ट्रॅजिडीवर विजय मिळवतात त्यांना प्रॉडिजी म्हटलं जातं. दु:खद घटना घडल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना एक विशेष अर्थ देण्याची क्षमता व त्याला अनुसरून केलेली समर्पक कृती हेच या व्यक्तींमधले विशेष गुण असतात.. तीन दिवसांनंतर नवीन वर्ष सुरू होत आहे. मागच्या वर्षांत जे काही दु:खद, शोककारक घडलं असेल ते मागे ठेवा आणि निर्धाराने पुढे चला यशस्वी, निर्भय भविष्याकडे.
सुरुवातीला या चार गोष्टी –
पहिली गोष्ट अमेरिकेतील एका तरुणाची आहे. ऐन तारुण्यात तो जिच्या प्रेमात पडला. तिची अट होती की, जर तो आयुष्यभर गावात राहणार असेल तरच ती त्याच्याशी लग्न करेल. त्याप्रमाणे दोघांनीही लग्न करून अमेरिकेतील अतिशय लहानशा गावात (लोकसंख्या दहा हजार) आपला संसार थाटला. तिथे त्याने एक दुकान भाडय़ाने घेऊन स्वत:चं एक जनरल स्टोअर सुरू केलं. पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर जेव्हा कुठे नफा दिसायला लागला तेव्हाच दुकानाचं पाच वर्षांचं करारपत्र संपलं. दुकान मालकाने करार वाढवण्यास नकार दिला व स्वत:चं जनरल स्टोअर त्या ठिकाणी थाटलं. ते गाव लहान असल्यामुळे तिथे दुसरं जनरल स्टोअर थाटण्याला  वावच नव्हता, त्यामुळे नवीन संसाराची ऐन तारुण्यातली पाच वष्रे चक्कवाया गेल्यासारखी होती.
दुसरी गोष्ट आहे एका जपानी तरुण फिजिसिस्टची. दुसरं महायुद्ध सुरू होतं. या तरुणाचं स्वप्न होतं की आपण अणुबॉम्ब बनवून तो अमेरिकेवर टाकावा; परंतु तत्पूर्वी अमेरिकेनेच जपानवर अणुबॉम्ब टाकून जपानला नेस्तनाबूत करून टाकलं.
तिसरी गोष्ट आहे एका भारतीय तरुणाची. त्याचं स्वप्न होतं पायलट होण्याचं. तो सायन्सचा एक अतिशय हुशार विद्यार्थी होता. आपल्या स्वप्नांच्या दिशेने जलदगतीने जाणाऱ्या या तरुणाच्या आयुष्यात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडली. कॉलेजच्या पिकनिकला जाताना त्याच्या बसला अपघात झाला आणि त्यात त्याने आपले दोन्ही पाय गमावले. आपल्या स्वप्नांबरोबरच एक सामान्य आयुष्य जगण्याची क्षमतादेखील त्याने गमावली होती. त्याचं उर्वरित आयुष्य व्हीलचेअरच्या साहाय्याने त्याला काढावं लागणार होतं.
चौथी गोष्ट आहे पोलीस खात्यात नोकरी करून एक करिअर करू पाहणाऱ्या भारतीय महिलेची. ती एक अतिशय तत्पर आणि प्रामाणिक ऑफिसर होती. पण तिच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून तिची बदली सर्वात कुप्रसिद्ध ठिकाणी करण्यात आली. अपमान व अद्दल घडवणे या हेतूने ही बदली करण्यात आली होती.
आयुष्यात होणाऱ्या शोकांतिकांची ही चार उदाहरणं. मी उदाहरणं याकरिता म्हणतो की अशा घटना, शोकांतिका कधी ना कधी, कमी- अधिक तीव्रतेने प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात. याचं स्वरूप आपल्या आप्तेष्टांचा अकस्मात मृत्यू, आपल्या प्रियजनांपासून विभक्त होणं, नोकरी जाणं, धंद्यात मोठं नुकसान होणं, शारीरिक अपंगत्व किंवा एखादा मोठा अन्याय यापकी काहीही असू शकतं. अशा घटना आपल्या आयुष्यात गतिरोधक ठरून आपल्या आयुष्याचा वेगच कमी करत नाहीत तर त्याची दिशाच बदलून टाकतात. त्यामुळे आपण अनेक वेळेला अधिक मवाळ, असुरक्षित व भीतीग्रस्त होऊन आयुष्य जगायला लागतो. प्रश्न आहे अशा परिस्थितीला आपण समर्पकरीत्या तोंड देऊ शकतो का? उत्तर आहे.. हो!!
जे लोक अशा दु:खद घटनांवर, ट्रॅजिडीवर विजय मिळवतात त्यांना प्रॉडिजी म्हटलं जातं. (प्रॉडिजी- सवरेत्कृष्ट गुणवत्ता, टॅलेंट असलेली माणसं). दु:खद घटना घडल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांना एक विशेष अर्थ देण्याची क्षमता व त्याला अनुसरून केलेली समर्पक कृती हेच या व्यक्तींमधलं विशेष टॅलेंट असतं. पुढे जाण्यापूर्वी आपण त्या चार गोष्टींकडे पुन्हा वळूया. या चार लोकांनी त्या ट्रॅजिडींना कसं तोंड दिलं.. ते मवाळ झाले की प्रॉडिजी झाले..?
पहिली व्यक्ती ज्याने पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आपलं दुकान गमावलं होतं. त्याने त्याहीपेक्षा लहान गावात जाऊन एक नवीन दुकान थाटलं. कैक वर्षांनंतर तो तरुण जगातल्या सर्वात मोठय़ा रिटेल व्यवसाय- वॉलमार्ट याचा जनक सॅम वॉल्टन म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि १९९१ मध्ये तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनला. दुसरी गोष्ट होती एका जपानी माणसाची. ज्याच्या देशाला अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून उद्ध्वस्त केलं होतं. तद्नंतर त्याने एक प्राण घेतला की एक दिवस व्यवसायाच्या स्पध्रेत जपान अमेरिकेला मागे टाकेल व जपानला तेथे नेण्यात माझा सिंहाचा वाटा असेल. तो माणूस म्हणजे जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘सोनी’ याचा जनक व मालक अकियो मोरिटा. त्याने आपलं स्वप्नच पूर्ण नाही केलं तर आज अनेक जपानी वस्तू अमेरिकेलाच तिच्या बाजारपेठेत टक्कर देत आहेत.
आपली तिसरी गोष्ट होती त्या तरुणाची, ज्याचे पाय गेल्यामुळे त्याचं पायलट होण्याचं स्वप्न धुळीस मिळालं होतं. तो तरुण म्हणाला की अपंगत्व आल्यामुळेच मला लाचारीचा खरा अर्थ कळला. त्यामुळे आपल्या चंदिगडमध्ये राहणाऱ्या सुशिक्षित पण बेरोजगार तरुणांची लाचारी मी समजून घेऊ शकलो व त्यामुळे मला आयुष्याची एक दिशा सापडली. व्हीलचेअरवर बसून दिवसाचे १८-१८ तास काम करत त्याने ळळर या संस्थेची स्थापना केली. ‘वायटीटीएस’ने एक हजाराहून अधिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचं सत्कार्य केलं आहे. ‘वायटीटीएस’ हे वृद्धाश्रम तसेच अनाथालयदेखील चालवतं. या तरुणाचं नाव आहे विनीत खन्ना.
शेवटची गोष्ट आहे त्या भारतीय महिलेची जिच्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून तिची बदली तिहार जेलमध्ये केली गेली होती. या जेलमधील कैदी माणसं नसून जनावरं आहेत असं म्हटलं गेल्यामुळे तिहार जेलला एक ‘झू’ (प्राणिसंग्रहालय) म्हटलं जायचं. अशा या जनावरांसारख्या कैद्यांचं परिवर्तन करून त्यांना सत्संग करायला लावला व एका जेलचं रूपांतर एक आश्रमात करण्याचा चमत्कार ज्या स्त्रीने केला तिला आपण सर्व जण ओळखतो. आणि तिचं नाव आहे किरण बेदी. या कार्यासाठी त्यांना मॅगेसेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 वरील चारही गोष्टींत आपले नायक प्रॉडिजी झाले. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातल्या ट्रॅजिक घटनांसमोर हार न मानण्याचा निर्णय घेतला. ते हे करू शकले कारण त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांकडे एका वेगळ्या मानसिकतेने पाहिलं. आपण सारे नेहमी आयुष्याला कंट्रोल करण्याचा, सोयीस्कर करण्याचा व तणावमुक्त करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. जेव्हा काहीही अनपेक्षित किंवा विपरीत घडतं तेव्हा आपलं मन बंड पुकारतं आणि आपण अस्वस्थ होतो. आपण सारे आपल्या मनातील विचारांचे कैदी असतो. ट्रॅजिडी घडल्यानंतर आपण स्वत:लाच असे काहीसे प्रश्न विचारतो.
  * या घटनेमुळे माझं काय नुकसान झालं?
  * आता माझ्या आयुष्यात काय काय गरसोयी होतील?
  * मीच का?
  *आयुष्य इतकं क्रूर का आहे?
  * मी काय पाप केलं म्हणून हे माझ्या वाटय़ाला आलं?
हे प्रश्न इतके नकारात्मक आहेत की यांची उत्तरं आपल्याला किती हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत, किती त्रास होणार आहे यावरच आपलं मन केंद्रित करतं. अशाने कोणालाही नराश्य येईल, त्यामुळे या घटनेनंतर आपण अधिक घाबरून जगायला लागतो. व नेहमी देवाकडे प्रार्थना करतो की अशी घटना पुन्हा माझ्या वाटय़ाला कधीच येऊ नयेत. परंतु या चारही गोष्टींमध्ये आपल्याला असं दिसून येतं की परिस्थितीचे (पान १ वरून)    गुलाम न होता चारही व्यक्तींनी त्या परिस्थितीवर विजय मिळवला. कारण चारही परिस्थितीत त्यांनी वेगळे प्रश्न विचारले.
 * मी या परिस्थितीतून काय शिकू शकतो?
उदा. सॅम वॉल्टन हे शिकले की यापुढे कधीही व्यावसायिक जागेचं करारपत्र पाच वर्षांचं न करता नेहमी नव्याण्णव वर्षांचं करारपत्र करावं.
 * मी या परिस्थितीला कसा सुधारू शकतो?
हा प्रश्न विचारल्यामुळे विनीत खन्ना याने ‘वायटीटीएस’ सुरूकेले व अकियो मोरिटाने ‘सोनी’ची स्थापना केली, किरण बेदींनी तिहार जेलमध्ये सत्संग सुरू केले.
* परिस्थितीशी सामावून घेण्यासाठी मी माझ्या वागणुकीत व कृतीत कोणकोणते बदल आणायला पाहिजेत?
सॅम वॉल्टनने अतिशय आक्रमकरीत्या धंदा करण्याची पद्धत शिकायला सुरुवात केली. युद्ध संपल्यामुळे अकियो मोरिटाने धंद्यावर लक्ष केंद्रित केलं व अमेरिकेला मात देण्याचं आपलं स्वप्न तिथे पूर्ण केलं. विनीत खन्नाने व्हीलचेअरवर बसूनही स्वत:ला स्वावलंबी बनवलं.
 * या परिस्थितीचा मी संधी म्हणून कसा वापर करू? (कारण ही परिस्थिती फक्त माझ्याच वाटय़ाला आलेली आहे.)
 सॅम वॉल्टन अमेरिकेतील गावात राहायचा त्याचा फायदा असा झाला की कुठल्याही स्पर्धकाने जोपर्यंत वॉलमार्ट नावारूपाला आलं नाही तोपर्यंत त्याची दखलच घेतली नाही. केवळ पाय गेल्यामुळेच विनीत खन्नाला लाचारी म्हणजे काय हे कळलं व आपल्या आयुष्याचा मार्ग सापडला.
 * मी समाजाला कसं योगदान करू शकतो?
‘वॉलमार्ट’ आज एमआरपी पेक्षा कमी किमतीत वस्तू विकून समाजाला योगदान करत आहे. ‘सोनी’ने सदैव नावीन्यपूर्ण उत्पादनं देऊन समाजाला योगदान दिलं आहे. तसंचं किरण बेदी व ‘वायटीटीएस’ यांनी कैदी, बेरोजगार तरुण, अनाथ मुलं, वृद्ध यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणलं आहे. हे लोक वेगळे ठरले (Unique) कारण आपली आयुष्याकडे पाहण्याची मानसिकता त्यांनी बदलली. त्यांनी हे सिद्ध केलं की, ते वेगळे Unique आहेत. हे वरील पाचही प्रश्न फारच प्रभावी आहेत. त्या मार्गावर चालणं म्हणजे यशाच्या मार्गाकडे चालणं.
शेवटी मी असं नाही म्हणणार की  Life goes on… .. मी असं म्हणेन आपण पुढेच जात राहायला हवं. आत्मविश्वासाने. रोजच. एका उत्तम, आनंदी आणि यशस्वी भविष्यकाळाकडे ..   
 यशस्वी भव   
(लेखक पथिक एचआरडी संस्थेचे संचालक आहेत.)