News Flash

रवींद्र विचार जगणारं ‘पाठोभवन’

रवींद्रनाथ टागोरांना वाटायचं मुलांचं कोवळं, निर्मितीक्षम जग हे अजानवृक्षाखाली वाढावं, हिरवळीवर आडवं पडल्यावर वर निळंशार आकाश दिसावं.

|| रेणू दांडेकर

रवींद्रनाथ टागोरांना वाटायचं मुलांचं कोवळं, निर्मितीक्षम जग हे अजानवृक्षाखाली वाढावं, हिरवळीवर आडवं पडल्यावर वर निळंशार आकाश दिसावं. इथेच समजून घ्यायची सवय लागावी, निसर्गातून गुणपूजा बांधावी, ज्ञान मिळवावं, हेच ज्ञान माणसाचं जीवन कलापूर्ण बनवेल. हे विचार एवढे सशक्त आहेत, की आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवरही याच विचारांनी ‘पाठोभवन’ सुरू आहे. आजही ‘पाठोभवन’ अनुभवणं म्हणजे आपलं जग व्यापक करणं आहे. परंतु आजच्या काळातले बदल, आग्रह, अपेक्षा लक्षात घेता ‘पाठोभवन’ जिवंत ठेवणं अवघड आहे.. पाठोभवन शाळेचा हा अंतिम भाग.

आज सकाळी सहा वाजताच ‘पाठोभवन’मध्ये गेले. मला तर आता मी इथलीच वाटत होते. पोचले तेव्हा मुलं जमत होती. शिपाई असेल पण दिसला नाही. घंटा मुलंच देतात. इथे प्रत्येकाला वाटत होतं इथलं काम माझंच आहे.

मुख्य इमारतीच्या समोर (ही इमारत प्राचार्य, उपप्राचार्य, दा-दींची संमेलन जागा अर्थात स्टाफ रूम, विश्रांती निवास, प्राचीन रंगकाम केलेलं संमेलन सभागृह इत्यादी इथे आहे) मुलं जमली. रवींद्र प्रार्थनेने सुरुवात झाली. पाठीला दप्तर घेऊन मुलं ठरलेल्या झाडांकडे रवाना झाली. इकडे-तिकडे जाण्यात सहजता होती पण जाता-येता रांगेतच गेलं पाहिजे, असा नियम नव्हता. झाडाखाली मुलं गोलाकार नि त्याच गोलात त्यांचे दा-दी खालीच मांडी घालून बसलेले होते. तिसऱ्या वर्गापासून इंग्रजी भाषा शिकवली जाते नि बंगाली या मुख्य भाषेबरोबर संस्कृत – हिंदी या भाषाही मुलं शिकतात. मोठय़ा वर्गातली मुलं ज्या झाडांखाली बसली होती तिथे चर्चा चाललेल्या दिसत होत्या, सहज संवाद जाणवत होता. पुलावर नववीचे विद्यार्थी होते. वातावरणात आपलेपणा होता. गप्पा सुरू झाल्या. ‘‘दा-दीबद्दल काय वाटतं तुम्हाला?’’ सगळे हसले, कारण मुलाखतीतला हा कोरडा प्रश्न होता. ‘‘दा – दी आमचे शिक्षकच नाहीत तर ते खरंच दा आणि दी आहेत. वे फॉर्मल टीचर जैसे नहीं है। वे आते है, पढाते है, चले जाते है। हम बाहर यही देखते है।  हमारे दा-दी मन को छू लेते हैं। पढते  तो हम अपने आप। हमारे दा-दी दुनियामें सबसे अच्छे दा-दी है।’’ त्यांच्या बोलण्यातून दा-दींबद्दलचं प्रेम आपोआप व्यक्त होतं होतं. मुलांमध्ये संवेदनशीलता अधिक आहे हे जसं जाणवलं तशी निर्माणक्षमताही जाणवली तिथल्या एका दीदींकडे हे मत व्यक्त केलं तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘आपण कुठल्या झाडाखाली, कुठल्या मातीवर उभे आहोत याचं भान असलं की प्रत्येक मूल असं असतं असं जाणवतं.’’ मुलं निघून गेली. मोकळेपणा, निर्भयता आणि संयमित व्यक्त होणं इथे जाणवलं. हे नक्कीच इथल्या मोकळ्या वातावरणातून, शिकण्याच्या समृद्ध संधींमधून आणि रवींद्र तत्त्वज्ञानातून आलं असणार. सगळी मुलं अशीच असतील? का नेमकी वेगळी मुलं आपल्याला भेटली? एका झाडाखाली दा-दी नव्हते, मुलं गटात लिहीत बसली होती. ‘‘क्या लिख रहें हो?’’ मुलं म्हणाली, ‘‘हमनें एक सब्जेक्ट चुना है। अभी लायब्ररीसे आए है हम। तो उस पर लिख रहें है।’’ ‘‘आप क्या पढते हो यहाँ पर?’’ ‘‘हमें कोई पढाता नहीं। अपने आप हम पढते है। हमें नही लगता हमें कोई पढाने आया है। हम जो दिनभर सोचते है, लिखते है, पार्टिसिपेट करते है, प्रेझेंट करते है, एक दूसरोसें शेअर करते है वही हमारी पढाई है।’’ हा गट आठवीचा होता.

मुलं हा शाळेचा आरसा असतो नि ‘पाठोभवन’चा आरसा लख्ख होता. मुलांमधल्या जाणिवा, आत्मविश्वास, वेगळेपण हे तिथल्या शिकण्याच्या पद्धतीत आहे. खूप विषयांचे तासही पाहिले. उपक्रम वेगळे करावे लागत नाहीत, ते मुलांना सुचतात हे पाहिलं. इतक्यात एका मुलीनं मला बोलावलं. म्हणाली, ‘‘दी दी, आप कुछ पूछ रहे थे।  हमारे दा-दी हमारे आसपास होते है, कभी साथसाथ होते है।  हर एक को वो पहचानते है। वो हमें संभालते है और हमें हम पर छोड देते है।’’ हे बोलणारा मुलगा अकरावीत होता. ‘पाठोभवन’ची ओळख मुलंच करून देत होती. ती काय शिकत असतील, कसं शिकत असतील हे वेगळं समजून घ्यायची गरज नव्हती. इथे शिक्षक कमी बोलत होते नि मुलं अधिक व्यक्त होत होती. काय शिकलंय हे सांगत होती.

बोलताना मुलांनी सांगितलं, इथे खूप सांस्कृतिक संमेलने होतात. रवींद्रनाथांनी दिलेला आशय खूप संपन्न आहे. मुलं दुसरीपासून संगीत नि नृत्य शिकतात. या कलांची दालनं संगीत साधनांनी समृद्ध आहेत नि शिकवणारेही तज्ज्ञ आणि ‘रवींद्र संवेदना’ असणारे आहेत. ही सांस्कृतिक संमेलनं मुलांच्या मनावर अभिजात संस्कार करताहेत. त्यातूनच ‘पाठोभवन’ची संस्कृती आकार घेतेय. इथली आश्रम संमेलनंही वेगळी होतात. मुलंच आयोजन करतात. मुलं सांगत होती, ‘‘हम हम है। कोई किसी पर डिक्टेटरशिप नहीं चलाता है। हमारी विचारसभा होती है। किसीने गलती की तो इस सभा में जजमेंट होता है। पिटाई का तो सवाल ही नहीं. ’’ इथे मुलांना घरची आठवण काढायला वेळच नसतो. एकत्र वाढताना इथे राहाणाऱ्यांना ‘पाठोभवन’ अधिक संपन्न करते.

‘पाठोभवन’ची वेळ आहे सकाळी साडेसहा ते साडेबारा आणि नंतर आश्रमातली मुलं आश्रमात जातात नि घरी जाणारी मुलं घरी जातात. पुन्हा संध्याकाळी सगळी मुलं ‘पाठोभवन’मध्ये येतात. या वेळी खेळ, प्रकल्प, उपक्रम, गटचर्चा, वाचन सुरू होते. वर्गात वा प्रत्येक गटात ३०-३५ मुलं असतात. पहिली ते आठवीपर्यंत शास्त्रीय संगीत, चित्रकला, नृत्य (मणिपुरी, ओडीसी), रंगकाम, वाद्यसंगीत, मातीकाम, शिल्पकला, लाकूडकाम, रवींद्र संगीत असे विषय आहेत. नववीत मुलं आपल्या आवडीने यातील एकाची निवड करतात. ‘पाठोभवन’मध्ये जवळजवळ ७० ‘दा-दी’ आहेत. विशेष म्हणजे इथले बरेच विद्यार्थीच आज इथे ‘दा-दी’ आहेत. माजी मुख्याध्यापिका रवींद्रनाथांच्या कुटुंबातील होत्या. सध्या असलेल्या बोधीरूपा सिन्हा याच शाळेच्या माजी विद्यार्थिनी नि त्यांच्या वडिलांना रवींद्रनाथांचा सहवास लाभला होता. बोधीरूपा प्राचार्य असूनही मुलांच्या ‘दी’च होत्या. उपप्राचार्य डॉ. पांडे निवृत्तीला आलेले पण मुलांचे ‘दा’च होते. दोघांकडेही काही विचारायला, सांगायला, बोलायला सगळ्या वयाची मुलं येत होती. मुख्य पदावर असूनही ते बालवाडीचेही ‘दा-दी’ होते नि उच्च माध्यमिकचेही दा-दी होते. हे वेगळं नाही का?

रविंद्रनाथांना वाटायचं मुलांचं कोवळं, निर्मितीक्षम जग हे अजानवृक्षाखाली वाढावं, वृक्षाच्या सावलीत विसावावं, हिरवळीवर आडवं पडल्यावर वर अथांग हिरवा रंग दिसावा नि मध्ये-मध्ये निळंशार आकाश दिसावं. इथेच समजून घ्यायची सवय लागावी, निसर्गातून गुणपूजा बांधावी, ज्ञान मिळवावं, हेच ज्ञान माणसाचं जीवन कलापूर्ण बनवेल. कला माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करते. हे विचार एवढे सशक्त आहेत, की आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवरही याच विचारांनी ‘पाठोभवन’ सुरू आहे. (स्वत: रवींद्रनाथ १९०१ ते १९४२ पर्यंत ‘पाठोभवन’मध्ये होतेच.) आजही ‘पाठोभवन’ अनुभवणं म्हणजे आपले जग व्यापक करणं आहे. आजच्या काळातले बदल, आग्रह, अपेक्षा लक्षात घेता ‘पाठोभवन’ जिवंत ठेवणं अवघड आहे. इथे जे ‘पाठोभवन’ समजून काम करताहेत त्यांची संख्या जास्त आहे. ‘पाठोभवन’चा विश्वास आहे, की निसर्ग आणि माणूस एकजीवच असायला हवेत. मात्र रवींद्र विचार समजणं आणि जगणं यात अंतर आहे. त्यामुळे इथून बाहेर पडणाऱ्या मुलांना स्पर्धेच्या जगाशी संघर्ष करावा लागतो.

पाठय़पुस्तकांना इथे ‘सहजपाठ’ म्हणतात. इथलं सातवीचं पुस्तक इथल्या अनुभवी ‘दा-दीं’नी तयार केलंय, संकलित केलंय. परीक्षा नाहीतच त्यामुळे जीवघेणी स्पर्धा नाही. गृहपाठ नाही. ‘दा-दी’ मुलांना काम देतात. मुलं काम करताना ज्या कल्पना पुढं येतात त्यांची नोंद शिक्षक करतात. कोणत्याही प्रकारची तयार शैक्षणिक साधने वापरली जात नाहीत. इथे कुठेही मोठय़ा मोठय़ा वाक्यांचे सुविचार लिहिलेले नाहीत. तक्ते लटकत नाहीत, पताका नाहीत. कारण हे टांगायला भिंतीच नाहीत. इथे झाडांवर पक्षी, त्यांची घरटी, रंगीत फुलं, फळं, प्राणीच मुलांना दिसतात. पालवीची सावली पडावी इतकी मोठी झाडं आहेत. मी पाहिलं ‘संथाल’ या आदिवासी जनजातीची मुलं जशी इथे शिकतात तशी वेगळ्या अपेक्षेने या शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांचीही मुलं शिकतात. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा यातली दरी मुलंच पुसून टाकतात.

हे सगळं असलं तरी समस्या नाहीतच असं नाही. मात्र त्या समस्यांचं भांडवल न करता सोडवायचा प्रयत्न होतो. बोधी रूपादींशी खूपच गप्पा झाल्या. शाळा व्यवस्थापनाचे प्रश्न होते त्याचीही वास्तव उत्तरं त्यांनी दिली. इथे मस्टर नाही. त्यामुळे धावत धावत येऊन सही करणं ही भानगड नाही. सगळे वेळेपूर्वी येऊन काम सुरू करतात. समस्या निर्माण होतात तेव्हा समस्या समजून, सर्व बाजूंनी विचार करून, चर्चेतून त्या सुटतात. पाठ निरीक्षण, नोंदी वेगळ्या कराव्याच लागत नाहीत. कारण एकदा बाहेर सर्वदूर पाहिलं की झाडाखालचं दृश्य उत्तर देतं. मुलं येऊन बोलतात. दा-दीं नी अनेक गोष्टींची अंगभूत जबाबदारी घेतलेली आहे. अभ्यासक्रम संपवणं, पाठय़पुस्तकं पूर्ण करणं हे नाहीच. कारण त्यांना केंद्रभूत मानून ते उरकणं म्हणजेच शिकवणं ही धारणाच नाही. पालक आजच्या काळातले, ‘पाठोभवन’ बऱ्याच प्रमाणात रवींद्रनाथांच्या काळातलं असल्यामुळे बरेच वेळा पालकांना मोकळेपणा दिला की पालकच कल्पना मांडतात आणि दोन काळांना जोडतात. इतरांपेक्षा त्यांची मुलं त्यांना वेगळी जाणवतात. इथे स्वयंप्रेरणा, विचार, कल्पकता यांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे प्रत्येकाची पद्धती वेगळीच असणार हे गृहीत आहे. त्यात रवींद्रनाथ कसे सापडतात हे पाहिलं जातं. मुक्ततेतून समजूतदारपणा येतोच. मुक्ततेचा अर्थ ‘पाठोभवन’ अनुभवल्याशिवाय येत नाही. एकदा ही अनुभूती घेतली की निर्भयता कशी येते हे समजतं.

एका संपूर्ण ग्रंथालयात होते मी! ग्रंथपाल ‘दी-दी’ वाचनाबद्दल मुलांशी बोलत होत्या. ‘बोलू नका, शांतता राखा.’ असल्या सूचना कुठे दिसल्या नाहीत. प्रत्येक मुलगा आठवडय़ाला एक पुस्तक वाचतोच. तर मोठय़ा वयाच्या-वरच्या इयत्तेतल्या मुलांना आठवडय़ाला दोन पुस्तकं दिली जातात. हे ग्रंथालय ३६८०२ पुस्तकांचं आहे. सतरंजी घातलेली होती. मुलं येत-जात होती, पुस्तकं घेत होती, वाचत होती, लिहीत होती, बोलत होती.

मुक्त-विमुक्त, स्वत:च अर्थ शोधणारी शिक्षणप्रणाली इथे आल्यावर वेगळी अनुभूती देते. मन भयमुक्त असेल तर काय घडतं याचा प्रत्यय आला. प्रार्थनेतली शक्ती अनुभवता आली. काही उणिवा, समस्या असतीलही. त्या शोधून मांडणं हा हेतूच नव्हता. सगळं सगळं प्रत्यक्ष पाहिलं. मुलांच्या वह्य़ा, त्या ‘दा-दीं’नी वाचण्याच्या पद्धती, मूल्यमापन नोंदी, मुलांचा शोध घेणं, विविध संधी, तासिका, वेगवेगळी दालनं, कलानुभव, इमारती, प्रचंड मोठे वृक्ष, वर्गप्रणाली, मोकळेपण या सर्वानी ‘पाठोभवन’ समजावून सांगितलं. आजच्या चकचकीत बाजारात एका बाजूला निसर्गात जगणारं ‘पाठोभवन’ वेगळं आहे. आपल्यातच दंग आहे. मला मात्र नवी वाट सापडली हे नक्की!

(समाप्त)

renudandekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:06 am

Web Title: rabindranath tagore patha bhavan mpg 94
Next Stories
1 कामातुराणां न भयं न लज्जा
2 हिमबिबटय़ाचे संरक्षण
3 आयुष्याच्या संध्याकाळी
Just Now!
X