी वेळ आणि अवकाश दोन्ही मिळाले असते किंवा समजा, अभिनवचं वर्तन बघून वडलांचा राग अनावरच झाला असेल तर ‘मला हे मुळीच आवडलं नाही. मला भयंकर राग आलाय. आपल्या वस्तू फेकण्यासाठी नसतात. पुन्हा हे असं केलेलं मला चालणार’ अशा नेमक्या शब्दांत त्यांना आपला राग व्यक्त करता आला असता. राग व्यक्त झाल्यानंतर त्यांना स्वत:ला बरं वाटलं असतं, अभिनवला नेमका संदेश मिळाला असता आणि त्याचे दोघांवरही विपरीत परिणाम झाले नसते. मुलावर केलेली टीका ही त्याच्या व्यक्तित्वावर घाला घालणारी (तू असाच आहेस. तू कधी सुधारणारच नाहीस. तुला काहीतरी समजतंय का. तू जन्मला नसतास तर बरं) नसावी. ती त्याच्या नेमक्या वर्तनावर केलेली असावी.(तू वेळ फुकट घालवतो आहेस ते मला आवडत नाही कारण ते तुझ्यासाठी चांगलं नाही. आई मारण्यासाठी नसते, मारलं की आईला लागतं. तुझ्या अमक्या अमक्या वागण्याचा मला खूप त्रास होतो आदी) टीकेतून मुलाला सुधारणेची दिशा मिळावी. (तुला कसला राग आलाय ते तू शब्दांत सांग म्हणजे मला कळेल. तू यापुढे मला विचारून हे करशील) या प्रसंगानंतर दोघांच्याही मनात पश्चात्ताप नसावा, समाधान असावं. पालकांच्या मनात समाधान अशासाठी की आपण योग्य तो संदेश मुलाला दिला. मुलाच्या मनात समाधान अशासाठी की पालकांनी मला स्वीकारलं.
काही प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारावेत आणि या प्रश्नांच्या प्रामाणिक उत्तरांचा स्वत:शी शोध घ्यावा. आपण स्वत: ताणाखाली आहोत का? त्या ताणाच्या निवारणासाठी आपण रोजच्या रोज काय करतो? आपण ताणाखाली असताना आपण मुलाला हाताळतो आहोत का? तसं असेल तर आपण काय खबरदारी घ्यायला हवी जेणेकरून मुलाच्या(आणि आपल्याही!) मनावर विपरीत परिणाम होणार नाहीत? आपल्या मुलाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? त्यातल्या मुलाची क्षमता लक्षात घेऊन केलेल्या किती आणि आपल्या अपूर्ण राहिलेल्या किती? आपण आपलं आयुष्य मुलाद्वारे जगत नाही आहोत ना?  आपलं मूल आपल्या टोपीत खोवण्याचं पीस नाहीए ना? आपण दिवसभर मुलाशी जो संवाद साधतो त्यातला खरोखर अर्थपूर्ण आणि महत्त्वाचा किती? त्यात काही बदल करायला हवा आहे का? आपलं मुलावरचं प्रेम हे प्रेम म्हणून (उदा. मुलाबरोबर आनंदात घालवला गेलेला वेळ) व्यक्त होतं की त्याच्यासाठी पसे खर्च करून आणलेल्या वस्तूंमधून? की ‘प्रेमापोटी’ (आम्ही तुझ्यावर प्रेमापोटीच रागावतो ना, हे विधान अनेक पालक करतात) रागच व्यक्त होतो? आपण आपल्या नकळत कुठेतरी आतून मुलाला झिडकारतो किंवा नाकारतो आहोत का? मुलाबरोबर एकत्र मिळणारा वेळ ही आपल्याला शिक्षा वाटतेय का?
आपल्या आई-वडिलांनी आपल्याला जसं वाढवलं त्यातल्या आपल्याला न आवडणाऱ्या किती गोष्टी आपल्या हातून घडताहेत? यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं नकाराकडे झुकणारी असतील तर त्यातून नकारात्मक शब्द आणि प्रतिक्रिया जन्माला येण्याची शक्यता जास्त आहे.
कार्ल युंग नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्र एकदा न्यू मेक्सिकोतल्या एका आदिवासी भागात गेला. तिथल्या आदिवासी समाजाचा मुखिया ओच्विये बियानो याने त्याला एक मजेशीर गोष्ट ऐकवली. तो म्हणाला, ‘‘आमची मंडळी तुम्हा गोऱ्या लोकांना वेडे म्हणतात. तुम्ही गोरे लोक सदानकदा अस्वस्थ असता, सतत कसल्या ना कसल्या मागण्या करीत असता आणि कायम असंतुष्ट असता.’’  युंगने असं वाटण्याचं कारण विचारलं. त्यावर बियानो आपल्या डोक्याकडे बोट दाखवत उत्तरला, ‘‘ तुम्ही लोक इथून विचार करता आणि हे वेडाचं लक्षण आहे.’’ युंगने जेव्हा त्याला विचारलं, ‘ तुम्ही कुठून विचार करता?’, तेव्हा  बियानोने आपल्या हृदयाकडे बोट दाखवलं!  बियानोचा हा प्रतिसाद युंगला आत्मपरीक्षणासाठी प्रवृत्त करता झाला.
आपल्या मानसिक कार्यप्रणालीची दोन अंगं असतात. एक- ज्याला आपण मन म्हणतो. त्यालाच आपण बुद्धी असंही म्हणतो. दुसरं- ज्याला आपण अंत:करण म्हणू या. मन हे आपल्या ज्ञानाचं भांडार असतं. ते चूक-बरोबर, योग्य-अयोग्य यांतून निवड करतं आणि त्याचा न्यायनिवाडा करतं. कुठल्याही गोष्टीचं पृथ:करण करणं, मूल्यमापन करणं, हिशेब करणं, ही मनाची कामं आहेत. मन हे शिक्षणातून, संस्कारांमधून तयार होतं. ते नेहमी विचार, तर्क, ग्रह यांमधून व्यक्त होतं. कुठल्याही प्रश्नाची उकल करणं, कुठल्याही समस्येचा तौलनिक अभ्यास करणं यासाठी मन हे उत्कृष्ट साधन आहे. पण मनाच्या कार्याला मर्यादा आहेत. आयुष्यातल्या प्रत्येकच ठिकाणी तर्क, बुद्धी, विचार यांचा उपयोग होत नाही. समजा आपण एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी बसलेलो आहोत किंवा आपल्याला आवडणारं संगीत ऐकतो आहोत किंवा एक छोटं बाळ आपल्याकडे बघून खुदकन् हसलं किंवा आपल्याला आवडणाऱ्या जेवणाचं ताट आपल्यासमोर आहे. यातल्या कुठल्याही गोष्टीचा आनंद पुरेपूर घेण्यासाठी मनाच्या आधी सांगितलेल्या कार्याचा उपयोग नाही. किंबहुना ती करय या आनंदनिर्मितीच्या आडच येण्याची शक्यता जास्त आहे. इथे अंत:करणाने व्यवहार होऊ शकतात. अंत:करण मूल्यमापन करत नाही, ते चुका काढत नाही, तर्काच्या निकषांवर प्रत्येक गोष्ट घासूनपुसून बघत नाही किंवा विरोध करत नाही. ते ‘जाणतं’, ते ‘ओळखतं’, ते ‘ताडत’, ते ‘स्वीकारतं’ , त्याला गोष्टी ‘उमजतात’ ते कायम वर्तमानात असतं, कारण ते आपल्या पंचेंद्रियांशी निगडित असतं. म्हणूनच ते आपल्याला समोर असलेला क्षण जसा आहे तसा जगायला मदत करतं. आपली उत्स्फूर्तता, सर्जनशीलता, अंत:प्रेरणा यांचा अंत:करणाशी जवळचा संबंध असतो. मनाच्या अतिवापराने ताण वाढू शकतो. अंत:करण आपल्याला ताणातून मुक्ती देऊ शकतं. मन आणि अंत:करण यांचे हे गुणधर्म तपासून पाहिले तर हे लक्षात येईल की मुलं अंत:करणाच्या आणि मोठी माणसं मनाच्या माध्यमातून जास्त जगत असतात. मूल जितकं लहान तितकं त्याचं मन अप्रगल्भ आणि अंत:करण जास्त सजीव आणि संवेदनक्षम. म्हणूनच मनाच्या स्तरावरून मुलांशी साधलेला संवाद हा संवेदनहीन ठरू शकतो, म्हणूनच घातकही. अंत:करण स्वत:ला आणि इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतं. मुलांशी संवाद साधण्यासाठी आपण मनाकडून अंत:करणाकडे वळायला हवं. प्रतिक्रियांपेक्षा प्रतिसाद द्यायला शिकायला हवं. (प्रतिक्रिया ही भूतकाळाचे संदर्भ घेऊन येते. उदा.‘‘तुझा पसारा नेहमी मीच आवरतो. तुझं नेहमीच असं असतं. मला कंटाळा येतो.’’ प्रतिसाद हा आताच्या क्षणापुरता मर्यादित असतो. उदा.‘‘ चल, ताबडतोब हा पसारा आवरू या.’’)
एकंदरीतच आयुष्यातला ‘नकार’ कमी करायला हवा. म्हणजेच ‘सकारात्मक’ अनुभवांमध्ये जास्तीत जास्त बुडून जायला हवं. रोजच्या जगण्यातले छोटे छोटे आनंददायी अनुभव समरसून घेणं. घरासमोरच्या झाडाची कोवळी पानं सूर्यप्रकाशात चमचमताना पाहण्यापासून ते आपल्या कुटुंबीयांसमवेत हसण्या-खिदळण्यापर्यंतचे असंख्य आनंददायी अनुभव आपल्या मुठीत सामावण्याचं कौशल्य शिकण्याचं सामथ्र्य आपल्याकडे असतं हेच आपण रोजच्या धकाधकीत विसरलेलो असतो. त्याची फक्त आठवण ठेवणं महत्त्वाचं. निसर्गाशी रममाण होणं, कलांचा आस्वाद घेणं, छंद जोपासणं, ध्यान करणं यांमधून आपलंच अंत:करण आपल्याला गवसतं. तुज आहे तुजपाशी, परि जागा चुकलासी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2012 4:31 am

Web Title: kids live life from sould and elder person from mind
टॅग Kids
Next Stories
1 आणि त्या बोलू लागल्या..
2 रूढी परंपरांचे काटे…
3 मी जनाना महल बोलतोय…
Just Now!
X