मानसी होळेहोन्नूर

कार्यालयीन पार्टीत मुद्दाम जास्त खाद्यपदार्थ मागवून नंतर घरी घेऊन जाणारे किती तरी महाभाग असतात. ‘ऑफिसच्या बिलांमध्ये घरच्या खर्चाची एखाद् दोन बिले घुसवली तर काय मोठा फरक पडणार आहे?’ असे म्हणणारेही  बरेच असतात. असेच काहीसे सारा नेत्यानाहू अर्थात इस्रायलच्या पंतप्रधानांच्या पत्नीला देखील वाटले असावे. त्यामुळे त्यांनी घरी स्वयंपाकी असतानाही बाहेरून जेवण मागवले आणि त्याचे बिल इस्रायलच्या सरकारी बिलांमध्ये लावून टाकले. घरी जेऊन खोटी हॉटेलची बिले सादर केली. त्यांचा पती,  बेंजामिन नेत्यानाहू हा इस्रायलचा पंतप्रधान म्हणजे देशाची जबाबदारी पूर्ण त्यांच्यावर, त्यामुळे थोडे फार लोकांचे पैसे घेतले तर त्यात काय चूक? असे मानत सारा नेत्यानाहू वागल्या. पण नुकताच तिथल्या न्यायालयाने हा सरकारी पैशांचा गैरवापर आहे असे सांगून  पंतप्रधानांच्या या पत्नीलाच आर्थिक दंड सुनावला. सरकारी पैशांतूनच नेमलेला स्वयंपाकी घरी असताना सारा यांनी अनेक वेळा घरगुती पाटर्य़ासाठी बाहेरून खाणे मागवले आणि स्वयंपाकी गैरहजर आहे, असे सांगून ती बिले सरकारी पैशांनी भरली. ही प्रकरणे बाहेर आली तेव्हा त्यांनी यावर सोयीस्कर मौन धारण केले, जेव्हा सखोल चौकशी झाली आणि पुरावे मिळाले तेव्हा त्यांनी त्याचे खापर हिशोब ठेवणाऱ्या लोकांवर फोडले. जवळपास एक लाख अमेरिकन डॉलरचा (६९ लाख ४ हजार रुपये ) हा घोटाळा होता, पण प्रकरण दाखल होई होईतो ५० हजार डॉलरवर येऊन पोहोचला आणि शिक्षा सुनावता सुनावताना जेमतेम १५,३०० डॉलरचा आर्थिक दंड सारा नेत्यानाहू यांना सुनावला गेला. अर्थात त्याआधी त्यांनी न्यायालयात आपली चूक मान्य केली होतीच. सप्टेंबरमध्ये इस्रायलमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच वेळी नेत्यानाहू यांच्यावरदेखील लाच घेतल्याचे, पदाचा गैरवापर केल्याचे आरोप झालेले आहेत. ते पंतप्रधान असतानाही आणि वेळोवेळी ‘माझी पत्नी निरपराधी आहे,’ असे ठासून सांगूनही त्यांच्या पत्नीला न्यायालयाने दोषी ठरवले हा तसा त्यांनाही एक धक्काच असणार. यानिमित्ताने एक गोष्ट समोर आली की इस्रायलमधली न्यायव्यवस्था इतकी निष्पक्ष आहे, की सत्तेत असणाऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा सुनावली गेली. सरकारी मालमत्तेचा उपयोग सत्तेत असतानाच नव्हे तर सत्ता सोडतानादेखील करणारे आपल्याकडे भरपूर आहेत, न करणारा एखादा विरळाच. पण इस्रायलमध्ये होऊ शकते तर आपल्याकडे का नाही या हेतूने जर कोणी जनहित याचिका केली तर कोणा कोणाची नावे पुढे येतील हे बघावे लागेल.

नावाच्या पलीकडे

‘मेरीजुअना पेप्सी’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर मादक पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक येते, पण अशा नावाची एखादी व्यक्ती असू शकेल असे चुकूनही वाटत नाही. अमेरिकेत शिकागोमध्ये अशी व्यक्ती आहे आणि तिने नुकतीच ‘नेम्स इन व्हाइट क्लासरूम्स : टीचर बिहेवियर्स अ‍ॅण्ड स्टुडन्ट परसेप्शन्स’ असा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली आहे. त्यासाठी कारणीभूत ठरलं ते तिचं बालपण. लहानपणापासून सगळीकडे तिच्या नावाची थट्टाच केली गेली. एकदा तर शिक्षिकेने तिचे नाव बदलून मेरी ठेवले आणि त्याच नावाने तयार केलेलं प्रमाणपत्र ती घरी घेऊन आली. त्याबद्दल आईने विचारताच आपल्याला या नावाने चिडवत असल्याचे तिने सांगितले. त्यावेळी आईने तिला सांगितले, ‘‘तुझे नाव मेरीजुअना आहे, मेरी नाही. हेच नाव तुझी ओळख आहे, लोक हसतात म्हणून वेगळे नाव घेण्याची गरज नाही. हेच नाव तुला पुढे घेऊन जाईल.’’ त्या दिवसापासून ती लोकांना तिचे नाव ठासून सांगायला लागली.

तिच्या आईप्रमाणेच अमेरिकेत अनेकदा कृष्णवर्णीय किंवा रेड इंडियन समाजातल्या मुला-मुलींची नावे वेगळी असतात, अगदी सर्वसामान्य, मेरी, जेन, क्रिस, बॉब यापेक्षा वेगळी. त्यामुळे अनेकदा नाव ऐकूनच हा मुलगा किंवा मुलगी गोरी नसणार असा अंदाज लावला जातो. स्वत: शिक्षिकेची नोकरी केलेल्या मेरीजुअनानेही हा अनुभव घेतला. तिच्या सहशिक्षिका वर्गात जायच्या आधीच मुलांची नावे बघून त्यातल्या अशा वेगळ्या नावांची टिंगल करायच्या. त्या मुलांबरोबरच्या वागण्यात देखील हा टिंगलीचा सूर कायम असायचा. अनेक जण तो विद्यार्थी कसा आहे हे जाणून घ्यायच्या ऐवजी केवळ त्याच्या नावामुळे त्याला वेगळी वागणूक द्यायच्या. पण या सगळ्याचा त्या विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होतो हे त्यांच्या खिजगणतीतही नसायचे. त्यामुळे जेव्हा पीएच.डी.ची संधी मिळाली तेव्हा तिने हाच विषय निवडला. जेव्हा एखादा शिक्षक/ शिक्षिका नावामुळे मुलांना वेगळी वागणूक देतात तेव्हा तो त्या शिक्षकांचा पराभव असतो. कोणालाही त्यांच्या नावामुळे वेगळी वागणूक देण्याऐवजी त्या नावामागचा अर्थ, त्याचं कारण समजून घेतले पाहिजे. जसे मेरीजुअनाच्या आईने केले आणि तिनेही स्वत:च्या आईचा हा विश्वास सार्थ ठरवत स्वत:चे नाव जगभर पोहोचले.

(स्रोत – इंटरनेटवरील जागतिक वृत्तविषयक विविध संकेतस्थळे.)

manasi.holehonnur@gmail.com

chaturang@expressindia.com