05 August 2020

News Flash

अवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये

संगीत हा माझा श्वास आहे आणि संगीत रंगभूमी हा ध्यास.

(संग्रहित छायाचित्र)

रजनी जोशी

‘सतत नवनवे प्रयोग करायला मला आवडतं. सध्या मी पुढच्या पिढीला नाटय़पदांच्या मूळ चाली कशा होत्या ते कळावं यासाठी ‘नाटय़संगीताच्या शंभर सरगम’ या नव्या पुस्तकावर काम करते आहे.  संगीत हा माझा श्वास आहे आणि संगीत रंगभूमी हा ध्यास. एकुलती एक असूनही आई-वडिलांनी अवास्तव लाड न करता मला जी शिस्त लावली त्यामुळेच आज चौऱ्यांशीव्या वर्षीही मी निरोगी, निरामय जीवन जगते आहे. आता एकच मागणं, शेवटच्या क्षणापर्यंत असंच कार्यमग्न असावं, इतकं की पान कधी गळून पडलं ते देठालाही कळू नये.’

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा २०१५-१६ चा ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ १७ फेब्रुवारी २०१६ ला मला मिळाला. याआधीही संगीत रंगभूमीच्या प्रदीर्घ सेवेसाठी मला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मला वाटतं, की हे पुरस्कार म्हणजे आपण आपल्या आयुष्यात निश्चित केलेलं काम निष्ठेने, एकाग्रचित्ताने व अभ्यासपूर्वक केल्याबद्दल मिळालेली पावती. संगीत हा माझा श्वास आहे आणि संगीत रंगभूमी हा ध्यास. या दोन्ही क्षेत्रात सक्षम होण्यासाठी मला ज्यांच्या मार्गदर्शनाचं आणि आशीर्वादाचं शिंपण लाभलं, ते माझे आईवडील व माझे पाच गुरू वामनराव सडोलीकर, गोविंदराव अग्नि, निवृत्तीबुवा सरनाईक, अभिषेकी बुवा आणि माणिक वर्मा यांची मी आजन्म ऋणी आहे.

एकुलती एक असूनही आई-वडिलांनी अवास्तव लाड न करता मला जी शिस्त लावली त्यामुळेच आज चौऱ्यांशीव्या वर्षीही मी निरोगी, निरामय जीवन जगते आहे. मी लहान असताना आई तिच्या नìसगच्या कामात आणि वडील कॉम्रेड पेंडसे राजकारणात व्यग्र असल्याने त्यांनी मला सातवीपासूनच दर मे महिन्याच्या सुट्टीत वध्र्याला ‘सेवाग्राम’मध्ये ठेवायचा निर्णय घेतला. पुढची ५ वर्षे मी तिथे जात होते. हा माझ्या आयुष्यातील टìनग पॉइंट. ‘सेवाग्राम’मध्ये पहाटे ५ वाजता उठायला लागे. त्यानंतर अंगण झाडून झालं की गार पाण्याने आंघोळ. मग सामुदायिक प्रार्थना. तेव्हापासून लागलेली गार पाण्याच्या आंघोळीची सवय आजही आहे. त्यामुळे नाटकांच्या दौऱ्यांत माझं कधीही अडलं नाही. नळ सोडला, की माझं काम होतं. तसंच झोपायला पलंग हवा अशी अट नाही की जेवायला अमुक-अमुक हवं, अशी फर्माईश नाही. हेदेखील ‘सेवाग्राम’च्या संस्कारांचं फळ.

मला सगळं आलं पाहिजे, हा आई-वडिलांचा आग्रह. संस्कृत श्लोकांचं पाठांतर हा त्यातलाच एक भाग. या पाठांतराच्या सवयीमुळे आजही रात्री झोपेतून उठवून बोलायला सांगितलं तरी मी ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘सौभद्र’.. अशा माझ्या कुठल्याही नाटकातील संवाद घडाघडा म्हणू शकते. वेळ पाळण्याबद्दल मी आजही अत्यंत आग्रही आहे. नाटकाचा पडदा उघडण्याआधी अर्धा तास तयार होऊन मी शांतपणे विंगेत बसलेली असते. ही सवय मला लहानपणीच माझ्या एका ब्रिटिश मत्रिणीमुळे लागली. माझा जन्म अकोल्याचा. तिचे वडील तेव्हा तिथल्या इम्पिरीयल बँकेचे (आताची स्टेट बँक) व्यवस्थापक होते. तिच्या सहवासातून वेळेचं महत्त्व माझ्या मनावर बिंबलं ते कायमचं.

आईकडून वारसा हक्काने गाता गळा मिळाला असल्याने मी संगीत विषय घेऊन एम.ए. केलं. त्यानंतर योग्य जोडीदार मिळून मी मुंबईमध्ये गिरगावात स्थिरावले. माझ्या गाण्याविषयी कळल्यानंतर दोन वर्षांतच ‘मुंबई मराठी साहित्य संघा’कडून संगीत नाटकात काम करण्याविषयी विचारणा झाली. ‘यशवंतराव होळकर’ नाटकात केलेली ‘पेशव्यांच्या राजगायिके’ची भूमिका हे माझं पदार्पणातील काम. तेव्हापासून, म्हणजे १९६३ पासून २०११ पर्यंत मी ‘साहित्य संघा’ची सर्व नाटकं केली. प्रत्येकात नायिकेची भूमिका. नायक म्हणाल, तर राम मराठे, छोटा गंधर्व, रामदास कामत, नारायण बोडस, प्रकाश घांग्रेकर, अरिवद पिळगावकर, विश्वनाथ बागुल असे त्या काळचे सगळे नटश्रेष्ठ. साहित्य संघ व काही इतर संस्थांची नाटकं धरून आजवर माझे पंधरा-सोळा हजार प्रयोग झाले असावेत.

वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत मी नायिकेच्या भूमिका करत होते. त्यानंतर जेव्हा रंगमंचावर आयत्यावेळी गाण्यासाठी आवाज लागेलच अशी खात्री वाटेना तेव्हा मी आपणहून ‘न गाणाऱ्या’ भूमिका स्वीकारल्या, पण नाटक सोडलं नाही. म्हणजे ‘स्वयंवर’ नाटकात आधी मी रुक्मिणी होते, आता तिची आई.. ‘मानापमान’मध्ये भामिनीची आई असं. दोन महिन्यांपूर्वीच चिंचवडला आमच्या ‘स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग झाला. आता माझ्या शिष्या निलाक्षी पेंढारकर, सुवर्णा कागल, श्रेया सौंडुर आदी नायिकेच्या भूमिकेत असतात. त्यांचा आग्रह असतो, की तुम्ही आसपास असलात की आम्हाला धीर येतो. दरवर्षी जानेवारीत चिंचवडला वंदना घांगुर्डे हिच्या ‘नादब्रह्म’ या संस्थेतर्फे केल्या जाणाऱ्या तीन दिवसांच्या महोत्सवात दोन संगीत नाटकं सादर केली जातात. या रंगमंचाशी माझं जवळचं नातं आहे. संगीत नाटकांबरोबर मी ‘भाऊबंदकी’, ‘खडाष्टक’, ‘बेबंदशाही’, ‘रमा-माधव’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार,’ अशा गद्य नाटकांतूनही प्रमुख भूमिका केल्या. मला आव्हानांना भिडायला आवडतं. या वळणासाठीही एक आव्हानच कारणीभूत ठरलं. ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगासाठी राम मराठे, अनंत दामले व मी ट्रेनने नागपूरला चाललो होतो. तेव्हा बोलता-बोलता गाडीतील एका सहप्रवाशाने टोकलं, ‘‘तुम्हा संगीत नाटकातील कलाकारांचं बरंय, पद गायचं आणि टाळ्या घ्यायच्या.अभिनय तोंडी लावण्यापुरता असला की झालं.’’ हे शब्द माझ्या जिव्हारी लागले. तत्क्षणी माझा निर्णय झाला, यापुढे अभिनयासाठीही दाद मिळवायचीच. त्यानंतर मी २८ गद्य नाटकं केली. या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी मला पद्मश्री दाजी भाटवडेकरांचं मार्गदर्शन लाभलं. नाटकांबरोबर मी ‘बिचारा लक्ष्या’, ‘अल्बम’, ‘फ्रिज’, ‘शोधू कुठे किनारा’ अशा दूरचित्रवाणी मालिकाही केल्या. ‘फिल्म डिव्हिजन’तर्फे निघणाऱ्या अनुबोधपटांत कामं केली आणि रसिकांबरोबर समीक्षकांचीही वाहवा मिळवली. वाईटातूनही कधी कधी चांगलं निघतं म्हणतात ते असं.

मुंबई आकाशवाणी हे तर माझं माहेरघर. इथे मी ‘ए’ ग्रेड आर्टस्टि म्हणून १९५९ पासून संगीताचे कार्यक्रम करते आहे. फक्त गाणंच नव्हे तर संगीत रंगभूमी या विषयाच्या अनुषंगाने संहितालेखन व निवेदन हेदेखील माझ्या आवडीचं काम. उदाहरण द्यायचं झालं तर ‘परंतु या सम हा’ या शीर्षकाखाली बालगंधर्वावर मी तेरा वेगवेगळे कार्यक्रम सादर केलेत. १९७२ ला ‘मुंबई दूरदर्शन’ सुरू झाल्यावर संगीताचा पहिला कार्यक्रम करण्याचा मान मिळाला हे माझं भाग्य.

मुख्य भूमिकांतून बाजूला झाल्यावर मला थोडी उसंत मिळाली आणि मी एक वेगळी वाट निवडली. ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगणारी संगीत नाटकं व त्यातील पदं’ या विषयाच्या अभ्यासकांना सर्व माहिती एकाच जागी मिळावी यासाठी मी संकलन व लेखन सुरू केलं. ‘मराठी संगीत रंगभूमीचा आधुनिक अवतार’ या नावाने ते पुस्तकरूपात डिसेंबर २०११मध्ये साहित्य संघाने प्रसिद्ध केलं. सध्या मी पुढच्या पिढीला नाटय़पदांच्या मूळ चाली कशा होत्या ते कळावं यासाठी ‘नाटय़संगीतांच्या शंभर सरगम’ या नव्या पुस्तकावर काम करते आहे.

‘मुंबई साहित्य संघ’ या संस्थेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मला संगीत रंगभूमीची ओळख करून देण्यापासून या क्षेत्रात माझी कारकीर्द घडवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर साहित्य संघाने मला मदतीचा हात दिलाय. आज या संस्थेची मी उपाध्यक्ष आहे. बहुतेक रोजच माझी एक फेरी इथे असतेच.

सतत नवनवे प्रयोग करायला मला आवडतं. संगीत रंगभूमीच्या दीडशे वर्षांच्या वाटचालीवर आधारित ‘सुखद स्मृती’ या कार्यक्रमाचे आजवर ऐंशी प्रयोग झाले आहेत. ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या गाजलेल्या पदांवर आखलेला कार्यक्रम ‘क्षण आला भाग्याचा’, अनंत दामले ऊर्फनूतन पेंढारकर यांना वाहिलेली स्वरआदरांजली ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, माझ्या गुरू माणिकताई वर्मा यांच्या सांगीतिक कारकीर्दीवरील ‘माणिक महिमा’, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.लं. देशपांडे व जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांवर ‘संगीत रंग बरसे’ असे कार्यक्रम मी संहिता लिहून आत्ताआत्तापर्यंत सादर केले आहेत.

‘मंदारमाला’ नाटकाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अलीकडेच मुकुंद मराठे यांच्या ‘नादब्रह्म’ संस्थेने ‘सुवर्णमंदार’ नावाने या नाटकाचा संपूर्ण प्रवास उलगडून दाखविणाऱ्या कार्यक्रमाची निर्मिती केली. २०१५ ते २०१८ या तीन वर्षांत ‘सुवर्णमंदार’चे ५० प्रयोग ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले. मूळ ‘मंदारमाला’ नाटकात भूमिका केलेल्या कलाकारांपैकी हयात व सक्षम अशी मी एकटीच. साहजिकच माझी मुलाखत हे ‘सुवर्णमंदार’चं बलस्थान. आजही या कार्यक्रमाचे प्रयोग कुठे ना कुठे होत असतात.

‘धाडीला राम का वनी?’ या द. गो. गोडसे यांच्या नाटकात माझ्या वाटेला कैकेयीची भूमिका आली होती. नारायण बोडस (राम), आशा खाडिलकर (सीता ), अरिवद पिळगावकर (भरत) असे तगडे गायक कलाकार असूनही त्या वेळी साठीच्या घरातील कैकेयीच्या गाण्यांना वन्स मोअर मिळत असे हे विशेष.

माझी एकुलती एक मुलगी रश्मी लंडनमध्ये स्थायिक असल्याने मी वर्ष-दोन वर्षांंतून महिनाभरासाठी तिच्याकडे जात असते. मी येणार आहे असं कळताच तिथल्या महाराष्ट्र मंडळातील मंडळी माझ्यासाठी एक दिवस राखून ठेवतात. त्यांच्यासाठी मी ‘गंधर्वाच्या पाच नायिका’ हा कार्यक्रम केला. त्यातील भूमिकांना लागणारे कपडे, दागदागिने मी इथून घेऊन गेले. कधी फक्त गाण्यांचा कार्यक्रम होतो. भजनं, ठुमरी याबरोबर तिथल्या गुजराथी रसिकांसाठी मी त्यांच्या भाषेतील लोकप्रिय गाणीही त्या भूमीवर गायली आहेत. श्रोत्यांचे आग्रह मला नवनव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी बळ देतात.

अमेरिका, इंग्लंड, दुबई, बहारीन, सिंगापूर, इस्रायल, कतार अशा अनेक देशांत मी गायनाचे कार्यक्रम केले आहेत. यापैकी अमेरिकेतील वॉशिंग्टन दौऱ्यातील माझ्या आईविषयीची एक ह्रद्य आठवण सांगावीशी वाटते. वडिलांच्या जाण्यानंतर माझी जबाबदारी (लग्न, बाळंतपण, आदी) पार पाडल्यावर ती अमरावतीला

डॉ. दाजीसाहेब पटवर्धन यांच्या कुष्ठरोग्यांच्या आश्रमात सेवेसाठी राहत होती. तिथे कुष्ठरोगी स्त्रियांच्या प्रसूतीपासून नवजात बालकांच्या जोपासनेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या तिने निभावल्या. त्यावेळी एका कुष्ठरोगी दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेला आणि पुढे आईच्या निगराणीखाली वाढलेला एक मुलगा पुढे अभियंता होऊन वॉशिंग्टनला स्थायिक झाला. शिरीष देशपांडे त्याचं नाव. जेव्हा त्याला माझा कार्यक्रम त्याच्या शहरात आहे असं समजलं तेव्हा माझ्याशी संपर्क करून तो मला घरी न्यायला आला. त्यावेळी त्याच्या दिवाणखान्यात लावलेला माझ्या आईचा फोटो बघून मला काय वाटलं ते शब्दात मांडणं अशक्य आहे. अशा ‘सत्त्वशील’ आईवडिलांच्या पुण्याईमुळेच आजही मी कार्यरत आहे. ‘विद्याधर गोखले प्रतिष्ठान’च्या नाटय़संगीत प्रशिक्षण संस्थेत मी आजही शिकवते. दोन वर्षांआधी ठाणे, डोंबिवली, बोरिवली, नाशिक, पुणे अशा सर्व केंद्रांत शिकवत असे. आता फक्त दादर शाखेत जाते. तरीही प्रवेश परीक्षा व अंतिम परीक्षा यासाठी मी यावं हा संयोजक शुभदा दादरकर हिचा आग्रह मला मोडता येत नाही.

देशविदेशात भ्रमंती करण्याची मला प्रचंड आवड, वेडच म्हणा ना! माझ्या दर वर्षी ५ ते ६ सहली ठरलेल्या आहेत. या छंदामुळे आजवर माझं जवळजवळ सगळं जग बघून झालंय.

या लेखानिमित्ताने नाटय़प्रवासाच्या सुखद स्मृती जागवत असताना परमेश्वरापाशी एकच मागणं, की त्याने शेवटच्या क्षणापर्यंत असंच कार्यमग्न ठेवावं. इतकं, की पान कधी गळून पडलं ते देठालाही कळू नये.

शब्दांकन – संपदा वागळे

waglesampada@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 12:27 am

Web Title: rajni joshi chaturang avaghe paunshe vayaman abn 97
Next Stories
1 आरोग्यम् धनसंपदा : दिवाळीत नजर ठेवा वजनकाटय़ाकडे
2 तळ ढवळताना : झाडांचं काय घेऊन बसलात राव..
3 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : रक्षणकर्ती!
Just Now!
X