12 August 2020

News Flash

काटे किंवा फुलं : निवड तुमची

आम्हाला सुखी व्हायचंच. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा, असं लोक विचारतात.

| July 27, 2013 01:01 am

आम्हाला सुखी व्हायचंच. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा, असं लोक विचारतात. मी त्यांना म्हणतो, मार्ग अगदी सुगम आहे. आधी मनाशी निश्चित करा, की तुम्हाला सुखी व्हायचंय.एकदा निश्चय केला, की मार्ग शोधण्याचीही गरज उरणार नाही.
तुम्ही म्हणता विषाद नको, दु:ख नको, पण तुम्ही विषाद हा जणू काही आपला चेहरा करून टाकला आणि त्या आधारावर लोकांजवळ सहानुभूती मागू लागलात, प्रेम मागू लागलात, तर तुम्ही ते दु:खं, तो विषाद सोडणार तरी कसा? कारण मग भीती वाटेल, की विषाद जर सुटला, तर हे सगळं प्रेमही दूर जाईल. ही सहानुभूती, लोकांचं लक्ष हे सगळं हरवून जाईल. तुम्ही त्या दु:खाला, विषादाला घट्ट धरून ठेवाल, त्याला वाढवत जाल, अतिशयोक्ती कराल, लोकांना दाखवताना त्याचा भरपूर विस्तार कराल. मग एखाद्या फुग्यासारखं ते फुगवत न्याल आणि भरपूर आरडाओरड कराल. मी किती दु:खी आहे ते लोकांच्या मनावर ठसविण्याचे उपाय मोठय़ा प्रमाणावर अमलात आणाल.
लोकदु:खाची चर्चा करतात. त्यावेळी ते कसं सांगतात, बोलतात ते नीट निरखून बघा. ते फार रस घेऊन सांगताहेत असं तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या डोळ्यांत तुम्हाला एक चमक दिसेल आणि तुम्हाला उमजेल की त्या सगळ्यात, दु:खाचा बाजार मांडण्यात त्यांना निंदनीय, विकृत प्रकारचं सुख मिळतं आहे. आपल्या दु:खांचं इतरांपाशी वर्णन करता करता त्यांच्या जीवनात वेगळीच झगमग प्रकटते. वर्णन करण्यात ते अगदी पटाईत होतात. त्यात अगदी रस घेऊन ते सांगू लागतात आणि तुम्ही (ऐकताना) त्यात रस घेतला नाही तर दु:खी होतात. नाराज होतात. असं वागल्याबद्दल ते तुम्हाला कधीही क्षमा करणार नाहीत.
दुसऱ्यांची फिकीर सोडा आणि स्वत:बद्दल विचार करा. तुम्ही जेव्हा दु:खाबद्दल बोलाल तेव्हा चुकूनसुद्धा त्यात रुची घेऊ नका. नाही तर तुम्ही त्या दु:खशृंखलेत बांधले जाल. मग खूप आरडाओरड केलीत तरी मनोमन तुम्हाला सुटका नको असते. तुम्ही तुरुंगात वस्ती कराल. आपल्या पारतंत्र्याबद्दल भले तुम्ही जोरजोरात निषेध कराल, ओरडा कराल, पण तुमच्या कारागृहाचे दरवाजे उघडले गेले तरी तिथून पळण्यासाठी तुमचा पाय उचलला जाणार नाही. तुम्हाला तिथून काढून लावलं तरी मागच्या दरवाजानं तुम्ही तिथंच येऊन दाखल व्हाल, कारण आता तुमच्या लेखी कारागृह बहुमूल्य असते. ते सोडणं कठीण. जवळपास अशक्य.
लक्षात घ्या. जीवनात काटे असतात, फुलंही असतात. कशाची निवड करावी हे तुमच्यावर अवलंबून असतं. (स्वत:च जर काटे निवडले तर मग आरडाओरड करणं चुकीचं ठरतं.) म्हणून जेव्हा दु:ख, विषाद वाटतो, तेव्हा थोडा विचार करा. तुम्ही दु:खाच्या व्याख्येत चूक करत आहात. आणखी एक गोष्ट पक्की मनाशी धरा. दु:ख आपोआप प्रविष्ट होत नाही. तुम्ही स्वत: त्याला आपल्या जीवनात आणता. ते झटकून टाका. त्यापासून पळ काढा. स्नान करा. नाचा. काय हवं ते करा. त्यातून स्वत:ची सुटका करून घ्या. तुम्हाला दु:खानं वैफल्यग्रस्त करणारा राग आळवत बसू नका. नाही तर तो राग म्हणजे तुमचा दुसरा स्वभाव होऊन बसेल.
सुख आणि दु:ख आपल्याच हाती
इथं काही सफलता नाही की विफलता नाही. सुख नाही की दु:ख नाही. सगळं तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. सुख-दु:ख वगैरेंना नियती समजण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या दु:खाची जबाबदारी परमेश्वराच्या अंगावर टाकू नका. परमेश्वर त्याचा इन्कार करेल. तुम्ही मात्र व्यर्थच दु:खाखाली दबून सडून जाल; पण त्याच्यापासून मुक्ती मिळणार नाही, कारण तुम्ही एक गृहीत मनाशी घट्ट धरलं आहे, की हीच आपली नियती, हेच आपलं भाग्य. मी तुम्हाला सांगतो, उद्यापर्यंतसुद्धा वाट बघायची गरज नाही. अगदी आता या क्षणी तुम्ही त्या शृंखलेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकता. त्या वेढय़ातून तुम्हाला इच्छा असली, तर स्वतंत्र होऊ शकता. तुम्हालाच खरीखुरी इच्छा नसेल तर काही इलाज नाही. तुमच्या जीवनात तुमच्या इच्छेविरुद्ध, तुमच्या खऱ्या सहमतीशिवाय काहीही करता येणार नाही. तुमचा सहयोग हवाच.
माझ्याकडे येणारे काही लोक म्हणतात, आम्हाला सुखी व्हायचंच. तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा. मी त्यांना म्हणतो, मार्ग अगदी सुगम आहे. आधी मनाशी निश्चित करा, की तुम्हाला सुखी व्हायचंय. जर तुम्ही सुखी होण्याचा निश्चय केला असेल, तर मार्ग शोधण्याचीही गरज उरणार नाही. सुखी होण्यापासून कोण कुणाला अडवू शकतो? त्या अवस्थेच्या आड रस्तासुद्धा येणार नाही. खरं तर.. रस्त्याची गरजच उरणार नाही, पण तुम्हाला सुखी व्हायचंच नसेल आणि रस्त्याची ही चौकशी, विचारणा वगैरे केवळ आपल्या दु:खाचं वर्णन करण्याचा उपाय असेल, दु:खाची चर्चा करण्याचा मार्ग असेल किंवा माझी सहानुभूती मिळवण्यासाठी असेल, तर मग माझ्यापाशी काही इलाज नाही.
आणखी एक गोष्ट या संदर्भात सांगायची आहे. जीवनाची पाटी म्हणजे जणू जलाचा पृष्ठभाग. तुम्ही त्यावर लिहिता. पूर्ण लिहिलं नाही तोच ते पुसून जातं. कुणी वाळूवर काही लिहितं. लिहिताना एकदम पुसून जात नाही. हवेची झुळूक येईल.. तोवर ते लिहिलेलं टिकेल. पुसून जायला जरा वेळ लागेल. कुणी दगडावर अक्षरं कोरतं. हवेचे झोत आले तरी काही होत नाही. युगानुयुगे ते तसंच राहील. यातला जीवनाचा खरा लेख म्हणजे पाण्यावरचा लेख.
सर्जनात्मक जीवन
कसं असतं जीवन? सत्य सांगायचं तर ते पाण्यासारखं असतं. त्यावर तुम्ही सतत लिहीत राहिलं पाहिजे. लिहीत राहाल तेव्हाच अक्षरं शाबूत राहतील. तुम्ही जरासे थांबलात की सगळी अक्षरं पुसून जातील. समजा कुणी सायकल चालवत असेल, तर जोवर पॅडल मारत असेल तोवर सायकल पुढे जात राहील. पॅडल थांबवलं की, पहिल्या शक्तीच्या आधारे थोडाबहुत वेळ गती राहील, मग ती मंदावेल. अनेक र्वष सायकलवर बसून पुढे जात असल्यानं, सायकलला जो वेग आलेला असेल तो थोडा वेळ राहील एवढंच! थोडा उतार असला तर आणखी पुढे जाईल, पण अशी किती चालणार? लवकरच ती पडेल. असंच तुम्ही तुमचं जीवन क्षणाक्षणांनी विणत असता. दरक्षणी पुढे नेत असता हा धंदा हरघडीचा आहे. ज्या दिवशी ते थांबवायला तुम्ही राजी व्हाल (त्या दिवशीपासून गती मंदावायला लागेल.) म्हणून म्हणतो आताच ती शुभ घडी आली आहे. तुम्ही या सगळ्या झमेल्यातून बाहेर पडा.
तुम्ही विचाराल बाहेर व्हायचं म्हणजे काय करायचं? बाहेर कसं व्हायचं? कसं हा प्रश्नच पडायला नको. हसत बाहेर पडा. गाणं गुणगुणत बाहेर पडा. चेहऱ्यावरची जुनी सवय (दु:खाच्या सुरकुत्या, विषादाच्या आठय़ा) झाडून टाका. म्हणा की, बस! आता फार झालं. आता अधिक नाही. या क्षणापासून जीवनात विषादाच्या, खेदाच्या, दु:खाच्या आधारावर जे काही मागितलं ते पुन्हा मागू नका. मागू नयेच, कारण असं मागणं अपमानजनक असतं. मूळ आनंदकेंद्री असलेल्या अस्तित्वावर दु:खाची झूल पांघरून सहानुभूतीचा जोगवा मागणं हे अस्तित्वाचा अपमान करण्यासारखंच आहे.
(‘ओशो विचारतरंग’ या मनोविकास प्रकाशनाच्या माधवी कुंटे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकातील हा संपादित भाग, साभार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2013 1:01 am

Web Title: path of happyness
टॅग Chaturang
Next Stories
1 काव्य जगणारं घराणं
2 ‘सावळे परब्रह्म आवडे या जीवा’
3 एकादशीबाई, तुझा लागला मला छंद।
Just Now!
X