09 March 2021

News Flash

साडीला ‘डिझायनर’ स्पर्श

सत्या पॉल यांनी साडीला ग्लॅमर देत थेट रॅम्पवॉकवर कॅटवॉक करायला लावलं आणि फॅशन विश्वात खळबळ माजली...

भारतीयांची खास ओळख असणारी साडी फॅशन विश्वाला आव्हान देत थेट आंतरराष्ट्रीय झाली.

पूजा सामंत – samant.pooja@gmail.com

साडी ही आपल्यासाठी इतकी अतिपरिचयाची की तिच्या अंतरंगातली कलात्मकता लक्षातही आली नसेल कुणाच्या, पण सत्या पॉल नामक अवलियाला मात्र या साडीचा दिमाखदार तोरा मोहवून गेला आणि तयार झाली सहावार साडय़ांची अनोखी दुनिया! मोहमयी!  कधी कपडय़ाच्या पोताचं वैविध्य तर कधी आकारांचं.. उभे आडवे, गोल, चित्रविचित्र.. रंग तर कधी नितळ तर कधी थेट डोळ्यांत घुसणारे. सत्या पॉल यांनी साडीला ग्लॅमर देत थेट रॅम्पवॉकवर कॅटवॉक करायला लावलं आणि फॅशन विश्वात खळबळ माजली.. मग भारतीयांची खास ओळख असणारी साडी फॅशन विश्वाला आव्हान देत थेट आंतरराष्ट्रीय झाली.. आणि फॅशन डिझायनर सत्या पॉल एक ब्रँड नेम झालं. त्या सत्या पॉल नामक किमयागाराविषयी..

अगदी गेल्याच वर्षी- म्हणजे २०२० मध्ये ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अंधेरीच्या ‘टी सीरिज’ कार्यालयात कलाकारांचा ताफा उपस्थित होता. सध्या विविध चित्रपटांतील उत्कृष्ट भूमिकांमुळे पुन्हा चर्चेत आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता अतिशय तलम आणि नाजूक प्रिंट असलेल्या श्वेत साडीत सामोऱ्या आल्या. साध्या पण लक्ष वेधून घेणाऱ्या ‘डिझायनर’ साडीत नीना गुप्ता आकर्षक दिसत होत्या. पहिलाच प्रश्न त्यांना विचारत म्हटलं, ‘‘आपकी यह साडी बेहद प्यारी हैं! लगता हैं इस साडी को मसाबाने डिज़ाइन किया है.. ’’(नीना गुप्ता यांची लेक आईप्रमाणे अभिनयात न येता अल्पावधीतच नामांकित फॅशन डिझायनर म्हणून नावारूपाला आलीय) यावर नीना गुप्ता पटकन म्हणाल्या, ‘‘नहीं तो!  यह साडी और बॅग दोनों सत्या पॉल के हैं, मसाबा के मेंटॉर है न वो!’’

आज हा प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे ज्येष्ठ फॅ शन डिझायनर सत्या पॉल यांचं नुकतंच वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं. त्यानिमित्तानं त्यांच्या कामाविषयी  फॅ शन क्षेत्रातल्या काहींना बोलतं के लं. एक मात्र खरं, की जागतिक फॅ शन विश्वात सत्या पॉल हे पहिले भारतीय फॅशन डिझायनर ठरले, ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात- विशेषत: युरोप, अमेरिका आदी पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय साडय़ांना दर्जेदार ओळख मिळवून दिली. भारतीय साडीत जगातली कुठलीही स्त्री ‘सेन्शुअस’, ‘ग्लॅमरस’, आधुनिक आणि पारंपरिकही दिसू शकते. स्त्रीसौंदर्याची व्याख्या तिनं नेसलेल्या साडीत देखील होते, हे जगाला प्रथमच सत्या पॉल नामक साडय़ांच्या किमयागारानं दाखवून दिलं.

फॅ शन विश्वातील अनुभवी डिझायनर्स आणि समीक्षकांपासून नव्या पिढीच्या डिझायनर्सपर्यंत सत्या पॉल हे नाव कु णाला माहीत नाही असं शक्यच नाही. परंतु त्यापलीकडेही त्यांचं फॅशन विश्वातलं योगदान प्रचंड आहे. भारतीय साडीला जगभरात वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या पॉल यांच्या प्रभावाविषयी फॅशन जगतातील काही प्रसिद्ध व्यक्तींचे हे अनुभव..

ट्रेन्डी, कॉकटेल साडय़ा – शायना एन. सी. (फॅशन डिझायनर)

माझ्या फॅशन डिझायनिंग कारकीर्दीला २५ र्वष झाली. अनेक खास आणि डिझायनर साडय़ा मी फॅशनमध्ये आणल्या. यातही ५४ प्रकारे साडय़ा नेसण्याबद्दल माझं नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये झळकलं. मी स्वत: ड्रेसेसपेक्षा साडय़ांना अधिक प्राधान्य देते, हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच, की साडय़ांची डिझायनर अशीच माझी ओळख आहे. पण सत्या पॉल यांची बातच निराळी! सत्या अनेकदा जॉर्जेटचं कापड साडय़ांसाठी वापरत असत. ते वापरायला सुटसुटीत असलं तरी त्याचा नियमित वापर नव्हता. सत्या यांनी जॉर्जेटवर ‘मोटिफ्स’ (नक्षी) वापरून या साडय़ांना डिझायनर लुक दिला आणि भारतीय साडय़ा जगभर नेल्या हे त्यांचं वेगळेपण. जेव्हा फॅशन क्षेत्रातील अन्य डिझायनर्स तुमची नक्कल करू लागतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची छाप, तुमचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलं असतं. सत्या यांनी डिझाईन

के लेल्या सहावारी साडय़ांमध्ये भारतातील आणि अगदी परदेशी मॉडेल्सनादेखील रॅम्पवर ‘कॅटवॉक’ करताना पाहिलं आणि फॅशन विश्व चकित झालं. आणि हो, सत्या पॉलनंतर अन्य डिझायनर्सनी साडय़ांना त्यांच्या कलेक्शनमध्ये वाव द्यायला सुरुवात केली. सत्या यांच्या साडय़ांच्या डिझाईनची कॉपी सुरू झाली होती. अर्थात सत्याच्या कलेक्शनची सर त्यांना कधी आली नाही. ‘ट्रेंडी’, ‘कॉकटेल’ साडय़ा हे सत्याचं मोठं वैशिष्टय़ होतं.

भारतीय साडय़ांची नजाकत रॅम्पवर – रोहित बाल (फॅशन डिझायनर)

मी मूळचा श्रीनगरचा राहाणारा. फॅशन डिझायनिंगचं प्रशिक्षण मी दिल्लीच्या ‘निफ्ट’ (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझायनिंग) येथून पूर्ण केलं. दिल्लीत ‘फ्लॅगशिप स्टोअर’ सुरू केलं तो साधारणत: १९९० चा काळ होता. पण त्याही वेळेस ज्येष्ठ फॅशन डिझायनर सत्या पॉल यांच्या नावाला असलेलं वजन आणि त्यांच्या ‘कलेक्शन’बद्दल अनावर उत्सुकता माझ्यासारख्या नव्या फॅशन डिझायनरला वाटणं अगदी स्वाभाविक होतं. माझे समकालीन डिझायनर साधारणत: ‘कुतोर’च्या (म्हणजे फॅशन डिझायनिंगमध्ये महागडे, ‘हाय एण्ड लक्झरी’ पोशाख) मागे लागत. ‘कुतोर’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लॅमर आणि मागणी होती. मीदेखील काळाच्या मागणीला अनुसरून ‘कुतोर’मध्ये कलेक्शन सादर करत गेलो आणि म्हणूनच जेव्हा फॅशनच्या क्षितिजावर सत्या पॉल यांचं नाव तळपत होतं तेव्हा मी चकित झालो. कारण फक्त साडय़ा ही त्यांच्या कलेक्शनची खासियत होती. भारतीय साडय़ांची नजाकत रॅम्पवर आणि फक्त भारतातच नव्हे, तर युरोपियन देशांतही त्याच दिमाखदार तोऱ्यात सत्या पॉल या अवलियानं ठळकपणे दाखवली. आंतरराष्ट्रीय फॅशन विश्वात तोपर्यंत भारतीय साडय़ांना स्थानच नव्हतं. सत्या पॉल यांनी साडय़ांना आंतरराष्ट्रीय स्थान आणि मान मिळवून दिला. त्यांच्याबरोबर कधी काम करण्याची संधी मला मिळाली नाही ही खंत माझ्या मनात कायम राहील.

‘व्हायब्रण्ट ’ अवलिया – मसाबा गुप्ता (फॅशन डिझायनर)

मी ‘टीनएजर’ असताना माझ्या आईचं (अभिनेत्री नीना गुप्ता) अभिनयाचं क्षेत्र मला नेहमीच भुरळ घालत असे. आठवी-नववीत असेपर्यंत मी तिच्यामागे लकडा लावत असे, की मलाही तुझ्या क्षेत्रात यायचंय. कधी वडिलांचा (क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्डस) फोन आला की मी त्यांना म्हणे, की मलाही अभिनयाच्या क्षेत्रातच जायचं आहे. ते म्हणत, जे करशील ते विचार करूनच कर. पुढे मम्मीनं मला अप्रत्यक्ष सुचवलं, अभिनेत्रींसाठी लागणारं गोंडस रूप माझ्याकडे नाही. मी करिअरसाठी क्रीडा क्षेत्राचा किंवा अन्य पर्यायावर विचार करावा. दहावी झाल्यानंतर एका फॅशन शोमध्ये सत्या पॉल यांची भेट झाली. त्यांच्या साडय़ा मम्मी वापरत असे. मला त्यांच्या डिझाईनिंग कौशल्याची भुरळ पडली आणि ‘एस.एन.डी.टी.’मध्ये फॅशन डिझायनिंगसाठी प्रवेश घेतला. अनेक डिझायनर वर्षांकाठी उत्तीर्ण होतात, पण सगळे ‘सत्या पॉल’ होत नाहीत. सत्या पॉल माझ्यासाठी गुरू,मेंटॉर  ठरले आणि म्हणूनच फॅशन विश्वातील माझी वाटचाल सुकर झाली. त्यांच्या सहवासात, त्याच्याकडे क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करत असताना माझ्यात एक उत्तम कलात्मक डिझायनर आहे हे जगाला समजलं.

सत्या सरांनी त्यांचं पहिलं डिझायनर दालन मुंबईत १९८० मध्ये ‘ला अफेयर’ सुरू केलं आणि त्याचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता. साडी ही फक्त पारंपरिक प्रसंगांसाठीच असू शकत नाही. दैनंदिन वापरातल्या, ‘प्रोफेशनल’ कामांसाठीच्या ‘फॉर्मल’ साडय़ा आज काळाची गरज आहे, हे मी त्यांच्याकडून शिकले. साडय़ांवर ‘फनी प्रिंट्स’ डिझाईन केल्यानं साडय़ांचा लुक बदलतो, साडय़ांचे रंग (कलर पॅलेट) फॅन्सी, व्हायब्रण्ट असू शकतात, ठरावीक चौकट मोडून साडय़ा सहज नेसता येतील, ही कला मला त्यांच्याकडे अवगत झाली. साडय़ांमध्ये पोल्का डॉट्स , झेब्रा प्रिंट्स हे युथफुल लूक देतात, हे जगाला नव्यानं दाखवणारे सत्या सर होते.

त्यांच्या कारकीर्दीच्या पुढच्या टप्प्यात त्यांनी ‘अ‍ॅक्सेसरीज’ डिझाईन केल्या आणि त्यावरही आपली नाममुद्रा उमटवली. त्यांचा स्वभाव हळुवार, सौम्य, प्रेमळ होता. आपल्या सहकाऱ्यांना न दुखावता समजावून सांगण्याची त्यांची हातोटी मी कशी विसरेन? सामान्य माणूस जेव्हा ‘सेलिब्रिटी’ होतो तेव्हा त्याच्याशी संपर्क साधणं अशक्य होतं बऱ्याचदा. पण सत्या सर असं दुर्मीळ व्यक्तिमत्त्व होतं, की त्यांनी स्वत:भोवती अदृश्य भिंती कधी उभारल्या नाहीत. म्हणूनच आमच्यासारख्या शिष्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभत राहिलं.

आज साडी म्हटलं की आठवतं ते त्यांनी त्याला दिलेलं ग्लॅमरस रूपडं. जगात जिथं जिथं ही साडी दिसेल तेव्हा तेव्हा मला सत्या सरांचं फॅशन जगताला दिलेलं योगदान आठवेल एवढं नक्की.

साडीचा दिमाखदार तोरा जगभरात – मेहेर कॅ स्टेलिनो (माजी मिस इंडिया, फॅशन समीक्षक)

सत्याची आणि माझी पहिली भेट १९९१ मध्ये झाली. त्याचा फॅशन शो ‘इंटर प्लाझा’- के म्पस् कॉर्नरला होणार होता. ‘फॅशन क्रिटिक’ म्हणून माझं काम करणं तोपर्यंत सुरू झालंच होतं.  या शोबद्दल एकूणच सेलिब्रिटीं मध्ये, फॅशन आणि ‘पेज थ्री’ वर्तुळात अमाप उत्सुकता होती. त्याला कारणही तसंच होतं. फॅशन विश्वाचं एक अतूट समीकरण ‘ग्लॅमर’शी असतं आणि ग्लॅमर म्हणजे उत्तान वाटतील असे ‘असिमेट्रिकल’ (असमान आकारांतले), कलात्मक पोशाख असंच काहीसं चित्र होतं. पण आपल्या देशातील भारतीय स्त्रीची प्रतिमा अधोरेखित करणारा तिचा पारंपरिक पेहराव म्हणजे साडी- तो ‘रॅम्प’वर कसा दिसेल, शरीर झाकणाऱ्या अंगभर साडीत मॉडेल्स कशा दिसतील, याची उत्सुकता शो जाहीर झाल्यापासूनच सर्वाना होती. अनेक ‘पेज थ्री सेलिब्रिटीं’चे प्रश्नांकित चेहरे सत्याच्या या फॅशन शोमध्ये उपस्थित होते. सत्यानं आपल्याच भारतीय फॅब्रिक्सच्या झोकदार साडय़ांमध्ये मॉडेल्सना कॅटवॉक करायला लावून फॅशन विश्वात खळबळ उडवून दिली. ‘सारीज् आर टाइमलेस’ हे सत्य सत्यानं साऱ्यांना पटवून दिलं. साध्या साडय़ांनाही सत्याचा ‘डिझायनर’ स्पर्श मिळाला. लग्न समारंभांत किंवा सण-उत्सवांत पटोला, बनारसी, कांजीवरम् आदी भरजरी साडय़ा आवर्जून नेसल्या जातात, पण त्याव्यतिरिक्त नेसल्या जाणाऱ्या साडय़ांनाही ‘कॅज्युअल लुक’असू शकतो, त्या दैनंदिन वापरात नेसल्या तरीही कायम लक्षात राहण्याजोगी छाप पाडू शकतात, हे सत्यानं फॅशन जगाला आपल्या किमयागारीनं दाखवून दिलं. त्यानंतर ‘आय अ‍ॅम इन सत्या पॉल’ (म्हणजे, मी सत्या पॉलची साडी नेसलेय!) हे सांगणं किंवा त्या साडीत ‘शो ऑफ’ करणं हा फॅशन संस्कृतीचा एक भाग बनून गेला. एखाद्या स्त्रीनं सत्याची डिझायनर साडी नेसणं हे ‘स्टेटस सिम्बॉल’ कधी बनलं हे गेल्या ३०-३५ वर्षांत समजलंही नाही.

सत्यानं साडय़ांच्या डिझाइनमध्ये वेगळ्या प्रकारचे ब्लॉक प्रिंट्स, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रिंट्स आणि फ्लोरल प्रिंट्स पहिल्यांदा आणले. पारंपरिक साडय़ांमध्येदेखील सत्याचा कलात्मक स्पर्श जाणवत असे. साडय़ा रॅम्पवर आणताना त्यानं साडय़ांची मूळची ओळखही कायम ठेवली- म्हणजे मॉडेल्सनी साडय़ा नेहमीप्रमाणे सहावारी पद्धतीनंच नेसल्या होत्या. उगाचच वेगळ्या पद्धतीनं नेसणं नव्हतं. क्रेप, सिल्क आणि जॉर्जेट हे त्याचे आवडते कापडाचे प्रकार होते. करिअरच्या फार पुढच्या टप्प्यात सत्यानं पुरुषांसाठीचं ‘कलेक्शन’आणलं. त्यातही त्याची सर्जनशीलता कमालीची होती. त्यानं ‘लाँच’ केलेले टाय आणि स्कार्फ हे हातानं बनवलेले होते, त्यांची रंगसंगतीही अतिशय आकर्षक होती. स्कार्फस्ची ‘रेंज’ त्यानं स्त्रियांसाठीदेखील आणली.

१९८५ मध्ये सत्यानं त्याचा ‘सत्या पॉल’ हा ‘ब्रँड’ सुरू केला, पण त्याआधीही त्यानं साडय़ांवर काम सुरू केलं होतं. २००१ पर्यंत सत्या पॉल हा वलयांकित ब्रँड झाला होता. १९९१-९२ मध्ये सत्याची मुलाखत घेण्यासाठी मी त्याला फॅशन शोनंतर संपर्क केला. फॅशन जगतात अनेक र्वष सातत्यानं फॅशन पत्रकार, फॅशन समीक्षक आणि परीक्षक म्हणून काम केल्यानंतर अनेक डिझायनर्स, मॉडेल्स, स्टायलिस्ट यांचं जगणं, वागणं जवळून अनुभवता येतं. अध्र्या हळकुं डानं पिवळे होणारेदेखील पाहिले आणि शिखरावर पोहोचून अतिशय निगर्वी आणि विनम्र असणारेही पाहिले. अर्थात सत्या पॉल हा दुसऱ्या श्रेणीत होता. त्यानं मुलाखतीसाठी कधीही आढेवेढे घेतले नाहीत. त्याच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा होता. माझ्यात जर कारागिरीचे गुण असतील, तर ते आपल्या भारतीय मातीनं, इथल्या कलेनं मला लाभलेत, असं तो सांगायचा. भारतीय स्त्रिया आणि साडय़ा यांच्या घट्ट नात्याविषयी त्याचं म्हणणं होतं, की जागतिक फॅशन विश्वात  पारंपरिक सौंदर्याच्या रूढ व्याख्येत आपल्या भारतीय स्त्रीचं स्थान नेमकं  कु ठं आहे माहीत नाही, पण तिला सौंदर्याचं कोंदण भारतीय साडी निश्चित बहाल करते आणि म्हणूनच साडय़ा डिझाईन करणं मला भावतं. परदेशी पद्धतीचे ड्रेस जगभर वापरले जातात आणि तितकेच ते डिझाईन होत राहातात, पण साडय़ा हे भारताचं वैशिष्टय़ आहे, ते जगभर पोहोचलं पाहिजे. साडय़ांची योग्यता, थोरवी तितकी आहेच, असं त्याचं ठाम मत होतं. साडय़ा हे प्रत्येक वयोगटातील, कोणत्याही अंगकाठीच्या स्त्रीला शोभणारं वस्त्र आहे. साध्या साडय़ांनाही सत्याने असाधारण ‘लुक’ दिले आणि मग त्याच्या साडय़ा कुठल्याही स्त्रीवर खुलून दिसू लागल्या. सत्या पॉल म्हणजे ‘खूबसूरत’ साडय़ा हे समीकरण कायम झालं, सत्या पॉल हा आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला. आपल्या देशातच त्याच्या ब्रँडची १०० पेक्षा अधिक दालनं झाली आणि जगभरही त्यानं साडय़ांची बुटिक्स सुरू केली. सत्याच्या कामाचा व्याप अलीकडे त्यांचा मुलगा पुनीत सांभाळत आहे. मात्र साडीचा दिमाखदार तोरा जगभरात नेण्याचं काम सत्याचं. साडय़ांचा प्रसार आणि प्रचार सत्या पॉल या फॅशन डिझायनरनंच केला असं मी म्हणेन. म्हणूनच त्याचं फॅशनमधील योगदान अनन्यसाधारण आहे. ज्या काळात जगाला साडी हा भारतीय पोशाख आहे हे ठाऊकही नव्हतं, त्या काळात सत्यानं साडी जगभर नेली हे धाडसच होतं!

साधा, मैत्रीपूर्ण आणि हसतखेळत बोलणाऱ्या सत्यानं २०१४ पर्यंत काम केलं आणि पुढे तो अध्यात्माकडे वळला. कोइंबतूरमधील एका योग आश्रमात सत्यानं शांतपणे अखेरचा श्वास घेतला.. त्याच्या स्वभावाला अनुसरून!

छायाचित्रे सत्या पॉल यांच्या संकेतस्थळावरून साभार सर्व मुलाखती : पूजा सामंत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 1:11 am

Web Title: saree designer touch satya paul dd70
Next Stories
1 घरकामाचे मोल
2 ज्येष्ठांचे लिव्ह इन : समंजस परिपक्वता
3 व्यर्थ चिंता नको रे : मेंदूची भावनिक घडण
Just Now!
X