* भाजी रस्सा यावर तेलाचा लालसर तवंग दिसण्यासाठी फोडणीत थोडी साखर घालावी म्हणजे भाजीला छान रंग येतो.
* दहीवडय़ाचं दही घुसळताना त्यामध्ये थोडे नारळाचे दूध घालावे. म्हणजे वडे स्वादिष्ट होतात.
* थंडीमध्ये दही लवकर लागत नाही. कुकर गरम करून विरजणाचे भांडं त्यात ठेवून कुकर बंद करावा म्हणजे दही छान तयार होते.
* कोथिंबीर निवडल्यावर देठे न टाकता त्यात कच्चे दाणे व हिरवी मिरची घालून थोडय़ा तेलावर परतून त्याची चटणी करावी. त्यात थोडे लिंबू पिळावे.
* लोणी कढवताना त्यात चार-पाच लवंगा घालाव्यात. तुपाला छान वास येतो.
* गवारची भाजी करताना त्यात शिजवताना थोडे दूध घालावे. भाजी छान मिळून येते.
* भजी करताना त्यात फक्त डाळीचं पीठ न घालता त्याबरोबर थोडे कमी ज्वारीचे, मुगाच्या डाळीचे पीठ व तांदुळाचे पीठसुद्धा घालावे म्हणजे भजी खुसखुशीत होतात. शिवाय कितीही भजी खाल्ली तरी त्रास होत नाही.
* वांगी, बटाटा, फ्लॉवर वगैरे भाज्या धुऊन मगच चिराव्यात. धुतलेले पाणी टाकून देऊ नये. त्या पाण्यामध्ये ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे उतरलेली असतात. ते पाणी भाजी शिजवण्यासाठी वापरावे.
सुनंदा घोलप- sunandaagholap@gmail.com