अंजली बासरकर

परवा मला मुंबईच्या पार टोकाला, कुलाब्याला जायचं होतं. आजकाल कुठे जायचं म्हणजे एक तर कार नाही तर ‘ओला’ किंवा ‘उबेर’ची फारच सवय झाली होती. संध्याकाळी ७ वाजता पोचायचं होतं. संध्याकाळी रस्ते वाहतुकीमुळे जॅम होतात त्यामुळे मुलगा म्हणाला, ‘‘आई ट्रेनने जाऊ या, आपण लवकरच पोचू.’’

‘बापरे! ट्रेन!’ मनाने जोरदार निषेध नोंदवलाच. गेले सात-आठ वर्ष आम्ही मुंबईत नव्हतो, त्यामुळे लोकलच्या प्रवासाची सवय सुटली होती. गर्दी, धावपळ, चढणं, उतरणं धक्का-बुक्की या सगळ्यांची मनात भीतीच बसली होती. एक वर्षांपूर्वी ‘नी रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळेही असेल कदाचित मनातली भीती फारच वाढली होती. वाटायचं, ट्रेनमध्ये चढताना पाय उचलेल की नाही? गुडघ्यात वाकेल की नाही? कोणी ढकललं म्हणजे? पडलो तर? एक ना अनेक शंका-कुशंका. पण मुलाने माझी ‘शाळाच’ घेतली. ‘‘अगं आई, तू मूळची मुंबईची! ‘मुंबईसारखा मस्त पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठेच नाही,’ असं गुणगान तूच करायचीस. मालाड ते कुलाबा रोज प्रवास करायचीस, चर्चगेटला चालत्या ट्रेनमध्ये चढून सीट पकडायचीस. लोकलचा प्रवास एन्जॉय करायचीस. मध्ये काही वर्ष ट्रेनची सवय सुटली नि पायाचं ऑपरेशन झालं. म्हणून तू लोकलला पाय लावायलाही घाबरतेस? ते काही नाही! मला तुला या भीतीतून बाहेर काढायचं आहे. अगदी गर्दीच्या वेळी विरार ट्रेन नको पकडूया पण उलटय़ा बाजूला कमी गर्दीच्या ट्रेनने प्रवास करायला काय हरकत आहे? मागच्या महिन्यात आपण मावशीकडे गिरगावात गेलो होतो तेव्हा चर्नी रोड स्टेशनवर लोकल ट्रेन बघून तू म्हणाली होतीस, ‘आय अ‍ॅम मिसिंग लोकल ट्रेन जर्नी! एकदा जावंसं वाटतं लोकल ट्रेनमधून.’ गेली ३५ वर्ष तू ट्रेनने प्रवास केला आहेस. ते काही नाही. उद्या कुलाब्याला जाताना ट्रेनने जायचं. मी येतो तुझ्याबरोबर. ठरलं.’’

आम्ही बीकेसीवरून माटुंगा स्टेशनला आलो. त्यातल्या त्यात कमी गर्दीचं स्टेशन म्हणून. सकाळपासून मनाची तयारी केली. स्वत:ला सांगितलं, ‘इतकी बावळट कधीच नव्हतीस तू! कॉलेजात चांगली बोल्ड म्हणून ओळखली जायचीस. घाबरतेस काय? कम ऑन! यू कॅन डू इट!’

माटुंग्याला लेडीज डब्यासमोर आलो. तेवढय़ात एक ट्रेन आली नि मी अगदी सराईतासारखी ट्रेनमध्ये चढले. सहजपणे चढले. गुडघा दुखला नाही काही नाही. जशी पूर्वी चढायचे तशी सहज चढले नि पटकन विंडो सीटही पकडली, तीही सराईतासारखी. गाडीत विशेष गर्दी नव्हतीच. बसल्यावर खूप मोकळं-मोकळं वाटलं. सकाळपासून आलेलं दडपण क्षणात विरघळलं. छान, मस्त वारा येत होता. गजरेवाली समोरून गेल्यामुळे आधीच खूश असलेलं मन फुलांच्या वासानं गंधाळलं. मनातला फोबिया धावत्या ट्रेनबरोबर विरघळून गेला. मधली १० वर्ष जणू पुसली गेली. मन कसं हलकं झालं. अरे वा! अजूनही आपण लोकल ट्रेनचा प्रवास करू शकतो! मजा आया!

मन अगदी आनंदी पाखरू झालं नि वयाच्या २१ व्या वर्षांत जाऊन पोचलं. कुलाब्याचं कामही छान झालं. परत येताना कार बुक करणाऱ्या मुलाला म्हटलं चला, आता ‘बेस्ट’ने जाऊ. धाडस करून सिग्नलला बस पकडली. पूर्वीसारखी बस रिगल युनिव्हर्सिटी, राजाबाई टॉवरवरून पुढे पुढे जात होती. शरीराच्या अक्षमतेचं, वयांचं, स्टेटसचं सगळं बंधन जसं गळून पडत होतं..

आजकाल वयोमानाप्रमाणे आणि आर्थिक स्थैर्यामुळेमुळे खूपच ‘कम्फर्ट झोन’मधून प्रवास करणं सुरू होतं. आज खूप वर्षांनी पक्की मुंबईकर असल्यासारखं वाटलं! मन इतकं हलकं, इतकं निर्भीड झालं होतं, स्वत:वरचा विश्वास दुप्पट झाला होता नि उतरत्या वयातही एकदम तरुण झाल्यासारखं वाटत होतं. मी लेकाचा हात धरला नी म्हटलं, ‘‘थँक्यू राजा! तू आज एका ‘आई’सारखं काम केलंस.’’

मुलांना ती लहान असताना खूप लाड की ते आपल्यावर फार अवलंबून राहायला लागतात. म्हणून आईला त्यांना थोडं मोकळंही सोडावं लागतं. ज्यायोगे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आज तसंच झालं, घरचे सगळे जण मला त्रास होऊ नये, पायाची शस्त्रक्रिया झाली आहे, या कारणाने कायम खासगी वाहनाने प्रवास करवत होते. पण एखाद्या दिवशी असं नॉर्मल मुंबईकर होऊन तरुणाईनं जगायलाही खूप मजा आली! एकदम बिन्धास्त झाल्यासारखं वाटलं. खूप आत्मविश्वास देऊन गेली ही संध्याकाळ!

anjalivbasarkar@canarabank.com

chaturang@expressindia.com