कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान व योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे. या रोगासाठी पोलिओ किंवा देवीसारखी प्रभावी लस उपलब्ध नसल्याने पुढील काही वर्षे तरी हा रोग समाजात आढळून येत राहील. बहुविध उपचार पद्धतीचा वापर करून हा रोग आटोक्यात ठेवू शकतो.
कुष्ठरोगाचा इतिहास हा मानवी इतिहासाइतकाच जुना आहे. पूर्वी कुष्ठरोग म्हणजे हातापायाची बोटे झडणे, वाकडी होणे, नाक बसके होणे अशा विकृती डोळ्यापुढे येत. १९४० पर्यंत या रोगासाठी काहीच उपाययोजना नसल्याने रुग्णांना रोगाच्या सर्व अवस्थांमधून जाण्याचा प्रसंग येई. त्यातून कुष्ठरोग हा असा आजार आहे की त्यामुळे मृत्यू ओढविण्याची शक्यता नाही! त्यामुळे जे होईल ते भोगणे रुग्णांच्या नशिबी येई. आता मात्र प्रभावी बहुविध उपचार पद्धतींमुळे रोग बरा करणे शक्य झाले आहे.
कुष्ठरोगाची माहिती
कुष्ठरोग हा जंतुमुळे होणाऱ्या इतर रोगांसारखाच असला तरी काही वैशिष्टय़ांमुळे तो इतर रोगांहून वेगळा आहे. १८७३ मध्ये डॉ. हॅन्सन यांनी नॉर्वेमध्ये ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे’ या कुष्ठरोगांच्या जंतूचा शोध लावला तेव्हा एका रोगजंतूशी निगडित झालेला कुष्ठरोग हा पहिलाच मानवी रोग ठरला. कुष्ठरोगाच्या जंतूचे एक महत्त्वाचे वेगळेपण असे आहे की, हा अत्यंत मंदगतीने वाढणारा जंतू आहे. उदाहरणार्थ इ. कोलाय हा आतडय़ातील जंतू दर २० मिनिटांनी विभाजन होऊन एकाचे दोन जंतू तयार करतो. कुष्ठरोगाचा जंतू मात्र दर १२ ते १४ दिवसांनी विभाजित होतो. यामुळे जंतू शरीरात शिरून रोगाची लक्षणे दिसेपर्यंत २ ते १० वर्षे निघून जातात. मंदगतीने वाढ होणाऱ्या जंतूमुळे रोगाची लक्षणे व शरीरातील प्रसार हाही अत्यंत मंदगतीने होतो. कुष्ठरोग जंतूचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तो त्वचा, नाकातील श्लेष्मपटल यांच्याबरोबरच चेतातंतूंमध्ये शिरतो व तेथे हळूहळू वाढत राहतो. अशा प्रकारे चेतातंतूंमध्ये वाढणारा हा एकमेव जिवाणू आहे. याच कारणाने चेतातंतू हळूहळू नष्ट होऊन चट्टय़ांवर व हातापायामधील संवेदना कमी होऊन बधिरपणा येतो. बधिर भागावर भाजणे किंवा काही जखम झाली तर रुग्णाला काहीच संवेदना नसल्याने जखमा होतात, त्या दुर्लक्षित राहतात व अनेक वर्षे उपचार न केलेल्या रुग्णांमध्ये हातापायाची बोटे झडतात.
कुष्ठरोगाची लक्षणे
कुष्ठरोगाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे एका जंतूमुळे होणाऱ्या रोगातही विविध रुग्णांमध्ये त्यांच्या रोगप्रतिकारशक्तिनुरूप लक्षणांमध्ये दिसणारी विविधता. ढोबळपणे चांगली रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णामध्ये रोग नियंत्रित राहिल्यामुळे एक किंवा दोन चट्टय़ांपर्यंतच रोगाची मजल जाते. या प्रकारच्या आजारास टय़ुबरक्युलॉइड आजार म्हणतात. याउलट ज्या रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नगण्य असेल त्याची चेहरा, हातपाय, छाती, पाठ अशा सर्व ठिकाणची त्वचा जंतूंची बेसुमार वाढ झाल्याने लालसर, सुजलेली व चकचकीत दिसू लागते. या प्रकारास लेप्रोमॅटस् लेप्रसी म्हणतात.कुष्ठरोगाचे चट्टे पांढरट किंवा लालसर असू शकतात. काही रुग्णांमध्ये त्वचेवर चट्टे न येता केवळ चेतातंतू नष्ट होतात व अशा रुग्णांमध्ये हातापायास बधिरता येणे अथवा बोटे वाकडी होणे अथवा डोळा बंद न करता येणे अशी लक्षणे दिसतात. टय़ुबरक्युलॉइड रोगाचे निदान चट्टय़ावरील बधिरपणामुळे करता येते. याउलट लेप्रोमॅटस प्रकारात प्राथमिक अवस्थेत बधिरपणा नसतो व निदान करण्यासाठी त्वचेचा छेद घेऊन काढलेल्या द्रव्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करावी लागते. अशा तपासणीत लेप्रोमॅटस रोग्यांमध्ये रोगाच्या प्रकारानुरूप जंतू आढळतात. मात्र टय़ुबरक्युलॉइड प्रकारच्या रोग्यांमध्ये रोगजंतूंची संख्या इतकी कमी असते की, चट्टय़ावरील कातडीचा छेद घेऊन काढलेल्या द्रव्यात जंतू आढळत नाहीत. अशा वेळी बधिरपणाबद्दल शंका असल्यास त्वचेच्या तुकडय़ाची तपासणी (Biopsy) करून निदान करावे लागते.
कुष्ठरोगाचे उपचार
१९४०च्या सुमारास डॅपसोन हे औषध कुष्ठरोगावर उपयुक्त असल्याचा शोध लागल्यावर हा आजार लवकरच नियंत्रित होईल अशी आशा उत्पन्न झाली. अनेक रुग्ण बरेही झाले, परंतु लेप्रोमॅटस रुग्णांना हे औषध आयुष्यभर चालू ठेवावे लागे. काही रुग्णांनी अनियमित औषध घेतल्याने व काही रुग्णांना कमी मात्रेत औषध दिले गेल्यामुळे जंतू डॅपसोनला दाद देईनासे झाले. त्यामुळे १९६० सालानंतर डॅपसोनला दाद न देणाऱ्या जंतूंची व या जंतूंनी पछाडलेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. १९८० सालापर्यंत सुमारे ३० टक्के रुग्ण डॅपसोन या औषधाला दाद देईनासे झाले. या कारणाने जागतिक आरोग्य संघटनेने १९८२ साली बहुविध उपचार पद्धतीचा वापर जगभर सुरू करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सध्या पाचपेक्षा कमी चट्टे असणाऱ्या पॉसिबॅसिलरी रुग्णांना डॅपसोम गोळी रोज व रिफँपिसिन गोळी महिन्यातून एक वेळा या पद्धतीने सहा महिने उपचार दिले जातात. पाचपेक्षा जास्त चट्टे असलेल्या रुग्णांना तीन औषधे असलेली उपचार पद्धत वापरली जाते व कमीत कमी एक वर्ष उपाययोजना केली जाते. अशा रुग्णांना त्यांच्यामध्ये जंतूंची संख्या जास्त असल्याने मल्टिबॅसिलरी रुग्ण म्हणतात व डॅपसोन व क्लोफॅझिमिन गोळ्या रोज तसेच महिन्यातून एक वेळा रिफँपिसिन व क्लोफॅझिमिन गोळ्या दिल्या जातात.
रोगाची प्रतिक्रिया
औषध योजना चालू असताना अचानक रुग्णास ताप येणे, चट्टे सुजणे, नवीन चट्टे व गाठी अंगावर उठणे, नसा दुखऱ्या होणे व एकाएकी लकवा भरणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे मेलेल्या जंतूंमध्ये जे अँटिजेन्स बाहेर पडतात त्यांच्यावर रोगप्रतिकारकशक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे दिसतात. अशा वेळी खूपच त्रास होऊ शकतो. मूळ औषधे चालू ठेवून रिअॅक्शनसाठी वेदनाशामक औषधे व काही वेळा स्टॅरॉइड प्रकारची औषधे द्यावी लागतात.
कुष्ठरोग- सद्यपरिस्थिती
१९८२च्या सुमारास बहुविध उपचार पद्धत सुरू झाली तेव्हा कुष्ठरोगाचे भारतातील प्रमाण हजारी ५ इतके होते. त्यानंतर हे प्रमाण झपाटय़ाने कमी होत आहे. सन २००५ मध्ये हे प्रमाण देशात दर दहा हजारांत एकपेक्षा कमी इतके नोंदविले गेले. त्यामुळे हा प्रश्न आता फार मोठा राहिला नाही, म्हणून सर्व कुष्ठरोग योजना शासनाने बंद केल्या व कुष्ठरोगाची औषधे सर्वसाधारण रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली. परंतु अजूनही नवीन रुग्ण समाजात आढळून येत आहेत व या आजाराचे उच्चाटन झाले असे म्हणता येत नाही. आज जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीस ५ ते १० वर्षांनी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे पुढील १०-२० वर्षे तरी कुष्ठरोगाचे रुग्ण समाजात आढळून येणार आहेत असे समजण्यास हरकत नाही. यासाठी सर्वसाधारण नागरिकांना जागरूक राहणे आवश्यक आहे. लवकर निदान झाल्यास तत्पर उपाययोजना करून विकृती टाळता येतात. निदान होण्यास उशीर झाला तर रोग पसरून बधिरपणा व विकृती येऊ शकतात. त्यामुळे त्वचेवर न खाजणारा व बधिर चट्टा आल्यास किंवा हातापायास मुंग्या, बधिरपणा आल्यास किंवा त्वचा लालसर चमकदार दिसू लागल्यास ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. रोगाचे निदान झाले तरी घाबरण्याचे कारण नसते. प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. या रोग्यांपैकी केवळ २० ते २५ टक्के रोगी सांसर्गिक असतात व तेही उपाय सुरू केल्यावर असांसर्गिक होतात. त्यामुळे प्रत्येक रुग्ण घरात राहून उपचार घेऊ शकतो. मात्र घरच्या इतर लोकांची तपासणी अनिवार्य असते. त्यांच्यापैकी कोणात लक्षणे आढळली तर ताबडतोब उपचार करावे लागतात.
शेवटी असे अनुमान काढता येईल की, कुष्ठरोग हा इतर रोगांपेक्षा थोडा वेगळा असला तरी लवकर निदान व योग्य उपाययोजना करून रोग बरा करणे शक्य आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन