News Flash

पत्र्याची शेड ते वसतिगृह

स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले

स्थलांतरित ऊसतोड कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले, तसेच अंध, अपंग, मूकबधिर मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणाऱ्या, त्यासाठी गावकऱ्यांचा विरोध पत्करणाऱ्या, स्वत:ची जमीन, दागिने विकून या मुलांसाठी ‘शांतिवन’ उभारणाऱ्या कावेरी नागरगोजे. पत्र्याच्या शेडमध्ये अवघ्या पन्नासेक मुलांपासून सुरू झालेल्या शांतिवनात आज पाचशेच्या वर मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, वसतिगृहांची सोय करण्यात आली आहे. बीडमधल्या सुरू असलेल्या या आगळ्या प्रकल्पाचा हा प्रवास..
बीडपासून अंदाजे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या सीमेवर असणारे आर्वी, ता. शिरुर कासार, जि. बीड हे माझे गाव. गावात जाण्यासाठी रस्ता चांगला नाही. पूर्वी नगर जिल्ह्य़ात असणारे हे माझे गाव संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर बीड जिल्ह्य़ात समाविष्ट झाले. माझे घराणे सैन्याशी निगडित होते. पणजोबांपासून ही परंपरा चालू होती. वडील भारतीय सैन्यात होते. मी बारावी पास झाले आणि लगेचच माझ्या लग्नासाठी मुलांची शोधाशोध सुरू झाली. गावातल्याच मामाच्या मुलाशी अर्थात दीपक नागरगोजे यांच्याशी माझा २००० साली विवाह झाला. दीपक यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्यासोबत मी बाबा आमटे यांच्या आश्रमात गेले. आणि तेथले भारावलेले वातावरण पाहून थक्क झाले. बाबांची कार्यप्रेरणा पाहून मलाही काही तरी करावे असे वाटू लागले.
बीड जिल्ह्य़ात ऊसतोड कामगारांची संख्या लक्षणीय आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी या जिल्ह्य़ातून हजारो मजूर ऊस तोडण्यासाठी वर्षांतील सात-आठ महिने पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरित होतात. या मुलांचा सांभाळ करणारे घरी कुणीच नसल्याने हे कामगार आपल्या मुलांनाही सोबत घेऊन जातात. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलाचे शिक्षण थांबते. या मुलांना शिकण्याची खूप इच्छा असते. पण पर्याय नसतो. उसाच्या फडातच ही मुले लहानाची मोठी होतात. शिक्षणाचा पत्ता नाही, कुपोषणाने त्यांची पाठ कायमची धरलेली. पोटासाठी संतुलित आहार मिळत नाही, अशांना कुठले आलेय शिक्षण आणि कुठला हक्क? ही पाश्र्वभूमी पाहून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपण काही तरी करावे, असे मनात आले. माझ्या पतीलाही हा विचार आवडला. याविषयी आम्ही नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला मूर्खात काढले. ते म्हणाले, ‘‘समाजसेवेचे उद्योग पैसेवाल्यांनी करायचे असतात. हे तुमचे काम नाही. तुम्ही आपल्या पोटापाण्याचे पाहा, आम्हाला तरी भिकेला लावू नका.’’ मात्र, मी घेतलेल्या निर्णयावर ठाम होते.
आर्वीमध्येच आपली शाळा सुरू करण्याच्या निर्णय झाला. आमची आठ एकर जमीन मी संस्थेला दान दिली. जून २००१ साली २९ ऊसतोड कामगारांची मुले, २२ अनाथ मुले, चार उपेक्षित महिला यांच्यासोबत आम्ही दोघे व भगवान भांगे यांनी ‘शांतिवना’ची मुहूर्तमेढ रोवली. अनाथालय, अनाथाश्रम, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा प्रकल्प, निराधार महिलाश्रम, तमाशा कलावंत, वेश्या, एड्सबाधित मुलांचा प्रकल्प अशी विशेषणे प्रकल्पाच्या नावासमोर लावणे म्हणजे पीडितांना त्यांच्या वेदनेची जाणीव करून दिल्यासारखे वाटेल, म्हणून त्या मुलांना स्वत:च्या घरात आम्ही या प्रकल्पाला ‘शांतिवन’ असे नाव दिले. पत्र्याच्या पाच झोपडय़ा व एक मोठी शेड उभी करून आम्ही शांतिवन सुरू केला. प्रकल्प गावापासून दूर होता. येण्यासाठी रस्ता नव्हता. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून ये-जा करावी लागत असे. रस्त्यात मोठा नाला होता व एक नदी होती. पावसाळ्यात दळणवळण ठप्प व्हायचे. तसेच सुरुवातीला गावातील लोकांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. पावसाळ्यात शांतिवनात जेवढे साहित्य आहे त्यातच आम्ही मुलांची देखभाल करायचो. मी आणि सासूबाई स्वयंपाक करण्यापासून मुलांचे कपडे धुण्यापर्यंत सर्व कामे करीत असू. मात्र, माझ्या मनाला पूर्ण समाधान वाटत नव्हते. कारण मुलांना अधिकृत शाळा नव्हती. गावातल्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत या मुलांचा प्रवेश घेण्याचे ठरविले. मात्र याला गावातील काही पुढाऱ्यांनी विरोध केला. या मुलांना गावातल्या शाळेत शिकू देणार नाही, असा पवित्रा घेतला. या मुलांमुळे आमच्या शाळेतील मुलांवर वेगळे संस्कार होतील, असे अनेक जण म्हणायला लागले. खूप टोकाचा विरोध केला. मात्र गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान मुळे व सरपंच शहाजीराव भोसले या मुलांच्या पाठीशी उभे राहिले व त्यांनी या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला.
‘शांतिवना’तून शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात अनंत अडचणी यायच्या. पावसाळ्याचे चार महिने ही मुले शाळाबाह्य़ असायची. एके दिवशी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ही बातमी कळली. ते ‘शांतिवना’ला भेट देण्यासाठी आले. त्यांना येथील काम खूप आवडले. ऊसतोड कामगारांची मुले आणि अनाथ मुलांसाठी सुरू झालेला हा बीड जिल्ह्य़ातील पहिलाच प्रकल्प होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आणि शासनाकडे प्रस्ताव पाठवून विशेष बाब म्हणून या ठिकाणी विनाअनुदानित तत्त्वावर आम्ही शाळा सुरू केली. शाळेची मान्यता मिळाल्याचे कळल्यावर ‘शांतिवना’तील सर्वानाच खूप आनंद झाला व अर्धी लढाई जिंकल्याचा विश्वास मिळाला. कारण ही मुले शिकली तर उद्या ऊसतोड करणाऱ्या आईवडिलांना मोठा आर्थिक आधार देतील.
‘शांतिवना’त काम करणे आनंददायी होतेच, पण अनेक अडचणी येत होत्या. पण मी मात्र धीराने साऱ्याला सामोरी जात होते.. जिथे जिथे आपली आवश्यकता आहे असे वाटायचे तिथे मी स्वत: जात होते.
खालापुरी येथील गंगुबाई भस्मारे यांच्या पतीचे आणि मोठय़ा मुलाचे एकाच वर्षांत निधन झाले. गंगुबाई व त्यांची सून शीलाताई विधवा झाल्या. शीलाताईंच्या राणी व अतुल या दोन चिमुरडय़ांचे पितृछत्र हरपले होते. घरातला कर्ता पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब रस्त्यावर आले. ही गोष्ट कळाल्यावर त्या गावी जाऊन मी त्या कुटुंबाला शांतिवनात आणले. त्या वेळी पाचवीत असणारी राणी शांतिवनातच लहानाची मोठी झाली. तिच्या वर्तणुकीने तिने शांतिवनातील सगळ्यांची मने जिंकली. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्वीतीलच एका सुस्थितीतल्या कुटुंबातील मुलाशी राणीचे लग्न लावून दिले. आम्ही दोघांनीच तिचे कन्यादान केले. या वेळी खूप आनंद झाला. आज तिचे हसरे कुटुंब बघताना त्या वेळी तिला इथे आणले नसते.. तर काय झाले असते, या नुसत्या विचारानेही अंगावर काटा येतो.
एके दिवशी मुलांचे कपडे धूत असताना एक किडकिडीत शरीरयष्टीचे, डोक्यावर काळी टोपी असलेले ९० वर्षीय आजोबा आपल्या अविनाश नावाच्या नातवासोबत शांतिवनात आले. ते सांगायला लागले, की माझ्या मुलाने सूनबाईचा खून केला व तो खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे. घरात मी एकटाच आहे. मी हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करून आम्ही दोघे जगत आहोत. मात्र अविनाश सारखा आईची आठवण काढत रात्र-रात्र रडतो. ताई, मला आता या वयात त्याला समजावून सांगता येईना. मी अविनाशला शांतिवनात ठेवले. त्याला दररोज माझ्याजवळ झोपवले, त्याला आईची माया लावली. आज तो शांतिवनात चांगलाच रमलाय.
शीतल नावाची सहावीत शिकणारी मुलगी व तिचा भाऊ राजकुमार यांना त्यांचे मामा दत्ता बारगजे एके दिवशी घेऊन आले. मुलांचे वडील परागंदा झालेले होते. आई मोलमजुरी करून घर चालवायची. तीन मुले, त्यांचा शिक्षणाचा खर्च तिला झेपेना. या वेळी मी या दोन मुलांना ठेवून घेतले. सुरुवातीला अशा मुलांना शांतिवनात ठेवत नव्हतो. मात्र शीतल आल्यानंतर माझ्या मनात विचार आला, की उपेक्षित, अनाथ, गरजू बेघर मुलींसाठी काहीतरी करायला हवे. याच वेळी वर्तमानपत्रात दोन बातम्या माझ्या वाचनात आल्या.
नाळवंडी येथील रामा पठाडे या ऊसतोड कामगाराचा ट्रॅक्टर वरून पडून अपघाती मृत्यू झाला. मी सुरेश राजहंस यांना सोबत घेऊन नाळवंडी येथे गेले. पठाडेचे घर म्हणजे चार पत्र्यांचा आडोसा, अपंग आणि भोळसर पत्नी, सीमा आणि ऊर्मिला या दोन मुली. घरात अठराविशे दारिद्रय़. उपजीविकेसाठी जमीन नाही, केवळ वडिलांचीच तेवढी कमाई होती. आम्ही गेलो तो दिवस तिसरा दिवस होता. रामाच्या अस्थी संकलन करण्यासाठी गावकरी जमलेले होते. तो विधी पार पडल्यानंतर रामाची पत्नी व दोन्ही मुली दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर कामाला निघाल्या होत्या. मी त्यांना विचारले, तर ते म्हणाले, आम्ही रोजंदारीस नाही गेलो तर वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी पैसे कोठून आणणार? हा प्रश्न माझ्या मनाला चटका लावणारा होता. मी गावातील प्रतिष्ठित लोकांना बोलून सीमा व ऊर्मिलाला घेऊन शांतिवनात आले. त्या ठिकाणी त्यांची शिक्षणाची व राहण्याची सोय केली. या वेळी या मुलींना अश्रू आवरत नव्हते. त्या म्हणाल्या, ‘‘ताई, तुम्ही आमच्यासाठी काय केले आहे याची तुम्हाला कल्पना नाहीय.’’
बीड तालुक्यातील आहेर वडगाव येथील बिभीषण बाबरस नावाचा ऊसतोड कामगार. कोल्हापुरातील एक उसाच्या फडात गाडी भरण्यासाठी पहाटे गेला तो थंडीने काकडून मेला. रोहिदास रोहिटे या कार्यकर्त्यांला घेऊन आम्ही त्या गावात गेलो. त्या वेळी त्याच्या घरचे चित्र हृदय हेलावणारे होते. त्याची पत्नी आणि पाच लहान लेकरं; त्यापैकी तीन मुली. सरकारी जागेतल्या चार पत्र्यांच्या शेडमध्ये राहत होते. बिभीषणवर मुकादमाचे कर्ज, तसेच सावकारांचा कर्जाचा डोंगर होता. कर्ज फेडायचे की मुलांना जगवायचे, हा मोठा प्रश्न त्या बाईसमोर होता. या वेळी मी कोमल, सुप्रिया, नम्रता या तीन मुलांना घेऊन मी शांतिवनात आले व त्यांना शिक्षण दिले व त्यांना जीवन जगण्याचा वेगळा मार्ग दाखविला. याच्यासारख्याच किती तरी मन हेलावणाऱ्या व सुन्न करणाऱ्या घटना प्रत्येक मुलासोबत जोडलेल्या आहेत.
आजघडीला अशा वेगवेगळ्या घटनांमुळे पोरक्या झालेल्या ५० मुली आणि ५४ अनाथ मुलांना ‘शांतिवना’त आधार मिळाला आहे. यासह काही तमाशा कलावंतांच्या मुलांनाही ‘शांतिवना’त सामावून घेतले आहे. आपण अनाथालयात राहत आहोत किंवा उपेक्षितांच्या प्रकल्पात आम्ही राहत आहोत अशी उपरेपणाची भावना त्यांच्यात येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामान्य घरातल्या मुलांनाही या वनात प्रवेश दिला जातो. ऊसतोड कामगार, अनाथ मुलामुलींबरोबरच अनेक सामान्य नागरिकांनीही मुलांना आमच्याकडे ठेवायला सुरुवात केली आहे. ‘शांतिवना’ला अनेक जण आर्थिक मदतही देत आहेत. आजघडीला ‘शांतिवन’च्या माझ्या संसारात ५०० मुले, १९ महिला आणि २२ कार्यकर्ते सुखेनैव नांदत आहेत.
या मुलांसाठी काम करीत असताना मला खूप आर्थिक खस्ता खाव्या लागल्या. सुरुवातीच्या काळात सावकारांकडून अवाच्या सव्वा व्याजाने पैसे काढले. हे पैसे फेडण्यासाठी आम्ही आमची वडिलोपार्जित सर्व शेती विकली. कारण सावकाराचा नेहमीचा तगादा असायचा. याच वेळी माझा मुलगा, चंद्रहास झाला. त्याला सांभाळताना त्याच्यावर माझ्याकडून अन्याय व्हायचा. पैशाची अडचण, आश्रमातील मुलांची सततची काळजी यामुळे माझी खूप तारांबळ व्हायची. चंद्रहासला दोन रुपयाचा बिस्किटचा पुडादेखील माझ्याकडून दिला जात नव्हता. आज चंद्रहास पाचवीत शांतिवनात शिक्षण घेतोय. चंद्रहासनंतर आपल्याला दुसरे अपत्य नको म्हणून ऑपरेशन केले. एके दिवशी किराणा आणण्यासाठी पैसे नव्हते. काय करायचे हा प्रश्न होता, पैसे कुणीच देत नव्हते. अशा वेळी मी संक्रांतीच्या दिवशी माझ्या अंगावरील सर्व दागिने, चंद्रहासच्या अंगावरील दागिने सोनाराकडे मोडले व त्या पैशातून मुलांना पुरणपोळीचे गोड जेवण दिले. बीड जिल्हा पत्रकार संघाने ‘शांतिवन’ला एक बस भेट दिली, त्यातून वाडी-वस्ती तांडय़ावरील मुले या बसने शिक्षणासाठी येतात. हे काम करीत असताना सुरुवातीपासून विरोध करणारे अनेक लोक अजूनही विरोधच करतात, मात्र सहकार्य करणारे व मदत करणारे अनेक हात सरसावले आहेत.
गेल्या वर्षी बीड जिल्ह्य़ातील भयावह दुष्काळाला तोंड देताना आश्रमातील झाडे जगविण्यासाठी नवीन शक्कल लढवली. आश्रमातील सातशे झाडांना पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही मुलांना या झाडाखालीच अंघोळ करायला, जेवणानंतर हात धुण्यास सांगितले. त्यामुळे ही सर्व झाडे आज हिरवीगार आहेत व मुलेही आनंदाने हे काम करताहेत.
आज मागे वळून पाहताना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी करू शकलो याचे समाधान वाटतेय. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही या मुलांना शिकण्याची गोडी वाटतेय, ही बाब सर्वाधिक अभिमानाची आहे. शिक्षण घेतल्याने या मुलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली व काही परिवार जरी त्यामुळे सुखी झाले तरी माझ्या कामाचे चीज होतेय, असे मी म्हणेन.

शांतिवनातील सेवा क्षेत्र आणि लक्ष्य :  स्थलांतरित ऊसतोड कामगारांची व स्थलांतरित कामगारांची मुले, ग्रामीण व शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत मुले, वेश्या, तमाशा कलावंत, देवदासी महिला यांची मुले, अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंग मुले, आपत्तीग्रस्त बालके आणि महिला.
शांतिवनातील उपक्रम :  *अवंती – अंबर मुलांचे वसतिगृह. यात २०० मुलांच्या निवासाची सोय केली आहे.  * सह्य़ाद्री मुलींचे वसतिगृहात ५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह आहे.  प्राथमिक शाळा, विज्ञान भवन, * नारी निकेतन – विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अनाथ आदी ४३ महिला येथे आहेत.
* नवी दिशा – ग्रामीण भागातील मुलांना वेगवेगळ्या दिशा दाखविणे * दत्तक योजना.
शब्दांकन – संतोष मुसळे
संपर्क- कावेरी नागरगोजे
शांतिवन
मु.पो. आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड,
पिन- ४३११२२.
मोबाइल क्रमांक-
९९२३७७२६९४, ९४२१२८२३५९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:01 am

Web Title: social worker kaveri nagargoje
टॅग : Pratyaksha Jagatana
Next Stories
1 माझं शिक्षण आणि आई
2 संगीत ‘मराठेशाही’
3 ‘मनगंगे’च्या निमित्ताने
Just Now!
X