News Flash

‘द रोड नॉट टेकन’

तांडय़ातले पहिले पदवीधर असलेले पपा नोकरीसाठी बाहेर पडले नसते तर आज माझ्यासारखी बंजारन पोरगी कुठल्या तरी उसाच्या थळ्यात कोयता घेऊन ऊसतोडणी करत राहिली असती.

|| मीनाक्षी राठोड

तांडय़ातले पहिले पदवीधर असलेले पपा नोकरीसाठी बाहेर पडले नसते तर आज माझ्यासारखी बंजारन पोरगी कुठल्या तरी उसाच्या थळ्यात कोयता घेऊन ऊसतोडणी करत राहिली असती. पण गेल्या बारा वर्षांत जालना जिल्ह्य़ातला गंगारामवाडी तांडा ते मुंबईतलं झगमगतं सिनेजगत असा एक आयुष्य बदलून टाकणारा माझा प्रवास झाला. तरीही या कमालीच्या अनिश्चित क्षेत्रात वावरताना प्रत्येक वेळी रॉबर्ट फ्रॉस्टचा ‘द रोड नॉट टेकन’ निवडण्याचं धाडस माझ्यात कुठून येतं, माहीत नाही. पण येतं आणि चालत राहते..

जालना जिल्ह्य़ातला गंगारामवाडी तांडा ते मुंबईतलं झगमगतं सिनेजगत. गेल्या बारा वर्षांतला हा सर्वार्थानं ‘फिल्मी’ प्रवास. वडील बाबासाहेब आता हयात नाहीत. पण तांडय़ावर अजूनही लोक म्हणतात, ‘ही बाबाची पोरगी!’ इथं मुंबईत आल्यावर ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’मधली सावित्री, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधली वैजयंता, ‘ग्रीवा’ लघुपटातली लता हिवाळे.. अशा किती तरी भूमिकांच्या ओळखी चिकटत राहिल्या, पुढेही राहतील..

मागच्या महिन्यात मुद्दाम तांडय़ावर गेले होते. निमित्त होतं भावाच्या लग्नाचं. ‘डेली सोप’च्या रहाटगाडग्यात अशी अडकले, की मागच्या दोन वर्षांत जाणं झालं नव्हतं. तांडय़ावरच्या गणगोताच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य, कौतुक लपता लपत नव्हतं. माझ्या आईभोवती घोळका करून पोरं नाचू लागली, ‘नानी नानी उ टीव्ही म काम करेवाळ माशी कुळस छ?’ (आजी, ती टीव्हीवर दिसणारी मावशी कोणती आहे?) माझी आई, भाग्यश्री, मला समोर घेऊन आली तशी ही पोरं भिंतीआडून डोकावत लाजून बघत राहिली. मध्येच एखादी आयन्याची चोळी घातलेली याडी (आईच्या वयाची बाई) आलाबला घेऊन जायची. मग सगळ्यांच्या बोलण्यातून कळलं, मला असं गावात आलेल्या नव्या नवरीगत वागवण्याचं कारण म्हणजे मी सध्या करत असलेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका. त्यातली कानडी हेल असलेलं मराठी बोलणारी कुर्रेबाज वैजयंता सगळ्यांना भलतीच आवडत होती.

‘शिवाजी अंडरग्राऊंड’सारखं प्रभावी नाटक गेले सात वर्ष करूनही सर्वसामान्य माणसांपर्यंत मी तितकीशी पोहोचले नाही. ‘बाळूमामा’नं मात्र मला अक्षरश: घराघरांत पोहोचवल्याचा अनुभव सारखा येत राहतो. तर, या दोन वर्षांत तांडय़ावर फारसा बदल झालेला नव्हता. चिखलवाटेच्या पांदीचा मात्र सिमेंट रस्ता झालेला. रस्त्यात लागणारी तीच विहीर, थोडं पुढे गेल्यावर शाळा.. सगळं तेच, पण मी आतून-बाहेरून खूप बदलून गेलेली. एखाद्या चित्रपटाच्या सीनमध्ये ‘गेस्ट अ‍ॅपिअरन्स’ असावा तशी मी. मला बघून आणि बायामाणसांच्या चेहऱ्यावर मला भेटल्याचा झळकणारा आनंद अनुभवून माझ्या साध्यासुध्या आईचा चेहरा अभिमानानं जो काही फुलला होता की पुढचे दोन दिवस लग्नातही आगळाच चमकत राहिला..

खरं तर हे तेच लोक होते, जे आम्हा पोरींवरून आईला काही तरी नेहमीच घालूनपाडून बोलायचे. ‘कशाला पोरींना शिकवता, शहरात धाडता, त्या शिनमाच्या दुनियेचा नाद लय वाईट..’ असं सगळं कानाआड करत आई-पपानं आम्हा पाच बहिणींना शिकण्याचं, जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य घेऊ दिलेलं. माझ्यापेक्षा साधारण पाचेक वर्षांनी मोठी असलेली वहिनी आता घर-संसारात रमलेली. गावाकडं भेटली. तिच्या लग्नात मी जेमतेम बारा-तेरा वर्षांची असेन. मला खूप आवडली होती पहिल्याच नजरेत. दिसायला छान गोरीगोमटी, मधाळ बोलणारी. आता तिची लहान बहीण शोभावी अशी तिची मुलगी सोबत होती. गोड छोकरीला मला भेटवायला घेऊन आलेली. वहिनीचा चेहरा जबाबदाऱ्यांनी जरा प्रौढ झालेला. वहिनीचं सारखं एकच कौतुक सुरू होतं, ‘‘ही माझी पोरगी खूप छान डान्स करते, गाणंपण गाते, बघ ना, किती गोरी आहे, उंच आहे..’’ मीच बोलले, ‘‘हो, हो, खूप छान!’’ माझा शब्द पडण्याआधीच वहिनी तिला बोलली, ‘‘मीनाफुफी घेऊन जाईल हं तुलापण मुंबईला टीव्हीत काम करायला!’’

वहिनीचे शब्द ऐकून दहा-बारा वर्षांपूर्वीचा काळ आठवला. माझ्या करिअर निवडीबाबत पूर्ण ‘ब्लँक’ असणारे, बिचकणारे कित्येक जण आता ‘आमच्या पोरा-पोरींना जरा गाइड कर, त्यांनापण तुझ्यासोबत तिकडं ने’ अशा शिफारशी करत होते.. लोक लग्नात नवरी-नवरदेवासोबत कमी आणि माझ्यासोबतच जास्त फोटोसेशन करायला लागले.  खड्डय़ातून वाट काढत ‘फुल्ल’ मेकअप केलेल्या मला स्कूटर पळवत गॅदिरगच्या स्टेजपर्यंत पोहोचवणारे, मला पहिलं बक्षीस मिळालं की ते गावभर सांगणारे पपा आता आमच्यात नाहीत. पण आता कळतंय, तीच माझी सुरुवात होती. ते आमच्या तांडय़ातले पहिले पदवीधर. शिकून-सवरून पपा नोकरीसाठी बाहेर पडले नसते तर आज माझ्यासारखी बंजारन पोरगी कुठल्या तरी उसाच्या थळ्यात कोयता घेऊन ऊसतोडणी करत राहिली असती. मुंबईसारख्या शब्दश: महानगरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं तेव्हा भांबावलेपणाशिवाय जवळ काहीच नव्हतं. पण हे शहर तुम्हाला कळत-नकळत चहूबाजूंनी समृद्ध करत जातं. इथं खचाखच भरलेल्या बसमध्ये तुम्ही बसता तेव्हा पाचशे रुपयांची नोट दिली तर कंडक्टर तुम्हाला खाली उतरवू शकतो. त्यामुळे पाच रुपये सुट्टे जवळ ठेवावेच लागतात. अभिनय क्षेत्रात करिअर करतानासुद्धा असंच असतं, प्रासंगिकता कळली पाहिजे. जिथे ज्याची आणि जेवढी गरज आहे ते तेवढेच कौशल्य वापरता आले पाहिजे. नसता तुम्ही बाहेर फेकले जाता. हे मी मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’मध्ये शिकले. ‘ग्लासात नवीन काही भरायचे असेल तर आधी तुमचा ग्लास रिकामा करा’ हे रोकडं तत्त्वज्ञानही इथंच सांगण्यात आलं. मग जालन्यात मिळालेली बक्षिसं, झालेलं कौतुक, त्याची डोक्यात गेलेली थोडी हवा, सगळं-सगळं झटकन गळून पडलं. मना-मेंदूची कोंडी फुटायला सुरुवात झाली. इथली भाषा, राहणीमान, शहराचा प्रचंड वेग यांच्याशी जुळवून घेता घेताच नाटय़शास्त्राची दोन वर्ष हातातून वाळूसारखी निसटून गेली.

विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण झालं तसा ‘आता पुढे काय?’ हा प्रश्न समोर उभा राहिला. मालिका-चित्रपटात कामं मिळवायला चार कार्यालयांत भेटी दिल्या तेव्हा कळलं, की भारतातल्या कानाकोपऱ्यांतून असंख्य तरुण ‘स्ट्रगलर्स’ इथं मुंबापुरीत येऊन राहतात, प्रचंड मेहनत करतात.. मग मी तर महाराष्ट्रातलीच आहे, मला कसली भीती, हा विचारच मला मुंबईमध्ये पाय रोवून राहण्याचं बळ देऊन गेला. पण नुसत्या ऑडिशन्स देणं म्हणजे मृगजळाच्या मागे धावणं होऊन बसलं होतं. मात्र सोबतच राजकुमार तांगडे, संभाजी भगत, नंदू माधव यांच्यासह आम्ही दोन वर्ष ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटकाच्या संकल्पनेवर काम करत राहिलो. मुंबईसारख्या महागडय़ा शहरात रूमचं भाडं भरून फक्त एखाद्या नाटकाच्या संकल्पनेवर काम करायचं हे मोठंच दिव्य होतं. माझ्या बरोबरीची मुलं, मुली मला आणि माझा नवरा, अभिनेता कैलास वाघमारेला, ‘‘हे असं कोणतं नाटक तुम्ही करत आहात दोन-दोन वर्ष?’’ म्हणून नावं ठेवत होती.

आम्हालाही काय घडतंय ते कळत नव्हतं, पण अखेर २० मे २०१२ रोजी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा पहिला प्रयोग दणक्यात पार पडला आणि त्याच्या अपारंपरिक आशय-विषयामुळे सगळी नाटय़सृष्टी ढवळून निघाली. या नाटकातली मुख्य भूमिका, सावित्री या चळवळीतल्या स्त्रीचं पात्र मी साकारलं. बघता-बघता वर्ष सरलं आणि एका वर्षांत २०० प्रयोगांचा पल्ला या नाटकाने पूर्ण केला. ‘क्लास आणि मास’मध्ये प्रचंड प्रसिद्धी, आडवातिडवा प्रवास, प्रत्येक शहरात भरभरून प्रेम करणारे चाहते, असं सगळं अनुभवलं. पण नाटकाच्या प्रयोगाशिवाय इतर फार काहीच आयुष्यात घडत नव्हतं. मित्रांशी चर्चा केल्यावर नाटय़शास्त्रातली नेटची परीक्षा द्यायचं ठरवलं. एक महिना स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं. पहिल्याच प्रयत्नात पास झाले. जालना जिल्हय़ात घनसावंगीला लेक्चररची नोकरी मिळणार होती. चांगला पगार होता. माझे कित्येक मित्र-मत्रिणी नेट पास करून नोकरी शोधत होते, पण मला या नाटकाच्या बळावर सहज नोकरी मिळाली. ‘आता तुझा स्ट्रगल संपला, मस्तपैकी नोकरी करायची आणि आनंदात राहायचं,’’ असं सगळे म्हणत होते. घरचे तर खूपच खूश झाले. मीपण मुंबई सोडण्याची तयारी केली. बॅग भरली. रात्रीची ट्रेन पकडून जालन्याला जाऊन दुसऱ्या दिवशी कामावर रुजू व्हायचं होतं. पण आत खोलवर अस्वस्थ होते.

एका नृत्य स्पर्धेला मी लातूरला गेल्याचं मला आठवलं. तेव्हा मी सेकंड इयरला असेन. मी कैलास आणि आमचे दोन मित्र, आम्ही वृत्तपत्रातली छोटीशी जाहिरात बघून दिवसभर प्रवास करून जालन्यावरून लातूरला गेलेलो. संध्याकाळ झाली होती. तिथं राहण्याची कसलीच व्यवस्था नव्हती. मग तिथल्या व्यवस्थापकाला विनंती केल्यावर त्यांनी आम्हाला तिथल्या शाळेची खोली उघडून दिली होती.. ती स्पर्धा अशी धडपडत आम्ही केली. पुन्हा काही दिवसांनी आमच्या महाविद्यालयात युवक महोत्सवाच्या निवडी सुरू झाल्या. माझी निवड झाली नाही. खूप गलबलून आलं. खूप रडले पण मी जिद्द सोडली नाही. घरी जाऊन बॅग भरली. ट्रेन पकडली आणि युवक महोत्सवात जाऊन पोहोचले. एका  मत्रिणीच्या होस्टेलवर दोन दिवस काढले आणि तिथं राहून सगळा युवक महोत्सव अनुभवला. ‘हा सगळा अट्टहास मी का आणि कशासाठी केला होता,’ हा प्रश्न मला सतावू लागला. ‘मला खरंच नोकरी करायची की स्वत:तल्या कलावंताला न्याय द्यायचाय?’ मी स्वत:ला पुन्हा-पुन्हा विचारलं, तेव्हा माझ्या आतून खरंखुरं उत्तर आलं. मी दुसरा पर्याय निवडला. संस्थाचालकांना फोन करून ‘सॉरी, मी तुमच्याकडे नोकरी नाही करू शकत,’ असं सांगितलं. आजही या कमालीच्या अनिश्चित क्षेत्रात वावरताना प्रत्येक वेळी हे रॉबर्ट फ्रॉस्टचा ‘द रोड नॉट टेकन’ निवडण्याचं धाडस माझ्यात कुठून येतं, माहीत नाही.

आता अनेकानेक प्रयोग सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वीच माझी मुख्य भूमिका असलेल्या ‘मयत’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुन्हा प्रचंड कौतुक सुरू झालं. वाटलं, आता आपण ‘सराईत’ होतोय का काय? आपल्याला साचलेपण येतंय का काय? मग हे वाटणंच मला माझ्या मुळांकडे, थेट बंजारा तांडय़ावर घेऊन गेलं. तिथल्या रसिल्या-रंगिल्या होळीची लोकगीतं लहानपणापासूनच कानात रुजलेली. गावी होळीला गेले आणि लख्खकन मनात चमकलं. परत मुंबईला आल्यावर एका स्टुडिओमध्ये बंजारा होळीचं एक झोकदार गाणं रेकॉर्ड केलं. अख्ख्या स्टुडिओचा जणू तांडा झाला. सगळ्यांच्याच ओठावर ‘छोरी तारे घुंगटे म, चांदा छ ए का सूर्या छ..’ (ए पोरी, पदराआड लपवलेला तुझा चेहरा म्हणजे चंद्र आहे की सूर्य?) खेळू लागलं. पुढं हे लोकधन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं. मग एका बडय़ा निर्मात्यानं ते गाणं बघितलं आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ झालं!

माझ्यातली ‘मी’ गावात असो की महानगरात, मुळं मला कायम खुणावत राहतात. आतल्या कलावंताची नवी रूपं जणू आयने समोर ठेवून दाखवत राहतात. हरेक रूप तितकंच देखणं दिसतं. तरीही मी चालत राहते, अजून नव्याच्या शोधात!

meenakshi.rathod46.mr@gmail.co

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:07 am

Web Title: me chi gosht article by meenakshi rathore mpg 94
Next Stories
1 रवींद्र विचार जगणारं ‘पाठोभवन’
2 कामातुराणां न भयं न लज्जा
3 हिमबिबटय़ाचे संरक्षण
Just Now!
X