शिल्पा चौडापूरकर

आयुष्यातल्या खऱ्या आव्हानांना आता कुठे सुरुवात झालीय. आयुष्याच्या प्रवासात हेही समजलं, की लहानपणी पटलेलं स्त्री-पुरुष समानतेचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात एका मर्यादेपर्यंतच खरं आहे. पण तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल तर तो संयमानेच घडवावा लागेल. केवळ आडमुठेपणा बजावत विरोधाला विरोध करण्यात काही अर्थ नाही. गोष्टी समजून घेऊनच पुढे जावं लागेल. अर्थात एका रात्रीत हे शहाणपण आलेलं नाही. त्यासाठी वयाची खूप वर्ष घालवावी लागली. स्वत:च्या अविरत शोधात असे आयुष्याचे अर्थ सापडत जातात..

खरंच मी मला सापडलेय का? न संपणारा प्रश्न आणि खरं तर आयुष्यभर न मिळणारं त्याचं उत्तर. पण मनात आलं,शोधू या का? काय हरकत आहे? एकदा या रोजच्या धावपळीत छोटासा विराम घेऊन थोडा विचार केला तर काय बरं उत्तर मिळेल? कोण आहे मी? लहानपणापासून एकाग्रपणे शाळा-महाविद्यालयाचा अभ्यास करणारी, इतर अवांतर पुस्तकं खूप वाचणारी, प्रामाणिक मध्यमवर्गीय नोकरदार आई-वडिलांनी वाढवलेली त्यांची लाडकी मुलगी म्हणून जग मला ओळखतं. माझ्या आईने माझ्यावर कधीही मुलगी म्हणून कोणतेही नियम लादले नाहीत. तिचे पक्के स्त्रीवादी विचार ती माझ्यावर नेहमी बिंबवायची. ते मला एकदम पटायचे. मुलगा असो किंवामुलगी, दोघांनी घरातली आणि बाहेरची कामं केलीच पाहिजेत, ही तिची शिकवण. अगदी स्वयंपाकापासून ते भिंतीवरची पाल मारण्याचं काम असो किंवा बाहेरून पैसे कमवून आणण्यापर्यंत सगळ्या कामांमध्ये कुणा एकाची मक्तेदारी नसावी हे ऐकतच मी मोठी झाले.

काळ होता पंचवीस वर्षांपूर्वीचा. आजच्याइतके विचार आणि आचारस्वातंत्र्य तेव्हा उपनगरीय समाजात नावालाही नव्हते किंवा असं म्हणू या, की मी ज्या चौकटीत वाढत होते त्या वातावरणात ते रुजलेलेही नव्हते. मला आठवतंय, माझ्या शाळेत मुलांनी मुलींशी बोलणं म्हणजेदेखील महाचर्चेला निमंत्रण होते. आतासारखं सगळं अंगावर येण्याइतपत मुक्तछंदात जगणं नव्हतं. सगळं काही गृहीत नव्हतं. तेव्हा ‘दूरदर्शन’ होतं. मोबाइल्सचा तर प्रश्नच नव्हता. तेव्हा आमच्या उपनगरांत माझ्या वयाच्या एकाही मुलाला मी कधीही स्वयंपाकघरात काम करताना पाहिलं नव्हतं, की एकाही मुलीला शॉर्ट पॅण्ट्स अ‍ॅण्ड हॉल्टर टॉप्स घालून रस्त्यात सहजपणे वावरताना पाहिलं नव्हतं. ते सगळं बहुधा वांद्रे आणि मलबार हिल परिसरातील उच्चभ्रूंसाठी राखीव होतं.

शाळेत असताना खूप साहित्य वाचलं. अगदी ‘श्रीमान योगी’पासून ते लुईसा मे अल्कॉटच्या ‘लिटिल वुमन’पर्यंत. हे वाचताना वाटायचं की सगळं ज्ञान आलं आपल्याला. पण जेव्हा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला आणि मारिओ पुझोचं ‘गॉडफादर’ वाचलं तेव्हा माझा मध्यमवर्गीय गोड-गोड जगाबाबत असलेला भ्रमाचा फुगा फुटला. त्यानंतर मी इंग्रजी साहित्याचा फडशा पाडला आणि अभिजात-समांतर जागतिक साहित्याच्या समुद्रात मुक्तपणे विहरण्याचा आनंद घेतला. आपण आजपर्यंत केवढय़ा मर्यादित जगात होतो याची जाणीव झाली. जग कशा प्रकारचं असू शकतं, याचं भान या वाचनातून आपसूक यायला लागलं. यथावकाश शिक्षण झालं, नोकरी सुरू झाली. स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं लहानपणीच पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. नंतर हळूहळू उमजायला लागलं, की ही तर नुसती सुरुवात होती.

आयुष्यातल्या खऱ्या आव्हानांना आता कुठे सुरुवात झालीय. तेव्हाही अनुभवांनी आणि वाचनातून तयार झालेल्या विचारशक्तींनी छानपणे जमिनीवर ठेवलं. मग कळलं, की काहीही गृहीत धरायचं नाही. हेही समजलं, की लहानपणी पटलेलं स्त्री-पुरुष समानतेचं तत्त्वज्ञान प्रत्यक्षात एका मर्यादेपर्यंतच खरं आहे. स्त्रीवादी विचारधारा खूप छान आहे. पण तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल तर तो संयमानेच घडवावा लागेल. केवळ आडमुठेपणा बजावत विरोधाला विरोध करण्यात काही अर्थ नाही. गोष्टी समजून घेऊनच पुढे जावं लागेल. अर्थात एका रात्रीत हे शहाणपण आलेलं नाही. त्यासाठी वयाची खूप वर्ष घालवावी लागली. आज जेव्हा थोडं आर्थिक स्थैर्य आलंय तेव्हा पटतं, की आयुष्यात ‘इन्स्टंट नूडल्स’ सारखं काही नसतं. हेच तत्त्वज्ञानमी आता माझ्या पुरत्या स्त्रीवादासाठीसुद्धा वापरायचं ठरवलंय. त्याची सुरुवात माझ्या आठ वर्षांच्या भाच्यापासून करतेय. स्वयंपाकघरातील काम त्याचंही आहे हे त्याला शिकवतेय. शेवटी पहिलं पाऊलच हजार पावलं पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. क्रांती काही एकदम घडणार नाही. नुसती ‘इनक्रेडिबल इंडिया’ ही घोषणा करून काही होणार नाही. तसे प्रत्येकाच्या पातळीवर प्रयत्नही व्हावे लागतील.

माझ्याकडे कामाला येणारी बाई मला त्या दिवशी म्हणाली की तिची मुलगी गरोदर आहे. तिला म्हटलं, ‘अभिनंदन’ तर मला म्हणाली, ‘छे, खरं अभिनंदन तेव्हा होईल, जेव्हा तिला मुलगा होईल.’ मला धक्काच बसला. म्हटलं, अरे आज २०१९ मध्ये १९१९ सारखा विचार करतात हे लोक! त्या बाईचा आर्थिक स्तर निम्न आहे किंवा शिक्षण नाहीये म्हटलं तरी हे नाकारता येणार नाही, की आजही भारतात पुत्रप्राप्तीला नको इतकं महत्त्व आहे. तथाकथित शिकलेला समाजही कुठे तरी मुलीच्या जन्माला दुय्यम स्थान देतोय. हा सारा भवताल मन दुभंगून टाकणारा आहे. केव्हा बदलणार हे सगळं? बायकांनी अजून काय केलं म्हणजे लोकांना हे पटेल की मुलीचा जन्मही महत्त्वाचा आहे? मला अनुभवाने असं वाटतंय की जोपर्यंत ‘हळदीकुंकू’ संस्कृती चालू आहे, तोपर्यंत हे बदलणार नाही. शेवटी ही सगळी सांस्कृतिक प्रतीकं आहेत. पुरुषांना महत्त्व देण्याची. हे जर बंद झालं तर थोडय़ा तरी बदलांच्या आरंभाची शक्यता आहे. या विचारांना जाहीरपणे मांडलं की, लोक म्हणतात की, ‘ही मुलगीच वाह्य़ात आहे.’ आधी राग यायचा की आपल्या अपसमजांना घट्टपणे धरून  मिरवणारे हे लोक असं का बोलतात? मग ठरवलं की चिडचिड करून काही होणार नाही आणि कुणावरही राग धरून काहीही साध्य होणार नाही. आपल्या वागणुकीने लोकांना लिंगभेदभावातील निर्थकता दाखवून द्यायला पाहिजे हे जेव्हा पक्कं केलं तेव्हा माझ्या परीने मी जगण्यात काही बदल घडवले. याबाबत अतिरेकी वागून किंवा आपण वेगळ्या विचारांचे असल्याचं दर्शवण्यासाठी उगाच मोर्चे काढून काहीच विशेष घडत नाही.

अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्यापासून ते मी सध्या कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाकडून प्रत्येक क्षणी मला नवं काही तरी शिकायला मिळतं. माझ्या अनुभवांत आणि ग्रंथवाचनातून मिळालेल्या ज्ञानात याची दरदिवशी भर पडत असते आणि माझ्या आकलनक्षमता रुंदावत नेण्यास मला मदत होते. त्यासाठी मनाचा ‘फिल्टर’ मी कायम सुरू ठेवलेला असतो. त्यामुळे योग्य ते बरोबर गाळून येतं.

आज होतंय काय की, उगीच सगळीकडे आदर्श स्वप्नाळू झापडं लावली जातात आणि आम्हीच कसे स्टॅण्डर्ड आहोत, हे बिंबवण्याची चढाओढ लागते. समाजात असो किंवा समाजमाध्यमात, ही स्पर्धाच अप्रत्यक्षपणे लागलेली दिसते. हे प्रत्येकाच्या बाजूने कळत नकळत होते. मीही त्या प्रांतातून वावरले आहे. पण त्यामुळे फक्त मनस्तापच वाटय़ाला येतो. आजूबाजूचे बदल मोकळ्या मनाने स्वीकारायचे. मग ते एखाद्या काकूंनी ‘आमच्या वेळेला असं नव्हतं बरं का’ असा मारलेला टोमणा असू दे नाही तर ‘#मीटू चळवळ’ असू दे, आपण योग्य ते घ्यायचं आणि वाटचाल पुढे सुरू ठेवायची.

खरं सांगायचं तर आत्तापर्यंत कळत नकळतपणे ‘लोक काय म्हणतील’ किंवा लोकांचा बरा-वाईट शिक्का महत्त्वाचा वाटत आलेली आमची पिढी आता कुठे बदलायला लागली आहे. आता वाढलेल्या वयानुसार आणि आयुष्याला भवतालाने, तंत्रज्ञानाने दिलेल्या द्रुतगती वेगामुळे समाजाचे ‘शिक्कीकरणा’चे महत्त्व कमी झाले आहे. आपला आनंद कशात आहे, हे अखेरीस आजच्या पिढीला कळलंय. याच आनंदाचं ऐकून मी इंग्रजीत दोन कादंबऱ्या लिहिल्या. स्वत:ला व्यक्त करताना खूप छान वाटलं.

स्वत:ची इतरांशी तुलना करणं सोडून दिलंय. कारण कोणी तरी कुठल्या तरी बाबतीत माझ्यापेक्षा कायम पुढेच राहणार हे नक्की. पण खरं सांगते, हे वाचायला सोप्पं वाटतं पण मला हे आत्मसात करायला वेळ लागला. दीपिका पदुकोण ‘ये जवानी है दिवानी’मध्ये रणबीर कपूरला सांगते तसं, की कुठे तरी काही तरी आपलं हरवणारच. सगळं मिळण्याचा अट्टहास कशाला? त्यापेक्षा आहे ते एन्जॉय करू या की. किती साधा पण मस्त विचार! शेवटी स्वत:चा शोध कधीही संपणार नाही. तो संपायलाही नको. नाही तर आयुष्य आणि विचारांचा विकास थांबेल. आता मी ‘लोकांना आवडतेय का?’ पासून ‘मला कोण आवडतंय?’ इथपर्यंत येऊन पोचले आहे. जगप्रसिद्ध गायक बॉब मार्लेचं एक वाक्य आहे, ‘मनी इज जस्ट अ नंबर अ‍ॅण्ड नंबर्स नेव्हर एण्ड. इफ इट टेक्स मनी टू बी हॅपी, युअर सर्च फॉर हॅप्पीनेस विल नेव्हर एण्ड.’

माझ्यापुरता माझा आनंद कशात आहे हे जरा-जरा मला उलगडतंय. मी खूप पैसे कमावत नाही किंवा पेज थ्रीवर विराजमान नाही. हे सगळं निश्चितच थोर असलं तरी माझ्याजवळ नाही म्हणून मी दु:खी राहणार नाही किंवा त्याच्यासाठी मी रॅटरेसमध्येही सहभागी होणार नाही.  एखादं छान पुस्तक वाचण्यात किंवा एखादी छान पाककृती करण्यातही उत्कट आनंद मिळवता येतो. एखाद्या लहान मुलाला खेळणं दिल्यानंतर त्याचा त्यातला निखळ आनंद आपल्याला अवर्णनीय समाधान मिळवून देऊ शकतो. हे मला उमजल्यानंतर आयुष्य कसं आनंदी बनवावं याची गुरुकिल्लीच माझ्या हाती लागली.

आतापर्यंतच्या आयुष्यात, माझ्यापुरती मला सापडलेली मी जगाच्या दृष्टीने परिपक्व की अपरिपक्व, हे फारसं महत्त्वाचं नाही. तर दर दिवशी सांस्कृतिक, भौतिक आणि वैचारिक दिशेने घडविणारा भवताल मला सर्वार्थाने पुढल्या पायरीवर आणून ठेवतोय, हे महत्त्वाचं आहे.

shil.c877@gmail.com

chaturang@expressindia.com