01 June 2020

News Flash

महामोहजाल : जबाबदार पालकत्व

मुलं अति इंटरनेट वापरतात, अशा तक्रारी घेऊन पालक आमच्याकडे येतात, परंतु अनेकदा त्याला खूप उशीर झालेला असतो.

सध्याच्या काळात प्रत्येकाला झटपट सुख हवं आहे. मोठी माणसं आणि मुलं दोघांकडेही संयम राहिलेला नाही.

मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com

मुलं अति इंटरनेट वापरतात, अशा तक्रारी घेऊन पालक आमच्याकडे येतात, परंतु अनेकदा त्याला खूप उशीर झालेला असतो. पालकांना अशी मदत घ्यायला नकोसं वाटतं, कारण पालक म्हणून आपण कमी पडलो, अशी स्वत:ची प्रतिमा त्यांना नको असते. मात्र व्यसनाची लक्षणं लवकर समजून घेऊन त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करणं, हे भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. हेच चांगलं, जबाबदार पालकत्व!  ‘इंटरनेटचं व्यसन’ या लेखाचा हा उर्वरित भाग.

या लेखाच्या पूर्वाधात (२ मे) आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन्स आणि तंत्रज्ञान यांच्यात अडकलेल्यांच्या व्यसनांचे अनेक प्रकार पाहिले. सध्याच्या काळात प्रत्येकाला झटपट सुख हवं आहे. मोठी माणसं आणि मुलं दोघांकडेही संयम राहिलेला नाही. थोडंदेखील मनाविरुद्ध झालं, की आपण चटकन बेचन होतो. एकंदरीतच निराशा सहन करण्याची क्षमता खूपच कमी झालेली आहे. आज आपल्याला प्रत्येक गोष्ट विद्युतवेगानं हवी आहे. झटपट यश, झटपट पसा, झटपट लोकप्रियता, झटपट प्रसिद्धी, झटपट कौतुक आणि त्याबरोबरच असते ती इतरांनी आपल्याला झटपट स्वीकारावं अशी इच्छा. सुदैवानं अनेक जणांना हव्या असणाऱ्या अशा गोष्टी झटपट पुरवू शकणारी ‘इंटरनेट’ ही जादूई जागा आहे. ही मंडळी दिवसाचा मोजका काळ कसबसं काम करतात आणि उरलेला सगळा वेळ समाजमाध्यमांवर ‘लाइक्स’ गोळा करण्याच्या पाठीमागे लागलेली दिसतात.

कोणत्याही गोष्टीवर  इतकं अवलंबून असणं, ही एक चिंतेची बाब आहे. अमली पदार्थ, मद्य, तंबाखू आणि धूम्रपान ही सारी व्यसनं आपल्याला चांगल्यापकी ठाऊक आहेत, कारण ती आता समाजात रूढ होऊन बराच काळ उलटून गेला आहे. मात्र इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन गेिमग या गोष्टी ही ‘व्यसनं’ आहेत, ही संकल्पनाच आपल्यापकी बऱ्याच जणांच्या अजूनही पचनी पडत नाही. आपल्यापकी बहुसंख्य लोक अशा ‘स्मार्ट’ उपकरणांवर कुठल्या ना कुठल्या रूपात अवलंबून असले, तरी ती मोठय़ा प्रमाणावर घातक आहेत हे मात्र आपलं मन कधीच मानत नाही.

लहान मुलं असोत, की मोठी माणसं, आपल्या मनातल्या दु:खदायक गोष्टी किंवा नकोशा परिस्थितीवर उतारा म्हणून त्यांना इंटरनेटचं माध्यम अगदी सोईचं वाटतं. (कधी कधी मुळात ही तापदायक परिस्थिती निर्माण होण्याचं कारणही इंटरनेटच असतं म्हणा!) त्यातच ही मंडळी सायबरजगतात वावरण्यात कमालीची हुशार असल्यामुळे आपण स्वत:ला नीट सांभाळू शकतो, असा फाजील आत्मविश्वासही त्यांच्यात असतो. अशी मुलं मग कुटुंबात एकेकटी पडत जातात. तीच का, आपण सारेच खऱ्या जगतापासून आता बऱ्यापकी तुटलो आहोत. खासकरून ज्या घरात चांगलं वातावरण नसतं तिथली मुलं, किंवा ज्या मुलांकडे मुळातच समाजात मिसळण्याचं फारसं कौशल्य नसतं, त्यांना इंटरनेटवर अयोग्य गोष्टी करण्याची किंवा इंटरनेटच्या अतिवापराची सवय लागते.

मुलांना इंटरनेटचं व्यसन नेमकं लागतं कसं? त्यामागं अनेक कारणं असू शकतात.

आपल्या मित्रमत्रिणींचा दबाव आणि त्यांचा प्रभाव हे मुलांना इंटरनेटचं व्यसन लागण्याचं सर्वात अधिक प्रमाणात आढळून येणारं कारण आहे. एखाद्या गटाचा आपण भाग असावं आणि त्या गटानं स्वीकारावं ही बहुसंख्यांची इच्छा असते.

त्यांच्याकडे तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं कौशल्य असलं, तरी  ऑनलाइन जगतात करत असणाऱ्या गोष्टींचे परिणाम काय होतील, हे जाणण्याची परिपक्वता मात्र त्यांच्यात नसते.

इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी गुप्तपणे करता येत असल्यामुळे त्यांना आपण अधिक शक्तिमान असल्यासारखं वाटतं. त्यामुळे ती धाडसानं नवनवी साहसं करू लागतात.

इंटरनेटवरच्या धोकादायक गोष्टींबद्दल आणि त्याच्या मनावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल त्यांना जाणीव नसते. भविष्यात आपल्याला कायदेशीर बाबींना सामोरं जावं लागेल, याची तर त्यांना अजिबात कल्पना नसते.

आयुष्यातला कंटाळा,‘ऑफलाइन’ जगतातला अन्य ठिकाणच्या संवादाचा अभाव, इंटरनेटचा वेग, उत्सुकता आणि मनोरंजनाची गरज या साऱ्या गोष्टी वापरात भर टाकतात.

इंटरनेटवर साहस करण्याची आणि सतत ‘कनेक्टेड’ राहण्याची मानसिक गरज निर्माण होते.

आपल्या मित्रांमध्ये इंटरनेटवर केलेल्या साहसाबद्दल बढाया मारणं आणि त्यांच्यात ‘कूल’ समजलं जाणं त्यांना महत्त्वाचं वाटतं.

घरामध्ये असणारा संवादाचा अभाव किंवा संपूर्णपणे विसंवाद असणं, एकटेपणा, नराश्य, अतिउत्साह, बेचनी, अंतर्मुखता आणि आत्मविश्वासाचा अभाव या गोष्टींमुळेही मुलं इंटरनेटकडे खेचली जातात.

इंटरनेटचा वापर केल्यामुळे तेवढा काळ भीती, चिंता, अपराधाची भावना किंवा अशा नकारात्मक मानसिक भावनांपासून मुक्तता मिळते.

अर्थातच, इंटरनेटचं व्यसन लागण्यामागे वर दिलेल्या कारणांपेक्षा अन्य काही सुप्त कारणंदेखील असू शकतात.

इंटरनेटचं व्यसन लागण्याची लक्षणं किंवा धोक्याची चिन्हं कशा प्रकारे ओळखता येतील?

इंटरनेटवर किती वेळ जातो आहे, याचं भान नसणं.

नियमित वेळापत्रक न पाळता येणं, वेळेच्या नियोजनाचा अभाव.

झोप व खाणंपिणं यांचं वेळापत्रक कोलमडणं.

शैक्षणिक कामगिरी घसरणं.

समाजात मिळूनमिसळून राहण्यापेक्षा एकटं राहायला आवडणं, घरातल्या लोकांशी संवाद न साधणं.

सतत ‘मूड’ बदलणं किंवा स्मार्ट उपकरण काढून घेतल्यावर आक्रस्ताळेपणा करणं वा िहसकपणे वागणं.

शाळा-महाविद्यालयात गरहजर राहणं.

इंटरनेटच्या सवयीवर नियंत्रण आणण्यात किंवा त्या कमी करण्यात अपयशी ठरणं.

स्मार्ट उपकरणापासून दूर राहू न शकणं.

घरात प्रौढ व्यक्ती असताना मुलांनी ही उपकरणं चोरून वापरणं, ती शौचालयातही घेऊन जाणं.

उपकरण वापरत असताना अत्यंत आनंदात असणं आणि ते नसताना चिडचिडं होणं किंवा भीती वाटणं.

सतत ऑनलाइन जगतातले अनुभव आणि त्याविषयीच्या आकर्षणांबद्दल बोलत राहणं.

अपराधी वाटणं, भीती वाटणं, उपकरणाच्या वापराबद्दल खोटं बोलणं.

पालकांना फसवणं आणि उपकरण काढून घेतल्यास स्वत:ला इजा करून घेण्याची धमकी देणं.

काही टोकाच्या प्रकरणांमध्ये तर अंग दुखणं, डोकं दुखणं, मान दुखणं, मनगटं किंवा बोटं दुखणं, दृष्टी अंधूक होणं, डोळे दुखणं किंवा डोळे कोरडे पडणं अशी लक्षणंही दिसून येतात.

लक्षात ठेवा, आपलं शरीर आपल्याला नेहमीच धोक्याचा इशारा देत असतं, पण त्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली प्रवृत्ती असते.

एखाद्या उपकरणाचं व्यसन लागण्याची लक्षणं वर दिली आहेत. मात्र ही सारी लक्षणं काही एका रात्रीत दिसू लागत नाहीत. व्यसनाच्या सुरुवातीपासूनच मुलांमध्ये अशा उपकरणांवर अवलंबून असण्याची लक्षणं दिसायला लागतात. पालकांनी त्याची वेळीच नोंद घेऊन त्यावर त्वरित कृतीयोजना करणं चांगलं.

मुलांनी अति इंटरनेट वापरण्याच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे पालक येतात, परंतु अनेकदा त्याला खूप उशीर झालेला असतो. पालकांना अशी मदत घ्यायला नकोसं वाटतं, कारण ते पालक म्हणून आपल्या मुलाचं संगोपन करण्यास अपयशी ठरले आहेत, अशी आपली आजूबाजूच्या लोकांसमोर प्रतिमा निर्माण होईल, असं त्यांना वाटतं. मात्र व्यसनाची लक्षणं लवकर समजून घेणं आणि अशा मुलांवर लवकरात लवकर उपचार करणं, यावर आमचा ठाम विश्वास आहे. भविष्यातलं नुकसान टाळण्यासाठी लक्षण लवकरात लवकर ओळखणं आणि लवकर मदत घेणं केव्हाही चांगलं, होय ना? आपल्या मुलाची सुरक्षितता आणि आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टींची जबाबदारी पालक म्हणून आपल्यावरच असते. तिच्यामध्ये चालढकल करून कसं चालेल?

वरील परिस्थितींमध्ये मदत घेण्यासाठी तुम्हाला काय करता येऊ शकतं –

व्यसनाची चिन्हं ओळखणं.

मुलांच्या इंटरनेट वापराबद्दल त्यांच्याशी सकारात्मक पद्धतीनं संवाद साधणं.

त्यांच्यापुढे स्वत:चा आदर्श ठेवणं.

घरातल्या सगळ्यांसाठीच इंटरनेट वापराचे नियम ठरवणं.

घरातल्या प्रत्येकानं किती वेळ इंटरनेट वापरावं याचे नियम ठरवण्यामध्ये मुलांनाही सहभागी करून घेणं.

अन्य तज्ज्ञांची मदत घेणं.

मदत घेण्यात संकोच वाटून न घेणं.

अखेर आपल्या मुलासाठी जे सर्वोत्कृष्ट करायचं आहे, त्यासाठी शाळेतले समुपदेशक किंवा नातेवाईक किंवा कौटुंबिक मित्रही समुपदेशन करून मदत आणि मार्गदर्शन करू शकतील.

काही गंभीर प्रकरणांमध्ये मनोरोगतज्ज्ञांचीही मदत लागेल.

अशी मदत घेण्याआधी रोगाचं निदान आणि चाचण्या करूनच उपाययोजना करणं जरुरीचं असतं.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उपचार व औषधं किंवा समुपदेशनाची प्रक्रिया आपल्या मर्जीनुसार मध्येच कधीही थांबवू नये. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते किंवा व्यसन पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं.

कुठलंही व्यसन एका रात्रीत बरं होऊ शकत नाही. त्यासाठी संयम, सातत्य, आशावाद, विश्वास आणि चिकाटीची गरज असते.

मुलांना मनात वाटणारी भीती, चिंता आणि त्यांचं वर्तन यांवर मार्ग काढण्यासाठी सर्वात चांगलं साधन म्हणजे ‘चांगलं पालकत्त्व’.  या गोष्टीवर आमचा दृढ विश्वास आहे. मूल मोठं झाल्यावर मग आदर्श पालकत्वाला सुरुवात करून उपयोग नसतो, तर अगदी लहान वयातच मुलाला चांगल्या सवयी आणि शिस्त लावणं आवश्यक असतं. अर्थातच हे साध्य करण्यासाठी कुटुंबामध्ये निरोगी संवादाची आवश्यकता असते. त्यातूनही परिस्थिती हाताबाहेर गेलीच, तर तुम्हाला मदत करायला आम्ही सदैव तत्पर आहोत.

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:07 am

Web Title: responsible parenthood mahamohajal dd70
Next Stories
1 चित्रकर्ती : संजादेवीचा चित्रमय जागर
2 सायक्रोस्कोप : वर्तमानकाळातलं जगणं
3 पडसाद : ‘मी टाइम’बरोबर थोडय़ा तडजोडीची तयारी हवी
Just Now!
X