मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com

दररोज आपल्याला कुठल्यातरी नव्या ‘अ‍ॅप’बद्दल माहिती मिळत असते. यातले कितीतरी अ‍ॅप्स आपण ‘इन्स्टॉल’ही करत असतो, तर अनेक अ‍ॅप्स मोबाइलमध्ये विकत घेताना मुळातच इन्स्टॉल करून दिलेले असतात. मोबाइलमधलं प्रत्येक अ‍ॅप आपली नेमकी कोणकोणती माहिती वापरतं आहे, याबद्दल मात्र आपण सहसा गाफील राहतो. अनेकदा हे दुर्लक्ष महागात पडल्याचीही उदाहरणं समोर आली आहेत. यानिमित्तानं सर्वच ‘डिजिटल’ उपकरणांत इन्स्टॉल करायच्या अ‍ॅप्सबाबत बाळगायच्या सुरक्षिततेबद्दल..

‘‘मला जर फोनमध्ये एखादं अ‍ॅप ‘इन्स्टॉल’ करायचं असेल, तर मग त्यांच्या नियम आणि अटींना मान्यता द्यावीच लागते. आपल्याला जर अ‍ॅप इन्स्टॉल करणं आवश्यकच असेल तर मग हे नियम व अटी वाचण्याची गरज तरी काय आहे?’’ साधारणपणे सगळ्या मोबाइल वापरकर्त्यांचा हाच युक्तिवाद असतो. कुठलंही अ‍ॅप इन्स्टॉल करण्याआधी दिलेल्या करारातल्या नियम आणि अटी वाचायला कुणालाही कंटाळाच येतो. शिवाय त्या समजायला कठीण असल्यामुळेही त्या टाळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पण आपण एखादं अ‍ॅप इन्स्टॉल करण्याच्या बदल्यात नेमकी किती मोठी किंमत चुकती करत असतो हे प्रत्येक वापरकर्त्यांनं जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

तुमच्या मोबाइलवर किती अ‍ॅप्स आहेत हे चटकन सांगा पाहू. नाही सांगता येणार. आपण एखादा मोबाइल किंवा कॉम्प्युटर विकत घेतो तेव्हा त्यावर कितीतरी अ‍ॅप्स अगोदरच इन्स्टॉल केलेले असतात. एखादं अ‍ॅप इन्स्टॉल करण्याआधी कृपया त्याबद्दलची लोकांची मतं (म्हणजे ‘रिव्ह्य़ूज’) नक्की वाचा. आपल्याला या अ‍ॅपची गरज नेमकी का आहे, हा प्रश्न स्वत:ला विचारा. अनेकदा कित्येक अ‍ॅप्स आपण तात्पुरत्या वापरासाठी इन्स्टॉल करतो आणि विसरून जातो. मग ती आपल्या मोबाइल वा कॉम्प्यटरवर कायमची राहतात. ही दुर्लक्षित अ‍ॅप्स आपली माहिती चोरत असतात. आपण एखादं अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर सहसा त्याबरोबरची अनेक साहाय्यक अ‍ॅप्सही आपल्या उपकरणात इन्स्टॉल होत असतात. ही छुपी अ‍ॅप्स वापरकर्त्यांला त्याच्या स्क्रीनवर दिसत नसतात.

अ‍ॅप इन्स्टॉल करायला सुरुवात करताना आपली परवानगी मागणारा एक ‘बॉक्स’ आपल्या उपकरणाच्या स्क्रीनवर उघडतो हे तुम्ही पाहिलंच असेल. बहुतेक अ‍ॅप्स आपल्याला आपल्या स्मार्ट उपकरणावरच्या सहा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी वापरण्याची परवानगी मागतात. त्या सहा गोष्टी म्हणजे आपली ‘कॉन्टॅक्ट लिस्ट’ (अर्थात मोबाइलमध्ये साठवलेले दूरध्वनी वा भ्रमणध्वनी क्रमांक), कॅमेरा, गॅलरी (मोबाइलच्या गॅलरीत विविध प्रकारची माहिती साठवलेली असते), डॉक्युमेंट्स, मायक्रोफोन आणि आपल्या फोनचं ‘लोकेशन’. आपण या साऱ्या गोष्टींना परवानगी देऊन टाकतो, त्यानंतर पुढे एखादा गैरप्रकार घडल्यास आपोआपच त्याची जबाबदारी अंतिमत: आपल्यावर- म्हणजे वापरकर्त्यांवरच येते. कारण मुळात त्या अ‍ॅपचे नियम आणि अटी मान्य करूनच वापरकर्त्यांनी ही परवानगी दिलेली असते.  म्हणूनच एखाद्या अ‍ॅपला आपल्या उपकरणावरच्या गोष्टींचा ‘अ‍ॅक्सेस’ देण्याआधी नियम व अटी वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

पालकांनी वेगवेगळी अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याआधी ती आपल्या मुलामुलींच्या वयोगटासाठी योग्य आहेत की नाही, हे तपासून पाहिलं पाहिजे. अनेक अ‍ॅप्स विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली असतात. अनेक मुलं पालकांना न विचारताच आपल्या फोनवर अ‍ॅप्स किंवा गेम्स इन्स्टॉल करतात. इंटरनेटवर नेमकं काय काय आहे हे पाहण्यासाठी ती तसं करतात, किंवा अनेकदा त्यांच्या मित्रमैत्रिणींचाही दबाव असतो. काही दिवसांपर्यंत एकमेकांसोबत फाइल्सची देवाणघेवाण करण्यासाठी ‘शेअर इट’ हे अ‍ॅप मोठय़ा प्रमाणावर वापरलं जात असे. त्यावर मोठय़ा प्रमाणात अश्लील आशयही नि:शुल्क उपलब्ध असल्याचं आम्हाला अनेक मुलांनी सांगितलं आहे. अनेक प्रकारच्या प्रौढांसाठीच्या ‘वेब सिरीज’ मुलं ‘शेअर इट’द्वारे एकमेकांशी अगदी सहजपणे शेअर करत होती.

याशिवाय मुलं वेगवेगळ्या प्रकारचं ‘हॅकिंग’ शिकवणारी अ‍ॅप्स इन्स्टॉल करतात असंही आम्हाला अनेकदा दिसून आलं आहे. हॅकिंग केवळ अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीरदेखील आहे. अशी साधनं मुलांना अडचणीत आणू शकत असल्यामुळे त्यांना याबाबत सावध करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. याखेरीज मुलं अनेकदा दुसऱ्यावर नजर ठेवणारी  ‘स्पायिंग अ‍ॅप्स’, अश्लील साहित्य असणारी अ‍ॅप्स, ‘पॉर्न चॅट्स’ आणि ‘ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्स’देखील इन्स्टॉल करत असतात. सध्या मुलांमध्ये अशी अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्याची जणू लाटच आली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्तीपूर्ण ठरू नये. आमच्याकडे आलेल्या एका प्रकरणात एका नववी इयत्तेतल्या मुलानं आपल्या फोनवर पॉर्न चॅटसाठीचं अ‍ॅप इन्स्टॉल केलेलं होतं. या अ‍ॅपवर दोन लोकांनी त्याच्याशी  संपर्क साधलेला होता. हा अल्पवयीन मुलगा आहे हे लक्षात आल्यावर या लोकांनी त्याला कोंडीत पकडलं. त्याच्यावर दादागिरी केली जात असे. पुढं तर अश्लील व्हिडीओ पाहत असल्याबद्दल त्याच्याकडून खंडणीही मागण्यात आली. अखेर या मुलानं आपल्या आईवडिलांना याबद्दल सांगितल्यावर तक्रार नोंदवण्यात आली.

एका वीस वर्षांच्या मुलीनं आपल्याला चॅट्स, फोन आणि एसएमएस या सगळ्यांवरच अश्लील भाषेत धमक्या येत असल्याची तक्रार आमच्याकडे नोंदवली होती. तिनं आपला फोन नंबर कुठल्या इंटरनेट संकेतस्थळावर ‘शेअर’ केला आहे का, याबद्दल आम्ही विचारलं असता तिनं ठाम नकार दिला. मात्र जेव्हा आम्ही तिचा फोन तपासला तेव्हा तिनं त्यावर दोन ‘डेटिंग’ अ‍ॅप्स इन्स्टॉल केली असल्याचं दिसून आलं. या दोन्ही अ‍ॅप्सनी तिच्या मोबाइलवरची कॉन्टॅक्ट लिस्ट, फोनचं लोकेशन, गॅलरी, इंटरनेट कनेक्शन आणि जिओ टॅगिंग सुविधा यांचा ताबा घेतलेला होता. आणखी वाईट गोष्ट म्हणजे तिच्या फोनच्या गॅलरीतले फोटो आणि व्हिडीओ आपोआप ‘अपलोड’ होऊन त्या दोन डेटिंग अ‍ॅप्सवर दिसत होते. या अ‍ॅप्सद्वारे तिचा फोन नंबर आणि पत्तादेखील शेअर केला जात होता. पुढं तपास केला असता दिसून आलं, की तिचे फोटो, फोन नंबर आणि पत्ता एका अश्लील संकेतस्थळावर ‘पोस्ट’ करण्यात आला होता. त्यामुळेच तिला अनोळखी पुरुषांकडून घाणेरडे कॉल्स आणि मेसेज यायला सुरुवात झाली होती. अशा संकेतस्थळावर असणारी माहिती काढून टाकणं अत्यंत कठीण असतं. शिवाय या प्रक्रियेला वेळही खूप लागतो. अखेर त्या मुलीला आपला फोन नंबर, स्मार्टफोन हे सारंच बदलावं लागलं.  दुसऱ्या शहरात राहायला जावं लागलं. पोलिसांकडे याची तक्रार केल्यावर त्यांनी यावर तात्काळ कृतीदेखील केली. मात्र या मुलीला याची मोठी किंमत चुकती करावी लागली. तिला जो मनस्ताप झाला तो प्रचंड होता.

मुलं आणि प्रौढ व्यक्ती आपल्या फोनवर डेटिंग अ‍ॅप्स इन्स्टॉल करत असतात. जर मोठय़ा माणसांनाच आपल्या ‘ऑनलाइन’ जगतातल्या वर्तनामुळे होणारे परिणाम कळत नसतील, तर मग मुलांना ते माहीत असावेत आणि सुरक्षेच्या सगळ्या सूचनांचं त्यांनी आपणहून पालन करावं, अशी अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ आहे?

इतर गैरप्रकारांसोबतच सध्याच्या- म्हणजे टाळेबंदीच्या काळात ‘साइड लोड’ हा एक नवाच प्रकार सुरू झाला आहे. उदा. सध्या ‘टिकटॉक’ या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र काही अन्य अ‍ॅप्सच्या मार्फत ‘टिकटॉक’ अजूनही वापरता येतं. यालाच ‘साइड लोड अ‍ॅप्स’ असं म्हणतात. अशा प्रकारची साइड लोडिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्या लोकांचा डेटा अनेकदा हॅक होत असतो. कधी कधी त्यांच्या बँक खात्यातून रक्कमदेखील चोरीला जाऊ शकते. एका स्त्रीला नुकताच आपण ‘पेटीएम’कडून बोलतो आहोत, असा फोन आला. तिला तिची ओळख ‘अपडेट’ करण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगण्यात आलं. या ‘बिलडेस्क’सारख्या साधम्र्य असणाऱ्या नावाच्या ‘फेक’ अ‍ॅपमधून तिला आपली ओळख पटवणारी कागदपत्रं सादर करायला सांगण्यात आलं. तिनं हे करताच पुढच्या पाच मिनिटांत तिच्या दोन बँक खात्यांतून सुमारे दीड लाख रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आला. अशा प्रकारची अ‍ॅप्स तुमच्या उपकरणाला ‘रिमोट अ‍ॅक्सेस’ पुरवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून गुन्हे करत असतात.

अविश्वसनीय ऑनलाइन ‘ऑफर्स’, एकावर एक ‘फ्री’, वस्तूंवर ७० टक्के ‘डिस्काऊंट’ ही सारी विपणनाची तंत्रं असतात. जेव्हा एखादी योजना बाजारपेठेतल्या दुकानांपेक्षा खूपच चांगली असते, तेव्हा त्यात नक्की काहीतरी गोम दडलेली असतेच. जे लोक अशा मोहाला बळी पडतात त्यांना गुन्हेगार एक लिंक पाठवतात. या लिंकवरून केलेल्या ‘डाऊनलोड्स’मुळे अनेक आर्थिक गुन्हे घडतात. बळी पडलेल्यांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

आपल्या कोणत्याही ‘डिजिटल’ उपकरणावरील अ‍ॅप्सबाबत सुरक्षितता बाळगण्यासाठी तुम्हाला काय करता येईल?

  • तुम्हाला जे अ‍ॅप इन्स्टॉल करायचं आहे त्याचा उद्देश आणि आवश्यकता समजून घ्या.
  • इन्स्टॉल करण्याआधी नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.
  • या अ‍ॅपला कोणकोणत्या परवानग्या देत आहात, त्या विचारपूर्वक निवडा.
  • खात्रीशीर स्रोतांमधून किंवा ‘अ‍ॅप स्टोअर’मधूनच अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  • अ‍ॅप इन्स्टॉल करण्याआधी त्यावर लोकांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया वाचा.
  • वापरकर्त्यांच्या वयानुरूप अ‍ॅप्स इन्स्टॉल करा.
  • अ‍ॅपमध्ये दिलेली तक्रार नोंदवण्याची सोय समजावून घ्या.
  • जर अ‍ॅपशी संबंधित एखादी धमकी आली किंवा त्यात गैरव्यवहार झाला असेल तर त्याची तक्रार नोंदवा.
  • तुमच्या उपकरणातली नको असणारी अ‍ॅप्स लगेच काढून टाका.
  • अद्ययावत ‘अँटीव्हायरस सॉफ्टवेअर’ वापरा.
  • आपली उपकरणं नेहमी ‘अपडेट’ करा.
  • एखादं अ‍ॅप वापरात नसेल तर त्याला दिलेल्या ‘अ‍ॅक्सेस’च्या परवानग्या बंद करा.
  • वापरात नसेल तेव्हा इंटरनेट, ‘जिओ टॅगिंग’, ‘ब्ल्यूटूथ’ आणि ‘हॉटस्पॉट’ बंद करून टाका.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही आपल्या उपकरणात वापरत असलेल्या अ‍ॅप्सचा गैरवापर किंवा अतिवापर होत नाही ना हे पाहा. ते थांबवणं आपल्याच हातात आहे.

डिजिटल तंत्रज्ञान माणसाला सक्षम करणारं एक साधन आहे. या अत्यंत उपयुक्त साधनानं आपल्याला नव्या गोष्टी शिकण्याची, स्वत:ला विकसित करण्याची आणि स्वावलंबी बनण्याची संधी मिळाली आहे. मात्र विज्ञानानं देऊ केलेल्या या शक्तीला वापरत असताना आपणा वापरकर्त्यांची असणारी जबाबदारी टाळून चालणार नाही. तेव्हा ऑनलाइन जगतात सावधगिरी बाळगूया, जबाबदारपणे वागूया आणि सुरक्षित राहू या..

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी