आम्ही आकाशवाणी कलाकार आणि तो कार्यक्रम मन:पूर्वक ऐकणारे, पसंतीची दाद देणारे आमचे श्रोते! तब्बल तीस वर्ष श्रोत्यांशी माझं वेगळंच नातं जुळलेलं होतं. त्यातल्याच एक होत्या, ज्योत्स्नाताई देवधर. मनाच्या कोपऱ्यात आजही ते नातं घट्ट जपून राहिलेले आहे. त्याविषयी..
पुणे आकाशवाणीचा भरभराटीचा काळ होता तो! कार्यक्रम सादर करणारे आम्ही आकाशवाणी कलाकार आणि तो मन:पूर्वक ऐकणारे, पसंतीची दाद देणारे आमचे श्रोते! तब्बल तीस वर्ष श्रोत्यांशी माझं वेगळच नातं जुळलेलं होतं. कार्यक्रमात आमची एक विशिष्ट भूमिका असायची. त्या भूमिकेतून आम्ही श्रोत्यांशी संवाद साधायचो. म्हणजे ‘बालोद्यान’ हा मुलांचा कार्यक्रम नाना, हरबा, ताई सादर करायचे. ‘शेतकरी मंडळा’त आबा, गणपा असायचे. महिलांच्या आणि ग्रामीण विभागाच्या कार्यक्रमांतून मी अशा बहुविध भूमिका निभावल्या. त्यात ‘गृहिणी’ या कार्यक्रमात भाई, ‘आपले माजघर’ या ग्रामीण महिलांसाठीच्या कार्यक्रमात सरूबाई, ‘नभोवाणी शेतकरी मंडळी’त पारूबाई, तर ‘चालू जमाना’ या कार्यक्रमात रूकाबाई, ‘शेतीशाळे’त अंबाक्का, ‘आरसा’या कौटुंबिक श्रुतिकामालेतमावशी.. आणि या कार्यक्रमांत सहभागी असायचे सुप्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर, दमदार आवाजाचे पुरूषोत्तम जोशी, जयराम कुलकर्णी, कृष्णराव सपाटे, नाना ऊर्फ गोपीनाथ तळवलकर, नेमिनाथ उपाध्ये.. सर्वच नामवंत! तेव्हाचे श्रोते भाबडे असतील कदाचित, पण आमच्या याच कार्यक्रमातल्या नावांनी ते आम्हाला ओळखायचे. याच नावावर कार्यक्रम आवडल्याचं पत्रांतून कळवायचे. अक्षरश: शेकडय़ांनी पत्रं यायची. केवळ आवाजाच्या माध्यमातून आमचे त्यांचे घनिष्ट संबंध जुळलेले होते. आमच्या भूमिकांवरच ते प्रेम करायचे. रेडिओ ऐकताना माई, सरूबाई आपल्या घरात येवूनच आपल्याशी बोलतेय, असं त्यांना वाटायचं. आपली सुखदु:खं पत्रांतून कळवायचे. लग्न-मुंज, बारशी, वाढदिवस अशा घरगुती समारंभांची आमंत्रण यायची. दिवाळीला, नववर्षांरंभी शुभेच्छापत्रांचा, संक्रांतीला तिळगुळाचा वर्षांव व्हायचा. श्रोते कलाकारांच्या भूमिकेशी इतके समरस झालेले असायचे की काही कारणाने कलाकार बदलला तर ते त्यांच्या लक्षात तर यायचंच, पण त्याबद्दल ते लगेच पत्रातून विचारणा करायचे- माई कुठे गेली! वहिनीला बरं नाही का! श्रोत्यांना असा बदल पसंत पडत नाही म्हणून मग कलाकार बदलला, व्यक्तिरेखा बदलली तर त्याचा समर्पक खुलासा संवादातून आम्ही करायचो! आता मात्र हा भोळेपणा, भाबडेपणा उरलेला दिसत नाही! मालिकेत कलाकार बदलला तर पडद्यावर एका ओळीत ‘अमुक’ ऐवजी  अमुक आता ही भूमिका करतेय  एवढं सांगितलं तरी चालतं! की ऐकणारे, पहाणारे आम्ही असे मनानं कशात गुंतत नाही? जसं आपसातल्या नात्यात दिसतं तसंच इथंही! कोण जाणे! पण श्रोत्यांच्या स्नेह भावाच्या खरोखरी असंख्य आठवणी मनात राहिलेल्या आहेत. कधीतरी अचानक मागच्या पिढीतलं कुणीतरी भेटतं त्या कार्यक्रमांची आठवण काढतं तेव्हा छान वाटतं. श्रोत्यांचं प्रेम आम्हाला आमचं काम अधिक चांगलं करायला उत्साह द्यायचं. केल्या कामाच्या पसंतीची पावती द्यायचं. आणखी काय हवं!
श्रोत्यांबरोबरच आकाशवाणीत त्याकाळी कार्यरत असलेल्या साहित्यिकांचा, कलाकारांचा सहवास मिळाला. त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली, त्या निमित्तानं त्यांच्याशीही एक नातं जोडलं गेलं हा माझ्या जीवनातला भाग्ययोगच होता. सर्वाधिक लाभ तर होता, एका संवेदनशील, प्रेमळ, कलावंत व्यक्तिमत्त्वाशी अगदी घट्ट स्नेहबंधानं जोडलं जाण्याचा! ज्योत्स्ना देवधर! ज्येष्ठ साहित्यिक आणि पुणे आकाशवाणीतील महिलांच्या कार्यक्रमाच्या निर्मात्या. त्यांचं माझं नातं जमलं ते ‘गृहिणी’ या महिलांच्या कार्यक्रमातच. गृहिणीमध्ये त्या वहिनी आणि मी माई – या वाहिनीची मी नणंद! तर त्या नात्यांनी आम्ही दोघी समरसून कार्यक्रम सादर करायचो! ज्योत्स्नाताई निवृत्त होईपर्यंत, म्हणजे अठरा वर्ष आम्ही दोघींनी एकत्र काम केलं. लेखिका म्हणून सर्वमान्य, वाचकप्रिय होण्याआधी गृहिणीतल्या वहिनी म्हणून श्रोत्यांना, विशेषत: महिला वर्गाला त्या अतिशय प्रिय झालेल्या होत्या. त्यांनीच ‘गृहिणी’ला वाढवलं, श्रोत्यांना प्रिय होईल असं रूप दिलं. त्यांच्या या कामात मी त्यांची सहायक म्हणून होते. पण ज्येष्ठ-वरिष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव त्यांच्या मनात कधी नव्हताच. ऑफिसात तसं असलं तरी ‘गृहिणी’त आम्ही वहिनी आणि माईच! किती छान पद्धतीनं कार्यक्रम गुंफले जायचे त्या वेळी! निमित्त असायचं श्रोत्या भगिनींना मनोरंजनातून माहिती देण्याचं. स्वयंपाक घरातल्या गोष्टींपासून ते जागतिक राजकारणा पर्यंत. ऐतिहासिक, पौराणिक कथांपासून ते विज्ञानाच्या प्रगती पर्यंत सर्वच विषय आमच्या कार्यक्रमात हवेतच. हे असे विषय, माईशी, म्हणजे तरूण, अजून अविवाहित आणि म्हणून सांसारिक गोष्टींत अनभिज्ञ अशा नणंदेशी ही वहिनी बोलायची आणि श्रोत्यांपर्यंत पोचवायची. आणीबाणीच्या काळापर्यंत आमचे सर्वच कार्यक्रम स्टुडिओतून थेट श्रोत्यांपर्यंत जायचे. स्टुडिओतल्या घडय़ाळानं कधी दोनतीन मिनिटं शिल्लक राहिलेली दाखवली की ही वहिनी माईला विचारणार ‘‘माई, बटाटय़ाचा कीस चांगला मोकळा, पांढराशुभ्र कसा करायचा माहितेय! मेथीचे पराठे कसे करायचे!’’ अर्थातच माईला हे माहिती नसायचंच. मग वहिनी ते सर्व सांगणार. कार्यक्रमातली उरलेली मिनिटं भरून काढण्यासाठी वहिनीच्या अशा पाककृती, स्वयंपाकघरातल्या छोटय़ा छोटय़ा उपयुक्त सूचना, काटकसरीचे, बचतीचे मार्ग अशा अनेक गोष्टी उपयोगी, म्हणजेच ज्योत्स्नाताईंचे हे अनुभवाचे बोलच असायचे. कारण त्या स्वत:च उत्तम गृहिणी होत्या. सर्वच सुंदर गोष्टीत त्यांना रस होता. मिनिटा-सेकंदावर चालणाऱ्या आकाशवाणीत मोजक्या वेळात, नेमक्या शब्दांत, जास्तीत जास्त गोष्टी श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या तर कार्यक्रमांचं नियोजन नेटकं हवं, झटपट हवं. ही कसरत करता करताच लेखिका ज्योत्स्नाताईंची लेखनशैली अल्पाक्षरी, पण आशयघन अशी झाली! त्यांच्या लेखनाचं ते वैशिष्टय़च आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांची पृष्ठसंख्या नेहमीच मर्यादित. कुठे फापट पसारा नाहीच.
कार्यक्रमातलं आमचं वहिनी-माईचं नातं वास्तवातही तसंच मनमोकळं होतं; जिव्हाळय़ाचं होतं. खरं तर आकाशवाणीतल्या सर्वाशीच ज्योत्स्नाताईंचं छान नातं होतं. त्यांच्या आणि माझ्याही निवृत्तीनंतर ते कायमच होतं. त्यांच्याकड अधून-मधून जायचं, गप्पागोष्टी करायच्या हे नेहमीच चालायचं. आजही मनाच्या कोपऱ्यात हे बंद घट्ट जपून राहिलेले आहेत.    
chaturang@expressindia.com

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान