स्वयंपाकाच्या मावशी, भाजीवाली रखमा आणि कपडे, भांडी घासायला येणाऱ्या शांताबाई माझ्या जिवाभावाच्या सख्या! जीवनाबद्दल कसलीच कुरकुर नव्हती त्यांची. आयुष्याला धैर्याने सामोऱ्या गेल्या. परिस्थितीवर मात केली. आणि मी.. मी जगायला शिकले त्यांच्याकडून. त्यांनी मला मदत तर केलीच, पण खूप प्रेमही केलं माझ्यावर. माझी नोकरी आणि घराचा तोल सावरला गेला त्यांच्यामुळे.

निवृत्त झाले. वयाची जवळजवळ सहा दशकं गेली. केवढा मोठा काळ! तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा काळ आजच्यापेक्षा खूपच वेगळा होता. नोकरी करणाऱ्या बाईची परिस्थितीही वेगळी होती. एकीकडे आर्थिक स्वावलंबन सुखावत होतं, तर दुसरीकडे घर आणि नोकरी दोन्ही सांभाळताना नाकी नऊ येत होते. दोन्ही जबाबदाऱ्यांना न्याय देताना तिची फरफट व्हायची. माझ्या नोकरीचा तो काळ आज नव्यानं न्याहळताना, त्या परिस्थितीत मदतीला धावलेल्या माझ्या काही सख्या मला आठवतात..
मी शाळेत शिक्षिका होते. शाळा दूर अंतरवर. शाळा सकाळी साडेसातलाच. म्हणजे सातलाच बाहेर पडावं लागायचं. माझ्या दोन मुली, त्यांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस, लवकर उठून स्वयंपाक करणं जमेना. खाण्याचे हाल व्हायला लागले. नि मग मदतीला धावून आल्या शीलाताई! स्वयंपाकाच्या मावशी. देवदूतच वाटल्या मला. मावशी खूप साध्या, सज्जन व स्वच्छ होत्या. कामही नीटनेटकं. स्वयंपाकही चवीचा करायच्या. नासधूस नाही. कुरकुर नाही. शिवाय अतिशय प्रामाणिक. आम्हाला त्यांनी खूपच जीव लावला. मी घरात नसले तरी माझ्या सासूला त्या गरम गरम जेवू घालायच्या.
मावशींचा नवरा भिक्षुकी करायचा. लहरी, विक्षिप्त व संशयी स्वभावाचा. पान-तंबाखूचं जबरदस्त व्यसन. चार मुलांचा संसार, नवऱ्याच्या कमाईत भागेना. मग मावशींनी पोळपाट लाटण्याचा आधार घेतला. मावशी संपन्न घरच्या होत्या. नवऱ्याला पत्ते खेळायचा नाद. त्यात शेती, घर, दागिने सारं गेलं. हातात झोळी आली. मावशी सारं सांगायच्या, रडायच्या.
रविवार होता त्या दिवशी. मावशी जरा उशिराच आल्या. मीही रविवारच्या कामात गुंतलेली. मावशींचा चेहरा सुजलेला होता. डोळे रडून लाल झाले होते.
‘‘चेहऱ्याला काय झालं?’’ मी विचारताच मावशी हमसून रडू लागल्या. नवऱ्यानं त्यांना मारलं होतं. माझा संताप झाला. ताड ताड मी मावशींच्या नवऱ्याला बोलत होते. पण मावशी मात्र काहीच बोलत नव्हत्या. रडून, रडून त्यांनी मन हलकं केलं व पुन्हा कामाला लागल्या. अगदी चवीचा स्वयंपाक केला. गरम-गरम पोळ्या मुलींना वाढल्या. आग्रहही केला. कुठेही दु:खाचा लवलेशही नव्हता. मावशींच्या या मदतीचं मोल कसं करायचं? परवा मावशींचा फोन आला. त्यांच्या धाकटय़ा मुलाचं लग्न ठरलं होतं. त्यांना थोडी मदत हवी होती. मी आनंदानं ती केली. पण या छोटय़ाशा मदतीनं मावशीच उपकार कसे फिटतील?
माझी शाळेतल्या कामाची जबाबदारी वाढत होती. जादा तास, दहावीच्या सारख्या परीक्षा, पेपर तपासणे. सांस्कृतिक विभागाची जबाबदारी या साऱ्यासाठी जादा वेळ द्यावा लागत होता. शाळा सुटल्यावर थांबावं लागत होतं. नवऱ्याची पण जबाबदारीची नोकरी. साधं भाजी आणणं पण जमत नव्हतं आम्हाला. आणि मग भेटली भाजीवाली रखमा! रोज सकाळी ताजी ताजी भाजी घेऊन आमच्याच घरी आधी यायची. इरकली साडी, धारवाडी ब्लाऊज, काळ्याभोर केसाचा आंबाडा, कपाळावर रुपायाएवढं कुंकू व नाकात नथ. रखमा साजरी दिसायची. नेहमी हसत असायची. भाज्यांची वर्णनं तर अशा गोड भाषेत करायची की विचारायला नको. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिच्याशी एक वेगळंच नातं जोडलं गेलं.
रखमाचा नवरा बांधकाम करणारा मिस्त्री होता. भरपूर पैसा कमवायचा. पण दारूचं व्यसन, नवरा दारू पीत असूनही तिनं कधीही नवऱ्याची तक्रार केली नाही. उलट त्याच्याबद्दल तिला नितांत प्रेम होतं. रखमाला पैशाची गरज पडली की हजार पाचशे मागायची. भाजीत पैसे वळते करत होती. आम्हाला बोरं, पेरू, आवळे काय काय आणून द्यायची. तिचं छोटं शेतही होतं. तिच्या गोड स्वभावामुळं तिचा भाजीचा धंदा चांगला चालत होता. धंद्यावर तिनं मुलीचं लग्न झोकात केलं. सूनही आली तिला.
तिचा माझ्यावर एवढा जीव व विश्वास का होता हे एक मला कोडंच होतं. एक दिवस सकाळी सकाळी भाजीचं टोपलं दारात टेकवलं व रखमा एकदम घरात आली. मी नेहमीच्या घाईत होते. तिनं ब्लाऊजमधनं एक कापडी पाकीट काढलं. त्यात एक सोन्याचा हार होता, नवाच. चमकत होता. माझ्या हातात देत म्हणाली, ‘‘कालच आणला सोनाराकडून. पैसं मागं टाकत व्हतं. एक तोळय़ाचा हाय.’’
‘‘रखमा अगं असा कशाला घेऊन आलीस. कुठं पडला म्हणजे..’’ मला काळजी वाटली.
‘‘तुम्हाला दावायला आणला. लेवा की चार दिस. मग मी घालीन. घाला गळय़ात.’’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं. म्हटलं, ‘‘बाई गं. धन्य केलंस मला!’’
तर तिसऱ्या शांताबाई. धुणं भांडी करायच्या माझ्याकडे. माझ्या मैत्रिणीनं त्यांना माझ्याकडे पाठवलं. त्या आल्या तेव्हा त्यांच्याबरोबर चार वर्षांची मुलगी होती त्यांची. माझ्या धाकटीएवढी. शांताबाई एकदम अबोल होती. काहीच बोलत नव्हती. उद्यापासून कामाला येते म्हणाली आणि निघूनही गेली. पैशाचं काहीच न ठरवता नियमित कामाला येऊ लागली. नि घरातलीच झाली. स्वच्छ काम आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण होते तिच्याकडे. घराच्या चाव्या आम्ही तिच्याकडे द्यायचो. बाई फार विश्वासू होती. थोरलीच्या हातातली अंगठी एकदा हरवली. शोध शोध शोधली. पण सापडली नाही. शांताबाईला विचारणार तरी कसं? तिला काय वाटेल? आम्ही सारे गप्पच होतो. शांताबाई आली. कपडे भिजवले. धुवायला लागली.
‘‘आवं ताई हिकडं या,’’थोरली धावतच तिच्याकडे गेली. शांताबाईंनी तिच्या तळहातावर अंगठी ठेवली. ‘‘तुमच्या कापडात गावली. नीट ठेवा,’’ असं म्हणून पुन्हा कपडे धुवायला लागली. म्हणजे आंघोळ करताना अंगठी कपडय़ात अडकून गेली होती.
एकदा तिला सहजच विचारलं, ‘‘नवऱ्याला सोडून का आलीस?’’
‘‘का सांगायची बाई कर्माची कहाणी? आईनं माझं आत्याच्या पोराशी लग्न लावून दिलं. लई दारू प्यायचा, मारायचा. चार पैसं कसबसं कमवायचा, पण तेही दारूत घालायचा. म्हणलं दारू काय समदेच पित्यात, पर बाई तो बाहेरख्याली व्हता. एक दिस त्या सटवीला घेऊन रातीचा घरी आला. अन् बाई, एकाच खोलीत त्यानं त्या सटवीबरोबर रात घालवली. मी कोपऱ्यात, जागीच पडून व्हते.’’
‘‘शांताबाई!’’ मी हादरून गेले होते. ‘‘व्हय बाई, ती रातच वैऱ्याची व्हती. पहाटच उठले, लेकराला काखत घेतलं. अन् आईचं घर गाठलं. पुन्हा त्याचं तोंड बघितलं नाही बघा.’’
मी नि:शब्द झाले. बोलायचं तरी काय? कष्ट करून तिनं मुलीला बी.ए. केलं. तिला शिकलेला नवरा मिळवून दिला. मुलीला कोर्टात नोकरी मिळाली. तिनं मोठं घर बांधलं. फोनवर मलाही वास्तुशांतीला येण्याचा आग्रह केला. शांताबाईचे पांग फिटले.
साऱ्यांच्याच जीवनात सुख-दु:ख, चढउतार असतातच. त्याशिवाय जीवनाला अर्थ तरी कुठे अहतो. निवृत्त झाले आणि नवऱ्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली. आणीबाणीची परिस्थिती. खूप घाबरून गेले. मग माझी कोकरं परदेशातून धावत आली. भाऊ-भावजय, खूप मदत केली त्यांनी. सारं छान पार पडलं. पण माझा प्रदेश, माझं ते गाव सोडावं लाागलं. आणि मग मायेच्या, हक्काच्या माझ्या त्या सख्या, त्याही दूर गेल्या.
माझ्या जिवाभावाच्या सख्या! जीवनाबद्दल कसलीच कुरकुर नव्हती त्यांची. आलेल्या प्रसंगाला त्या धैर्याने सामोरी गेल्या. परिस्थितीवर मात केली. आणि मी.. मी जगायला शिकले त्यांच्याकडून. त्यांनी मला मदत तर केलीच, पण खूप प्रेमही केलं त्यांनी माझ्यावर. कशी होऊ मी उतराई त्यांची?    

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…