मंजुला नायर

responsiblenetism@gmail.com

इंटरनेट वापराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. फक्त मुंबई शहरातच इंटरनेटचे १.६४ कोटी वापरकत्रे आहेत. मात्र समाजमाध्यमं, अ‍ॅप्स, ऑनलाइन गेम्स आणि आर्थिक व्यवहार यातून सायबर गुन्ह्य़ांचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. जगात सरासरी १० सेकंदांना एक सायबर गुन्हा घडत असतो. सायबरजगतातल्या गुन्ह्य़ांमध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना सर्वाधिक धोका असतो, असं  अभ्यासांत दिसून आलं आहे. गेल्या २ वर्षांत अल्पवयीन मुलांनी केलेले सायबर गुन्हे आणि ज्यांत मुलं भरडली गेलेली आहेत असे सायबर गुन्हे, या दोन्हींचं प्रमाणही तब्बल तिपटीनं वाढलेलं आहे. आपल्या मुलांना आणि स्वत:लाही या ऑनलाइन जगतात सुरक्षित ठेवण्यासाठी आपली तयारी झालेली आहे का? याचा विचार करणारं ‘मोहमायाजाल’ हे सदर दर पंधरवडय़ाने..

आज आपल्या दैनंदिन आयुष्यातला प्रत्येकच भाग कुठल्या ना कुठल्या रूपानं तंत्रज्ञानाशी जोडला गेलेला आहे. गेल्या दोन दशकांमध्ये तंत्रज्ञानानं आपलं आयुष्य अधिक गतिमान, अधिक सोपं, अधिक आरामदायक आणि अधिकाधिक घटनांनी भरलेलं बनवलेलं आहे. आपण एका स्थित्यंतराच्या कालखंडात जगतो आहोत. सध्या झालेल्या डिजिटल क्रांतीमुळं आपण कशा प्रकारे जीवन जगतो आणि काम करतो याचा पुनर्वचिार करण्याची आणि पुननिर्मिती करण्याचीही वेळ आलेली आहे. तंत्रज्ञानामुळे काळ आणि अंतर यांच्या सीमारेषा पार पुसल्या गेलेल्या आहेत. आपल्या वैयक्तिक पातळीवरच्या छोटय़ा छोटय़ा जगांचं एकत्रीकरण होऊन त्यांचं एका मोठय़ा ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये रूपांतर झालेलं आहे.

एकटय़ा मुंबई शहरातच १.६४ कोटी इंटरनेटचे वापरकत्रे आहेत. नवनवीन प्रकारची माहिती आणि तंत्रज्ञान या गोष्टींचा जणू आता स्फोटच झालेला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. चांगलं जीवनमान जगण्यासाठी आता तंत्रज्ञानावर अवलंबून असणं अटळ आहे. या बदलत्या काळात डिजिटल तंत्रज्ञानाला केवळ आपला सहकारीच नव्हे, तर एक शिक्षक म्हणूनही स्वीकारणं जरुरीचं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. ज्या मुलांचा आणि नवतरुणांचाही जन्म या डिजिटल युगात झालेला आहे, ते या जगात नागरिक म्हणून अगदी सहजी वावरत असतात. मात्र त्यांचे पालक आणि एकुणातच प्रौढ व्यक्ती डिजिटल जगात नव्यानंच प्रवेश करत असल्यामुळं अनेकदा अडखळताना दिसतात. आज आपल्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा ठसा उमटलेला आहे. त्याच्याशी परिचय करून घेण्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या आव्हानाला आपल्याला सामोरं जायचं आहे. या नव्या क्रांतीशी स्वत:ला जुळवून घेणं आता अपरिहार्यच आहे.

तुमचा लिंग, वय, धर्म किंवा आर्थिक स्तर कुठलाही असो, आता प्रत्येक जण इंटरनेट आणि समाजमाध्यमं (सोशल मीडिया) यांचा वापर मोठय़ा प्रमाणावर करत असतो. त्यामुळंच नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी सर्वाना सामावून घेणारा आणि कोणताही फारसा सामाजिक-आर्थिक अडथळा नसणारा हा मंच आपल्याला सहजी उपलब्ध आहे. मात्र एखाद्या गोष्टीची शक्ती जितकी जास्त, ओघानंच तितकी जास्त जबाबदारीही तिच्यावर येत असते. त्यामुळंच – आपण जबाबदार पद्धतीनं इंटरनेट वापरतो आहोत का? आता इंटरनेट वापरू शकणं हा जर नागरिकांचा मूलभूत हक्क बनू पाहत असेल, तर मग त्यावरच्या सुरक्षिततेबाबतचे प्राथमिक नियमही आपण पाळतो आहोत का? या प्रश्नांवर अंतर्मुख होऊन विचार करणे जरुरीचे झालेले आहे.

जगात लागणाऱ्या प्रत्येक नव्या शोधासोबतच त्यामुळं उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबद्दलची प्रश्नचिन्हंदेखील उभी राहातच असतात. आपण जर इंटरनेट वापरताना सुरक्षिततेबाबत काळजी घेतली नाही, तर आपल्यालाही काही कटू अनुभवांना सामोरं जावं लागू शकतं. समाजमाध्यमं, अ‍ॅप्स, ऑनलाइन गेम्स आणि आर्थिक व्यवहार यातून होणारे सायबर गुन्हे आता मोठय़ा प्रमाणावर वाढू लागलेले आहेत. हल्ली जगात सरासरी १० सेकंदांना एक सायबर गुन्हा घडत असतो. आपल्यासारख्या दाट लोकसंख्येच्या देशात तर असे गुन्हे टाळणं अशक्यच! सायबर जगतातल्या गुन्ह्य़ांमध्ये लहान मुलं आणि स्त्रिया यांना सर्वाधिक धोका असतो, असं अनेक अभ्यासांत दिसून आलं आहे. गेल्या

२ वर्षांत अल्पवयीन मुलांनी केलेले सायबर गुन्हे आणि ज्यांत मुलं भरडली गेलेली आहेत असे सायबर गुन्हे, या दोन्हींचंही प्रमाणही तब्बल तिपटीनं वाढलेलं आहे. ज्या लोकांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नसते किंवा जे लोक सुरक्षेकडं दुर्लक्ष करतात अशा लोकांना सायबर जगतातले गुन्हेगार सहजी आपलं सावज बनवतात. मात्र असे गुन्हे कायद्याच्या दृष्टीनं गंभीर, दखलपात्र स्वरूपाचे असतात आणि त्यामुळंच त्यांच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. ऑनलाइन जगतातील या गुन्हांचा मनावर विपरीत परिणाम होतो व अनेकदा अशा अप्रिय घटनांचे ओरखडेही कायमस्वरूपी राहतात.

बहुतेक वेळा लहान मुलं अशा गुन्ह्य़ांना सहजी बळी पडू शकतात. हॅकिंग, मॉìफग, ऑनलाइन जुगार यांसारखे अनेक प्रकारचे सायबर गुन्हे अल्पवयीन मुलांकडून जाणता किंवा अजाणता घडत असतात. याखेरीज अन्य चिंताजनक बाबी म्हणजे इंटरनेटचं व्यसन, गेम्सचं व्यसन, इंटरनेटवर दुसऱ्यांवर दादागिरी (bullying) करणं, समाजमाध्यमांतल्या प्रतिक्रियांमुळं येणारा मानसिक ताण, नराश्य, आत्महत्या, सेल्फी काढण्याचं वेड, इंटरनेटवरील सौंदर्यविषयक साइट्सचा मुलांद्वारे वापर केला जाणं आणि अश्लील साइट्स पाहण्याचं व्यसन लागणं यांसारखे मानसिक आजार लहान आणि किशोरावस्थेतील मुलामुलींमध्ये दिसून येतात. आजच्या आधुनिक काळात इंटरनेटच्या वापरामुळे घरात निर्माण होणाऱ्या तणावाला प्रत्येक पालकाला आणि प्रौढ व्यक्तीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळंच बेजबाबदारपणे केलेल्या ऑनलाइन वर्तनाचे होणारे मानसिक परिणाम समजावून घेणं कधी नव्हे इतकं जरुरीचं झालेलं आहे. त्यासोबतच कोणत्या सायबरगुन्ह्य़ांचे गंभीर कायदेशीर परिणाम भोगावे लागतात, याची माहितीही सायबरजगताचा वापर करताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी असणं जरुरीचं आहे.

बहुसंख्य पालकांना आपलं मूल स्मार्टफोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं सहजी वापरू शकतं याचं खूप कौतुक वाटत असतं. घरी पाहुणे आले की हमखास त्याच्या या कौशल्याचं प्रदर्शन घडवलं जातंच. अगदी रांगणाऱ्या बाळानंसुद्धा अशा स्मार्ट उपकरणाच्या वापराबाबतची कौशल्यं दाखवली, की त्याच्या पालकांचा ऊर आनंदानं अगदी भरून येतो. अनेकदा अशा स्क्रीन असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर बाळाचं मन रमवण्यासाठी केला जातो. मुलांमध्ये जितक्या मोठय़ा प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता आहे, त्यामानानं ती प्रौढ व्यक्तींमध्ये अगदी कमी तर आहेच, शिवाय त्यांना अशा वापरातल्या धोक्यांबाबतची जागरूकताही नाही. आज मुलं किंवा पालक या दोहोंपैकी कुणालाच तंत्रज्ञानातल्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबींमधलं फारसं कळत नाही, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं आहे.

या धोक्यांबाबतचे प्रश्न पालकांच्या मनात उभे तरी राहतात का, याबद्दलच मुळात शंका घ्यायला बराच वाव आहे. माझं मूल इंटरनेटवर नेमकं काय करत असतं, हे मला ठाऊक आहे का? ते सुरक्षित आहे का? ते किती वेळ स्क्रीनकडं पाहातं यावर मी कसं नियंत्रण ठेवेन? माझ्या मुलाला इंटरनेटवर कुणी त्रास देतं आहे का? पालकांना कुणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले की ते ताबडतोब चिंताग्रस्त होतात. त्यांच्या या भीतीमुळं एकतर लगेचच ते नव्या तंत्रज्ञानावर बंदी घालतात किंवा मुलांकडून अशी स्मार्ट उपकरणं काढून घेतात. मुलांना एखादी गोष्ट नाकारणं, तिच्यावर बंदी घालणं किंवा वापरावर अतिरिक्त प्रमाणात नियंत्रण आणणं यानं खरंतर काहीच साध्य होत नसतं. उलट यामुळं केवळ पालकांच्या नकळत स्मार्ट वस्तू वापरण्याचे पर्याय शोधण्याकडं मुलांचा कल वाढतो. डिजिटल जगतातलं पालकत्व हे आज जगातल्या सर्वात मोठय़ा आव्हानांपैकी एक आव्हान म्हणावं लागेल. खुद्द पालक आणि प्रौढ व्यक्तीच या तंत्रज्ञानाच्या मोहजालात चांगलेच अडकलेल्या आहेत. आपल्या स्वत:च्याच इंटरनेटवरच्या वर्तनाबाबतचं भान त्यांना आता राहिलेलं नाही. ‘लहान मुलांनी इंटरनेट कमी प्रमाणात वापरलं पाहिजे,’ वगैरे प्रवचन देण्याचा नैतिक अधिकार मुळात खुद्द पालकच आता गमावून बसलेले आहेत.

त्यामुळंच आजच्या पालकाची महत्त्वाची जबाबदारी आता वेगळी आहे. ती म्हणजे, इंटरनेटचा वापर सुरक्षितपणे कसा करता येईल, हे आपल्या मुलाला प्रेमानं शिकवणं. आज प्रत्येकच पालक आपलं ऑनलाइन आयुष्य आणि ऑफलाइन आयुष्य यात समतोल साधण्यासाठी झगडत असताना, मुलांनादेखील या प्रक्रियेत मार्गदर्शन करणं जरुरीचं आहे. कुठलंच तंत्रज्ञान वाईट नसतं, त्याचा वापर कसा करावा हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असतं. इंटरनेटच्या जगात कोणत्याही सीमारेषा नाहीत. त्यामुळं इथला मुख्य नियम म्हणजे प्रत्येकानं इंटरनेट वापरण्याची आचारसंहिता म्हणजे इंटरनेट एटिकेट्सचं पालन केलं पाहिजे. अशा आचरणामुळेच आपण या जगतातले जबाबदार ‘नेटिझन’ बनू शकू. इंटरनेट वापरासाठी आपण खरोखरच सज्ज आहोत का? आपण स्वत: पुढाकार घेऊन या डिजिटल जगतात आपल्या मुलांचे रक्षणकत्रे बनू शकतो का? आपल्या मुलांना आणि स्वत:लाही या ऑनलाइन जगतात सुरक्षित ठेवण्यासाठी आपली तयारी झालेली आहे का?

सुदैवानं या प्रश्नाचं उत्तर आहे –

होय.. अजूनही आशेला वाव आहे.

इंटरनेटचा जबाबदार पद्धतीनं वापर करणारे नागरिक म्हणजेच ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ हा उपक्रम आमच्या ‘आहान फाऊंडेशन’ या ना-नफा संस्थेद्वारे चालवला जातो. २०१२ पासून मुलांचं इंटरनेट जगतात संरक्षण व्हावं, याकरता ही संस्था महाराष्ट्रात कार्य करते आहे. ‘ऑनलाइन जगतातली सुरक्षितता बाळगणं हा आपण सायबरविश्वात स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग आहे.’ यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळं या सायबर क्रांतीचा आपल्या उपयोगासाठी वापर करून घेताना ‘तंत्रज्ञानाचं मानवीकरण’ करणंही जरुरीचं झालेलं आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आपण सारे मिळून सायबरजगतामध्ये गुण्यागोविंदानं नांदता येईल यासाठी झटू शकतो.

आमचं याबाबतचं आजही मत विचाराल, तर इंटरनेटवर सुरक्षित राहाणं हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि त्याबरोबरच ती प्रत्येक प्रौढ व्यक्तीची जबाबदारी आहे.

संपर्क : ८४३३७०१०७७

संकेतस्थळ : http://www.responsiblenetism.org

 

मंजुला नायर सध्या मुंबईच्या ‘भारतीय स्त्री शक्ती’, संस्थेच्या सचिव आहेत. गेली १५ वर्षे त्यांना कुटुंब समुपदेशनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. बालिकांचे शोषण ते घरगुती हिंसाचार यांसारखे अनेक गंभीर प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत. मंजुला या ‘आहान फाऊंडेशन’ आणि ‘रिस्पॉन्सिबल नेटिझन’ या प्रकल्पांच्या २०१२ पासून विश्वस्त आहेत. त्या स्वत: तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतात. इंटरनेटचा वापर त्या नवनवीन गोष्टी शिकणं आणि आपले विचार मांडणं यासाठी करत असतात. ‘महाराष्ट्र महिला आयोगा’च्या स्त्रियांसाठीच्या डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमासाठीच्या त्या अधिकृत प्रशिक्षकही आहेत.

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी