रंगनाथ पठारे

rangnathpathare@gmail.com

आजच्या भांडवलशाही रचनेत स्त्री आणि पुरुष; दोघेही स्वतंत्रपणे चरितार्थासाठी अर्थार्जन करू लागले आहेत. म्हणजे नाते आता बदलत आहे; बदलले आहे. म्हणून आता पुरुषाने नेता या पारंपरिक भावनेकडे वेगळ्या नजरेने पाहणे क्रमप्राप्त आहे. आता नेता स्त्रीसुद्धा असू शकते. म्हणजेच जेंडर किंवा लिंगविचार यापुढे बिनमहत्त्वाचा असणार आहे, असे मला दिसते. ते प्रगत प्रजातीसाठी वेधक आहे. मानवी प्रजातीचा प्रवास द्विध्रुवीय अस्तित्वाकडून एकध्रुवीय अस्तित्वाकडे चालू आहे, हे पुरुषांनी समजावून घेतले पाहिजे. तसे करण्यातूनच त्यांचे भांबावलेपण मिटणे आणि धास्तावलेपण कमी होणे, यांचा रस्ता मला दिसतो..

पुरुषाकडे कसे बघायचे? स्त्रीच्या तुलनेत समजा नको; पण स्त्रीच्या संदर्भात आणि बाकी पुरुषांच्या संदर्भात त्याच्याकडे कसे बघायचे? तो कसा असतो? मला असे दिसते की, स्त्रीच्या संदर्भात तो आतल्या आत कायम धास्तावलेला असतो. तसे तो सहसा कबूल करत नाही किंवा खरे तर तो तसे कधीही कबूल करत नाही. पण तसे ते असते हेही खरे आहे. हे असे का असते? कशामुळे असते? ते फक्त ‘फीअर ऑफ परफॉर्मन्स’ असते का? की आणखी काही? की अधिक काही?..  ते अधिक काही तरी असते.

‘तो’ सहसा अधिक उंच, तगडा आणि ताकदवान दिसतो. मनुष्यासकट बाकी बऱ्याच प्रजातींत हे असेच दिसते. मग हे धास्तावलेपण का, आणि खरेच का ते असते? ते असते असे माझे म्हणणे आहे. त्याची सगळी हिंस्रता, आक्रमकता; ही त्याच्या धास्तावलेपणाचीच द्योतक असतात. त्याला आपण कायम असुरक्षित आहोत असे वाटत असते. सुरक्षेसाठी त्याला भूमी हवी असते; तिच्यावर अधिकार हवा असतो. भूमी हे प्रतीकात्मक आहे.  क्षेत्र म्हणू या. त्याला एक क्षेत्र हवे असते. तिथे त्याला आपली सत्ता हवी असते; पण भूमी किंवा क्षेत्र हे तर नैसर्गिकरीत्या कायमच स्त्रीचे असते. ती जन्म देणारी, पृथ्वीच्या अधिक निकटची. त्याला तिच्या सकट त्या क्षेत्राचे स्वामित्व हवे असते. ते समजा मिळाले, असे त्याला वाटले तरी ते टिकवण्यासाठी त्याला कायम दक्ष राहायला लागते. आपली ही सत्ता कधीही जाऊ शकते या विचारांनी तो कायमच कावलेला असतो. हे क्षेत्र घर, कुटुंब, कामाचे ठिकाण, गाव, देश असे काहीही असू शकते. मग सुरक्षेसाठी घरंदाजपण, शालीनता, नम्रता, रीतभात, जन्मभूमीविषयीचे प्रेम, वांशिक शुचिता आणि श्रेष्ठत्व, राष्ट्रीयता अशा अनेक मूल्यांचा उद्घोष होतो. सुरक्षेसाठी घराभोवती कुंपण, गावाभोवती तटबंदी, देशाच्या रक्षणासाठी सन्य आणि शस्त्रास्त्रे अशा गोष्टी येतात; पण असुरक्षित असल्याची भावना पुरुषाला किंवा पुरुषांना कधीही सोडून जात नाही. पुरुषांच्या संदर्भातही पुरुष कायम सुरक्षेचाच विचार करतो. दुनियेत वावरताना आपल्याला सुरक्षा हवी म्हणून तो प्रत्येक पातळीवर अधिक सक्षम पुरुषाचा किंवा पुरुषांचा आसरा शोधत असतो. धर्म, वंश, जात यांच्यासकट गावातला नेता, कामाच्या ठिकाणाचा वरिष्ठ, सरकारी अधिकारी, राजकीय नेता; अशा जरूर पडेल त्या कोणाशीही संधान बांधून आपले असणे सुरक्षित करण्याची ओढ त्याला असते.

आता, अशा प्रकारची धास्ती स्त्रीच्या ठायी नसते काय? तर ती असतेच. कारण तीही मानवी प्रजातीचा भागच असते ना! पृथ्वीच्या पर्यावरणात श्वासोच्छ्वास करतानाचे भय तिला कसे चुकणार? खेरीज पुरुषी वर्चस्वाच्या या दुनियेत तिच्या राहणे, जगणे, वावरणे यांच्यावर खूप मर्यादा येतात. त्यासाठी आपल्या किंवा आपला मानलेल्या पुरुषाच्या असण्याची ढाल तिला वापरावी लागते आणि ती तशी चतुराईने वापरतेसुद्धा. त्यासाठी तिला तिच्या पुरुषाच्या अहंभावाचा वन्ही सतत पेटता ठेवावा लागतो. मी तुझी आहे. इतर सगळ्या वस्तू जशा तुझ्या तशीच मीही तुझी. त्या सगळ्यात अनमोल. त्यामुळे मला जपणे आणि सुरक्षित ठेवणे ही तुझी जबाबदारीच आहे, असे ती त्याला कधी कधी शब्दांनी आणि सहसा नि:शब्दपणे बजावत असते. आपण तुझी वस्तू आहोत, असे जरी ती त्याला म्हणत असली तरी अंतर्यामी ती स्वत:ला तसे मानत नाही. पुरुष ही आपल्या उपयोगाची एक वस्तू मात्र; अशीच तिची अंगभूत धारणा असते, जी ती प्रकट करत नाही. कारण तिच्या ठायी असलेले अभिजात चातुर्य. आपल्या अस्तित्वासाठी, त्याच्या सुखदायी करण्याच्या भावनेतून असे चातुर्य तिच्या ठायी अनेक पिढय़ांच्या ‘जेनेटिक’ संचितातून आलेले असते.

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मातृसत्ताक व्यवस्था या नैसर्गिक असतात आणि अनेक उत्परिवर्तन, बदल (म्युटेशन्स) होऊन कधी कधी नैसर्गिक व्यवस्था भ्रष्टही होऊन जातात. उदाहरणार्थ, मुळात मातृसत्ताक असलेली मानवी व्यवस्था काळाच्या दीर्घ प्रवासात पुरुषसत्ताक होऊन गेली. ती आज आपल्याला नैसर्गिक वाटते आणि आता तर तिलाही तडे जातील, अशी चिन्हे विकसित भांडवलशाहीत दिसू लागली आहेत. स्त्री-पुरुष जोडीच्या जागी आता एक व्यक्ती- पुरुष असो अथवा स्त्री- एकक मानून विचार करावा लागण्याची चिन्हे आहेत. ते बरे किंवा वाईट यापेक्षा तो जगण्याच्या शैलीचा एक अनुषंग मानावा लागेल आणि तशाच प्रकारे त्याच्याकडे बघावे लागेल. अर्थात जगभरात शेती करणाऱ्या लोकांत- अगदी प्रगत देशांसह- असे काहीही झालेले दिसत नाहीय, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे स्त्री-पुरुष नात्यांच्या संदर्भात एकाच वेळी द्विध्रुवीय आणि एकध्रुवीय (बायपोलर आणि युनिपोलर) अशा अस्तित्वाचा आजचा काळ आहे. असे बघा, वयात आलेल्या नर बछडय़ांना वाघीण आपल्या कळपातून हाकलते. त्यासाठी प्रसंगी ती त्यांच्यावर धावून जाते. तसे ती मादी असलेल्या आपल्या पिल्लांबाबत करत नाही. ती असे का करते? वयात आलेल्या वाघांनी बाहेर पडावे. त्यांनी आपापली क्षेत्रे शोधावीत आणि आपला वंश पेरावा असे तिला वाटत असते. शेतीची परंपरा असलेले आपले लोक आणि गरीब देशातील सारे लोक याच्या उलट करतात. ते मुलांना सांभाळतात. मुलींची लग्ने लावून त्यांना आपल्या कळपातून हाकलतात. आपली शेती किंवा तत्सम व्यवसाय चालविण्यासाठी मुले त्यांना आवश्यक वाटतात. पूर्वी जगण्यासाठी शिकार करावी लागत असे, आता शेती. शिकारीच्या गोष्टी आपण आता शेतीत आणलेल्या आहेत. नांगर तर पुरुषालाच धरावा लागतो ना, अशी धारणा शेतकऱ्यांमध्ये असते. चरितार्थासाठी पुरुष महत्त्वाचा, अशी धारणा असते.

तथाकथित प्रगत देशातील नागर समाज याच्यापेक्षा वेगळे वागतात. ते मुलगा असो वा मुलगी; तो किंवा ती सज्ञान झाली की त्यांनी बाहेर पडावे आणि स्वत:च्या हिमतीवर जगावे, अशी तिथे अपेक्षा असते. मुलगा आणि मुलगी असा फरक ते करत नाहीत. कारण त्या व्यवस्थेत दोन्हीही स्वतंत्रपणे आपले जगणे उभारण्यासाठी; चरितार्थ करण्यासाठी सारखेच सक्षम असतात, असे मानण्याची प्रथा आहे. हे आता आपल्याकडेसुद्धा आले आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष आपापला चरितार्थ करण्यासाठी सारखेच सक्षम असतात अशी धारणा आपल्याकडे- विशेषत: नागर समाजात- रुजू लागली आहे. याचे परिणामही दिसू लागले आहेत.

एकीकडे ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील होत आहे. तर शहरी विभागात मुलामुलींची लग्ने टिकणे मुश्कील होत चालले आहे. दोन्ही ठिकाणी आज पुरुष भांबावून गेल्याचे चित्र आपल्याला दिसते. होऊ घातलेल्या आणि होत असलेल्या बदलांशी जुळवून घेणे पुरुषांना सगळीकडे कठीण होत चालल्याची चिन्हे आहेत. ग्रामव्यवस्थेत जगणाऱ्या, शेतीशी संबंधित असलेल्या तरुणाला स्त्री जोडीदार मिळणे मुश्कील होत चालले आहे. त्याला जोडीने द्विध्रुवीय जगण्याची चाह आहे. ती चाह पुरी होणे कठीण होत चालले आहे आणि शहरी व्यवस्थेत स्वत:च्या पायावर स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या तरुणींशी तिथल्या तरुणांना जुळवून घेणे कठीण होत चालले आहे. एकासाठी ती दुर्मीळ होत चालली आहे आणि दुसऱ्यासाठी ती स्वतंत्र, आणि बरोबरीची, मागणी करणारी म्हणून अवघड वाटत चाललेली आहे. म्हणूनच पुरुषांचे भांबावलेपण दोन्हीकडे आहे. करियर करणाऱ्या आणि मोठय़ा अधिकारावर असलेल्या स्त्रिया उशिरा लग्न करताना दिसतात. त्यांना अनुरूप जोडीदार मिळणे अगदी चीन, जपान, कोरियासारख्या आपल्या आशियाई देशांत मुश्कील होत आहे. ते काही अंशी, मर्यादित प्रमाणात का होईना आपल्याकडेही दिसू लागले आहे. युरोप-अमेरिकादी प्रगत देशांत लैंगिक संबंधात जी मुक्तता असते, ती आशियाई देशांत अजूनही नाही. खेरीज कामात इतका वेळ आणि ताकद खर्ची होते, की सेक्स वगैरे गोष्टी तरुण आणि तरुणींना वैतागसुद्धा वाटू लागल्या आहेत. स्त्री- पुरुष अशी जोडी असण्याची, ती करण्याची, ठेवण्याची चाह क्षीण होत जाताना दिसते आहे. यातून नजीकच्या भविष्यात अनेक वेगवेगळे सामाजिक प्रश्न नक्कीच उपस्थित होतील. त्यांची उत्तरे आपल्याला शोधत राहावी लागतील.

ज्या प्रकारचा सामाजिक बदल आज होताना दिसतो, त्यामुळे पुरुष अधिक भांबावून गेला आहे. ग्रामपातळी आणि शहरे यात चित्र आणि त्यामागची कारणे वेगवेगळी दिसत असली तरी पारंपरिक पुरुषी व्यवस्था आणि तिच्याशी संबंधित असलेली पूर्वापार मानसिकता यांना तडे जाताना आजचा पुरुष गोंधळून गेल्याचे आपल्याला दिसते. पुरुषांनी शारीरिक, भावनिक आणि मानसिक अंगांनी स्त्रीला आपल्या बरोबरीची मानून तसा विचार करणे, हाच यातून पुढे जाण्याचा मार्ग मला दिसतो. हे असे सहजी होणार नाही, हे सरळच आहे. दीर्घकाळ चालत आलेली व्यवस्था आणि मानसिकता सहजी मोडता येणार नाही. पुरुष पुरुषांच्या बाबतीतसुद्धा आधार शोधत असतो. प्राण्यांच्या टोळीत जो म्होरक्या किंवा हुप्प्या असतो; त्याच्या आधारे जगणे इतर नरांना सुलभ जाते; पण तिथे मुख्य हुप्प्याची सत्ता असते. तो कळपातील साऱ्या माद्यांचा स्वामी असतो. त्याला आपली सत्ता टिकविण्यासाठी सतत जागे राहावे लागते. त्याला आव्हान मिळून तो पराभूत झाला की की नव्या हुप्प्याची सत्ता प्रस्थापित होते. माणसांच्या बाबत असे झाले नाही.

प्रागैतिहासिक काळी जगण्यासाठी माणसे जेव्हा मदानात उतरली, तेव्हा त्यांना जाणवले की त्यांच्यापेक्षा अधिक ताकद असलेले शिकारी प्राणी मदानात आहेत. म्हणून त्यांनी टोळीने राहणे आणि टोळीने शिकार करणे सोयीचे मानले. टोळीतल्या प्रत्येकाला त्याची त्याची भूमिका होती. म्हणून नेता होता, पण प्रत्येकाची सोय असण्यासाठी त्याला त्याची त्याची मादी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. त्यातून स्त्री-पुरुषांची जोडी आली. त्यांच्यात सख्य राहावे म्हणून लैंगिक बदलसुद्धा झाले. आजच्या भांडवलशाही रचनेत स्त्री आणि पुरुष; दोघेही शिकार करू लागले आहेत. म्हणजे दोघेही स्वतंत्रपणे चरितार्थासाठी अर्थार्जन करू लागले आहेत. म्हणजे नाते आता बदलत आहे; बदलले आहे. म्हणून आता पुरुषाने नेता किंवा हुप्प्या या पारंपरिक भावनेकडे जरा वेगळ्या नजरेने पाहणे क्रमप्राप्त झाले आहे. आता हुप्प्या स्त्रीसुद्धा असू शकते. नेता स्त्री किंवा पुरुष; असे कोणीही असू शकते. या दृष्टीने पुरुषी मानसिकतेत बदल होणे गरजेचे झाले आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेच्या जागी स्त्रीप्रधान व्यवस्था आली पाहिजे किंवा येऊ घातली आहे, असे मला म्हणायचे नाहीय; पण तिथे आता जेंडर किंवा लिंगविचार बिनमहत्त्वाचा होऊ घातला आहे, असे मला दिसते. मानवी प्रजातीसाठी हे घातक किंवा वेगळे आहे असे मला वाटत नाही. ते या प्रगत प्रजातीसाठी वेधक आहे, असे मी मानतो. त्यासाठी पुरुषांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे होऊन बसले आहे, इतकेच मला म्हणायचे आहे.

मानवी प्रजातीचा प्रवास द्विध्रुवीय (बायपोलर) अस्तित्वाकडून एकध्रुवीय (युनिपोलर) अस्तित्वाकडे चालू आहे, हे पुरुषांनी समजावून घेतले पाहिजे. तसे करण्यातूनच त्यांचे भांबावलेपण मिटणे आणि धास्तावलेपण कमी होणे, यांचा रस्ता मला दिसतो. आपल्यावर अवलंबून नसलेल्या स्वतंत्र, सक्षम स्त्रीचे असणे पुरुषाला मान्य करावे लागेल. त्यात त्याचे आणि एकूण मानवी प्रजातीचे हितच आहे असे मी मानतो.

आज जो पुरुष आपण समाजात पाहतो आहोत. तो सातत्याने स्त्रीच्या तुलनेत पाहिला गेला. दोषारोप केले गेले तेही त्याच तुलनेत. स्वतंत्र पुरुषजात या दृष्टीने पुरुषांचा फारसा विचार केला गेलेला दिसत नाही. का आहे पुरुष असा? तो असा का घडला असावा? कोण कोण कारणीभूत आहे त्यासाठी? समाज, संस्कार, शारीरिक फरक, भावनिक-मानसिक रचना, की आणखी काही? पुरुषाची स्वत:ची अशी बाजू, विचार आहे का? हे तपासून पाहणारं – पुरुष हृदय ‘बाई’ – हे खणखणीत सदर. पुरुषांनीच लिहिलेलं, त्यांना समजलेला पुरुष त्यांच्याच शब्दांत मांडणारं , दर शनिवारी.