जतीन देसाई – jatindesai123@gmail.com

मुलींनी शिक्षण घ्यावं यासाठी आग्रही असणारी आणि त्याच्याविरोधात असणाऱ्या तालिबान्यांकडून गोळ्या झेलूनही खणखणीतपणे उभी राहिलेली ‘नोबेल’विजेती जागतिक कार्यकर्ती मलाला युसुफझाई नुकतीच ‘निकाह’विषयीच्या तिच्या मतांमुळे चर्चेत आली. ज्या मुलाखतीवरून हा वाद झाला त्यात २३ वर्षांच्या मलालानं पारंपरिक लग्नसंस्थेविषयी आपला विचार मांडला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाकिस्तानच्या प्रांतीय सभागृहात त्याविषयी हरकत उपस्थित करून मलालाच्या पालकांकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं. तर त्या उलट काही नामवंतांनी, ज्यात राजकीय नेतेही आहेत आणि कलाकारही, तिच्या मताचा आदर करत अनुकू लता दाखवली आहे.      

कोणी, कोणाशी कसं लग्न/ निकाह करावा किंवा लग्न/ निकाह न करता एकत्र राहावं, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. इतर कोणी किंवा सरकारनं त्यात हस्तक्षेप करता कामा नये. हा नियम सर्वत्र असला पाहिजे. परंतु धर्माचं आणि पुराणमतवादी विचारांचं प्राबल्य असलेल्या समाजात किंवा देशात असं घडत नाही. यामुळे नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझाईनं निकाहसंबंधी चौकटीबाहेरचा विचार मांडल्यास पाकिस्तानात खळबळ माजते. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या प्रांतीय सभेत त्यावर चर्चा होते आणि काही आमदार मागणी करतात, की मलालानं निकाहसंबंधी मांडलेल्या मतावर तिच्या आई-वडिलांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. अर्थात याची दुसरी बाजू अशीही आहे, की यावर काही अनुकू ल मतेही मांडली गेली आहेत आणि त्यात नामवंतांचा समावेश आहे.

या महिन्याच्या सुरुवातीस ब्रिटनच्या प्रसिद्ध फॅशन आणि लाइफस्टाईल नियतकालिकानं- ‘व्होग’नं मलालाची दीर्घ मुलाखत घेतली. खरंतर ती ‘व्होग’ची ‘कव्हर स्टोरी’ आहे. मलालाला आपण लग्न करणार की नाही याची खात्री नाही. त्याविषयी तिनं ‘व्होग’ला दिलेल्या या मुलाखतीत म्हटलं आहे, ‘लोकांनी लग्न का केलं पाहिजे हे मला अजूनही कळत नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जीवनसाथी हवा असेल, तर तुम्ही लग्नाच्या कागदावर स्वाक्षरी का करायला हवी? ते सहज सहचर्य (पार्टनरशिप) का असू शकत नाही?’ मलालाची आई तूर पेकाई मात्र मलालाच्या या मताशी सहमत नाही. आपल्या आईच्या या मताबद्दल मलाला या मुलाखतीत सहजपणे, हसून सांगते. ‘माझी आई म्हणते, की तू असं काही बोलण्याची हिम्मतही करू नकोस! तू निकाह करायलाच हवास. निकाह ही अतिशय सुंदर गोष्ट आहे.’ मलालाचे वडील झियाउद्दीन यांना पाकिस्तानातून काही मुलांचे किंवा त्यांच्या आई-वडिलांचे निकाहसाठी ई-मेल येत असतात. मलाला  सांगते, ‘मुलानं लिहिलेलं असतं, की त्यांच्याकडे अनेक एकर जमीन आहे, अनेक घरं आहेत. आणि त्याला माझ्याशी लग्न करायला आवडेल.’ बीना शाह नावाच्या पाकिस्तानातील एका लेखिकेनं प्रश्न उपस्थित केला, की लोक मुलींनाच सतत निकाहबद्दल का विचारतात?  मलाला मुलगी असल्यानेच लोक तिला हा प्रश्न सतत विचारत असतात.

वयाच्या सोळाव्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलालाचं महत्त्वाचं काम मुलींच्या शिक्षणाबाबतचं आहे. पाकिस्तानमधल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातल्या अत्यंत सुंदर अशा स्वात खोऱ्यात असलेल्या मिंगोरा शहरातील ती रहिवासी. काही वर्षांपूर्वीपर्यंत तालिबान आणि इतर अतिरेकी संघटनांच्या दहशतीमुळे या भागात आई-वडील आपल्या मुलींना शाळेत पाठवत नसत. मलालानं आपल्या वडिलांच्या मदतीनं मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी मोहीमच सुरू केली. तिच्या या कामाला विरोध करत

९ ऑक्टोबर २०१२ ला तालिबानी दहशतवाद्यांनी मलालावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेली मलाला वाचली, पण त्यासाठी तिला देशाच्या बाहेर उपचार घ्यावे लागले होते. नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात तिनं अभ्यास केला. आता आई-वडील व भावासोबत ती ब्रिटनमध्ये राहाते आणि तिचं सामाजिक कार्य सुरूच आहे.  इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये अलीकडे झालेल्या संघर्षांत गाझा येथील मुलांचं प्रचंड नुकसान झालं. त्यांच्या शिक्षणासाठी  ‘मलाला फंडा’तून दोन लाख डॉलर्सची मदत करण्यात आली.  सगळ्या जगात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढत असताना मलालावर जेव्हा हल्ला करण्यात आला, तेव्हा स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी होत होतं. मलालानं पुकारलेलं बंड दहशतवाद्यांच्या विरुद्ध तसंच पुरुषी मानसिकतेच्या विरुद्ध होतं आणि म्हणून पाकिस्तानात तेव्हाही आणि आताही अनेक पुरुष मलालाच्या विरोधात बोलताना आढळतात.

मलालानं निकाहसंबंधी के लेल्या निवेदनावर पाकिस्तानच्या समाजमाध्यमांत मलालाच्या बाजूनं आणि विरोधातही मोठय़ा प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मलालाच्या विरोधातील प्रतिक्रिया अपेक्षित अशा स्वरूपाच्या आहेत. ‘मलालाचं बोलणं बेजबाबदार आणि इस्लामच्या तत्त्वांच्या विरोधात आहे’, ‘पाश्चात्त्य संस्कृतीचा मलालावर प्रभाव आहे’, ‘तरुणांचं मन भ्रष्ट करण्याचा मलालाचा प्रयत्न आहे’, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मलालाला विरोध करणाऱ्यांच्या आहेत. तर मलालाच्या समर्थनात वेगवेगळ्या महिला संघटना आणि पुरोगामी लोक आणि पक्ष उतरले आहेत. ‘आम्ही मलालाच्या सोबत आहोत’, ‘मलाला पाकिस्तानचा गौरव आहे ’, ‘स्त्रियांना स्वत:च्या निकाहसंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे’, अशा त्यांच्या घोषणा आहेत.

स्वतंत्र विचार करणारी आणि विवाहसंस्थेला नाकारणारी स्त्री पुरुषसत्ताक व्यवस्थेला चालत नाही. अशा स्त्रियांना गप्प करण्याचे किंवा त्यांची हत्या करण्याचेही प्रयत्न झालेले आहेत. काही मुलींनी आपल्या मनासारख्या व्यक्तीची पती म्हणून निवड के ली म्हणून त्यांना आपल्याच नातलगांच्या क्रोधाला बळी पडावं लागलं आहे. याला ‘ऑनर किलिंग’ म्हटलं जातं.  पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतात घराण्याच्या ‘प्रतिष्ठेसाठी’ मुलींच्या किं वा त्यांच्या मित्राच्या हत्या झाल्या आहेत. आपल्या देशातही ‘ऑनर किलिंग’च्या क्रूर घटना घडल्या आहेतच.  फार लांब कशाला, मुंबई व जवळपास देखील ‘ऑनर किलिंग’चे प्रकार घडलेले आपण पाहिले आहेत. थोडक्यात, मुलीनं तिच्या जीवनातले महत्त्वाचे निर्णय स्वत: घेता कामा नये, ही मानसिकता सर्वत्र आढळते. आजही घरातलीच पुरुष मंडळी तिच्या भविष्याविषयी निर्णय घेतात.

मलालानं या मुलाखतीत असंही म्हटलं आहे की, ‘युनिव्हर्सिटीत दुसऱ्या वर्षांपर्यंत माझा विचार होता, की मी कधीही लग्न करणार नाही आणि मला मुलंही नकोत. मी माझं काम करत राहीन. आनंदात माझ्या कुटुंबासोबत राहीन. तेव्हा माझ्या लक्षात आलं नव्हतं, की तुमचा विचार नेहमी एकसारखा राहात नाही. तुमच्यात बदल होतो आणि तुम्ही परिपक्व होत जाता.’ तिच्या या मुलाखतीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटणं साहजिकच होतं. आपल्या राजकारणासाठी धर्माचा उपयोग करणाऱ्या लोकांनी मलालाच्या निवेदनाचा उपयोग करायला सुरुवात केली. खैबर पख्तूनख्वाच्या प्रांतीय सभेत मध्यममार्गी आणि उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’च्या (पीपीपी) अपर दिर मतदारसंघाचे तेथील आमदार साहेबझादा सनाउल्ला यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून मागणी केली, की मलालानं खरोखरच निकाहसंबंधी असं वक्तव्य केलं आहे की नाही, याची सरकारनं चौकशी केली पाहिजे. सनाउल्ला यांनी असंही म्हटलं, की कुठल्याच धर्मात जीवनभर ‘पार्टनरशिप’ला मान्यता नाही. मलालानं जर पार्टनरशिपचं समर्थन केलं असेल तर ते निषेधार्ह आहे.

खान अब्दुल गफार खान- ‘सरहद गांधी’ यांची परंपरा असलेल्या ‘अवामी नॅशनल पार्टी’च्या निसार खान आणि सत्तेत असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) झियाउल्ला बंगश यांनी मलालाचं समर्थन केलं. निसार खान यांनी म्हटलं, ‘मलाला ही पख्तून राष्ट्रीयत्वाची मुलगी आहे. तिनं हिमतीनं दहशतवाद्यांचा मुकाबला केला. मलालाच्या निवेदनावर उपस्थित के लेल्या मुद्दय़ाचा मी निषेध करतो’. निकाह हा माणसाचा व्यक्तिगत मुद्दा असू शकतो, हे या पुरुषसत्ताक व्यवस्थेला मान्य नाही. बंगश यांनी म्हटलं, की ‘मलालाच्या निवेदनाचा विपर्यास करण्यात आला आहे.’ पेशावर येथील मौलाना शहाबुद्दीन पोपलझाई यांनी ट्वीट करून मलालाच्या वडिलांना मुलीच्या वक्तव्यावर खुलासा करण्यास सांगितलं. मलालाच्या वडिलांवर दबाव वाढतोय. पुरुषसत्ताक व्यवस्थेत मुलीच्या निकाहबद्दलच्या निवेदनावर वडिलांना खुलासा करायला सांगणं हे नवीन नाही. मुलगी प्रौढ असेल तरी अशा स्वरूपाची अपेक्षा वडिलांकडूनच असते. मलालाच्या मुलाखतीतील वाक्याचा लोकांकडून संदर्भ सोडून उपयोग करण्यात येत असल्याचं वडील झियाउद्दीन यांनी म्हटलं आहे. वडिलांकडून स्पष्टीकरण मागणारे बहुसंख्य मलालाला खुलासा करायला सांगत नाहीत.

माहिरा खान ही पाकिस्तानातील लोकप्रिय अभिनेत्री. तिनं ‘व्होग’चं मुखपृष्ठ ट्वीट केलं आणि मलालाचं समर्थन केलं. आयेशा उमर हीदेखील पाकिस्तानची अभिनेत्री. शर्मिन ओबैद-चिनोय ही दिग्दर्शिका आणि मिषा शफी ही पाकिस्तानी-कॅनडियन अभिनेत्री. या सगळ्या मलालाच्या बाजूनं उभ्या राहिल्या. मिषा शफीचा पहिला चित्रपट म्हणजे ‘द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट’. मीरा नायरचा हा २०१२ मधील हॉलीवूडमधील चित्रपट. अभिनेत्री केट हडसनची त्यात प्रमुख भूमिका होती. मॉडेल-अभिनेत्री मथिरा हिनं मात्र मलालाशी आपला या बाबतीत मतभेद असल्याचं म्हटलं. मथिरानं आपल्या ‘इंस्टाग्राम’वर लिहिलं,  की मला मुखपृष्ठ खूप आवडलं. मलाला, आपण नव्या पिढीला निकाह हा पारंपरिक विधी आहे हे शिकवलं पाहिजे. ते के वळ कागदावर स्वाक्षरी करणं नाहीये. बळजबरीनं करण्यात येणारे विवाह किंवा निकाह, बालविवाह चुकीचे आहेत. पण अल्लाच्या आशीर्वादानं होणारा निकाह सुंदर असतो.’ मुलाखत छापून आल्यानंतर पहिले दोन दिवस पाकिस्तानात ट्विटरवर मलाला ‘टॉप ट्रेंडिंग’ होती. अनेक जण त्यावर व्यक्त होत होते. फिरोज खान या पाकिस्तानी अभिनेत्यानं तर इंस्टाग्रामवर ‘मलाला द पपेट’ असं लिहिलं. याचा अर्थ मलाला पाश्चात्त्य देशाची कठपुतळी आहे, असा होतो. मलाला स्वतंत्ररीत्या विचार करते आणि तिच्या मताचा आदर केला पाहिजे, असं अनेक शिक्षितांना वाटत नाही ही चिंतेची बाब आहे. पाकिस्तानी चित्रपटक्षेत्रही मलालाच्या निवेदनाबद्दल विभाजित आहे हे यातून स्पष्ट होतं.

मलालाचा शिक्षणविषयक संघर्ष हा आधुनिक, पुरोगामी आणि स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आहे. त्यामुळे तिच्या याही वक्तव्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. त्या  विधानामागची कारणे न शोधता फक्त विरोध करणाऱ्यांनी समाजामध्ये डोकावून पाहायला हवं. आजची पिढी असा विचार का करत आहे यावर विचार करणं कदाचित  पुरुषसत्ताक व्यवस्थेला मान्य होणार नाही, त्यामुळे त्याच्या विरोधात संघर्ष होणारच, हेच या उदाहरणावरून पुन्हा अधोरेखित झालं आहे.

मलालाच्या इन्स्टाग्राम पेजवरून