सरिता आवाड

दिनानाथ मनोहर आणि मीरा डॅकिन सद्गोपाल या सामाजिक कार्यकर्ते म्हणून घडलेल्या दोन प्रगल्भ व्यक्तींच्या सहजीवनाची ही गोष्ट. गेली ३० वर्षं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहाणाऱ्या या जोडप्यानं आपल्या कामांतून, आजूबाजूच्या वातावरणातून मनाची होणारी कोंडी अनुभवली आहे. विविध चढउतारांमध्येही त्यांच्या नात्यातलं शहाणपण मात्र टिकू न राहिलं. एकमेकांना अवकाश देत या जोडप्यानं संवाद जपला. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सहजीवनाचा हा उत्तरार्ध…

मी नंदुरबारला निघाले होते. मीरा आणि दिनानाथ यांना भेटायला, त्यांचं घर मला अनुभवायचं होतं. पुणे ते नंदुरबार दहा तासांचा प्रवास. माझं मन त्यांच्या सहजीवनातल्या वळणावर घोटाळत होतं. घर उभारल्यावर कधी ना कधी ते उभारलेलं सगळं सोडून निघून जाण्याचा उमाळा खूप जणांना येतो, पण ते प्रत्यक्षात येत नाही. दिनानाथनं तो प्रत्यक्षात आणला. कारण त्यांच्या मनातल्या सर्जनाच्या प्रेरणा सशक्त होत्या. अगदी टोमॅटोचं सार, कढी करणारे दिनानाथ, घरात अडकलेले वाटत असले तरीही सगळं सोडून नंदुरबारला येऊ शकले याचं मला विशेष वाटत होतं. त्यातली मधली कडी सापडत नव्हती. नंदुरबारला जाऊन आल्यावर फोनवर सुनीताशी (मीरा व दिनानाथ यांनी दत्तक घेतलेल्या मुलीशी) माझा मनमोकळा संवाद झाला आणि त्यातून ही हरवलेली कडी सापडली.

१९९४ मध्ये किल्लारीच्या भूकंपात उद्ध्वस्त झालेली १३ वर्षांची सुनीता मीरा आणि दिनानाथच्या आयुष्यात आली. मीरा आणि दिनानाथ तिचे आई-वडील झाले. एक नवं आयुष्य सुनीतासमोर उलगडलं. पण या नव्या आयुष्याला समाज नावाचं खूप महत्त्वाचं परिमाण होतं. दिनानाथ आणि मीराकडे अनेक कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक यांची ये-जा असायची. या अनेक सामाजिक संबंधांचा सुनीतासुद्धा भाग बनली. तेव्हा या संवेदनशील मुलीला जाणवायला लागलं, की काही लोक जसे मीराशी वागतात, दिनानाथशी वागतात, तसं सुनीताशी वागत नाहीत. काहींना ती ‘बिचारी’ मुलगी वाटायची. ती मीरा आणि दिनानाथ यांची स्वत:ची मुलगी नसून ‘मुलीसारखी’ आहे, आणि तिनं तसंच असायला हवं, असं काहींना वाटत होतं. मुलगी असणं आणि मुलीसारखं असणं, हा सूक्ष्म भेद मीराच्या आणि दिनानाथच्या वागण्यात नव्हता. त्यामुळे इतरांच्या वागण्यात हा भेद जाणवला की सुनीता चिडायची, अस्वस्थ व्हायची. या लोकांशी आई-बाबांनी भांडावं, असं तिला वाटायचं. सर्वांना समजून घेण्याचं धोरण तिला पटायचं नाही. खरी गोष्ट ही होती, की तिचे आई-बाबा समतेची सवय असलेली दुर्मीळ माणसं होती. भवतालच्या समाजाला समतेची सवय नव्हती. अगदी समतेच्या गप्पा मारणाऱ्यांनाही नव्हती. त्यांचं पितळ उघडं पडायचं. तिचे आई-बाबा प्रगल्भ होते. समतेचं मूल्य न पचवलेल्या समाजाची त्यांना जाणीव होती. तेही त्याविरुद्ध लढत होते, पण निराळ्या पातळीवर. वैयक्तिक पातळीवर त्यांची भूमिका संवादाची होती. सुनीताला हे कळत नव्हतं. तिची, खरंतर तिघांचीही कोंडी होत होती. तिघांचं हे घर वेगळं होतं, मोलाचं होतं. एका कोंडीचंही होतं. पुण्याला राम राम करून ही कोंडी दिनानाथ यांनी स्वत:साठी सोडवली. त्यांच्या जाण्याने सुनीता आणि मीराच्या नात्यालाही वेगळा आयाम आला. दिनानाथ निघून गेल्यानंतरची पोकळी त्यांना खूप जाणवली. दिनानाथ यांचा खंबीर पाठिंबा त्यांनी गृहीत धरला होता. आता त्या पाठिंब्यामागचा माणूस त्यांना जाणवला.
इथे नंदुरबारला दिनानाथ यांची लेखणी जिवंत झाली. ‘पूर्णस्य पूर्ण मादाय’, ‘प्रदेश साकल्याचा’ अशा कादंबऱ्या आवेगात त्यांनी लिहिल्या. मनातली खळबळ, उमाळा, लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा त्यांना अनुभव होता. विनोबांच्या साक्षीनं आपली शस्त्रं समर्पण केलेल्या चंबळच्या डाकूंशी बाबा आमटे यांच्या श्रमिक विद्याापीठात असताना त्यांचा संवाद झाला होता. हे विलक्षण मला सांगायलाच हवं, अशा ऊर्मीनं त्या वेळी वयाच्या तिशीत त्यांनी एक लेख लिहिला, जो ‘माणूस’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाला. या अनुभवामुळे लेखणीशी त्यांची जवळीक झाली होती. आदिवासी, वंचितांचं जग बदलण्याच्या ध्यासापायी ते शहाद्यााच्या श्रमिक संघटनेचे कार्यकर्ते झाले होते. आदिवासींचा संघर्ष, त्यांच्या निष्ठा त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यांचं अमानवी वास्तव आणि ते वास्तव बदलण्यासाठी लढा देण्याची असीम ऊर्जा याच्याशी दिनानाथ एकरूप झाले होते. या आंदोलनांशी त्यांच्या लेखनाचं जैव नातं होतं आणि आहे. नंदुरबारला आल्यावर दिनानाथना त्यांच्या लेखनाच्या अवकाशाची स्पष्ट जाणीव झाली. हा अवकाश ते निष्ठेनं समृद्ध करत होते. या काळात मीरा मधूनमधून नंदुरबारला येत होत्या. दिनानाथ यांच्या लिहिण्याचा झपाटा मीरांनी पाहिला. आपण दिनानाथजवळ राहायचं आहे, हा त्यांच्या मनाचा कौल होता. साहजिकच नंदुरबारलाच घर उभारण्याचा दोघांनी निर्णय घेतला.

नंदुरबारला थोडं गावाबाहेर, डोंगराच्या उतारावर त्यांनी घर बांधायला घेतलं. त्यांच्या घरापर्यंत इतरांनी डोंगर फोडून सपाटीवर घरं बांधली आहेत. पण यांनी मात्र डोंगरपणा राखून त्याच्या अंगाखांद्याावर घर बांधलं आणि पुढे तीच रीत झाली. या बांधणीत मीरांच्याही कल्पना होत्या. त्यांना हव्या असलेल्या टाइल्स त्या स्वत: पुण्याहून घेऊन गेल्या. त्यांच्या कल्पना आणि नंदुरबारचे कारागीर यांचा समन्वय करण्याचं कठीण काम दिनानाथना करावं लागलं. २००६ मध्ये हे घर तयार झालं. मीरा तिथे राहायला आल्या. त्यांच्या सहजीवनाची नव्यानं सुरुवात झाली. दोघांनीही वयाची साठी ओलांडली होती. सुनीता मात्र पुण्यातच होती. तिला तिचा जोडीदार- किरण मिळाला होता. त्याच्याबरोबर सासरच्या विरोधाला न जुमानता तिनं राहायला सुरुवातही केली होती. कालांतरानं हा विरोध मावळला आणि तिचं रीतसर किरणशी लग्न झालं. पण ही पुढची गोष्ट… २०१६ मधली.

अंदाजे दहा तासांचा प्रवास करून मी नंदुरबारला पोहोचले. खरं तर दिनानाथ यांनी घराचा व्यवस्थित पत्ता दिला होता, गूगल नकाशाही दिला होता. तरीही थोडंसं चुकतमाकत मी घरी पोहोचले. घराचं नावच ‘अवकाश’ आणि आता घराचा अवकाश माझ्यासमोर होता. दिनानाथ, मीरा आणि त्यांची मैत्रीण वंदना मला दिसले. घरात शिरल्याबरोबर प्रवासाचा सगळा शीण विरून गेला. आठ-दहा पायऱ्या चढून घरात जावं लागलं. आपल्या दुखऱ्या गुडघ्यांच्या मित्रमैत्रिणींच्या सोयीखातर जिन्याला नीट कठडे बांधले होते. शिरल्या शिरल्या एक प्रशस्त खोली. तिच्या डावीकडे स्वयंपाकघर, तर उजवीकडे बैठक होती. घरातच वेगळे राहाणारे शिवाजी, वंदना, तिचा मुलगा-१२-१३ वर्षांचा सोहम हे कुटुंबीय. त्यांच्याबरोबरच फण्टूश आणि टिकोजीराव नावाचे श्वानवंशीय आणि एक मनीमाऊसुद्धा भेटली.

घरातून उत्तरेला दूरवर तापी नदीचं विस्तीर्ण खोरं दिसलं, क्षितिजाशी अंधुक डोंगर. घरात जिकडेतिकडे चोहीकडे पुस्तकंच पुस्तकं असल्यामुळे मला अगदी ‘आनंदी आनंद गडे’ झालं. छान गप्पा झाल्या. या गप्पांच्या ओघात या दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी मला समजली.

दिनानाथ मूळचे नाशिकचे. वडिलांचा सराफीचा व्यवसाय होता. अल्प प्रमाणात सावकारी होती. जातीपातींना अजिबात थारा नव्हता. सर्वांना मुक्तद्वार होतं. दिनानाथना चार भाऊ आणि सहा बहिणी. मोठे दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे कार्यकर्ते होते. गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली. सत्याग्रहात या भावांना तुरुंगवास घडला. दिनानाथ लहान वयात संघाच्या शाखेत जायचे. पण संघशाखेतील स्वानुभवामुळे आणि वाचनामुळे त्यांच्या विचारांची दिशा बदलली आणि डाव्या विचारांचा त्यांनी स्वीकार केला.

१८ व्या वर्षीच घर सोडून त्यांनी आपलं आयुष्य घडवलं. १९९१ मध्ये जेव्हा मीरा आणि दिनानाथ एकत्र राहायला लागले तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी दोघांना घरी बोलावलं, इतकंच नाही तर सर्व कुटुंबीयांचा मोठा मेळावाच भरवला. मीरा यांचं मनापासून स्वागत केलं. कुटुंबाशी असलेले वैचारिक मतभेद या जिव्हाळ्याच्या आड अजिबात आले नाहीत. ही सहिष्णुता मला कौतुकास्पद वाटली. वयाच्या ९२ व्या वर्षी दिनानाथांच्या आईला अपघात झाला, तेव्हा त्यांनी मीरांना बोलावून घेतलं. आपल्याला काय झालंय ते मीरांकडून समजून घेतलं. सासूबाईंचा मीरा यांच्या वैद्याकीय ज्ञानावर विश्वास होता. मीरांच्या भावंडांशी दिनानाथची दोस्ती आहे. या कौटुंबिक नात्यात आता सुनीता आणि तिचे पती किरण यांचीही भर पडली आहे. सुनीताची तिच्या चुलत भावंडांशी चांगली दोस्ती आहे.

वरच्या मजल्यावर पाहुण्यांसाठी बांधलेल्या खोलीत रात्री मला शांत झोप लागली. सकाळी जाग आली ती दिनानाथच्या बासरी वादनानं. ही कला दिनानाथांनी आपली आपण आत्मसात केली आहे. औदासीन्याकडे झुकणाऱ्या मीरा यांना बासरीनं प्रसन्न वाटावं हा त्यामागचा एक उद्देश आहे. शिवाय खुरमांडी घालून तासभर बसल्यानं ‘वेरिकोज व्हेन्स’चा त्रासही नियंत्रित होतो. जिन्यातून उतरल्या उतरल्या साबुदाण्याच्या खिचडीचा मस्त सुवास माझ्या नाकात भिनला. मीरांनी मराठमोळी खिचडी उत्तम बनवली होती. मग मीपण मधुमेह वगैरे विसरून खिचडीचा मनापासून समाचार घेतला. मीरांशी शुद्ध मराठीत गप्पा झाल्या.

मग मी माझ्या नेहमीच्या प्रश्नाकडे आले. ‘‘तुम्ही लग्न का केलं नाहीत?’’ याला दिनानाथांनी दिलेलं उत्तर अंतर्मुख करणारं आहे. लग्नात स्त्रीला आणि पुरुषाला समान अवकाश नसतो. स्त्रीचा अवकाश पुरुषाशी जुळवून घेणारा आणि बऱ्याचदा घरकाम, स्वयंपाक याच्याशी संबंधित असतो. त्यांच्या मते दोघांचेही स्वतंत्र अवकाश असायला हवेत. ते स्वतंत्र असल्यानंच नातं विविधरंगी होऊ शकतं. अवकाश स्वतंत्र असून संवादी असणं महत्त्वाचं आहे. ही एका अर्थी प्रचलित विवाहसंबंधावर टीका आहे. मला कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवल्या, ‘स्वरजुळणीतून एक गीत परी हवेच अंतर सात सुरातून’
नंदुरबार शहरापासून भौगोलिकदृष्ट्या लांब असले तरी इंटरनेट, टेलिफोन अशा सुविधांमुळे ते बाहेरच्या जगाशी जोडलेले होते. दिनानाथ लेखनात मग्न आहेत. विज्ञान कथा, स्थित्यंतराच्या कथा, ‘फत्ते तोरणमाळ’, ‘कबिरा खडा बाजारमें’ अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ८१ व्या वर्षातही त्यांची लेखणी अजून तितकीच तरुण आहे. मीराही त्यांच्या संशोधनामध्ये मग्न आहेत. परंपरेने खेड्यापाड्यात बाळंतपण करु शकणाऱ्या दाया, आदिवासी भागात दाईकाम करणारे पुरूष यांच्या ज्ञानाचा ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत कसा उपयोग करून घेता येईल याबद्दलचे मीरा यांचे शोधनिबंध ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली’सारख्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. आसपासच्या मुलांशी मीरांचा संवाद आहे, चित्र रेखाटण्याचाही त्यांना छंद आहे. दिनानाथच्या मदतीनं त्या मराठी शब्दकोडीसुद्धा सोडवतात. सिंगापूरला राहणारी सुनीता आणि त्या ‘झूम’वर सकाळी भेटतात, योगासनं करतात. सुनीता, मीरा आणि दिनानाथच्या नात्याला आता स्थैर्य आलं आहे.
दिनानाथांना माझा शेवटचा प्रश्न होता, की मीरामुळे तुमच्यात काय बदल झाला? यावर ते स्तब्ध झाले आणि म्हणाले, की मीरामुळे मी शांत झालो. दुसऱ्या दिवशी सकाळच्या कोवळ्या उन्हात मी मीरा आणि दिनानाथचा निरोप घेतला.

sarita.awad1@gmail.com