डॉ. नितीन पाटणकर

आपल्या आतडय़ात अब्जावधी जंतू वस्तीला असतात. ते आपले स्वास्थ्यरक्षण करतात. त्यांची ओळख करून घेणे महत्त्वाचे असते.  मधुमेह, हृदयरोग, आतडय़ांचा कर्करोग हे आजार होण्यामध्ये आतडय़ातील सूक्ष्म जीवांचे बदललेले प्रमाण हे एक महत्त्वाचे कारण असते. माणसाच्या सर्व गुणसूत्रात मिळून पंचवीस हजार जीन्स असतात, तर आतडय़ातील या सूक्ष्म जीवांच्या जीन्सची संख्या त्याच्या दीडशेपट जास्त असावी असा अंदाज आहे.

निर्जंतुक म्हणजे निरोगी, असा आपला समज असतो. साबणाच्या जाहिरातीत नेहमी ९९ टक्के जंतू मारले जातात. लहान मुले खेळायला गेली, की त्यांच्या हातांवर जंतू लागतात आणि त्यातून रोग होतात. मग हुशार, स्वच्छ आणि सुंदर दिसणारी आई आपल्या मुलाला कुठल्या तरी साबणाने धुते आणि तो एकदम निरोगी होतो. ही जाहिरात पाहताना मला नेहमी तुलसीदासांच्या ‘ठुमक चलत रामचंद्र’ या दि. वि. पलुस्करांनी अत्यंत मधुर आवाजात आणि ठुमकत्या लयीत गायलेल्या भजनाची आठवण येते.

‘किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय

धाय मात गोद लेत दशरथ की रानीयां

अंचल रज अंग झारि विविध भांति सो दुलारि

तन मन धन वारि वारि कहत मृदु बचनियां’

या ‘दशरथ की रानियां’ आजच्या काळात असत्या तर त्यांनी काय केले असते हे दृश्य डोळ्यासमोर येते.

खरं तर सगळेच जंतू वाईट नसतात. आपल्या आतडय़ात अब्जावधी जंतू वस्तीला असतात. ते आपले स्वास्थ्यरक्षण करतात. त्यांची ओळख करून घेणे महत्त्वाचे असते.

डेमोग्राफिक चेंज घडवून आणला, की त्या भागातील लोकप्रतिनिधी कोण होणार याची गणिते बदलतात. अगदी तसेच आपल्या आतडय़ात होते. सूक्ष्म जीवांच्या विविध जातींमध्ये काही अल्पसंख्य असतात, तर काही बहुसंख्य. प्रत्येक व्यक्तीगणिक त्याच्या आतडय़ात कुठच्या जातीच्या जंतूंचे किती प्रमाण हे भिन्न असते. त्या प्रमाणावर त्या व्यक्तीला होणारे आजार किंवा आजारापासून संरक्षण या गोष्टी ठरतात. इरिटेबल बॉवेल, मधुमेह, हृदयरोग, आतडय़ांचा कर्करोग, हे आजार होण्यामध्ये या सूक्ष्म जीवांचे बदललेले प्रमाण हे एक महत्त्वाचे कारण असते. स्टूल्समधील जीन तपासून या सूक्ष्म जंतूंचे सेन्सस घेता येते, या सूक्ष्म जीवांच्या जाती आणि उपजाती ठरवता येतात; पण सूक्ष्म जीवांची संख्या आणि प्रकार यांच्यामुळे ते काम जवळजवळ अशक्यप्राय ठरते. ‘शॉटगन मेटॅजिनॉमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हे शक्य झाले आहे. जसजशी आपली या सूक्ष्म जीवांबद्दलची समज वाढते आहे तशा इतक्या वर्षांत न जाणवलेल्या गोष्टी कळू लागल्यात. माणसाच्या सर्व गुणसूत्रात मिळून पंचवीस हजार जीन्स असतात, तर आतडय़ातील या सूक्ष्म जीवांच्या जीन्सची संख्या त्याच्या दीडशेपट जास्त असावी असा अंदाज आहे.

हिंदी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय प्रसंग म्हणजे, ‘एकमेकांपासून दुरावलेली जुळी भावंडे’. अशाच दुरावलेल्या (जत्रेत किंवा खलनायकाच्या कारवायांमुळे नव्हे) जुळ्यांच्यात ‘मेटॅजिनॉमिक्स’चा वापर करून आतडय़ातील सूक्ष्म जीवांची माहिती गोळा केली तेव्हा लक्षात आले, की आहार आणि संगती (कोहॅबिटेशन) याचा या सूक्ष्मजंतूंच्या प्रकारावर मोठा प्रभाव असतो. माणसाची गुणसूत्रे आणि त्याचे आजार यात ठाम नातेसंबंध (असोसिएशन) प्रस्थापित झाले आहेत. अगदी तसेच नातेसंबंध आणि त्याचा प्रभाव किती प्रमाणात पडतो हे आता सिद्ध झाले आहे. वजन, स्थूलता, फास्टिंग ग्लुकोज, गुड कोलेस्टेरॉल, ब्लड प्रेशर, हृदयरोग हे सगळे होण्याशी सूक्ष्म जीवांचा जवळचा संबंध आहे. संगती (कोहॅबिटेशन) म्हणजे एकत्र राहण्याने या आतडय़ातील जंतूचे आदानप्रदान होत राहते आणि त्या आतडय़ातील सूक्ष्म जंतूंचे एक वेगळे कुटुंब तयार होते.

बरेचदा रुग्णाला विचारतात, ‘‘घरात कोणाला मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा त्रास आहे का?’’ तेव्हा स्त्रियांचे उत्तर असते, ‘‘आमच्याकडे कुणालाच हे आजार नाहीत; पण सासरी मात्र ‘फॅमिली हिस्ट्री’ आहे किंवा याउलट ‘‘आमच्याकडे म्हणजे ना, सगळे साखर कारखानदार आणि सासरी सगळे अगोड’’ वगैरे. आता मात्र विचार करायला हवा की, एकत्र राहिल्यानेदेखील आजार होऊ शकतात किंवा टळू शकतात. गेली अनेक वर्षे एक चूक करत होतो त्याची कबुली इथे द्यायला हवी. बऱ्याचदा रुग्णाला विचारले, की हा त्रास कधीपासून होतो आहे आणि रुग्ण स्त्री असेल तर उत्तर येते की, ‘‘लग्न झाल्यापासून माझे सर्व त्रास चालू झाले.’’ यावर मला हसू येत असे. हसू येणे चूक होते. त्या स्त्रिया बरोबर असण्याची शक्यता होती, कारण वर वर्णन केलेल्या सूक्ष्म जीवांच्या आदानप्रदानामुळे काही त्रास वा आजार हे लग्नानंतर सुरू होऊ शकतात हे कळले आहे.

हे सूक्ष्म जीव आपला फायदा करून देतात. पचू न शकलेली कबरेदके हे यांचे अन्न. त्यातून ते विविध प्रकारची ‘शॉर्ट चेन फॅटी अ‍ॅसिड्स’ (एससीएफ) तयार करतात. ही एससीएफ अ‍ॅसिड्स शरीरात शोषली जाऊन शरीराला ऊर्जा पुरवतात आणि इतरही अनेक कामे करतात. उदाहरण द्यायचे झाले तर या फॅटी अ‍ॅसिड्समुळे; चयापचयाची गती (मेटाबॉलिक रेट) वाढते. लेप्टीन नावाचे संप्रेरक पाझरून मेंदूला सूचना मिळते, की पुरेसे अन्नसेवन झाले आहे, आता पुरे. चरबीच्या पेशीतून हे लेप्टीन पाझरण्यासाठी या सूक्ष्म जीवांनी निर्माण केलेल्या फॅटी अ‍ॅसिड्सची गरज लागते. याच फॅटी अ‍ॅसिडमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहायला मदत होते. शिवाय आवरणातील पेशींचे कर्करोगापासून संरक्षण होते.

‘गट फीलिंग’ हा शब्द आपण अनेकदा ऐकला आणि वापरलाही असेल. माझ्या ‘योग, चक्र आणि संगीत’ या कार्यशाळेमध्ये मी नेहमी सांगतो, की उदरपोकळीतील अवयवांना बोलता येते मेंदूशी. त्या बोलण्याचे शब्द हे रसायनाचे असतात. त्याची निर्मिती आतडय़ातील सूक्ष्म जीवांमुळे होते. दुभाषा असतात ती चक्र आणि संदेश वहन करतात त्याला योगात ‘नाडी’ म्हणतात. तसेच मेंदूकडून जे संदेश येतात ते याच मार्गाने उलटे येतात आणि त्याप्रमाणे या सूक्ष्म जंतूंचे काम, संख्या बदलते. यालाच हल्ली ‘क्रॉस टॉक बिटविन गट अ‍ॅन्ड ब्रेन’ असे म्हणतात. या संभाषणातून अनेक व्याधी उद्भवतात किंवा रोखल्या जातात. ‘सर्व रोगांचे मूळ पोटात असते’ अशी एक म्हण आहे, ती किती सयुक्तिक आहे ते आता कळू लागलेय.

इतके गुणकारी हे सूक्ष्म जीव. यांचा सांभाळ कसा करायचा? यांची संख्या घटली तर त्यांचे पुनरुज्जीवन कसे करायचे किंवा जर रोगकारक सूक्ष्म जीवांची वाढ झाली असेल तर त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे माहीत हवे ना. या सूक्ष्म जीवांच्या जातींमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात. ज्याच्या आवडीचे खाणे देत राहू ती जात प्रबळ आणि संख्याबहुल होत जाणार आणि ज्याच्या आवडीचे खाणे मिळत नाही तिची उपासमार होऊन ती अल्पसंख्य होणार. जंक फूड आणि त्यातील अतिरिक्त कबरेदके, अति चरबीयुक्त खाणे किंवा मांसाहारावर फार भर असणे, साखर नको म्हणून वापरले जाणारे शुगर सब्स्टिटय़ुट्स, प्रतिजैविकांचा अतिरेकी वापर, या सर्व गोष्टींमुळे रोगकारक सूक्ष्म जीवांची वाढ होते. अति ताणतणाव हेसुद्धा या रोगकारक सूक्ष्म जीवांच्या वाढीस कारण ठरतात. आहारातील बदलामुळे या सूक्ष्म जीवांच्या संख्येत बदल घडवून आणण्यासाठी आहारातील बदलांसोबतच या सूक्ष्म जीवांचे सेवन करता येते. औषधाच्या दुकानात अनेक प्रकारची औषधे आहेत ज्यात हे सूक्ष्म जीव साठवून ठेवलेले असतात. हल्ली तर अनेक खाद्यपदार्थ सूक्ष्म जीवयुक्त (विथ प्रीबायोटिक)असतात. रोगप्रतिकारक सूक्ष्म जंतूंच्या वाढीसाठी सोल्युबल फायबर असलेले पदार्थ उपयोगी असतात. याचेही प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या सोल्युबल फायबरचे पचन फक्त रोगप्रतिकारक किंवा रोगप्रतिबंध करणारे सूक्ष्म जीव करू शकतात. त्यामुळे असे सोल्युबल फायबरयुक्त पदार्थ सतत खाण्यात आले तर हवे ते सूक्ष्म जीव वाढीस लागतात आणि रोग निर्माण करणारे संख्येने कमी होत जातात.

असे फायबर सहज आणि मुबलक प्रमाणात मिळू शकतात असा आहार म्हणजे भारतीय आहार. कांदा आपल्या आहारात महत्वाचा. कांद्यामध्ये रोगप्रतिबंधक जंतूंना वाढवण्यासाठी लागणारे फायबर उत्तम प्रमाणात असते. तसेच अनेक भाज्या, पालेभाज्या यांच्या पृष्ठभागावर चक्क रोगप्रतिबंधक सूक्ष्मजंतूच राहत असतात. भाज्या स्वच्छ धुऊन जर त्याला खूप जास्त काळ न शिजवता खाता आले तर फार छान. स्मूदी हा प्रकार लोकप्रिय होण्यामागे हेसुद्धा एक मोठे कारण आहे.

मात्र एक कोडे अजूनही सुटलेले नाही. समजा, मी माझ्या आहारात बदल केले आणि माझ्या आतडय़ातील जंतूंची डेमोग्राफी बदलली तरीही जर मी तो वेगळा आहार घ्यायचा थांबवला तर काही आठवडय़ांत माझ्या आतडय़ातील सूक्ष्म जंतूंचे पुनर्वसन होऊन पुन्हा पूर्वीच्याच प्रमाणात सूक्ष्म जीवांचे प्रमाण आणले जाते. ही मेमरी किंवा लीगसी कशी काम करते ते अजून उलगडलेले नाही.

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com