01 June 2020

News Flash

सायक्रोस्कोप : वर्तमानकाळातलं जगणं

आपण कित्येकदा गतकाळातल्या अप्रिय घटनांच्या विचारात आणि भविष्याच्या चिंतेत इतके गुंतून पडतो, की वर्तमानकाळातले कितीतरी सुंदर क्षण आजूबाजूला असूनही ते पाहू शकत नाही.

सध्याच्या अनिश्चित वातावरणात उपयोगी पडू शकतो तो उपाय म्हणजे, ‘वर्तमानकाळात जगा’.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपण कित्येकदा गतकाळातल्या अप्रिय घटनांच्या विचारात आणि भविष्याच्या चिंतेत इतके गुंतून पडतो, की वर्तमानकाळातले कितीतरी सुंदर क्षण आजूबाजूला असूनही ते पाहू शकत नाही. मग त्यांचा आस्वाद घेणं दूरच राहिलं. आताही बहुसंख्य लोक ‘करोना’चं संकट कधी दूर होईल, त्यावर औषध निघेल का, आपलं जीवन पूर्वीसारखं सुरळीत होईल का, यासारखे प्रश्न विचारून स्वत:च्या तणावात भर पाडत असतील. त्याचा  दुष्परिणामच अधिक होईल. त्यापेक्षा सध्याच्या अनिश्चित वातावरणात उपयोगी पडू शकतो तो उपाय म्हणजे, ‘वर्तमानकाळात जगा’.

जंगलात मार्गक्रमण करत असताना एका भिक्षूच्या पाठी वाघ लागला. वाघापासून वाचण्यासाठी तो जिवाच्या आकांतानं पळू लागला. पळताना एका ठिकाणी त्याचा पाय घसरला आणि खोल उतार असलेल्या एका घळीत पडला. पडत असताना जीव वाचवण्यासाठी त्यानं घळीतल्या एका झुडपाला घट्ट पकडून ठेवलं. त्याला खाली खोल दरी दिसत होती, पण त्याला वर चढता येत नव्हतं, कारण तिथं वाघ त्याची वाट पाहात होता.  अशा परिस्थितीत झुडपाला पकडून ठेवल्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हतं. त्या अवस्थेत त्याला दिसलं, की झुडपाला एक पिकलेलं रसदार फळ लटकलेलं आहे. त्यानं ते तोडून तोंडात टाकलं आणि म्हणाला, ‘‘वा! याची चव अगदी अमृततुल्य आहे.’’

बस! ही छोटीशी ‘झेन’ रूपककथा इथंच संपते. पुढे काय घडेल याची उत्सुकता कायम ठेवत ही कथा अचानकच आपला निरोप घेते. वाघ तिकडे किती वेळ बसून राहिला असेल, भिक्षू झुडपाला लोंबकळत किती वेळ राहील, तो  स्वत:ची सुटका करून घेऊ शकेल का, अशा परिस्थितीत त्याला ते फळ खाणं कसं सुचलं, यातल्या कुठल्याही प्रश्नांची निश्चित उत्तरं ही कथा देत नाही. ही उत्तरं वाचकांवरच सोपवल्यामुळे या कथेचं अनेक प्रकारे अर्थबोधन होऊ शकतं. ही कथा सद्य:परिस्थितीला अनेक अर्थानी लागू होऊ शकते. या कथेसारखेच अनेक प्रश्न सध्याच्या परिस्थितीत अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ, ‘करोना’चं संकट कधी दूर होईल, त्यावर औषध निघेल का, आपलं जीवन पूर्वीसारखं सुरळीत होईल का, यासारखे अनेक प्रश्न यादीत जमा होतील. पण या कथेतून मिळणारा एक संदेश मात्र अर्थपूर्ण आहे. सध्याच्या अनिश्चित वातावरणास तोंड द्यायला तो उपयोगी पडू शकतो. तो आहे, ‘वर्तमानकाळात जगा.’

भिक्षूच्या गतकाळात वाघ आहे आणि भविष्यकाळात दरी आहे. तरीही तो समोर दिसणाऱ्या फळाचा आस्वाद घेतोय, कारण तो वर्तमानकाळात जगत आहे. कदाचित असंही असेल, की धोक्याची जाणीव त्याच्या मनात जागती असल्यामुळं वर्तमानकाळात जितका आनंद घेता येईल तितका तो घेत आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरीत कोसळण्यापासून घेता येईल तेवढी खबरदारी त्यानं झुडूप पकडून घेतली आहे. शिवाय आता आपण दरीत कोसळणार किंवा पाठी उभा असलेला वाघ आपल्याला खाणार, अशा विचारांचा अखंड जप तो  स्वत:शी करत नाही. त्यामुळे समोर असलेलं फळ त्याला दिसतंय आणि तो त्याचा आस्वादही घेऊ शकतोय.

हा संदेश आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आपण कित्येकदा गतकाळातल्या अप्रिय घटनांच्या विचारात आणि भविष्याच्या चिंतेत इतके गुंतून पडतो, की वर्तमानकाळातले किती तरी सुंदर क्षण आजूबाजूला असूनही ते पाहू शकत नाही. मग त्यांचा आस्वाद घेणं दूरच राहिलं. एरवीच्या धावपळीच्या जीवनात वेगवेगळ्या बाह्य़ उद्दीपकांचा मारा आपल्यावर अखंडपणे होत असतो. टाळेबंदीमुळे घरात अडकून पडलो असताना बाह्य़ उद्दीपकांचा अडथळा कमी आहे. त्यामुळे वर्तमानकाळात जगण्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. वर्तमानकाळात जगणं म्हणजे रोज नवीन चित्रपट पाहणं, नवीन पदार्थ करणं, त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकणं यांसारख्या कृतींपुरतं मर्यादित नाही, तर ते अधिक सखोल आहे.

वर्तमानकाळात जगण्याचं विश्लेषण अनेकदा तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून केलं जातं. पण फ्रेडरिक पर्ल्स या मानसशास्त्रज्ञानं त्याचं महत्त्व स्वत: पुरस्कृत केलेल्या विचारधारेतून अधोरेखित केलं आणि त्याला मानसशास्त्राच्या परिघात आणलं. मानवतावादी व अस्तित्ववादी विचारधारेशी जवळीक सांगणारी ही विचारधारा विसाव्या शतकाच्या मध्यावर लोकप्रिय झाली होती. अलीकडच्या काळात ती पुन्हा चच्रेत आली आहे. टाळेबंदीच्या काळात  स्वत:बरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी चालून आली असताना तर ती विशेष उपयोगी पडू शकेल. या विचारधारेचं नाव आहे, ‘गेस्टाल्ट  उपचार पद्धती’.  गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ आहे, ‘एकात्मता’. वर्तमानकाळात जगणं म्हणजे एकात्मतेचा अनुभव घेणं. ‘ इथं आणि आत्ता ’ (‘हिअर अ‍ॅण्ड नाऊ’अ‍ॅप्रोच) ही या विचारधारेतली महत्त्वाची संकल्पना आहे. आत्ताच्या क्षणाचं ज्ञान  स्वत:ला करून देणं व त्याचा सजगतेनं अनुभव घेणं, हे या संकल्पनेत अभिप्रेत आहे. आपण नेहमी तुकडय़ा-तुकडय़ात अनुभव घेत असतो. उदाहरणार्थ, आपण  घरात असलो, तरी डोक्यात विचार मात्र ऑफिसचे असतात. जेव्हा ऑफिसमध्ये असतो तेव्हा सुट्टीचे विचार असतात.  इतकंच काय, पण खाणं, वाचणं, पाहणं यांसारखी एखादी कृती करत असतानाही आपल्या डोक्यात निराळेच विचार धावत असतात किंवा आपल्या चित्तवृत्ती त्या कृतीपेक्षा फार वेगळ्या असतात. म्हणजेच एखाद्या छोटय़ा कृतीतला अनुभवही आपण तादात्म्यानं घेऊ शकत नाही. एकात्मतेनं अनुभव घेणं म्हणजे आपले विचार, कृती व भावना एकरूप होऊन तो अनुभव घेणं.

एकात्मकतेत सर्वात मोठा अडथळा आपण गतकाळाविषयी आणि भविष्यकाळाविषयी करत असणाऱ्या विचारांचा येतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आता कुठली भावना जाणवत आहे, असं विचारलं, तर आपण हा प्रश्न विचारण्याअगोदर जी भावना जाणवत असते ती सांगू किंवा पुढं काय घडणार आहे, त्याला अनुसरून भावना सांगू. पण आताची, या क्षणाची भावना काय आहे, हे नेमकेपणानं आपल्याला सांगता येत नाही. मुळात ती वेगळी असते याचा आपण विचारच केलेला नसतो, कारण आताच्या क्षणांचं  स्वतंत्र भान आपल्याला नसतं. ते गतकाळातल्या किंवा भविष्यकाळातल्या क्षणांत मिसळून गेलं असतं.  ते भान जागवण्याचा प्रयत्न केला, तर आपण आताचे क्षण अनुभवू शकू आणि वर्तमानकाळात जगू शकू. परिस्थिती जितकी अनिश्चित, तितकं वर्तमानकाळातलं जगणं अधिक अर्थपूर्ण ठरतं. ते करण्यासाठी आपण पुढील मार्ग अवलंबू शकू.

छोटय़ा टप्प्यातले विचार- आपण  स्वत:ला दीर्घकालीन टप्प्याची म्हणजेच अनेक वर्षांचा विचार करण्याची सवय लावलेली असते. पण जेव्हा सध्याच्या परिस्थितीसारखी पुढे काय घडेल याबाबत बरीच अनिश्चितता असते, तेव्हा दीर्घकालीन विचार फारसे उपयोगी पडत नाहीत. कारण त्यात परिस्थिती स्थिर राहील हे गृहीत धरलेलं असतं. म्हणून छोटय़ा टप्प्यात विचार करून परिस्थिती जशी वळण घेईल तसं विचारांना वळवणं उपयुक्त ठरतं. वर्तमानकाळाचा टप्पा काय ठेवायचा हा एक तात्त्विक प्रश्न आहे, कारण आपण ज्याला वर्तमान म्हणतो तो क्षणार्धात भूतकाळाचा तुकडा होऊन जातो. त्यामुळे वर्तमानाचा टप्पा निश्चित नाही. तो आपल्याला ठरवावा लागेल.उदाहरणार्थ, आठवडय़ाचा टप्पा निश्चित केला, तर विचार, भावना व कृती एकात्मकतेनं फक्त याच टप्प्यावर केंद्रितकरता येतील. एरवी आपण गतकाळातली व भविष्यातली कित्येक र्वष असा फार मोठा अवकाश विचारांना देत असतो. त्यामुळे विचारांचा फार मोठा भार आपण प्रतिक्षणी वाहत असतो. हा अवकाश वर्तमानापुरता मर्यादित केला, तर आपण भारातून मोकळं होऊ शकतो. एकात्मकता साधण्यासही त्यामुळे मदत होऊ शकते. परिस्थितीतल्या अनेक गोष्टी सूक्ष्मपणे  टिपण्याची क्षमता वृद्धिंगत होऊ शकते. सद्य:परिस्थितीतल्या चांगल्या गोष्टींकडेही लक्ष जाऊ शकतं. उदाहरणार्थ- आपल्याला ‘करोना’ होईल या चिंतेपेक्षा आता आपल्याला तो झालेला नाही आणि आपण विविध जीवनानुभव घेऊ शकत आहोत या विचारावर लक्ष केंद्रित होईल.

रिकाम्या खुर्चीचं तंत्र- वर्तमानकाळातला विचार करणं म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळ पूर्णत: पुसून टाकणं असं नव्हे. तर त्या विचारांना आपण जे अतिरिक्त महत्त्व देत असतो ते कमी करणं. ते विचार जर आपल्याला भावनिकदृष्टय़ा अस्वस्थ करत असतील तर त्यांना तिथंच सोडून देण्यास स्वत:ला शिकवणं महत्त्वाचं आहे. यासाठी रिकाम्या खुर्चीच्या तंत्राचा उपयोग करता येईल. हे तंत्र  स्वत:कडे तटस्थपणे पाहण्यास शिकवतं. अनेकदा आपण गतकाळातले आणि भविष्यकाळातले त्रासदायक विचार थांबवू शकत नाही. त्यासाठी असा विचार करता येईल, की समजा एखादा वेगळा माणूस थेट आपल्यासारखाच विचार करत आहे आणि तो समोर खुर्चीत बसला आहे, तो आपल्याकडे मदतीसाठी  विचारणा करत आहे. आपण त्याला जी मदत करू तीच आपण  स्वत:ला करू शकतो. जर आपण  स्वत:ला समस्येपासून वेगळं करू शकलो, तर तिच्याकडे वस्तुनिष्ठतेनं पाहता येतं. या तंत्रामुळे आपण  स्वत:ला समस्येपासून वेगळं करू शकतो आणि त्रयस्थ माणसाच्या भूमिकेतून  स्वत:ला विचार करण्यास भाग पाडून वर्तनात योग्य तो बदल करू शकतो.

स्व-अवलोकन केलं तर या मार्गापेक्षा वेगळे मार्गही आपल्याला चोखाळता येतील आणि आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल. पण त्यासाठी प्रयोगशीलतेचा अवलंब करणं आणि प्रयत्नांची कास धरणं गरजेचं आहे.

फ्रेडरिक पर्ल्स म्हणतो, ‘माझं उद्दिष्ट आहे, ते वर्तमानातल्या छोटय़ातल्या छोटय़ा क्षणांतला अर्थ शोधणं’. असा अर्थ शोधण्याची सवय आपण  स्वत:ला लावून घेतली तर कथेतल्या भिक्षूसारखे अनेक अमृततुल्य क्षण आपल्याला अनुभवता येतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:57 am

Web Title: living in present physcoroscope dd70
Next Stories
1 पडसाद : ‘मी टाइम’बरोबर थोडय़ा तडजोडीची तयारी हवी
2 फिरता रंगमंच
3 भूमिका बदलताना..
Just Now!
X