29 November 2020

News Flash

विकसित व्हावे.. अर्पित होऊन जावे..

‘‘सहाव्या वर्षी दाभोळला शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी २४ कुटुंबांमध्ये राहून डॉक्टर झालो आणि सामाजिक भानातून लोकमान्यांच्या जन्मगावी चिखलगावला आलो.

| July 4, 2015 12:30 pm

‘‘सहाव्या वर्षी दाभोळला शिक्षणासाठी  बाहेर पडलेला मी २४ कुटुंबांमध्ये राहून डॉक्टर झालो आणि सामाजिक भानातून लोकमान्यांच्या जन्मगावी cr24चिखलगावला आलो. परिसरातील २० खेडय़ांत ‘मोबाइल डिस्पेन्सरी’ सुरू केली. नंतर ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिरा’ची स्थापना झाली. तिथेच ग्रंथालय स्थापन करून १५ हजारपेक्षा जास्त पुस्तकांची वाचन चळवळ उभी राहिली. ‘सावित्री कन्या छात्रालय’ सुरू झाले. ‘समर्थ व्यायाम मंदिर’ उभारलं गेलं, मित्र छावणी कँपसाइट सुरू झाली. हजारो हातांच्या योगदानातून एक नवी सृष्टी आकार घेऊ लागली.. लोकसाधनेतून जीवन सार्थकी लागत आहे याचा आनंद आहे!’’

आ युष्याच्या वळणवाटांवरून होणाऱ्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे अनुभव आले त्यातून जगण्यासाठी जे शिकायला मिळाले त्याविषयी मागे वळून पाहताना काही बोलायचेच झाले तर खूप काही सांगता येईल.. खूप आठवणी आहेत..
सर्वात प्रथम आठवतं ते माझं बालपण.. आमचं गाव म्हणजे गुडघे. म्हणजे गोनिदांची ‘पडघवली’. जंगलात जन्मलो. तसं लहानपणही तिथेच म्हणजे जंगलातच गेलं. जगता जगता शिकताना आयुष्याच्या वळणवाटांवरती जंगलानेही खूप काही शिकवलं. पशू, पक्षी, प्राणी यांच्याबरोबर जगताना माणूस म्हणून कसं जगावं हे खरं तर त्यांनीच मला शिकवलं. घरी वडिलांचा दंडक होता, ‘जे काम तुला करता येत नाही ते तू दुसऱ्याला सांगायचं नाही.’ त्यामुळे बालपणापासूनच स्वयंशिस्तीची सवय लागली. तशीच गडीमाणसांना आदराने हाक मारण्याचीही. विठूमामा, धोंडूमामा, पांडुमामा, धोंडी आक्का, भागुजीदादा, जनीताई अशी कितीतरी नावे! (विठ्ठमामाने वडिलांना झाडावर चढणं, नांगर धरणं शिकवलं.) घरातले प्राणी हीसुद्धा घरामधली माणसंच. त्याचं मिळून आमचं एक मोठ्ठ कुटुंबच होतं! या प्रत्येकाकडून मला काही तरी शिकायला मिळायचं. तेव्हापासून मी विद्याव्रती विद्यार्थी झालो. तो आजही मी विद्याव्रती विद्यार्थीच आहे..cr26
.. आता मी ६ वर्षांचा झालो होतो. त्या दिवशी रात्री मी आईच्या कुशीत शिरून रडत होतो. उद्या पहाटेच अप्पाकाकांबरोबर ७ मैल दाभोळला शिक्षणासाठी राहायला जायचं होतं. आई समजूत घालत होती. ‘बाळा, जवळपास शाळा नाही. घरी बसून काय करणार? शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणासाठी तुला घर सोडून दूर राहायलाच लागेल. शाळेत जा. मनापासून अभ्यास कर. पडेल ते काम कर. कष्टांना कधी नाही म्हणू नकोस. यश तुझंच आहे. मला माहितीये, तू जर छान अभ्यास केलास तर मोठेपणी डॉक्टर होशील. माझी इच्छा आहे तू डॉक्टर व्हावं म्हणून!’ मी दूर जाणार म्हणून खरं तर आईलाही खूप वाईट वाटत होतं. ती मन घट्ट करून पदराने माझे अनावर अश्रू आवरण्याचा आणि मला सावरण्याचा प्रयत्न करत होती. आईचे शब्द आठवतच रडता रडता मी कधी झोपी गेलो कळलंच नाही. ‘तुला शिकून खूप मोठं व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय’ हे शब्द रात्री मनावर गोंदून घेतले होते..
..पहाटेच वडिलांनी करडय़ा आवाजात हाक मारली. आणि मी ताड्कन उठून बसलो. ‘अरे, निघायचंय ना दाभोळला जायला. पट्कन आवरून घे.’ पहाटेचे साडेचार वाजले होते. मी उठून पटापट सगळं आवरलं. आई बहुतेक रात्री झोपलीच नव्हती. तीन-साडेतीनलाच उठून पानग्या, लोणी, फोडणीची मिरची, थोडे हाळिवाचे लाडू, नारळाची बर्फी असा खाऊ तिने केला होता. माझे मोठे काका अप्पा यांच्याबरोबर मी निघालो.. हो राहिलंच की, घरातून निघण्यापूर्वी ज्या गाईचे आचळ तोंडात धरून मी दूध प्यायचो आणि ती वात्सल्याने तिच्या वासरासारखं मलाही चाटायची. तिलाही जाऊन भेटलो. तिचं दर्शन घेतलं. तिच्या अंगावरून हात फिरवला. तिनेही प्रेमभराने मला चाटलं. तिच्या दुधावरती माझा लहानपणाचा पिंड पोसला. तिचं प्रसादस्वरूप धारोष्ण दूध पिऊनच मी तृप्त मनाने दाभोळला जायलो निघालो..
बाहेर आभाळ फाटल्यागत धुव्वाधार पाऊस पडत होता. अर्धी चड्डी, शर्ट, काखोटीला बंदाची पिशवी, आईने डोक्यावर तेल घालून भांग पाडून दिलेला- असं आमचं ध्यान शाळेत जायला निघालं. अप्पांनी धोतर काचा मारून सावरून धरलं होतं. छत्री छातीशी कवटाळून आईकडे मागे वळून न पाहताच एका वळणावरून नवीन रस्त्याला लागलो. सोबतीला होता आई, वडील, आजी, काका, काकू यांना नमस्कार करून मिळालेला आशीर्वाद!
सहाव्या वर्षी दाभोळला शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी २४ कुटुंबांमध्ये राहून लौकिकार्थाने शिक्षण पूर्ण करून अर्थात डॉक्टर होऊन घर केलं ते वयाच्या २८ व्या वर्षी. या मधल्या प्रवासात कुठे ‘माधुकरी’ मागितली तर कधी भावंडांसोबत एका खोलीत राहिलो. तिथे घरातली कामं, स्वयंपाक अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. शालेय शिक्षण पूर्ण करून पुण्याला शहरात आलो तेही डॉक्टर व्हायचंय हा ध्यास घेऊन. त्यासाठी पडतील ते कष्ट केले. दमलो नाही, खचलो नाही. अहर्निशं कष्ट कष्ट आणि कष्ट! काय काय सांगणार? एक वेळ जेवण करून नाईट शिफ्ट केली, वेळ पडल्यास हमाली केली पण भीक मागितली नाही. दोन-दोन वर्षे हॉस्पिटलमध्ये नाइटशिफ्ट केली. काष्ठौषधीच्या दुकानात काम केलं. फार्मसीमध्ये काम केलं. जगता जगता रोज नव्याने शिकत होतो. याच काळात कधी मित्र-मैत्रिणींबरोबर तर कधी एकटाच सह्य़ाद्रीच्या रांगा पायाखाली घातल्या. सगळ्या वन्य जमातींच्यात राहिलो. त्यांच्याबरोबरच्या अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळालं. खरं सांगायचं तर जिगिवीषा जागी ठेवायचं काम या रानोमाळ भटकंतीतून झालं. निसर्ग वाचायला शिकलो आणि त्या निसर्गवाचनातून जगण्याचे खूप सारे धडे मिळाले. अप्पांच्या (गोनिदां) बरोबर केलेल्या भटकंतीतून निसर्गवाचन कसं करावं हे शिकलो. या निसर्गवाचनाने कोणत्याही परिस्थितीत जगण्याचं बळ दिलं.cr27
कॉलेजमध्ये असताना पुन्हा एका नवीन वळणावर येऊन पोचलो. कॉलेजमध्ये मी खूप ‘चळवळ्या’ होतो. अंगात भरपूर रग आणि मस्ती होती. आयुष्याला एक नवीन वळण देणारं पर्व याच काळात घडलं. ते म्हणजे ‘आणीबाणी पर्व.’ विनोबांच्या भाषेत ‘अनुशासन पर्व’. संघ, विद्यार्थी परिषद, अनेक संघटना आणि त्यातील मित्र, त्याशिवाय जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख, मोहन धारिया यांच्याशी झालेले संवाद यांनी प्रभावित होऊन माझं विचारविश्व बदललं. मी धडाडीने विद्यार्थी क्षेत्रात कार्यरत झालो. परिणामस्वरूप आणीबाणीची जेलयात्रा!! तीन महिने कारावास, भूमिगत राहून काम करणं, सत्याग्रह करून जेलमध्ये जाणं. बरोबर सख्खी बहीण, चुलत बहीण, मावस बहीण या तिघी, चुलत भाऊ आणि मी अशी पाच भावंडं जेलमध्ये होतो. मामा ‘मिसा’खाली, वडील भूमिगत, आई कर्करोगाने आजारी, बरी होणार नाही म्हणून हॉस्पिटलमधून घरी पाठवलेली. असं असूनही दंड न भरता शिक्षा भोगून मगच घरी जाणं. आईची दोन महिने दिवसरात्र सेवा, आईचा स्वर्गवास, पुन्हा शिक्षण पूर्ण करायला आईचे दिवसकार्यही न करता परत शहरात येणं या सर्व प्रकाराने मला खूप काही शिकवलं. म्हणून माझ्या आयुष्यात ‘आणीबाणी पर्व’ महत्त्वाचं ठरलंय.
कॉलेजला असताना मी रोज एक पुस्तक वाचायचो. या वाचनातूनच मला डॉक्टर अल्बर्ट श्वाइटझर, डॉ. आयडा स्कडर, डॉ. सेमिल्विस, काव्‍‌र्हर, डॉ. अप्पासाहेब म्हसकर अशी सारी भन्नाट आणि उत्तुंग माणसं भेटली. गावाकडे परत जाऊन यांच्यासारखंच आपणही काही तरी केलं पाहिजे असं ठरवून ‘हेल्थ फॉर ऑल’ असा एक प्रोजेक्ट तयार केला. इंटर्नशिप पूर्ण करून दुसऱ्याच दिवशी एका डॉक्टर मित्राला बरोबर घेऊन एका ओसाड माळरानावर चिखलगावला एका झोपडीत आलो. तसं बरोबर काहीच नव्हतं. होती ती दुर्दम्य इच्छाशक्ती!! आणि प्रबळ आत्मविश्वास!!!
.. थोडीशी वाट चुकलोच. फिरून मागच्या एका वळणावर जाऊ. अकोल्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गोनिदा होते. तसा मी ‘असाहित्यिक’ असूनही अप्पांवरील श्रद्धेमुळे संमेलनाला गेलो होतो. तिथे प्रा. प्रतिमा केसकर हिची प्राचार्य नरहर कुरुंदकर सरांबरोबर ओळख झाली. त्या संमेलनात आमचे चार-पाच कविमित्र आले होते. संध्याकाळी आमची मैफल जमली होती. कविवर्य किशोर पाठकजींनी या प्राध्यापिकेला आणि बरोबरच्या कविमित्रांना माझी ओळख करून देताना ‘आपण सगळे कविता करणारे कवी आहोत आणि हा कविता जगणारा कवी आहे,’ असे म्हटले. त्या दोन-तीन दिवसांत आम्ही एकमेकांना एकमेकांची स्वप्नं सांगत होतो. बोलण्याच्या ओघात पंचविशीतल्या माझ्या मनाने पुढच्या पंचवीस वर्षांचे संकल्प सांगून टाकले. आरोग्य आणि शिक्षण विषय घेऊन पुढची पंचवीस र्वष तरी कोकणातल्या दुर्गम ग्रामीण खेडय़ात मला सामाजिक काम करायचंय असं मत व्यक्त केलं. अर्थातच तेव्हा मला सगळ्यांनी वेडय़ात काढलं. तसं कॉलेजमध्येही मला वेडाच म्हणायचे. अर्थात मी नाकारत नाही. हे फकिरीचं वाण दांडेकर घराण्यात आहेच!!
प्रा. प्रतिमा केसकर आणि मी पुढच्या दोन वर्षांत घनिष्ट मित्र झालो. तिनंच मला मागणी घातली. माझ्याजवळ काही नसताना एका फकिराबरोबर संसार करण्यासाठी ती पुढे आली, तो माझ्यातला आत्मविश्वास पाहून! मी डॉक्टर होऊन जसा खेडय़ात परत आलो तसं तिने प्राध्यापकी सोडली आणि ती रेणू दांडेकर झाली आणि दोघांनी मिळून स्वप्न पाहिलं ते एका नव्या वाटेचं शैक्षणिक आरोग्याचं!!
बी. ए.ला व एम.ए.ला विद्यापीठात पहिल्या आलेल्या प्रतिमा केसकरने सिनिअर कॉलेजची प्राध्यापकी आणि पीएच.डी. सोडणं हेसुद्धा एक धाडसंच आणि इतरांच्या दृष्टीने वेडेपणाच होता. फकिराबरोबर संसार करण्याचा हा वेडेपणा तिने केला नसता तर माझ्या आयुष्याच्या वाटाही कदाचित बदलल्या असत्या. दोघांनीही दोघांचा वेडेपणा आदरपूर्वक स्वीकारला. तिच्या या धाडसाचं मीही मनापासून कौतुक करतो.
..पुन्हा नव्या वाटा, नवी वळणं. फिलिपाइन्सचे ग्रामपुनर्रचनेचे प्रणेते डॉ. जेम्स येन यांचा एक लेख वाचनात आला होता. सामाजिक कार्याची दिक्षा देणारी त्यांची पाच सूत्रं आम्ही डोक्यात ठोकून घेतली. ‘लोकांत जा’- आम्ही गावाकडे खेडय़ात परत आलो. ‘लोकांच्यात राहा’ -आम्ही जंगलात माळरानावर झोपडीत राहिलो. ‘लोकांपासून शिका’ -आम्ही माणसं वाचायला लागलो आणि वाचता वाचता शिकायला लागलो. ‘तुम्हाला काय येतं हे विसरून जा’ -आम्ही आमचे लौकिक शिक्षण विसरलो. ‘लोकांच्या गरजांनुसार काम करा’- परिसरातील ग्रामीण भागातील लोकांची किमान शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत गरजा होत्या. म्हणून आम्ही याच दोन विषयांवर लक्ष केंद्रित केलं. तो रस्ता सुरू झाला तो १९८२ साली. म्हणजे आजपासून ३३ वर्षांपूर्वीपासून..    या नव्या वाटेवरच्या प्रवासात जे महत्त्वाचे थांबे लागले त्यात १९८२ साली ‘लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ (लोकमान्य सार्वजनिक धर्मादायी न्यास) ही संस्था लोकांना बरोबर घेऊन स्थापन केली गेली. मोटरसायकल, घोडा, चालत असं करत परिसरातील २० खेडय़ांत ‘मोबाइल डिस्पेन्सरी’ सुरू झाली. ४६ गावांचे कार्यक्षेत्र निवडलं गेलं. एका झाडाखाली सुरू झालेल्या संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचे नामांकन मिळून वैश्विक मान्यता मिळाली. १९८४ साली ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिरा’ची चिखलगावला स्थापना झाली आणि एका अभिनव शाळेचं स्वप्न आकार घेऊ लागलं. अल्पावधीतच या शाळेला समाजमान्यता आणि राजमान्यता मिळाली. ग्रामीण पुनर्रचनेबरोबरच शैक्षणिक पुनर्रचनाही करण्यासाठी आम्ही प्रवास, चिंतन, लेखन, विचार करू लागलो आणि प्रचलित शिक्षण पद्धतीच्या चौकटीत राहून कौशल्याधारित तंत्रशिक्षण आणि व्यवसाय शिक्षण देणारी शाळा समाजात प्रतिबिंबित झाली.
दहा-बारा वर्षांनंतर या प्रयोगाचं वेगळेपण समाजात जाणवू लागलं. याचवेळेला गाव आणि परिसर बहुतांशी निरक्षर असताना ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्या वेळी लोकांनी वेडय़ात काढलं. पण आज ग्रंथालयाला शासनमान्यता असून १५ हजारपेक्षा जास्त पुस्तकांचा लाभ परिसरातील नागरिक आणि मुलं घेत आहेत. यातून एक वाचन चळवळ उभी राहिली. आज पुस्तकांबरोबरच मुलांनी खचाखच भरलेलं ग्रंथालय बघायचं भाग्य आम्हाला मिळत आहे. चरित्र वाचनाने मला घडवलं. महाविद्यालयाला जाताना तात्याकाकांनी एक वाक्य सांगितलं होतं, ‘चरित्र माणसाचं चारित्र्य घडवतं, म्हणून तू चरित्र वाचन कर.’ याच वाचनाने मी घडलो. म्हणून ग्रंथालयाचा प्रपंच!! पुस्तकं वाचतावाचता मी माणसं वाचायला शिकलो.
लोकांच्या गरजांनुसार कामं करता करता कामं उभी राहत गेली व ‘लोकायन’ मार्ग निवारा (बसस्टॉप) उभारला गेला. ‘सावित्री कन्या छात्रालय’ सुरू झाले. झोपडीतून पाच एकर जागेवर सतरा हजार चौरस फूट प्रशालेची देखणी वास्तू, ‘लोकमान्य टिळक मंदिर’ उभी राहिली, ‘समर्थ व्यायाम मंदिर’ उभारलं गेलं, मित्र छावणी कँपसाइट सुरू झाली. हे असे हातात हात घालून अनेकानेक प्रकल्प उभे राहू लागले. परिस्थितीचे चटके बसत असतानाही रस्त्याने चालताना सावली देणाऱ्या झाडांची संख्या कोणी मोजत नाही तशी नावं तरी किती घेणार? हजारो हातांच्या योगदानातून एक नवी सृष्टी लोकमान्यांच्या जन्मगावी चिखलगावला आकार घेऊ लागली. आम्ही केवळ निमित्तमात्रच!! प्रकाशने अंधकार भेदला जातो यावरच लोकांचा विश्वास जागा ठेवण्यासाठी जशी एक छोटीशी पणती तेवत असते तसंच म्हणा ना हवं तर!!
चांगल्या कामांना विरोध नेहमी होतच असतो. त्याची कारणंही अनेक असतात. अर्थात त्यात विरोध करणाऱ्याचंही काही चुकीचं असतं असं नाही. त्याची तमा न बाळगता आपण  काम करीत राहिलं तर या विरोधातून आपलंच बळ वाढतं.
सामाजिक कार्याबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आम्हाला दोन मुलं. काम सुरू होतानाच गोठय़ातल्या शाळेत सहा महिन्यांचा कैवल्य कातळावर- पोत्यावर खेळत असे. किमान भौतिक सुविधा नसतानाही आमचा संसार झोपडीत आनंदाने सुरू होता. आम्हाला मुलांकडे लक्ष देता यावं म्हणून पाचवी ते सातवी कैवल्य आजोळी शिक्षणासाठी गेला. पुन्हा परत येऊन दहावी झाला. पुन्हा शिक्षणासाठी पुण्याला गेला. आज तो एलएल.एम. होऊन कॉपरेरेटमधील गलेलठ्ठ पगाराची व प्रतिष्ठेची नोकरी सोडून गावाकडे परत आला आणि वकिलीचा व्यवसाय करतोय आणि संस्थेच्या  सार्वजनिक कामाचा शिलेदार म्हणूनही काम करत आहे. त्याची पत्नी धनश्री, एम.ए. क्लिनिकल सायकॉलॉजी असून, दिल्लीतील मीरा अंबिका इंटरनॅशनल स्कूलमधली प्रतिष्ठित नोकरी सोडून तीही चिखलगावला संस्थेच्या कामात सहयोग देत आहे. आमचा नातूही आता याच शाळेत येईल. ही विशेष सांगण्याची बाब!
कन्या मैत्रेयी चौथीपर्यंत शिकून पाचवीत सैनिकी शाळेत गेली. ती जन्मत:च स्वयंभू होती. इयत्ता चौथीत असतानाच तिने जाहीर केलं होतं ‘मला आर्मी मध्ये अधिकारी व्हायचंय’ मला बाहेर शिकायला जायचंय. मला कोणताही क्लास किंवा कोचिंग नको. माझा अभ्यास मी करेन. ती फग्र्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. झाली आणि सीडीएस देऊन आज ती इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर अरुणाचलच्या फिल्ड एरियात कार्यरत आहे. तिनेही ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये एका वर्षांत १५ पुरस्कार आणि वैयक्तिक नऊ पदके मिळवली. स्वप्नाचा सतत १५ वर्षे पाठलाग करत ती आज इथवर पोहोचली आहे. दोन्ही मुलांनी स्वत:च्या गुणवत्तेवर आपापलं करिअर केलं तेही सामाजिक भान ठेवून हे विशेष!
.. चालता चालता कैक ऋतू उडून गेले तशी १२ वर्षे कशी संपली कळलंच नाही. अजूनही झपाटलेपण संपलंच नव्हतं. याच वेळी संस्थेच्या तपपूर्तीच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून माझे ग्रामीण विकासाच्या कार्यातील गुरू नानाजी देशमुख चक्क पाच दिवस चिखलगावला आले होते. या पाच दिवसांच्या विचारमंथनातून वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जगण्याला एक नवीन वळण आणि नवी दिशा मिळाली.
संस्थेचं कार्य आता शाळेपुरतं आणि शिक्षणापुरतं मर्यादित न राहता मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं बनू लागलं आणि नवीन दिशा मिळाली. चिखलगावला अनेक कार्यकर्ते, सवंगडी जमू लागले तसा कार्याचा विस्तारही होऊ लागला. शिक्षण, शेती, आरोग्य, महिला सबलीकरण आणि सर्वागीण ग्रामीण विकास अशा पाच विषयांना धरून लोकसाधनेची पंचपदी सुरू झाली. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून केलेली साधना म्हणून ‘लोकसाधना’ साकारली.
लोकसाधनेचा हा यज्ञ लोकसाधकांच्या समिधांनी प्रज्वलित होऊन या अग्निशिखांच्या तेजात विश्व प्रकाशमान होत आहे. १९८० ते २०१५ असा उण्यापुऱ्या ३५ वर्षांचा प्रवास आम्हाला जगण्यासाठी समाजभान,
आत्मभान देत आला आणि लोकसाधना करत असताना आमचं जीवन सार्थकी लागत आहे याचा आनंद आहे!!!

rajadandekar@yahoo.com
contact@loksadhana.org
www.loksadhana.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2015 12:30 pm

Web Title: mobile dispensary by dr raja dandekar
Next Stories
1 सफरचंद
2 मुळा
3 बहुउपयोगी नेलपेंट
Just Now!
X