‘‘लिहिल्याशिवाय मी जगू शकत नाही, हे खरं आहे. पण आजवर बरंच भलंबुरं लिहून झाल्यावर, मी आपण काय लिहिलंय, हे तपासतो तेव्हा लक्षात येतं की, आपण त्या त्या काळात आपल्या मनाच्या इच्छा लिहिलेल्या आहेत, आणि त्या इच्छा त्या त्या काळात अपुऱ्याच राहिलेल्या आहेत किंवा अपुऱ्या राहणार असं वाटलेलं आहे. थोडक्यात, लिहिणं म्हणजे अपुऱ्या इच्छांचा गजबजाट आहे. अपुऱ्या इच्छांवर चढवलेला शब्दसाज म्हणजे लिहिणं.’’ सांगताहेत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान.
ले खकाच्या लिहिण्याच्या प्रेरणेत एकच एक कोणता तरी विशिष्ट घटक असतो, असं मला वाटत नाही. अनेक घटकांचा, मानवी जगण्याच्या अनेक मितींचा समुच्चय होऊन तो लेखकाला लिहायला उद्युक्त करतो, लिहायची ऊर्मी, प्रेरणा देतो आणि त्याचा हात कायम लिहिता ठेवतो, असं मला वाटतं. ते अनेक घटक, त्या अनेक मिती सांगता येणं अशक्य नाही, पण अवघड आणि किचकट आहे. कोणताही लेखक मी का लिहितो, किंवा का लिहायला लागलो हे नीट, स्पष्ट आणि एकाच एका ठाम उत्तरानं सांगू शकत नाही. प्रेरणा हा मामला साधा, सरळ, एकमार्गी आणि एकाच मुद्दय़ावर केंद्रित असा नसतो, तर त्यात लेखकाच्या सगळय़ा आयुष्याचे संदर्भ आणि त्याला ज्ञात असलेले जगाचे भूतकाळापासूनचे संदर्भ यांची प्रचंड गुंतागुंत असते. ती सगळी गुंतागुंत शब्दांत मांडणं ही अवाढव्य गोष्ट ठरेल. विशेषत याला आपला मेंदू चालवून कल्पनारम्य असं ललित साहित्य लिहायचंय, त्याला ही गुंतागुंत उलगडून दाखवणं हा आणखी अवघड वाटणारा प्रकार आहे. वैचारिक, संशोधनात्मक असं जे साहित्य असतं, त्याचे हेतू आणि प्रेरणा सांगता येणं एक वेळ सोपं आहे, पण ललित, जे फक्त मेंदूच्या बळावरच अवलंबून आहे, ते साहित्य का जन्माला घातलं जातं, त्याचे हेतू काय आणि प्रेरणा काय हे सांगता येणं कठीण कर्म आहे.
आयुष्यात सर्वात पहिल्यांदा का लिहावंसं वाटलं हेही तो कालखंड नजरेसमोर आणून त्यातल्या त्यात मोघम सांगता येतं. पण त्या पहिल्या लिहितं होण्याच्या मागेही अनेक संदर्भाची रेलचेल असते आणि ती जशी आहे तशी एकसलग मांडता येणं मुश्किल काम असतं.
एक गोची अशी होते की, वाचणाऱ्यांकडून बऱ्याचदा तुम्हाला ती अमुक कथा किंवा ती अमुक कादंबरी कशी सुचली, असा प्रश्न विचारला जातो. विशिष्ट अशा एकाच साहित्यकृतीची निर्मितीप्रक्रिया ही मला कधी नीट सांगता येत नाही. कारण ती विशिष्ट साहित्यकृती कधीही एका सटक्यात मेंदूत जन्माला आलेली नसते. मेंदूत तिची जडणघडण सतत चालू असते आणि त्यात आयुष्याच्या सगळ्याच घडामोडींमधून निर्माण होणाऱ्या संदर्भाची सरमिसळ सतत होत असते. लेखक म्हणून जगताना मेंदू कायम लिहिण्याच्याच उलथापालथीत कार्यमग्न असतो. पण एखादी साहित्यकृती एका दमात सुचते असं होत नाही. लेखक मेंदूत येणाऱ्या प्रत्येक विचारातून, या विचारावर आपल्याला लिहिता येईल का याची शक्यता अजमावून पाहत असतो. आणि जो विचार त्याला लिहिण्याचा जास्त मोह पाडील, त्यावर तो लिहिण्याचा कच्चापक्का प्रयत्न सुरू करतो. त्या प्रयत्नात तो डोक्यात आधीपासून पडून असलेले इतर पूरक विचारही वापरू पाहतो, आणि विचारांच्या सरमिसळीच्या खेळातून साहित्यकृती जन्म घेत जाते. त्याच्या मेंदूत तोवर त्याच्या वयापर्यंतचं त्या साहित्याबद्दलचं आकलन तो वापरत राहतो आणि साहित्यकृती घडत जाते. पण हे सगळं आहे ते काही एका रात्रीत घडत नाही. ते समज येण्याच्या वयापासून त्याच्यात घडत असतं. त्या घडणीत अनेकानेक संदर्भ असतात, घटक असतात. ते सगळे मिळूनच त्याच्या त्या विशिष्ट साहित्यकृतीची प्रेरणा ठरतात. त्यामुळं प्रेरणेबद्दल बोलताना तिची फक्त ढोबळ उठाठेव करता येते, पण तिची सूक्ष्मता, तिच्यातल्या संदर्भाचे एकमेकांत गुंतलेले धागे यांचा सगळाच्या सगळा उलगडा शक्य होत नाही. प्रत्येक लेखकाची हीच अडचण होते. माझीही होते. त्यामुळं मी आजवर माझी एका कृतीमागची किंवा एकूण लेखकी जगण्यामागची प्रेरणा कधीही नीट सांगू शकलेलो नाही. ढोबळ प्रयत्न मात्र अनेक झालेत.  
   मला पुसट असा कलेचा वारसा आहे. तो फारसा ठळक नाही, आणि माझ्यावर प्रभाव पडण्याइतका मला परिचितही नाही. माझे आजोबा एका खेडय़ात गावच्या जत्रेत, अडाणी लोकांना एकत्र करून नाटय़प्रयोग बसवायचे. त्या नाटय़प्रयोगांच्या कथा मी लोकांच्या तोंडून मोघम ऐकल्यात, प्रत्यक्षात ते प्रयोग पाहायची संधी मला कधीच मिळाली नाही. गाव वायफट लोकांचं होतं. पण आजोबांनी त्या गावात देवळात भजनं सुरू केली. त्यांचं हस्ताक्षर सुंदर होतं. तिरकं आणि दमदार. (ते मात्र मी पाहिलंय.) त्यांना चार भाषा यायच्या. अस्खलित. ते कवनं करायचे. त्यांना बडबडायची आणि किस्से सांगायची सवय होती. ते माणूस म्हणून स्वाभिमानी, पण साधे होते. थेट बोलायचे. मी लहान असताना वडील गोष्टी लिहायचे. क्वचित कविताही. कथा सहसा भुताखेतांच्या किंवा रहस्याच्या असायच्या. कुठंकुठं छापूनही आल्या होत्या. पुढं त्यांनी लिहिलं नाही. कदाचित वेळ नसल्यानं किंवा लिहिण्याचं महत्त्व वाटत नसल्यानं. ते छान किस्सागो होते. माझी आई पण गोष्टी रंगवून सांगायची आणि आम्ही कसं वागावं ते सांगत राहायची. मी लेखक आहे असं मानलं तर माझ्या लहानपणात या तिघांचे संस्कार जे कळत-नकळत माझ्यावर झाले, त्यांचा वाटा मानावाच लागेल. त्यांचं जगणं, त्यांची वर्तणूक यांचा माझ्या लिहिण्याच्या प्रेरणेतला हिस्सा अबाधित.
आयुष्यात सुरुवातीला जेव्हा लिहिलं, तेव्हा आपण का लिहायचं हे मला कळत नव्हतं. पण आपण लिहायचं असतं हे मात्र कळलं होतं. आणि कोणताही आवताव न आणता, येता लिहायला सुरुवात झाली होती. लिहावं वाटणं ही सहज गोष्ट होती. जेवावंसं वाटतं, झोपावंसं वाटतं, अगदी तशीच. एकदा कधी तरी लिहिण्याचा पहिला क्षण आयुष्यात आला आणि नंतर लिहिणं निरंतर सुरू झालं. तो पहिला क्षण नेमक्या कुठल्याच एका प्रेरणेतून किंवा ऊर्मीतून आला असावा असं मला वाटत नाही. अकराबाराच्या वयाचा होतो मी तेव्हा. मानसिक पातळीवर एकटा पडल्यासारखंही काही तरी झालं असावं. त्याआधीची दोनतीन र्वष मला आठवतात. शाळा, अभ्यास यांचा कंटाळा मनात भरला होता. घरातल्या परिस्थितीबद्दल, वातावरणाबद्दल काहीसा उद्वेग मनाशी होता. भोवती हवे तसे सवंगडी नव्हते. घरात, बाहेर एकटं पडल्यागत वाटत होतं. त्या वयाची इतर पोरं जे काही करतात, तसं काही माझं चाललं नव्हतं. खेळणं होत नव्हतं. शाळेपासून भरकटलो होतो. आजोबांपासून थोडा दुरावलो होतो. आईवडिलांमधल्या तणावाचं दडपणही मनावर होतं. इतर नातेवाईक ढिगानं, पण मानसिक गुंतवणूक करावी असं कुणी नव्हतं. ते आपल्याला हीन लेखतात असं वाटायचं. मन इतरांशी स्पर्धा करावी अशी इच्छा धरायचं, पण तशी आपली परिस्थिती नाही असं जाणवायचं. वयात येण्याच्या आधीचा तो पहिला टप्पा होता आणि मानसिक जाणीवजागृतीचाही. त्या काळात आधार होता तो वाचनाचा आणि चित्रं काढण्याचा. हाती पडेल तो छापील कागद वाचायचा आणि हाती पडेल त्या कागदावर चित्रं काढायचा नाद लागला होता. त्यातून मनाचं एकटेपण थोडं भरलं जात असावं. त्या काळात रहस्यकथा वाचायला मिळाल्या. त्या रोमांचक होत्या आणि त्याही आधी रोमांचक स्वप्नरंजनं करायचीही सवय लागली होती. एकोणीसशे एकाहत्तरचं भारत-पाक युद्ध आणि त्याच वर्षीचा दुष्काळ यांचे माझ्या बालमनावर थरारक (गुलछबू अर्थानं नव्हेत.) परिणाम झाले होते. त्यांची रोमांचक उत्तरं माझ्याकडं होती. खेडय़ाचं जगलो होतो, तालुक्याचं जगलो होतो, जिल्ह्य़ाचं जगलो होतो, महानगरीचं जगलो होतो, त्यांच्यातलंही रोमांचकपण अंगात भिनलं असावं. आसपास अनेक लोक होते. त्यांच्या चर्चा होत्या. त्यांच्यातून पसा, धर्म, नरनारी, जाती, इतिहास, प्रचलित काळ यांच्यातल्या भेदाभेदांच्या प्राथमिक जाणिवा होत होत्या. माणसांचे नमुने आणि स्वभाव मनावर ठसत होते आणि या सगळ्यात असून मी कशातच नव्हतो. मला आठवतं, स्वप्नरंजनातलं रोमांचकपण अमलात आणता येत नाही याची एक उदासी मनात तरळत असायची. माणसांच्या बोलण्यांमध्ये दुख, वेदनांचं जागणं, विव्हळणं असायचं, एकमेकांशी झगडय़ांचे विषय असायचे आणि त्यांनी तसं असू नये म्हणून काही तरी जादू करावीशी वाटायची. पण ते शक्य नाही हे लक्षात यायचं न् दुख व्हायचं. खूप खुजं, हतबल वाटायचं. त्यातून येणारा एकटेपणा. मला आठवतं, मी नऊ वर्षांचा असताना एका मनोऱ्याचं आणि वर आभाळात उडणाऱ्या एका पक्ष्याचं चित्र काढलं होतं, नाव दिलं होतं – एकटा. एकदा पाण्यात तरंगणाऱ्या एकटय़ा होडीचं चित्र काढलं होतं. (हा चित्रं काढायचा नाद कुठनं लागला होता कळत नाही. एकदा निवांतपणी त्याचा धांडोळा घ्यायला हवा. पण हा नाद बराच काळ टिकला. पुढं त्यात काही छुटमुट बक्षिसंही मिळाली. पण पुढं चित्र काढण्यातलं अपुरेपण, काही तांत्रिक बांधीवपण जाणवलं असावं आणि त्यातून मोकळीक हवी वाटली असावी. पण चित्रांमुळं कागदांशी खेळण्याची सवय जडली असावी आणि मन सविस्तर, स्पष्ट मांडायला कागदावर लिहिणं जास्त योग्य वाटलं असावं. लिहायला सुरुवात झाल्यावर चित्रं मागं पडली.) हे एकटेपण, चित्रं, वाचन आणि भोवतालची माणसं, स्वप्नरंजन यांच्या समुच्चयातून कधी तरी मग लिहावंसं वाटलं असणार. त्यातच कुठं तरी तो प्रेरणेचा क्षण दडलेला आहे, पण तो काटेकोर चिमटीत पकडून दाखवणं अशक्य आहे. कारण तोवरच्या माझ्या आयुष्याचा प्रत्येक घटक मला त्या लिहितं होण्याच्या क्षणाकडं ढकलत होता (हे आज कळतं), त्यामुळं लिहितं होणं हे एका दमात घडलं आणि त्याला एकच एक प्रेरणा घडली, संस्कार घडला, असं म्हणता येत नाही. प्रेरणांची अनेक सूत्रं त्या लिहित्या होण्याच्या क्षणाशी निगडित आहेत.
लिहिण्याचा नाद लागला आणि आयुष्य जरा दिलासलं. स्वतत मग्न राहायला तो आधार बरा ठरला. तेव्हा विषयांना बंधनं नव्हती आणि काही एका विशिष्ट पठडीतलंच लिहिलं पाहिजे असा खास संस्कारही नव्हता. साहित्यातल्या मांडणीचे भेद तर तेव्हा ज्ञातही नव्हते. हे सामाजिक, हे धार्मिक, हे वैचारिक, हे ललित असं काही कळत नव्हतं. बास, लिहायचं, एवढंच. पुढं संपादन-लेखन असा व्यवसाय करताना एक निरीक्षण असं घडलं की, बहुतेक लिहित्या लोकांच्या लेखनाची सुरुवात सहसा काव्यलेखनापासून होते. माझं तसं झालं नाही. मी पहिलं गदय़ लिहिलं. त्याचं कारण कवितेशी तेवढा आत्मीय संबंध नव्हता आणि वाचनात गदय़ पुस्तकं होती, हे असेल. कविता त्यानंतर आयुष्यात आली ते सोळाव्या-सतराव्या वर्षी. (एक निरीक्षण असं की बहुतेक जण त्या वयात कवीच असतात. त्यातल्या बऱ्याच जणांचा पुढच्या दोनचार वर्षांतच कवितेचा नाद सुटतो, पण ज्यांचा टिकतो, ते पुढं कवी होतात.) अगदी पहिलं जे लिहिलं ते दीर्घ गदय़ होतं. फार पुढं कळलं की, तसल्या लिखाणाला कादंबरी म्हणतात. ते फार दमदार असेल असं आता वाटत नाही, पण त्या वयाच्या आकलनाच्या मानानं ते दमदारच असणार. पण गंमत म्हणजे माझं छापून आलेलं पहिलं साहित्य, एक कविता होती. वय कोवळं होतं तेव्हा आणि जीवन, मरण, आयुष्याची अनिश्चितता असा कवितेचा विषय होता. त्यानंतर दोन वर्षांनी पहिली कथा छापून आली, तिचाही विषय एका म्हाताऱ्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असाच होता.
आता विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, लिहिणं हा श्वासाइतकाच महत्त्वाचा भाग आहे. मनात सतत भवतालाबद्दल अनिश्चितता असणं हाही माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. तशात माझं जगणं लिहिण्यानं तोलून धरलं, ते मला जगण्याचीच प्रेरणा देत राहिलं. लिहिणं नसतं तर आयुष्यात मी काय केलं असतं मला नाही सांगता येणार. त्याची कल्पनाही मला करता येत नाही. पोट पाळण्याचे उदय़ोग मीही इतरांप्रमाणे विपुल केले, पण मनाचं जगणं, माणूस म्हणून खरं जगणं हे लिहिण्यातच राहिलं. लिहिण्याचा नाद जडल्यावर जे कळलंय-आकळलंय ते कागदावर ओतत राहणं हेच जगणं झालं. आणि आज अशी भावना आहे की, आपण आपलं जगणं कागदावर उतरवत राहतो. आपल्याच मनाच्या, मेंदूच्या, शरीराच्या जगण्याचा प्रत्येक कंगोरा शब्दांकित करण्याची कोशिश करत राहतो. याशिवाय लिहिण्याचा दुसरा उद्देश मला कळत नाही.
आज कळतं, जगणं आडवंतिडवं असल्याशिवाय चांगलं आणि मोकळं लिहिता येत नाही. त्या आडव्यातिडव्या जगण्याचे उभेआडवे धागे सततच्या लिहिण्याची प्रेरणा होत राहतात. नेहमी नवंनवं वाचणं, नव्यानव्या ठिकाणी जाणं, नव्यानव्या क्षेत्रांमध्ये घुसून पाहणं, नवीनवी माणसं भेटत राहणं, आतल्या आत मतं-मतांतरांचा झगडा असणं, सतत बडबडत राहणं, नवीनवी स्वप्नं पाहणं या गोष्टी आपलं लिहिणं चालतंबोलतं ठेवतात. व्यवहारी जगण्याच्या जेवढय़ा म्हणून पातळ्या आहेत, त्यातल्या जास्तीत जास्त पातळ्यांचा अनुभव घेत राहणं हे सगळं लिहिण्याला आणखी भक्कम आणि निसंकोच करत जातं. आडवंतिडवं जगणं म्हणजे दिशाहीन भरकट असू शकते, पण जगण्याला लिहिण्याची मिती असेल तर ती दिशाहीन भरकटही लिहिण्याशी सुसूत्र होत राहते. भरकटीनं आयुष्याची वाताहत होऊ शकते, पण लेखकी जगण्याचा पाया असेल तर, ती वाताहत टळते किंवा वरवरची ठरते आणि उलट पाया मजबूत करायला पूरक ठरते. लेखक जगण्याच्या इतर व्यवहारांमध्ये हारला काय किंवा जिंकला काय, त्या दोन्ही गोष्टी त्याला लिहिण्यात उपयोगी आणि समृद्ध करणाऱ्याच ठरतात. या नजरेनं मला माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस हा समृद्धीनं ओतप्रोत असाच वाटत आलाय. त्या अर्थानं माझ्या आयुष्याचा कोणताही दिवस वाया जात नाही. तो प्रत्येक दिवस सवय झाल्याप्रमाणे किंवा विकार जडल्याप्रमाणे लिहिण्याच्या प्रेरणेचाच असतो.
आज साहित्यसृष्टीत वावरताना असंही लक्षात येतं की, प्रत्येक लेखकाचं लिहिणं कुठल्या तरी एका झापडबंद कप्प्यात कोंबून मगच त्याकडं पाहण्याची त्या स्वत लेखकाची आणि त्याच्या वाचनाशी संबंधित असणाऱ्या सर्वाचीच वृत्ती असते. त्यात म्हणे त्या लेखकाची आणि त्याच्या लिखाणाची अस्मिता असते. लेखकाला किंवा लिखाणाला अस्मिता असावी हे मला पटत नाही. तो प्रकार एकांगी, एकारलेला आणि प्रचारकी ठरतो. लेखक हा फक्त लेखक असावा, तो कुणाचाच नसावा. लेखन हे फक्त लेखन असावं आणि ते सर्वाचंच असावं. लेखन हे नेहमी निर्वकिार, निर्वषि आणि तटस्थ असावं आणि ते सर्वाचंच असावं. कोणत्या तरी एकाच मुद्दय़ाचा अभिमान बाळगून त्याचाच फक्त िढढोरा पिटावा असं मला वाटत नाही. मला कशाचाच अभिमान वाटत नाही. हे सगळं जग, त्याच्या सर्व काळांसह मला माझं वाटतं, पण त्यातले कृत्रिम भेद मला माझे वाटत नाहीत. मी फक्त माणूस आहे. लिहिणारा माणूस. माणसाचे मूलभूत क्रियाकलाप करणारा आणि श्वास घेणारा. लिहिता येतं म्हणून लिहिणारा. काय लिहायचं हे माझं ठरलेलं नाही. आपल्याला जमेल ते काहीही लिहायचं एवढा नाद मी बाळगलाय, त्यात कुठलंही मुद्दामपण बाळगावं असं मला वाटत नाही. लिहिणं म्हणजे कागद, लेखणी आणि मी, एवढय़ांचाच व्यवहार आहे. तो व्यवहार कशासाठी? तर तो माझ्या आतल्या जगण्याचा भाग आहे. (आणि आपण सगळेच जण खरं तर आपलं आतलंच जगणं जगत असतो. आतलं जगणं हेच खरं जगणं असतं.) मेंदूत काही तरी चालू असतं, पूर्वजांनी भाषा, कागद, शाई अशा गोष्टींचा शोध लावून त्या मला बहाल केल्यात, तर त्यांच्या आधारानं मी माझा मेंदू मूर्त रूपात मांडायचा प्रयत्न करतो. ते केल्यानं मला मी जगणं जगत असल्यागत वाटतं. लिहिणं म्हणजे कागदावर आपला मेंदू मांडणं, एवढंच आहे.
हे सगळं जग मला आपलं वाटतं आणि त्याच वेळी ते मला आपलं वाटतही नाही. सगळ्याच जगाबद्दल एक ओलावा असतो आतल्या आत आणि त्याच वेळी एक कोरडेपणासुद्धा. तशाच पद्धतीचा काही एक स्वभाव तयार झाल्याचं मला स्वतलाही जाणवतं. धड इकडं नाही न् धड तिकडं नाही. एकांगी नाही. मधूनच जाणारा. समन्वयी किंवा तटस्थ. तोच स्वभाव लिहिण्यात उतरत असणार. उतरतोच. आणि स्वभाव जन्मजात असतो. सगळय़ांना कवेत घेण्याचा जर स्वभाव असेल, तर मला वाटतं, तो माझ्या कर्तृत्वाचा भाग नाही, तर माझ्यावर सर्व माध्यमांतून झालेल्या संस्कारांचा भाग आहे. आणि मी असंच का लिहितो किंवा तसंच का लिहितो, काय लिहितो आणि कशाला लिहितो, या प्रकारच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं माझ्यावरच्या संस्कारांमध्येच आहेत. त्या संस्कारांमध्ये मी जन्मल्यापासून माझ्या आयुष्यात आलेली, येणारी सर्व माणसं, सर्व प्रदेश, माझ्या पंचेंद्रियांवर परिणाम करणारे सर्व घटक, आणि होणाऱ्या प्रत्येक जाणिवेचं स्वतच्या पद्धतीनं विश्लेषण करणारं मन यांचा समावेश आहे. त्यामुळं प्रेरणा म्हणजे, बोटांच्या चिमटीत पकडून दाखवता येणारा एकच एक मुद्दा असतो, असं मला नाही वाटत. लोकांना सांगता येत नाही की, बघा, बघा, ही दिसतेय ना, हीच माझी प्रेरणा! प्रेरणा ही न दिसणारीच गोष्ट आहे. तिला शब्दरूप देणंही महान अवघड गोष्ट आहे. एखादा लेखक नुसता स्वतच्या प्रेरणेबद्दल लिहीत राहिला तर आयुष्यभर त्याला दुसरं काही लिहायला नको, एवढं ते सविस्तर आणि कधीच न संपणारं काम आहे.
त्यापेक्षा लेखकानं त्याला वाटतं, जाणवतं, सांगावंसं वाटतं त्या विषयांवर लिहीत राहावं. त्याच्या सततच्या लिहिण्यातून त्याच्या प्रेरणा अध्याहृतपणे व्यक्त होत राहतात. त्याच्या हातून उमटणाऱ्या प्रत्येक शब्दामधून, तो रंगवत असलेल्या प्रत्येक कागदामधून त्याच्या प्रेरणा पाझरत असतात. (त्याशिवाय तो लिहूच शकत नाही.) या कुणाला एखादय़ा अमुक लेखकाच्या लिहिण्याच्या प्रेरणा शोधायच्यात, त्यानं, लेखक आयुष्यभर जेवढे कागद रंगवतो, तेवढे सगळे वाचले पाहिजेत. त्याचं सगळं वाचत राहिलं पाहिजे. त्यातून त्या लेखकाच्या सगळ्या प्रेरणांचा साक्षात्कार त्या वाचणाऱ्याला होऊ शकतो. लेखकाचा स्वभाव, लेखनाचा उद्देश यांची जाणीव होऊ शकते. लेखकाला इत्थंभूत ओळखायला ही एवढीच एक पद्धत फार सोयीस्कर आहे.
आणि एवढं असूनही मला, लेखक म्हणून, आज आपण लेखक असल्याची जाणीव झाल्यानं, स्वतच्या लेखनाचा उद्देश शोधायचा मोह होतोच. म्हणजे याच्यामागं मी, मनातली एकटेपणाची विवरं बुजवण्यासाठी लिहिलं असं म्हणतो, पण आता जाणिवा विस्तृत होण्याच्या वर्तमानात, मी पुढच्या काळासाठी काय उद्देशानं लिहिणार आहे, याचा स्वतशी पडताळा घ्यायची इच्छा होते. आपल्या लेखनाची उपयोगिता, निरुपयोगिता शोधावीशी वाटते.
लिहिल्याशिवाय मी जगू शकत नाही, हे खरं आहे. पण आजवर बरंच भलंबुरं लिहून झाल्यावर, मी आपण काय लिहिलंय, हे तपासतो तेव्हा लक्षात येतं की, आपण आपल्या त्या त्या काळात आपल्या मनाच्या इच्छा लिहिलेल्या आहेत, आणि त्या इच्छा त्या त्या काळात अपुऱ्याच राहिलेल्या आहेत किंवा अपुऱ्या राहणार असं वाटलेलं आहे. थोडक्यात, लिहिणं म्हणजे अपुऱ्या इच्छांचा गजबजाट आहे. अपुऱ्या इच्छांवर चढवलेला शब्दसाज म्हणजे लिहिणं. आपण वयानं वाढत जातो, तशा आपल्या जाणिवा विस्तृत होत जातात. या जाणिवांमधून नवनव्या इच्छा मनाशी बाळगल्या जातात. आयुष्यात येणारा रोजचा दिवस नवा असतो. तो चांगलंवाईट काही शिकवतोच. कुठलंही शिक्षण हे त्या शिक्षणाच्या पुढंही काही तरी आहे, याची आस लावतं. ते पुढं काय आहे, हे शोधायची उत्सुकताही असतेच. त्या उत्सुकतेतून पुढं असं असावं, व्हावं, तसं असावं, व्हावं, असं वाटत राहतं. तसं वाटणं म्हणजेच इच्छा. एक प्रकारे प्रचलित आणि पुढच्या काळाबद्दलचं स्वप्नरंजनच – ते स्वप्नरंजन शब्दात मांडणं म्हणजे लिहिणं.
मी जेव्हाही कधी लिहायला सुरुवात केली, तेव्हापासून जे लिहीत आलोय, ते माझ्या त्या त्या काळातल्या त्या त्या दिवसांच्या अपुऱ्या इच्छांचंच लिहीत आलोय. दरम्यानचा एवढा काळ गेल्यावर मी आज, वर्तमानात कोणत्या अपुऱ्या इच्छांचं लिहू पाहतोय, हे शोधता येऊ शकेल. आजच्या अपुऱ्या इच्छा मी सांगू शकतो.
या एवढय़ा काळाच्या वाचनातनं, अनुभवातनं, जगण्यातनं आज मानवी समूहजीवन, त्याचा आजवरचा प्रवास, त्याचं वर्तमान आणि त्याचा संभाव्य काळ यात मी गुरफटून गेल्यागत वाटतं. माणसातले आपापसातले संबंध या विषयानं माझी पकड घेतल्याचं मला जाणवतं. माणसं एकटी म्हणजे काय, दुकटी म्हणजे काय, समूहातली म्हणजे काय, हे स्वतचं स्वत शोधून, ते शब्दात मांडावं असं मला वाटतं. माझं आजचं लिखाण तसं आहे.
एवढं जगून झाल्यावर माझ्या लक्षात आलंय की, प्रत्येक माणसाला आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी, आयुष्यभर सुख, शांती आणि आनंद याचा शोध घ्यायची सवय असते. आणि तो शोध लागतच नाही म्हणून स्वतच स्वतला दुखी करायची आणि दुखाच्या वचप्यासाठी भोवतीच्या इतरांनाही दुखी करायची, पीडा दय़ायची सवय असते. तोच वर्तमान माणसाचा स्वभाव आहे. माणूस एक वेळ स्वतचा आनंद स्वतपुरताच ठेवील, पण स्वतचं दुख स्वतपुरतं ठेवावं असं त्याला वाटत नाही. तो ते कोणत्या न कोणत्या रूपात इतरांना वाटायला निघतो आणि त्याचे त्याच्यावर आणि इतरांवर चांगलेवाईट, अल्प किंवा दीर्घ परिणाम होत राहतात.
माझ्या लक्षात आलंय की, मानवी समूहजीवनाच्या सुरुवातीचा उद्देश मुळात सुख, शांती आणि आनंद हाच होता. आजही आहे. आपण एकत्र राहू आणि सुखी, शांत, आनंदी होऊ असंच माणसांनी ठरवलंय आणि त्यासाठीच माणूस आयुष्यभर धडपडतही असतो. पण तरीही तो आपल्या मूळ उद्देशापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही, हे भोवतालचं जग आणि त्याच्या प्रत्येक घडामोडी पाहताना स्पष्ट जाणवतं. अस्वस्थता, भेद आणि भांडण हा आजच्या प्रत्येक माणसाचा आणि एकूणच जगाचा स्थायीभाव झालाय. भेद आणि भांडणं कशासाठी, तर तीही म्हणे शांती आणि सुखासाठी, एवढय़ा अजब तत्त्वज्ञानापर्यंत आजचा माणूस येऊन ठेपलाय. माणूस स्वतशीही भांडत असतो, माणूस दुसऱ्या माणसाशीही भांडत असतो, अनेक माणसं मिळून इतर अनेक माणसांशी भांडत असतात. हे आजच्या जगाचं रोजचंच जगणं आहे. मला वाटतं, कुणीही कुणाशीही भांडू नये, प्रत्येकानं दुसऱ्याला समजून घ्यावं, प्रत्येक माणसाच्या मनात सुख, शांती आणि आनंद असावा. ही माझी मला कळू लागल्यापासूनची अपुरी इच्छा आहे. आणि मी अपुऱ्या इच्छांचं लिहितो म्हणतो, तर माझं वर्तमान लिहिणं हे याच अपुऱ्या इच्छेचं आहे. ही अपुरी इच्छा हीच माझ्या वर्तमान लिहिण्याची प्रेरणा आहे असं म्हणायलाही हरकत नाही. जोवर माझी ही इच्छा पूर्ण होत नाही, तोवर मी लिहीत राहणार.     
chaturang@expressindia.com