‘चतुरंग’ पुरवणीतील सगळे लेख मी मनापासून वाचते.  ३१ ऑक्टोबरच्या अंकातील ‘उत्तरायणातले सहजीवन’ आणि  ‘नवे बंध अनुबंध’ हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वरचे दोन्ही लेख आवडले. हे लेख प्रसिद्ध करून नवीन विचारांस चालना दिली आहे याबद्दल ‘लोकसत्ता’चे मनापासून अभिनंदन! रोहिणी पटवर्धन यांनी अनेक अनुभवांवर आधारित सांगोपांग विचार मांडला आहे.  सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला, मानसिकता अन् धमक असेल तर निश्चितच आपण हे नातं निभावू शकतो, असं वाटतं. तसेच मुलं, नातेवाईक, समाज यांच्या दडपणाखाली न येता नातं निभावायचं असेल तर आर्थिक स्थिती चांगली राहील तसेच इतर अनेक बाबींचा विचार करूनच नात्याला सुरुवात करावी हे लेखिके ने प्रत्यक्ष अनुभव सांगून पटवून दिलं आहे. वृत्तपत्रात अनेक बातम्या वाचते. फेसबुक मैत्री अन् फसवणूक, लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, परदेशात मोठय़ा नोकरीत आहे असं भासवून फसवणूक, हे जर तरुण पिढीत घडत असेल तर नंतरच्या नव्या नात्यात ही शक्यता आहेच, म्हणूनच एकदमच ठाम निर्णय न घेता एकमेकांना समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. एकमेकांची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच लेखिके चं ‘जमेल तोच रमेल’ हे पटलं. पण ‘सावध असेल तो तरेल’ हेही खरं आहे. प्रत्येक नात्यात फायदे आहेत तसे तोटेही असतात. सारासार विचारशक्ती व अनुभवांवर निर्णय घेणं गरजेचं आहे असं वाटतं.

– उमा मोकाशी

कमीपणाच्या गंडाच्या मुळावर घाव

‘सायक्रोस्कोप’मधील ‘कमीपणाचा गंड ’ (३१ ऑक्टोबर) वाचून मनातील विचारांना गती मिळाली. आपल्याकडे तुलनेचे बाळकडू लहानपणापासूनच मुलांना पाजलं जातं. तो बघ किती शहाणा आहे, व्यवस्थित आहे, हुशार आहे अशा ताशेऱ्याने पेरलेल्या बीजाचा वटवृक्ष होऊन मोठेपणी त्रासदायक ठरतो. बरोबरच्या भावंडांपासून सुरुवात झालेल्या तुलनेच्या तराजूत हळूहळू सभोवतालच्या साऱ्यांचा समावेश होत होत या तुलनेचा परीघ सर्वव्यापी झाल्याचं लक्षातच येत नाही. या शर्यतीमुळे मनाची निकोप सुदृढता क्वचितच पाहायला मिळते. वैषम्यातून येत राहाणारी स्वत:ला कमी लेखण्याची किंवा इतरांना तुच्छ मानून मोठेपणा मिरवण्याची मनोवृत्ती मूळ धरते. अनाहूतपणे त्याची छाया हळूहळू सर्वत्र प्रतिबिंबित होते. स्वत:च्या कर्तृत्वाकडे सापेक्षतेने पाहाताना श्रुतीसारख्या व्यक्ती आपल्या भोवती अनाहूतपणे कोष विणू लागतात. इतरांच्या नजरेत त्यांना फक्त हिणवणेच दिसते, त्यामुळे ते एकलकोंडे बनतात. तर कुणालसारखे स्वत:बद्दल भ्रामक कल्पना करत कर्तृत्व आहे त्यापेक्षा उंचावण्याच्या प्रयत्नात सभोवतालच्या लोकांच्या उपहासास पात्र ठरतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की वर्गातील साठ मुलांच्यात एक किंवा दोघांचाच समान गुणवत्तेने पहिला नंबर येऊ शकतो. बाकीच्यांचे नंबर त्याखालीच राहाणार हे वास्तव स्वीकारलं तर बरेच प्रश्न सुटू शकतील. यासाठी कळायला लागल्यापासूनच ज्येष्ठांनी उदार दृष्टिकोन बाळगणं गरजेचं ठरतं. ती जबाबदारी पालक, शिक्षक अशा सभोवतालच्या मोठय़ा मंडळींनी पार पडली पाहिजे. आत्मशोध घेण्याची प्रवृत्ती आणि सर्व स्तरावर असंच विचारमंथन सुरू राहिलं तर या व्यक्ती न्यूनगंडाच्या फेऱ्यातून कदाचित सुटू शकतील.

– नितीन गांगल, रसायनी