अरविंद खडमकर

‘‘मनोहरपंत, हे घ्या..बघा,’’ म्हणत त्यांनी पिशवीतून एक पाकीट काढले. त्यांचा आवाज लाकडावर करवत फिरवावी तसा होता. आम्ही दचकलो. ‘काय आहे’ म्हणत मनोहरने ते पाकीट उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या हातात कार्डसाइजचे काही फोटो दिसत होते. पावसाळी ट्रिपचे ते फोटो होते. तरुण-तरुणींचा ग्रुप मस्त पाऊस एन्जॉय करीत होता..

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
bear and tiger viral video loksatta
Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video

आरती करताना अचानक निरंजनातील वात लागून चटका बसावा तसा पावसाळा सुरू झाला की, त्या प्रसंगाची आठवण येऊन मनाला चटका बसतो. गेल्या वर्षीच्या पावसाने उषाची स्वप्ने उद्ध्वस्त केली. उषा माझ्या मित्राची मुलगी. संवेदनशील मनाच्या उषाला इतका धक्का बसला की ऐन पंचविशीतली उषा प्रौढ दिसू लागली. मित्र तर पार विस्कटलाच.

पावसाला मी नावे ठेवत नाही. त्यात पावसाचा दोष नाहीच. दोष आहे त्या पावसात कुणाच्या तरी विघ्नसंतोषी वृत्तीने हैदोस घातलेल्या मनातल्या वादळाचा. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उषाचे विजयशी लग्न ठरले. त्याची बँकेत नोकरी. दिसायला स्मार्ट. उषाला अनुरूप. एका खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी. त्यांचा साखरपुडा दृष्ट लागावा इतका छान झाला. जुलै महिन्यात लग्न ठरले होते. सर्व खूश होते. त्या दिवशी मी मित्राकडे, मनोहरकडे, गप्पा मारीत बसलो होतो. विषय अर्थातच लग्नाच्या खरेदीचा. तेवढय़ात विजय आणि त्याचे वडील आले. अप्रूपतेने मनोहरने त्यांचे स्वागत केले. दोघे बसले.. पण चेहरा गंभीर.

‘‘मनोहरपंत, हे घ्या..बघा,’’ म्हणत त्यांनी पिशवीतून एक पाकीट काढले. त्यांचा आवाज लाकडावर करवत फिरवावी तसा होता. आम्ही दचकलो. ‘काय आहे’ म्हणत मनोहरने ते पाकीट उघडले.. त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या हातात कार्डसाइजचे काही फोटो दिसत होते. बघितले, पावसाळी ट्रिपचे ते फोटो होते. तरुण-तरुणींचा ग्रुप मस्त पाऊस एन्जॉय करीत होता. पावसात खडकावर, धबधब्याखाली उभी मित्रमंडळी, असे फोटो. तरुण मंडळी थ्रीफोर्थ पॅन्टमध्ये तर तरुणी अनेक मॉडर्न ड्रेसमध्ये पण ती वस्त्रे अंगाला चिकटलेली. अवयवांचा उभार दाखवणारी..आणि मुख्य म्हणजे नको तेवढी जवळीक दाखवणारी आणि त्या ग्रुपमध्ये उषा. तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात, कोणी तिच्याजवळ उभा आणि एका सेल्फीमध्ये तर सारा ग्रुप पुष्पगुच्छासारखा दाटीवाटीने उभा. त्या गर्दीत उषा!

‘‘उषा?’’ मनोहर ओरडला. ती रूममधून बाहेर आली. ‘‘काय बाबा?’’

‘‘हे बघ’’ म्हणत त्यांनी फोटो तिच्या पुढय़ात टाकले. क्षणमात्र तिचे डोळे विस्फारले.

‘‘काय हे उषा?’’ विजयचा चिरका आवाज.

‘‘अहो हे फोटो गेल्या वर्षीच्या पावसाळी वन डे ट्रिपचे. आमच्या ऑफिसची लोणावळ्याला ट्रिप गेली त्याचे आहे. दरवर्षी जातो आम्ही.’’ उषा म्हणाली.

‘‘पण एवढी जवळीक? असा ग्रुप आहे तुमचा?’’ विजय.

‘‘नाही हो. आम्ही सर्व सहकारी आहोत. कोणाच्या मनात काही वावगे नाही. आणि खरं सांगू, हे बघा, हे आमचे डिपार्टमेंट हेड.’’ एका व्यक्तीवर बोट ठेवत ती म्हणाली, ‘‘तिथे त्यांनी आम्हाला डबल बोनसची न्यूज दिली आणि सारे झिंगाट झाले. त्यावेळी एकच जल्लोष झाला, बट इट वॉज जस्ट फन.’’ उषा.

‘‘पण मला खटकले. नव्हे आम्हा सर्वाना खटकले. इतका फॉरवर्डपणा आम्ही नाही सहन करणार. मी हे लग्न मोडतोय.’’ तो हे बोलला मात्र त्सुनामी आली जणू घरात. ‘‘अहो हे पिकनिकचे फोटो आहेत. पावसात हेच कपडे वापरावे लागतात..’’ उषाने समजावले. ‘‘..आणि एवढी जवळीक, निकट स्पर्शही चालतो?’’ कुत्सितपणे विजय म्हणाला. मनोहर, उषा, मी, सगळेच त्यांना समजावत होतो, पण ते आपल्या निर्णयावर ठाम होते. ‘‘आता सेल्फी काढताना तर दाटीवाटीने होते ना..’’ उषा म्हणाली.

‘‘विजय, तुम्हीपण अशा पिकनिकला गेला असाल ना.. तेथे भावना फक्त मैत्रीची असते ना.’’ रडवेल्या आवाजात उषा म्हणाली, ‘‘तेच म्हणतो मी.. लग्नानंतर मांजरीने बोचकरावे तसे आपण बोचकारू.. याच पॉइंटवर.. आणि हे वादळ वाढतच जाईल. आपण नाही सुखी होणार. सो गुडबाय!’’ म्हणत दोघे उठले, ते लग्न मोडूनच!

कोणा एका सहकाऱ्याने हा विघ्नसंतोषीपणा केला आणि सारे उद्ध्वस्त झाले. उषाचे कार्यालयातील कुणाशीही अफेअर नव्हते. तरीपण या फोटोचा अर्थ काढणाऱ्यांनी घात केला. अजूनही उषा, तिची आई, मनोहर या धक्क्यातून सावरले नाहीत. आता पुन्हा पावसाळा सुरू झालाय. भीती वाटते, आणखी कोणी उषा, आशा या अशा पिकनिकमध्ये उद्ध्वस्त होणार नाही ना? मग पावसालाच सांगावेसे वाटते की बाबारे, असल्या घाणेरडय़ा संशयापेक्षा त्यांच्या मनातील ही क्षुद्र संशयाची किल्मिषे तूच का नाही धुऊन टाकत आणि त्यांच्यावर आनंदाचा वर्षांव करत?

chaturang@expressindia.com