राजन खान aksharmanav@yahoo.com

पुरुष बदलला आहे, बदलतो आहे हे मान्यच. परंतु आजही ती प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. जगात बहुतांशी पुरुष स्वत:ला आधुनिक म्हणवत असले  तरीही पारंपरिक विचारांचाच पगडा त्यांच्या मनावर जास्त आहे. त्यामुळे स्त्रीला स्वातंत्र्य देणारा मी कोण हा प्रश्नही त्यांचा मनात येत नाही. पण मला तिला स्वातंत्र्य द्यायचंय, बरोबरीनं वागवायचंय, असं मात्र ते म्हणताहेत, पण ‘म्हणजे काय’चा अर्थ त्यांना लागलेला नाही. पुरुष  अधिकाधिक गोंधळात आहे. प्रश्नांच्या जाळ्यात अडकला आहे.. ‘मी गोंधळलेला पुरुष’ या लेखाचा हा उर्वरित भाग.

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
islamic information center marathi news, islam information
माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…

आज जगभरच्या मानवी समाजाची बाह्य़-धारणा स्त्रियांविषयी सहानुभूतीच्या बाजूला कललेली आहे. अनेक देशांचे कायदे स्त्रियांना सन्मान, स्वातंत्र्य, बरोबरी देणारे आहेत. आधुनिक कला, साहित्य स्त्रियांची बरोबरी अभिव्यक्त करतायत. समाजात स्त्रीचा सर्वच बाबतीत दबदबा तयार झाला आहे. मधला काही काळ स्त्रीदाक्षिण्याचा होता, तो आता स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्तीकडे आलेला आहे. पूर्वी स्त्रीला किंवा स्त्रीबद्दल सर्रास वाईट बोलणं, तिची चेष्टा-कुचेष्टा करणं, तिचा अपमान करणं चालायचं, त्याला आता किमान जाहीर पातळीवर तरी आळा बसला आहे.

सार्वजनिक ठिकाणं, सार्वजनिक यंत्रणा, सार्वजनिक अभिव्यक्तीची माध्यमं यांच्यात स्त्रीचा उपहास, बदनामी अशा गोष्टी आता चालत नाहीत. कुणी तसा प्रयत्न केला तर बाकीचा समाज त्याच्यावर तुटून पडतो. तसं करणाऱ्याला मागास ठरवतो, त्याचे वाभाडे काढतो, आणि त्या तुटून पडणाऱ्यांत नुसत्या स्त्रियाच नसतात, तर पुरुषही मोठय़ा संख्येनं असतात. किमान स्वत:ला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या (आणि तसं तर सगळेच म्हणवून घेऊ लागलेत स्वत:ला.) समाजघटकांत तरी स्त्रियांविरुद्ध बोलण्याची, कृती करण्याची हिंमत पुरुषांमध्ये राहिलेली नाही. आधुनिक काळाचा दबाव आता उघडपणे पुरुषवर्गावर निश्चित आहे.

या  लेखाच्या पहिल्या भागात (२९ मे)म्हटलं होतं त्याप्रमाणे, आजचा पुरुष पारंपरिकता आणि आधुनिकता यांच्या द्विधेत घुटमळणारं आयुष्य जगतो आहे. स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे काय, ते कुठपर्यंत द्यायचं,(मी देणारा कोण, हा प्रश्नही त्याच्या मनात येत नाही) बरोबरी म्हणजे काय, ती कुठपर्यंत द्यायची, याचं गणित किंवा माप पुरुषाकडे तयार नाही. स्त्रीचं स्वातंत्र्य, समता, बरोबरी, मुक्ती यांच्या अचूक व्याख्येपर्यंत आणि नेमक्या अंमलापर्यंत समाज अद्याप पोहोचलेला नाही. त्याबाबतीत जगणं संभ्रमलेलं आहे.

आजचा पुरुष मला अजब दृश्यात दिसतो. म्हणजे त्याला स्त्रीला स्वातंत्र्य हवं हे मान्य आहे, पण त्या स्वातंत्र्याची चावी त्याला स्वत:च्याच हातात हवी आहे. त्याला स्त्रीला बरोबरी द्यायची आहे, पण त्या बरोबरीची उंची काय असावी, हे ठरवायचा अधिकार त्याला स्वत:कडं हवा आहे. आधुनिक काळाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय दबावच पुरुषावर इतका आहे, की स्त्रीच्या स्वातंत्र्याची महती आणि आवश्यकता त्याला मान्य आहे, स्त्रीच्या बरोबरीची गरज त्याला कळते आहे, पण ते स्वातंत्र्य आणि बरोबरी यांचं नियंत्रण आणि नियोजन आपणच करावं, असं त्याला वाटतं आहे. आणि त्याच वेळी अख्ख्या मध्ययुगाचा लांबलचक बेडीबद्ध प्रवास करून आलेल्या, स्वातंत्र्याची आणि बरोबरीची चव कळलेल्या स्त्रीला त्या स्वातंत्र्याची चावी आपल्याच हातात हवी आहे. बरोबरीची उंची तिला स्वत:लाच ठरवायची आहे, आणि वेळ आली तर तिला पुरुषापेक्षा अधिक उंच व्हायची इच्छा आहे. हा आताच्या स्त्री-पुरुष नात्यामधला वादाचा, संघर्षांचा पेच आहे. आणि मुळात सर्वसामान्य पातळीवर स्वातंत्र्य आणि बरोबरी म्हणजे काय, या बाबतीतही भरपूर गोंधळ आणि संभ्रम आहे. स्वातंत्र्य आणि बरोबरी म्हणजे नेमकं काय, हे स्त्री-पुरुष दोघांनाही कळत नाही अशी व्यवस्था आहे

निसर्गानं स्त्री-पुरुष दोघांनाही मुक्त, एकटय़ानं, स्वत:च्या मर्जीनं जगण्याचं दिलेलं स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्यावर समाजरचनेनं घातलेली कृत्रिम बंधनं, नियम यांच्या भरडय़ात किंवा दुहेरात माणूसजात जगत राहिली. समाजरचना शिस्तीत जगायला सांगते आणि निसर्ग बेछूट, मोकळं जगायला सांगतो, अशा त्या दुहेरात पुरुषसत्ताक व्यवस्थेनं पुरुषाला काही सवलती सोडल्या, काही ढील ठेवली, आणि समाजरचनेच्या नियमांची स्त्रीसाठी मात्र बंधनं तयार केली. त्यातून पुरुषाला कसंही जगण्याची मुभा आणि स्त्रीला मात्र कुंपणं उभी राहिली. पुरुषाचं बहुपत्नीत्व, पुरुषांसाठी वेश्यागृहं, स्त्रीकडून पुरुषांचं मनोरंजन करणाऱ्या कला, कुटुंबातल्या संपत्तीची पुरुषाची मालकी, संपत्तीचा वारसा पुरुषाकडं, होणारी अपत्यं पुरुषाच्याच नावानं ओळखली जाणं, अशा असंख्य गोष्टी. यात स्त्रीला अधिकाराची, बरोबरीची कोणतीही जागा नाही.

यातून पुरुषाला स्वत:ला निसर्ग अनुभवण्याची मोठी सोय ठेवली गेली, पण स्त्रीच्या निसर्गाची मात्र बळजोरीनं कोंडी करण्यात आली. पण औद्योगिक क्रांतीनंतरच्या कायद्यांमध्ये आणि समाजाच्या धारणेतही स्त्रीलासुद्धा निसर्ग असतो, हे मान्य केलं गेलं आणि तिथून स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती, स्त्रीची बरोबरी यांच्या उलथापालथी सुरू झाल्या. मध्ययुगीन पुरुषसत्तेत मिळालेल्या सवलतीत मुख्यत: संपत्ती, वासना हे मुद्दे होते. प्रत्येक गोष्टीत शेवटचा शब्द पुरुषाचा, हाही मुद्दा होता आणि याच मुद्दय़ांबाबतीत पुरुषांच्या बरोबरीचा घोळ सुरू झाला. संपत्तीत समान वाटा, स्त्रीच्या शब्दालाही किंमत, पुरुष जितका मुक्त वागेल, तितकीच स्त्रीसुद्धा मुक्त वागेल, पुरुष जी व्यसनं करील, ती स्त्रीसुद्धा करील, पुरुषाला स्त्रीचा अपमान करण्याचा अधिकार नाही, नाती सांभाळण्याची जबाबदारी तिची एकटीचीच नाही, अशा कितीतरी नव्या गोष्टी आल्या आणि पुरुषजात चलबिचलीला गेली. मी त्या चलबिचल पुरुषजातीचा प्रतिनिधी आहे. सध्या तो पुरुषजातीच्या चलबिचलीचा काळ सुरू आहे. स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसमानता ही पुरुषाला एक गोंधळाची पीडा होऊन बसलेली आहे.

गेली हजारो वर्ष मला पुरुष म्हणून सवय झालीय, स्त्रीनं माझ्या मागंच राहायचं, मागंच यायचं. आता ती बरोबरीला यायला निघालीय (आणि गंमत म्हणजे तिला बरोबरीला आणण्याची बाब अनेक माध्यमांतून बहुसंख्येनं पुरुष जातीनंच हाताळलीय. पुरुषच पुरुषाचा वैरी झाला की काय?) तर मला कळतच नाही, मी तिला बरोबरी देऊ म्हणजे काय करू? तिला स्वातंत्र्य देऊ म्हणजे काय करू? मला भीती वाटते, हे सगळं तिला दिलं तर ती माझ्या डोक्यावर बसेल. माझ्या पुढं निघून जाईल. माझ्यावर हुकूम गाजवू लागेल. माझ्या ताब्यातून निसटून जाईल. उद्या माझं ती काहीच ऐकणार नाही. ती मला सोडूनसुद्धा जाईल. माझी दिवसाची सगळी कामं मग कोण करील? आई, बहीण, प्रेयसी, बायको अशा वेगवेळ्या रूपांत स्त्री आयुष्यभर माझी सेवा करते, तीही फुकट करते, नातं म्हणून. जर ती स्वतंत्र झाली न् तिनं ‘तुझी कामं तू कर’ असं सांगितलं तर सगळ्या आयुष्यात मला स्वत:साठी किती राबावं लागेल! माझ्या आयुष्याचा किती तरी मोलाचा वेळ त्यात फुकट वाया जाईल. मग मी कर्तबगारी कधी गाजवणार? पराक्रमाचे झेंडे कधी रोवणार? हे विचार येतातच.

मला सवय आहे, माझ्या जन्मापासून मरेपर्यंत बाईनं बिनपगारी कर्मचारी म्हणून माझी सेवा करण्याची. असंख्य कामं करण्याची. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि मी झोपलेला असतानासुद्धा माझी दखल तिनं घेतलीच पाहिजे न् माझ्यासाठी राबलंच पाहिजे, याची मला सवय आहे. ती जर स्वतंत्र झाली न् मुक्त झाली न् तिनं माझी ही सर्व कामं करायला नकार दिला तर? किंवा समजा, मी तिला समानता दिली न् त्या अधिकारानं ती म्हणाली, की ‘आपण आपली सगळी कामं निम्मी निम्मी वाटून घेऊ,’ तर? आणि समजा, ती माझ्यापेक्षा वरचढ झाली न् म्हणाली, की ‘गेली हजारो वर्ष मी जी स्त्री म्हणून कामं करत आलेय, ती यापुढं आयुष्यभर तू कर आणि पुरुष म्हणून तू जी कामं करत आलायस, ती मी करते,’ तर!

आणि समजा, स्त्री जर म्हणाली, की ‘आजपासून लोभासाठी न् स्वार्थासाठी माझी खुशामत करायची नाही. मला सुंदर-असुंदर काही म्हणायचं नाही. मला दागिने, वस्त्रप्रावरणं, सौंदर्यप्रसाधनं आणून द्यायची नाहीत. तुला मी सतत चांगलीच दिसले पाहिजे, अशी अट मला नको. तुझं मन आयुष्यभर जपण्याची न् रिझवण्याची जबाबदारी माझी नाही.  तू जे आजपर्यंत सगळं करत आलास, ते-ते सगळं यापुढे मी करणार आहे. तू स्त्रीमध्ये करमणूक शोधलीस, आता मी पुरुषामध्ये करमणूक शोधणार आहे. माझ्या वेळाचं मी काहीही करीन, कुणीही मला त्याबद्दल काहीही विचारायचं नाही न् माझ्यावर कसलाही संशय घ्यायचा नाही. आणि घरातलं एकही काम मी करणार नाही न् करायचीच असतील, तर निम्मी-निम्मी आपण वाटून करू किंवा मग तुझी कामं तू कर आणि माझी कामं मी करते. आणि घरात येणाऱ्या सगळ्या पैशांवर तुझा निम्मा अधिकार आणि माझा निम्मा अधिकार. घर, स्थावर यावर माझीसुद्धा निम्मी मालकी. आणि मुलं जी होतात आपल्याला, ती माझ्याही नावासह, आडनावासह, जातीसह आणि धर्मासह ओळखली जायला हवीत. आणि हे पुरुषा, तू जसा तुझ्या मर्जीनं पैसा, संपत्ती खर्च करतोस, तर एक तर ती मला विचारून कर आणि हिशोब दे आणि मलाही माझ्या मर्जीनं पैसा, संपत्ती खर्च करायचा अधिकार पाहिजे आणि तू जर त्याचा हिशोब देणार नसशील तर मीही देणार नाही.’

आणि स्त्री जर म्हणाली, की ‘सर्वच्या सर्व सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रांत मला समान वाटा पाहिजे. निम्म्या जागा माझ्या राखीव म्हणून नाही, तर माणूस म्हणून माझा अधिकार म्हणून असल्या पाहिजेत. पृथ्वीवरच्या सर्व शेतीची निम्मी मालकी मला पाहिजे. सगळ्या कारखानदारीची निम्मी मालकी मला पाहिजे. नोकरीच्या निम्म्या जागा मला पाहिजेत. राजकारणातली निम्मी पदं मला पाहिजेत. माणसांच्या जगातल्या प्रत्येक गोष्टीवर, बाबीवर, घडामोडीवर पुरुषांइतकीच स्त्रीची मालकी, अधिकार, तजवीज असली पाहिजे.’ तर मी काय करायचं?

मला ठरवताच येत नाही, यातलं मी काय-काय द्यायचं?, आणि मुळात द्यायचं का?, आणि आणखी मुळात जाऊन सांगायचं तर मला पुढची वेगळीच भीती वाटतेय, ती अशी, की मुळात या गोष्टी यापुढे स्त्री माझ्याकडे मागत बसेल का?, की माझ्याकडून ओरबाडून, ओढून घेईल या गोष्टी? माझ्या परवानगीची, मान्यतेची तिला गरजच पडणार नाही? माझं, माझ्या काळाचं सर्वात मोठं भय ते आहे. स्त्री माझ्या ताब्यातून निसटते आहे.

पण सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या समाजात स्त्रीविषयक माझे पुरुषी, खरे विचार बोलायचीसुद्धा सोय नाही. आजकाल स्त्रियांच्या विरोधात उघड काही बोलायची, लिहायची सोय नाही. एक वावगा वाटणारा शब्द गेला की लोक चवताळून अंगावर येतात आणि त्यात पुरुषच जास्त असतात. मला माहीत असतं, ते माझ्यासारखेच ढोंगी आहेत. त्यांनाही खरं तर स्त्रीला स्वातंत्र्य द्यायचंच नाही आहे, किंवा स्वातंत्र्य द्यायचं म्हणजे नेमकं काय, तेही त्यांना कळत नाहीये. किं वा वर म्हटलं तसं, मी ते देणारा कोण, हाही विचार ते करत नाहीत, पण कुणी एखादा स्त्रीच्या बाबतीत काही वावगं, वावदूक बोलू लागला, की त्याच्या अंगावर जाऊन या सगळ्या (मनातून मागास) लोकांच्या समाजासमोर आपण सुधारलेले, पुरोगामी, आधुनिक आहोत असं दाखवायची सोय होते.

सध्याचा पुरुष हा असाच आहे. स्त्रीच्या बाबतीत आपण फारच आधुनिक विचारांचे, पुढारलेले आहोत, असं दाखवायची पुरुषांमध्ये ‘फॅशन’ आहे. आपण काळाबरोबर वाहत आहोत असं ते दाखवतात. प्रत्यक्ष त्यांच्या मेंदूतला काळ मागासच आहे. (ते जर या गोष्टी नाकारणार असतील, तर त्यांच्या घरात, कामाच्या ठिकाणी जाऊन विचारा ते स्त्रीशी, प्रत्यक्ष आपल्या बायकोशी  कसं वागतात म्हणून.. किंवा त्यांचं तारुण्य आणि तारुण्यातले चाळे तपासून बघा. सत्य हाती लागेल.)

प्रांजळपणे सांगायचं, तर मला स्त्रीला स्वातंत्र्य, समता सगळं हवं असं वाटतं. स्त्रीला बरोबरीनं वागवायची इच्छा आहे. पण त्यात दोन तिढे आड येतात माझ्या मनात. एक तर स्वत: स्त्रीला हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे कळतंय का? आणि दोन, मी एकटय़ानं हे स्वातंत्र्य देऊन कसं चालेल? बाकीच्या मागास जगात मी दिलेल्या स्वातंत्र्याचा कचरा होणार नाही, याची काय खात्री?  मला दडपण येतं, मी स्त्रीला स्वातंत्र्य दिलं आणि तिनं त्याचा गैरफायदा घेतला तर? ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भरकटली, बिघडली आणि वाया गेली तर? तिला हे स्वातंत्र्य संयमानं हाताळावं लागेल हे नाही कळलं तर?  मी गृहीत धरतो, ती स्वातंत्र्य मिळालं म्हणून माझ्यावर दादागिरी नाही करणार, माझ्या बरोबरीनंच वागेल, पण अचानक मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरवापर ती करणार नाही कशावरून? तिच्या अंगातल्या आदिम, नैसर्गिक प्रेरणा जागा झाल्या आणि ती मला न जुमानता बेछूट, बेमुर्वत वागू लागली न् कुटुंबसंस्था, समाजसंस्थांच्या घडय़ा विस्कटायला निघाली तर?

आणि समजा,  तिला तसं स्वातंत्र्य आहे, तर त्या स्वातंत्र्यासह जगणारं बाहेरचं जग कुठं उपलब्ध आहे तिला? मी भलेही पाहीन तिच्याकडं समतेनं आणि बरोबरीनं, पण बाहेरचं जग पाहील का तिच्याकडं त्या नजरेनं? बाहेरचं जग अजून कुठं तेवढं प्रगल्भ आणि पुरोगामी झालंय? मी जगातल्या तमाम स्त्रियांकडे केवळ माणूस म्हणून सन्मानानं पाहीन आणि त्यांच्याकडं वासनेच्या नजरेनं अजिबात पाहणार नाही, पण या जगातले तमाम पुरुष माझ्या कोणत्याही नात्यातल्या स्त्रियांकडं तशाच नजरांनी पाहतील याची काय खात्री? मलाही वाटतं, माझ्या घरातल्या स्त्रिया रात्री उशिरासुद्धा पृथ्वीवर कुठंही भटकून आलेल्या चालतील मला, पण त्या सुरक्षित घरी परत येतील याची काय हमी? स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांकडून ही पृथ्वी कुठं निर्धोक आहे अजून?  हे जग स्त्रियांना मोहात पाडणारं, फसवणारंच आहे. स्त्रिया वापरणारं आणि फेकून देणारंच आहे. तर माझ्या नात्यातल्या सर्व स्त्रियांना या जगाच्या भूलभुलैयाचा मोह पडू नये, त्या वाहवत जाऊ नयेत आणि त्या फसू नयेत म्हणून मी त्यांच्या स्वातंत्र्यावर घातला थोडा आळा तर काय बिघडलं? असं येत राहातं काहीबाही या पुरुषाच्या मनात.

मला वाटतं, हा जो ‘मी’ नावाचा पुरुष इथं मी लिहिलाय, तसाच्या तसा जगातला प्रत्येक पुरुष वर्तमानात आहे. जग अजूनही हे पुरुषांचंच आहे, पुरुषांच्याच ताब्यात आहे, पण पुरुषांचाच पुरुषांवर विश्वास नसलेलंही हेच जग आहे. जगातले खूप सारे पुरुष असला काही विचारही न करता आपलं पुरुषीपण अनुभवत जगत असतील. त्यांना स्त्रीचं स्वातंत्र्य, समता यांचं काही घेणंही नसेल कदाचित. पण खूप सारे पुरुष आता स्त्रीचं स्वातंत्र्य, समता या गोष्टींच्या संपर्कात आलेलेही आहेत. त्यांना त्याचं महत्त्व कळतही असणार. पण त्याचा अंमल कसा करायचा, कारण अंमल करायचा तर संपूर्ण जगाची साथ हवी, असा गोंधळलेला प्रश्नही त्यांना पडला असणार.

तर तसा ‘मी’ गोंधळलेला पुरुष आहे आणि भोवतीचे सगळे तथाकथित सुसंस्कृत पुरुषही मला तसेच दिसतात.