आनंद करंदीकर

anandkarandikar49@gmail.com

आज जो पुरुष आपण समाजात पाहतो आहोत. तो सातत्याने स्त्रीच्या तुलनेत पाहिला गेला. दोषारोप केले गेले तेही त्याच तुलनेत. स्वतंत्र पुरुषजात या दृष्टीने पुरुषांचा फारसा विचार केला गेलेला दिसत नाही. का आहे पुरुष असा? तो असा का घडला असावा? कोण कोण कारणीभूत आहे त्यासाठी? समाज, संस्कार, शारीरिक फरक, भावनिक-मानसिक रचना, की आणखी काही? पुरुषाची स्वत:ची अशी बाजू, विचार आहे का? हे तपासून पाहणारं – पुरुष हृदय ‘बाई’ – हे खणखणीत सदर. पुरुषांनीच लिहिलेलं, त्यांना समजलेला पुरुष त्यांच्याच शब्दांत मांडणारं.

इतर पुरुषांवर बोलायच्या आधी मला ‘मी’ पुरुष म्हणून कितपत कळलो आहे? काय कळलो आहे? हे तपासणे, समजून घेणे, मला महत्त्वाचे वाटते. मी माझ्याशी लपाछपीचा खेळ खेळेन, हे शक्य आहे. पण तरीही मला वाटते, की माझे वागणे, माझे हेतू, माझे मन, हे मला इतरांचे वागणे, इतरांचे हेतू आणि इतरांचे मन, यापेक्षा जास्त कळते. तेव्हा ‘मी’च्या वेलांटीचा फास लागण्याचा धोका पत्करूनसुद्धा मला माझ्या स्वत:पासून सुरुवात करणे योग्य वाटते. इतर पुरुषांना मी माझ्या पुरुष असण्याच्या जाणिवेच्या परिप्रेक्ष्यात, मला कळलेल्या पुरुषीपणाच्या संदर्भात, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझ्या आई-वडिलांनी मला मुलगा म्हणून माझ्या बहिणीपेक्षा विशेष काही वेगळी वागणूक दिली नाही, महत्त्वही दिले नाही. विशेष म्हणजे, मी मुंबईच्या माहीममधील ज्या ‘बेडेकर सदन चाळी’त राहायचो, तेथे माझ्या समवयस्क आठ-दहा मुलगे आणि पाच-सहा मुली होत्या, पण आमच्या चाळीत एकूणच मुलांना महत्त्व देण्याची, झुकते माप देण्याची चालरीत किंवा संस्कृती, मला शाळकरी वयात जाणवावी इतकी तीव्र नव्हती, इतकी उघड नव्हती. आम्ही मुलगेही भातुकलीचा खेळ खेळायचो, भोंडल्याची गाणी म्हणायचो, खिरापत काय आहे, हे ओळखण्यासाठी हेरगिरी करायचो. मुलांच्या जोडीने मुली अगदी हुतुतूसारखे मदानी खेळही खेळायच्या, अभ्यासात सामान्यत: मुलांच्या पुढे असायच्या आणि त्यांच्या रूपाबद्दल फारशी चर्चा झाल्याचे मला आठवत नाही. मुंबईतील चित्पावन ब्राह्मणांच्या मध्यमवर्गीय चाळीत हे का घडले? की माझी त्याबद्दलची जाणीव त्या काळात बोथट होती? सांगता येत नाही. त्यामुळेच असेल, पण मला माझ्या पुरुषीपणाची जाणीव प्रथम शारीरिक पातळीवर झाली. मुलींच्या संगतीत, मुलींच्या स्पर्शाने आणि मुलींच्या विचारानेही आपले लिंग ताठ होते, हे मला पहिल्यांदा कधी लक्षात आले? नक्की आठवत नाही. मी त्या वेळी बारा-चौदा वर्षांचा असेन.

मग मुलींच्या संगतीत मी सावधपणे वावरू लागलो. मुलींच्या शरीराबद्दल कुतूहल आणि आकर्षण वाढू लागले. इतर पुरुषांच्या बाबत असेच घडते का? अनेक मुलग्यांना आपण ‘मुलगा’ आहोत, ‘पुरुष’ आहोत, याची जाणीव भावनिक आणि वागणुकीच्या पातळीवर आधीच होत असावी. ज्या घरात मुलग्यांना शाळेत पाठवतात आणि मुलींना घरीच बसवतात, त्या घरात मी ‘पुरुष’ म्हणजे श्रेष्ठ आहे ही जाणीव त्या मुलग्याला पाचव्या-सहाव्या वर्षी होत असली पाहिजे. ‘बाहुलीशी खेळू नको, ती ताईसाठी आहे’, ‘तू काय मुलींसारखी भातुकली खेळतोस?’ ‘ताई, तू उन्हात जाऊन खेळू नको, काळी होशील, मग नवरा कसा मिळेल?’ इत्यादी सूचनांतून शाळेत जायच्या अगोदरच मुलांमध्ये पुरुषभाव आणि मुलींमध्ये स्त्रीभाव निर्माण होत असावा. मला तो अनुभव फारसा आला नाही पण बहुतेक इतरांना नक्कीच येत असणार.

पुरुषपणाची शारीरिक जाणीव आणि स्त्रीदेहाबद्दलचे कुतूहल आणि आकर्षण हे नववी-दहावीत असताना खूपच तीव्र होते. मग त्या काळात चाळीच्या गच्चीवर मुलींबरोबर ‘डॉक्टर-डॉक्टरचा खेळ’ खेळणे, अगदी उघडपणे मुला-मुलींनी हुतुतू एकत्र खेळणे, वेगवेगळ्या बाकावर बसायची पद्धती मोडून मुद्दामहून मुला-मुलींनी एकाच बाकावर बसणे, मुला-मुलींच्या जोडय़ा लावणे, इत्यादी प्रकार सुरू झाले. विशेष म्हणजे, यातील कुठलाच प्रकार फार काळ चालला नाही; अंदाजे दोन-तीन महिन्यांत तो बंद पडला. हे प्रकार बंद करण्यामागे मोठय़ा माणसांचे किंवा शिक्षकांचे ‘नका करू’ म्हणणे हे कारण नव्हते, किंबहुना मोठय़ा माणसांनी या प्रकारांना विरोध केल्याचेही मला विशेष आठवत नाही. म्हणजे हे ‘खेळ’ लवकरच संपतील अशी प्रगत जाणीव आमच्या चाळीतील आणि शाळेतील प्रौढांना होती का? की आपण कशाला तोंड खुपसा, आपण विरोध केला तर आपल्याच मुलीला जास्त त्रास होईल अशी भीती मुलींच्या आई-वडिलांना वाटत होती म्हणून मुलींचे आई-वडीलसुद्धा डोळेझाक करत होते? हे प्रश्न मला तेव्हा जाणवले नाहीत आणि आत्ताही या प्रश्नांची नेमकी उत्तरे मला माहीत नाहीत.

चाळीच्या सक्तीच्या सार्वजनिकतेमध्ये आणि पहिलीपासून नववीपर्यंत एकत्रच शिकलेल्या मुला-मुलींमध्ये हे घडले हे खरे. त्यामुळे स्त्रीदेहाबद्दल कमालीचे कुतूहल आणि विकृत समज माझ्यात कमी निर्माण झाले असे मला वाटते. इतर अनेक पुरुषांबद्दल असे घडत नसावे. लहानपणापासून ज्यांना मुलींचा सहवास मोकळेपणाने अनुभवता येत नाही त्यांच्या मनात मुलींबद्दल विकृत आणि अवास्तव कल्पना आणि अपेक्षा असतात असे मला मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो तेव्हा लक्षात आले. कारण कॉलेजमध्ये माझ्याबरोबर शिकणारे अनेक मुलगे हे गावाकडे घरी राहिलेले, शहरांमध्ये फ्लॅटमध्ये राहिलेले आणि फक्त मुलग्यांच्या शाळेत शिकलेले होते. मुलींना पाळी येते हे आपल्याला माहीत आहे, यातच त्यांना फार मोठे ज्ञान आहे, असे वाटायचे. मुलींना आपण संरक्षण दिले पाहिजे ही त्यांची स्वाभाविक धारणा असायची. आमच्या शाळेत आमच्या मुलांचा संघ कुठलीही मदानी स्पर्धा कधीही जिंकला नाही पण आमच्या शाळेतील मुलींचे संघ हे आंतरशालेय खो-खो स्पर्धात अनेक वर्षे विजयी व्हायचे. आणि तरीही या मुली अभ्यासातही आमच्या पुढे असायच्या. ‘आपण यांचे संरक्षण केले पाहिजे.’ असा विचार माझ्या तरी मनात दुरूनही आला नाही.

याच काळात, म्हणजे दहावी-अकरावीत हस्तमथुनाला सुरुवात झाली. आपण हस्तमथुन करतो म्हणजे काही तरी अपराध करतो, अशी भावना स्वाभाविकपणे मनात निर्माण झाली; का ते माहीत नाही. मग अचानक ‘बेडेकर सदन’मध्ये एका संघ प्रचारकाने ‘हस्तमथुनाचे तोटे’ या विषयावर बौद्धिक घेतले. ते ‘बेडेकर सदन’मधल्या डॉक्टरांच्या घरी झाले. त्यामुळे त्याला एक शास्त्रीय आधार असावा असे वातावरण होते. असे बौद्धिक झाले हे, कसे मला माहीत नाही, माझ्या वडिलांना (विंदा करंदीकर) कळले. त्यांनी शांतपणे या बौद्धिकात आम्हाला काय-काय सांगण्यात आले त्याची चौकशी केली. मग त्यांनी मला, ‘तुझ्या वयात हस्तमथुन करण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे, अतिरेक झाला नाही तर त्यात वाईट काही नाही,’ असे सांगितले. मग त्यांना कुठून मिळाले मला माहीत नाही पण हस्तमथुनावर भाष्य असलेले एक इंग्रजीतले सोपे पुस्तक मला वाचायला दिले. आता पुस्तकाचे नाव आठवत नाही. मग मला माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करण्याचे धर्य आले. त्यातील काहींना मी ते पुस्तक वाचायला दिले. या सर्व प्रकारामुळे हस्तमथुनाबद्दलचे न्यूनगंड माझ्या मनातून गेले आणि आणि पुढे आयआयटीत गेल्यावर तेथील अनेक मुलांना हस्तमथुन करण्याबद्दल न्यूनगंड आहे, असे माझ्या लक्षात आले. आयआयटीच्या विद्यार्थी वसतिगृहांत ‘श्ॉगी’ ही, त्यामुळे, फार हीनत्व दाखवणारी शिवी होती.

अकरावीपासूनच माझी प्रेमात ‘पडायला’ सुरुवात झाली. दुर्दैवाने मी माझे प्रेम व्यक्त करण्याअगोदरच प्रत्येक वेळी त्या मुलीची दुसरीकडे सोयरीक जुळली. आपण फार वाट बघू नये, वाटले की लगेच प्रेम व्यक्त करावे, असे मला वाटू लागले. मला त्याची अंमलबजावणी करणे जमले नाही कारण नेमकं त्याच वेळी आपली बायको कशी असावी याविषयीच्या माझ्या कल्पना फार विचित्र आणि वेगळ्या होऊ लागल्या. आयआयटीच्या चौथ्या वर्षांत असताना मी ‘युवक क्रांती दल’ (युक्रांद)च्या शिबिरात गेलो आणि दलात सामील झालो. त्यानंतरच्या दोन वर्षांत मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विशेषत: राममनोहर लोहिया यांचे विचार वाचले, त्यावर अभ्यासवर्ग ऐकले आणि त्यांच्यावर विचार करून ते स्वीकारले. याच काळात ‘युक्रांद’मधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वेगळ्या मार्गानीही माझे प्रशिक्षण केले. ‘लेका, चाळीतल्या बामणा, जरा मुंबई बघ’ असे म्हणून ते मला ‘आँटी’च्या बारमध्ये घेऊन गेले. दारू प्यायलो नाही, पण एकूण वातावरण, दारुडय़ांना जे स्वीकारावे लागते ते, किती उबग आणणारे आहे हे मला तीव्रतेने जाणवले.

माझे कॉम्रेड मला फोरास रोडला घेऊन गेले. प्रत्यक्ष वेश्यागृहात आम्ही आत गेलो.. समोर मुलींची परेड सुरू झाली. उठून बाहेर येताना ‘‘बिना बठके कैसे जा रहे?’’ असे म्हणून एकीने माझा चष्माही काढून घेतला. तो परत मिळवताना आमच्या नाकी नऊ आले. हाही अनुभव फारच भयानक होता. स्त्रियांची ही विटंबना दाहक होती. दुसऱ्या बाजूला ‘युक्रांद’मधील अनेक हुशार आणि कर्तबगार मुली होत्या. त्या समतेसाठी, स्त्रीमुक्तीसाठी लढणाऱ्या आणि विचार करणाऱ्या मुली होत्या. या काळात मी असे जाहीर केले की, मी आंतरजातीय लग्न करणार. माझ्या आई-वडिलांना हे काही फारसे आवडले नव्हते, पण त्यांनी विरोध केला नाही. वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या, ओळखीतून दलित वर्गातील मुली शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला प्रयत्न करूनही त्या वेळी शिकलेली, प्रागतिक, आत्मनिर्भर मुलगी लग्न करण्यासाठी सापडली नाही. दुसरीकडे अत्यंत प्रागतिक, धाडसी मुली माझ्या सभोवताली ‘युक्रांद’मध्ये होत्या. मग मी ‘युक्रांद’मधील मुलीशी लग्न केले.

लग्न करताना स्त्रीची योनीशुचिता, लग्नाआधीची किंवा लग्नानंतरची, हा विषय अजिबात महत्त्वाचा नाही, असे मी बौद्धिक पातळीवर निश्चित स्वीकारले होते. माझ्या बायकोला झालेला मुलगा किंवा मुलीचा बाप मीच आहे, हे कळण्याची भावनिक गरजही मला कधी जाणवली नाही. लग्नानंतरही तसा आग्रह मी कधीच धरला नाही. माझ्या बायकोनेही माझ्याबद्दल तसा आग्रह धरू नये, असे माझे म्हणणे होते. आपल्याशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला आपल्यामुळे कुठलेही आजार, रोग होत नाहीत, हे कसोशीने बघण्याची आपली जबाबदारी आहे हेही मला निश्चितपणे वाटत होते. त्यासाठी थोडा जरी संशय आला तरी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात मला कुठलाही कमीपणा कधीही वाटला नाही.

लग्न हे एकत्र काम करण्यासाठी आहे, एकमेकांना सहकार्य करून एकमेकांना त्यांच्या कामातून जे प्राप्त करून घ्यायचे आहे, त्यात मदत करण्यासाठी आहे, लग्न आयुष्यातले अनेक आनंद, निव्वळ शरीरसुख नव्हे, एकत्रपणे अनुभवण्यासाठी आहे, असे माझे तेव्हाही म्हणणे होते आणि आताही आहे. हो, हे खरे आहे, की मी आयुष्यभर एका बाईबरोबर संसार केला नाही. पण माझे आणि माझ्या सहचारिणींचे मार्ग वेगवेगळे झाले त्याचे मुख्य कारण आम्ही जे काम करत होतो त्याबद्दल आमचे दृष्टिकोन फार वेगवेगळे झाले, हे होते. तिची योनीशुचिता किंवा माझी लिंगशुचिता हा आमच्या वेगळे होण्यामधला महत्त्वाचा मुद्दा नव्हता, असे निदान मला वाटते.

मी जेव्हा आजूबाजूला बघतो, तेव्हा मला असे जाणवते की, मी फार अपवादात्मक पुरुष आहे. मी कमी पुरुषी असलेला पुरुष आहे. माझे ‘युक्रांद’मधील काही चांगले मित्र वगळता बहुतेक सगळे पुरुष पत्नीच्या योनीशुचितेबद्दल आग्रही असलेले पती आहेत. (स्त्रियाही पुरुषाच्या लिंगशुचितेबद्दल आग्रही असतात.) स्त्रियांबरोबर काम करणे हेसुद्धा बहुतेक पुरुषांना योग्य वाटत नाही, मग स्त्रियांच्या हाताखाली काम करणे हे तर ते अजिबातच स्वीकारू शकत नाहीत. आपली बायको आपल्यापेक्षा वयाने कमी आहे हे खरे, पण ती आपल्यापेक्षा अकलेने आणि कर्तबगारीनेही कमी आहे, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. नोकरीला लागली तर ती फारसे काय कमावणार? त्यापेक्षा तिने घरी राहून मुलांची काळजी घ्यावी, या विचाराला त्यांचा भरपूर पाठिंबा असतो. ‘आपली बायको आपल्या मताने जर आपल्यापेक्षा अकलेने आणि कर्तबगारीने कमी आहे, तर मग आपली मुले तिच्यावर कशी सोपवावी?’, असा प्रश्नही त्यांना पडत नाही. कारण बायकोला घरी बसवण्यामागे, मला पुन्हा पुन्हा असं वाटतं, की मुलांच्या शिक्षणापेक्षा अनेकदा तिच्या योनीची त्यांना जास्त काळजी असते.

मी माझ्या कंपनीमध्ये आणि मी करत असलेल्या सार्वजनिक कामांमध्ये कसोशीने असा नियम केला, की अधिकाराच्या ठिकाणी निदान निम्म्या स्त्रिया असल्यास पाहिजेत. प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी मी या उद्देशात यशस्वी झालो असे नाही. पण अधिकाराच्या जागी निदान ३० ते ४० टक्के स्त्रिया असतील, हे मी पाहू शकलो. काही वेळा तर याहूनही जास्त स्त्रिया अधिकाराच्या जागी असलेले व्यवस्थापन मी निर्माण करू शकलो. मी भारतातील भारतीयांच्या मालकीची व्यवस्थापन क्षेत्रात सल्ला देणारी सगळ्यात मोठी कंपनी उभारली, याहीपेक्षा या कंपनीच्या निम्म्याहून जास्त अधिकारी व्यक्ती स्त्रिया आहेत, याचा मला अभिमान वाटतो. वाईजवळच्या बोपर्डी गावात भारतातील पहिले ग्रामीण कॉल सेंटर आम्ही उभारले ही अभिमानाची गोष्ट आहे; पण काहीही पूर्वानुभव नसलेल्या शंभराहून जास्त स्त्रिया या कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी आम्ही शिकवून सज्ज केल्या, हा मला जास्त अभिमानाचा मुद्दा वाटतो. मला त्यात पुरुषार्थ वाटतो.

मला माझ्याबद्दल, माझ्यातील पुरुषाबद्दल, इतरांच्यातील पुरुषीपणाबद्दल अजूनही लिहिण्यासारखे खूप विषय आहेत. पुरुषांतील हिंसक आक्रमकतेचे पुरुषांनी ‘शौर्य’ म्हणून गायलेले पोवाडे, कमी असलेल्या भावनिक बुद्धय़ांकावर ‘आम्ही रडत नाही’च्या पालुपदाने पांघरूण घालण्याचा केलेला प्रयत्न, पुरुषांच्या संदर्भरहित आकलन करण्याच्या सवयीचे ‘लक्षवेधी’ आकलन म्हणून केलेले वर्णन, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. पण ‘मी’च्या वेलांटीचा गळफास’ अधिक घट्ट होण्याअगोदरच, सावधानतेने, शब्दमर्यादेचे भान ठेवण्याचे कारण सांगून, लिखाण थांबवतो.