02 July 2020

News Flash

कथा दालन : चुकीला माफी नाही..!

निमुळती पायवाट.. रातकिडय़ांची अखंड किरकिर.. त्यात नदीच्या पाण्याचा रोरावणारा आवाज संकेतला गर्भगळित करत होता.

(संग्रहित छायाचित्र)

यशश्री भिडे

bhideyashm@gmail.com

निमुळती पायवाट.. रातकिडय़ांची अखंड किरकिर.. त्यात नदीच्या पाण्याचा रोरावणारा आवाज संकेतला गर्भगळित करत होता. डोळ्यात बोट घातलं तरी कोण आहे हे दिसणार नाही इतका मिट्ट अंधार आणि त्यात लख्कन वीज चमकली! एका क्षणासाठी सगळा आसमंत प्रकाशमान झाला आणि संकेतने डोळे दिपल्याने गच्च मिटून घेतले. ‘‘साहेब.. आता फक्त पाच मिनिटं.. मग तुम्ही योग्य ठिकाणी पोचाल.’’ त्या मुलाच्या आवाजाने दचकून संकेत भराभर पावलं टाकायला लागला..

आदल्या दिवसापासून चालू झालेली पावसाची भुरभुर आता चांगलीच वाढली होती. वातावरणातला आळस संकेतच्या अंगात भिनला होता. त्यात जेवण अंगावर आलेलं! बांधकाम विभागात अभियंता म्हणून चिकटून संकेतला आता दहा वर्ष झाली होती. क्लार्क म्हणून चिकटून हळूहळू मुख्य अभियंत्यांपर्यंत पोचूनही चांगली पाच वर्ष झालेली. मनात येईल तेव्हा खुशाल रजा टाकून तो कराडला येत असे. आजसुद्धा अगदी बुधवारी तांबडा-पांढरा खाऊन स्वारी भर दुपारी पांघरूण घेऊन झोपली होती.

अचानक झालेल्या बर्फासारख्या थंडगार स्पर्शाने संकेतला खडबडून जाग आली. कुणाची तरी विचित्र चाहूल त्याला अस्वस्थ करू लागली. गाढ झोपेमुळे काही तरी होत असेल.. बायकोला मस्त चहा करायला सांगू या, असं म्हणून तो बाहेर आला. बायकोने दिलेला गरम चहा पितानासुद्धा त्याला मघाशी झालेल्या स्पर्शाची सारखी जाणीव होत होती. तेवढय़ात त्याची बायको म्हणाली, ‘‘अहो, तुमच्या फोनवर मघाशी ऑफिसमधून फोन आला होता. उद्या कलेक्टरबरोबर मीटिंग आहे म्हणत होते.’’

संकेत ताडकन उठला. एवढी महत्त्वाची मीटिंग आपण विसरलोच कशी?.. उद्या कोणत्याही परिस्थितीत हजर राहायलाच पाहिजे ऑफिसमध्ये. एक-दोन मिनिटं विचार करून तो बायकोला म्हणाला, ‘‘पटकन बॅग भर माझी. मी अर्ध्या तासात निघतोय.’’

‘‘निघायलाच हवंय का? संध्याकाळ व्हायला लागलीय.. नका ना जाऊ ..’’

संकेत बायकोला समजावत म्हणाला, ‘‘अगं कराड-चिपळूण अंतर तीन तासांचं तर आहे. मला काही मध्यरात्र होणार नाहीये. आत्ता निघालो तरी रात्री आठपर्यंत पोचेनसुद्धा. आणि दादूकाका आहेत कीमाझ्याबरोबर!’’

संकेतने बायकोला समजावलं तरी त्यालाही काही तरी विचित्र जाणवत होतं नक्की. बरं वाटत नाही हे कारण सांगून तो जाणं टाळू शकला असता, पण कुणी तरी आपल्याला यायला भाग पाडतंय असं सारखं वाटत होतं त्याला आतून! तो निघालाच..

कराड सोडून गाडी आतल्या रस्त्याला लागली. कडेने कोयना नदी दुथडी भरून वाहत होती. डोंगरातून आलेलं त्या लाल पाण्याचं रूप भयावह वाटत होतं. अखंड कोसळणाऱ्या पावसाने गाडी चालवताना दोन फुटांवरचंसुद्धा काही दिसत नव्हतं.

काळ्या ढगांनी केलेला काळोख, वाऱ्याने जमिनीला स्पर्श करणारी झाडं, त्यामुळे निर्माण होणाऱ्या चित्रविचित्र आकृत्या, यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या संकेतला अधिकच अस्वस्थ वाटत होतं. त्यात आपल्या गाडीत दोघांव्यतिरिक्त आणखी कुणी तरी आहे असं सारखं वाटत होतं..

कोयना बस स्टँडवर गरम वडा घेताना स्टॉलवाला म्हणाला, ‘‘नका जाऊ  साहेब आज.. लै पाऊस हाय घाटात. कशी गाडी चालवणार तुमी? दरड कोसळली मंजे वो?’’

दादूकाकांनी संकेतची अस्वस्थता ओळखली. ते म्हणाले, ‘‘मी आहे ना साहेब. तुम्ही काही काळजी करू नका.’’

कोयना सोडल्यावर घाट रस्ता सुरू झाला. आता पूर्ण अंधार झालेला. प्रचंड कोसळणारा पाऊस.. आणि गाडीत एकदम शांतता. अचानक दादूकाकांना अस्वस्थ वाटायला लागलं. कशीबशी त्यांनी पोलीस चौकीजवळ गाडी थांबवली. काही तरी गडबड आहे हे बघून पोलीस पुढे आले. दादूकाकांना परत घेऊन जाण्यासाठी तिथे अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. त्यांना रवाना केल्यावर पोलीस चौकीतच रात्र काढायची आणि सकाळी ऑफिसचा ड्राइव्हर बोलावून जायचं, असं संकेतने ठरवलं खरं, पण तेवढय़ात एक लहान चणीचा सावळासा, पण स्मार्ट मुलगा आला आणि म्हणाला, ‘‘साहेब, मघापासून मी ऐकतोय तुमचं बोलणं. तुम्हाला चालणार असेल तर मी येऊ  का चिपळूणपर्यंत गाडी चालवत? तसंही मला जायचं आहेच चिपळूणला. तुमची सोय आणि माझीही!’’

संकेतने विचार केला, स्वत:हून कुणी तरी तयार झालंय तर काय हरकत आहे? इथे रात्र काढण्यापेक्षा तासाभरात चिपळुणला घरी जाऊ . संकेत तयार झाला आणि त्या मुलाला म्हणाला, ‘‘चल, जाऊ  आपण.. नाव काय रे तुझं?’’

‘‘नावात काय आहे साहेब? चला तुम्ही.. उशीर झालाय आधीच.’’

काहीही विचार न करता संकेत गाडीत जाऊन बसला. जणू काही कुठली तरी शक्ती त्याला खेचून नेत होती..

घाटातून जाताना एकाही वळणावर गाडीचा वेग कमी न करता गाडी सुसाट चालली होती. संकेत एका वळणावर घाबरून किंचाळलाच! ‘‘अरे ए सावकाश, गाडी जाईल ना दरीत..’’

मुलाने शांतपणे विचारले, ‘‘मरणाला घाबरता की काय साहेब? मरण यायचं तेव्हा अचानक येत असतं.. आणि तुम्ही तर ठरवून लोकांना मारता..’’

हे ऐकल्यावर संकेतचा पारा चढला.. ‘‘मूर्खासारखं काय बोलतोयस तू? कोण आहेस तू..?’’

मुलाने उत्तर देईपर्यंत अचानक दोन-तीन वळणं गेल्यावर गाडी आचके देत थांबली. ‘‘उतरून घ्या साहेब.. टायर पंक्चर झालाय.’’

संकेत त्या मुलावर वैतागला. ‘‘तुला येत नाही नीट चालवता तर आलास कशाला? मी पण मूर्ख ..ओळख नसताना तुला घेऊन आलो.’’

‘‘राहू द्या ना साहेब.. कशाला चिडचिड करताय? माझं गाव आहे इथेच जवळ. लाइट दिसतायत ना दूरवर.. तिथेच. तिथे जाऊ . मस्त जेवणं चालू असतील रात्रीची. चला लवकर. इथे असं जंगलात थांबलो तर मदत तर सोडाच, साधं पाणीसुद्धा मिळणार नाही प्यायला.’’

संकेत वैतागून म्हणाला, ‘‘अरे बाबा, किती लांब आहे तुझं गाव आणि जायचं कसं जंगलातून? धड रस्तासुद्धा दिसत नाहीये..’’

‘‘साहेब, मी नेतो तुम्हाला नीट, जिथे न्यायचं तिथे.. काळजी नका करू..’’ संकेत नाइलाजाने चरफडत त्याच्या मागे निघाला. निमुळती पायवाट.. दोन्ही बाजूंनी रान वाढलेलं.. मध्ये-मध्ये चिखलात रुतणारा पाय.. रातकिडय़ांची अखंड किरकिर.. त्यात नदीच्या पाण्याचा रोरावणारा आवाज संकेतला गर्भगळीत करत होता. डोळ्यात बोट घातलं तरी कोण आहे हे दिसणार नाही इतका मिट्ट अंधार आणि त्यात लख्कन वीज चमकली. एका क्षणासाठी सगळा आसमंत प्रकाशमान झाला आणि संकेतने डोळे दिपल्याने गच्च मिटून घेतले.

‘‘साहेब..आता फक्त पाच मिनिटं.. मग तुम्ही योग्य ठिकाणी पोचाल.’’ त्या मुलाच्या आवाजाने दचकून संकेत भराभर पावलं टाकायला लागला. किती वेळ चाललो आणि चालतोय हे त्याला कळतंच नव्हतं. शेवटी अगदी समोर दिवे दिसू लागले आणि संकेतची भीती जरा कमी झाली. एका पडक्या घरात रॉकेलच्या दिव्याच्या उजेडात काही मंडळी जेवत होती. त्या दोघांना बघून आतील एक जण बाहेर आला. ‘‘अरे वा! आलास का घेऊन साहेबांना..या, या संकेत साहेब ..ओळखलं का मला? तुमचीच वाट बघत होतो आम्ही सगळे. अगदी योग्य वेळेत आलात.’’

‘‘तू.. तू .. तुम्ही मला ओळखता? आणि माझी वाट का बघत होतात?..’’ संकेत घामाने थबथबला होता. काय चालू आहे.. हे कोण लोक आहेत आणि आपल्याला कसे ओळखतात काहीच कळत नव्हतं त्याला. पुढे आलेला माणूस त्याचा हात धरून त्याला आत घेऊन गेला. आतमध्ये काही बायका, पुरुष, लहान मुलं केळीच्या पानावर जेवत होती. सगळे त्याच्याकडे बघत जेवत होते. त्यांच्या विखारी नजरा बघून संकेत लटलट कापायला लागला.

‘‘साहेब, घाबरू नका.आम्हाला ओळखलं नाहीत तुम्ही अजून? आम्ही नाही का मे महिन्यात आलेलो तुमच्या ऑफिसमध्ये एक निवेदन घेऊन? आठवतंय का? तेव्हा आम्ही पण असेच घाबरलो होतो. पण तुम्हाला ते कळलंच नाही. आमच्या हावरे धरणाला केवढं तरी भगदाड पडलेलं. ते बुजवा, त्याची डागडुजी करा, म्हणून विनवण्या करत रोज आम्ही खेटे घालत होतो. पण तुम्ही लक्षच दिलं नाहीत..’’

‘‘अरे हो.. पण त्याचं आता काय? तुम्हाला मिळाली ना भरपाई? कीअजून हवीय?.. उद्या ऑफिसला येऊन भेटा. मी काम करून देतो.. वाढीव नुकसानभरपाई देईन.’’

अचानक सगळे हसू लागले. रडू लागले..ओरडू लागले.. त्यातला एकजण भेसूर हसत म्हणाला, ‘‘गेलेल्यांना बोलावतोय हा ऑफिसला? आम्हीच तुला आमच्याबरोबर न्यायला आलोय.’’

आता मात्र संकेतचं उरलंसुरलं अवसानही गळालं. तो मटकन खाली बसला. तितक्यात त्याच्या तोंडावर कुणी तरी पाण्याचे सपकारे मारले. तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला एक दोघांनी घट्ट धरून ठेवलं.

‘‘साहेब.. एवढंसं पाणी तोंडावर आलं तर एवढं घाबरलात? आम्ही त्या दिवशीसुद्धा असेच रात्री जेवायला बसलो होतो आपापल्या घरात. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. उद्या परत बांधकाम खात्यात जाऊन धरणाच्या भगदाडाविषयी सांगायला हवं, असं आपसात बोलत असतानाच धरण फुटलं-धरण फुटलं अशा आरोळ्या ऐकू आल्या. जेवणाच्या ताटावरून उठून पळण्याचासुद्धा अवधी मिळाला नाही हो आम्हाला. एका क्षणात पाण्याचा लोंढा घरात घुसला. आपण मरणार ही भीती मनात यायच्या आधीच आम्ही सगळे कैक मैल वाहत गेलो. त्यानंतरच्या प्रत्येक अमावास्येला आम्ही त्याच वेळी इथे येतो. जेवणाची पानं वाढतो आणि तुझी वाट पाहतो. आज सगळं जमून आलंय.’’

सगळं बघून संकेतची बोबडीच वळली होती.. ‘‘माफ करा मला..’’, एवढंच कसंबसं त्याच्या तोंडातून बाहेर पडत होतं.

‘‘नाही साहेब. माफी नाही करणार आम्ही. तुम्हाला पण कळू दे की नाकातोंडात पाणी गेल्यावर काय होतं ते,’’ असं म्हणत त्यातल्या एक-दोघांनी त्याला उचलून एका लाकडी बाजेवर बसवलं. समोर जेवणाचं ताट ठेवलं. हात-पाय बाजेच्या पायांना करकचून बांधून टाकलं. त्याच्या तोंडात जेवण अक्षरश: कोंबलं आणि चौघांनी ती बाज उचलून शेजारून वाहत जाणाऱ्या ओढय़ात सोडून दिली.. संकेत धडपडत होता.. हातपाय सोडवायचा प्रयत्न करत होता.. पण नाकातोंडात पाणी जाऊन घुसमटत होता.. एका क्षणी सगळी धडपड आणि घुसमट थांबली. त्याच्यासकट बाज पुलाला येऊन अडकली. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातमी होती..

‘सरकारी बांधकाम अधिकाऱ्याचा हावरे धरणक्षेत्रातील नदीत बाजेला बांधलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2020 1:06 am

Web Title: no forgiveness for wrong katha dalan article abn 97
Next Stories
1 महामोहजाल : ऑनलाइन गेम्सच्या दोन बाजू
2 निद्रेही मानु दीजे।
3 गद्धेपंचविशी : कर्नल
Just Now!
X