14 August 2020

News Flash

जीवन विज्ञान : भूक, आहार आणि तृप्ती

खायला सुरुवात केल्यावर चव लागल्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होऊन अधिक चांगली भूक लागते आणि आपण जे खातोय त्याचा पुरेपूर आनंद मिळतो.

पोट भरल्यावर समाधान होतं.

डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

कडकडून भूक लागली असताना जेवणाचा पहिला घास घेतला आणि वरणात मीठच नाही, असं लक्षात आलं तर अनेकांच्या तोंडाची चवच निघून जाते; पण पहिल्याच घासाला ‘अरे वा,’ असं वाटलं, तर अन्नग्रहणाचं समाधान मिळतं. आपण पंचेंद्रियांनी अन्न ग्रहण करतो. खायला सुरुवात केल्यावर चव लागल्यामुळे जठराग्नी प्रज्वलित होऊन अधिक चांगली भूक लागते आणि आपण जे खातोय त्याचा पुरेपूर आनंद मिळतो. पोट भरल्यावर समाधान होतं आणि शेवटी आपण तृप्त होऊन म्हणतो, ‘आता पुरे!’  माणसागणिक  बदलणारी खाण्याची भूक, त्यांचा आहार आणि अन्नग्रहणानंतरची तृप्ती या संकल्पनांविषयी..

मी ८—९ वर्षांची असेन तेव्हाची आठवण आहे. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता, ‘खाण्यासाठी जगता की जगण्यासाठी खाता?’ तशी मी पहिल्यापासून खादाड. त्यामुळे मला अगदी कारल्याच्या भाजीपासून पुरणपोळीपर्यंत सगळेच पदार्थ आवडायचे. मी धिटाईनं या वक्तृत्व स्पर्धेत, मी खाण्यासाठी जगते आणि हे कसं योग्यच आहे, हे ठासून सांगितलं. परीक्षकांना हसू आवरत नव्हतं माझं भाषण ऐकताना; पण बक्षीस मात्र, ‘जगण्यासाठी खाते’ याविषयी गंभीर भाषण केलेल्या मुलीलाच मिळालं.

तुम्ही स्वत:ला हा प्रश्न मनातल्या मनात विचारा बघू, ‘मी जगण्यासाठी खातो/खाते, की खाण्यासाठी जगतो/जगते?’ मला खात्री आहे, की एखादा अपवाद सोडला तर बहुतेक सगळे माझ्यासारखेच असतील; पण लोक हसतील म्हणून ते तसं सांगायला लाजतात. आपण खाण्यासाठी जगतो म्हणजे काय? आपलं आवडतं- म्हणजेच प्रेयस खाणं भरपूर खाता यावं आणि ते खूप र्वष खात राहायला मिळावं, असंच  सगळ्यांना वाटतं; पण हे करण्यासाठी आरोग्य राखणं आणि कोणताही विकार होऊ न देणं महत्त्वाचं असतं. विशेषत: मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाबाचा त्रास असे आजार अजिबात नकोत. अगोड, बेचव, अळणी खाणं किती दु:खदायक! असं म्हणतात, की आजारी पडण्याची तीन प्रमुख कारणं आहेत.  चुकीचं खाणं, चुकीच्या पद्धतीनं श्वास घेणं आणि चुकीचा विचार करणं. मधुमेह झाला तर  साखर, गोड आणि भात खाणं बंद, तर हृदयविकार म्हणजे सतत टांगती तलवार.  तेल, तूप, तळलेले पदार्थ, मिठाया खाणं एकदम वज्र्य. रक्तदाब वाढला तर मीठ कमी खाणं.  म्हणजे सगळ्या तिखट आणि चमचमीत पदार्थाचा फक्त वास घेऊन समाधान मानणं. अशा वेळी जेवण आणि जीवन किती निरस होईल.

भूक म्हणजे ‘हंगर’ आणि आहार म्हणजे ‘अ‍ॅपेटाइट’.  शरीराला अन्न हवं ही भावना म्हणजेच भूक लागणं. वय, लिंग, कामाचं स्वरूप आणि सवय यानुसार प्रत्येकाचा आहार कमी-जास्त असतो. ‘डाएट’ करणं म्हणजे कमी खाणं आणि स्वत:ला उपाशी ठेवणं हा गैरसमज आहे. ‘सटाईटी’ हा  तिसरा महत्त्वाचा शब्द. अर्थात खाण्याचं समाधान आणि तृप्ती. ही भावना तात्पुरती असली तरी फार महत्त्वाची आहे. गरिबीमुळे पुरेसं अन्न ज्यांना मिळत नाही अशा लोकांची शारीरिक उपासमार होते, तर काही आजारांमुळे किंवा वजन कमी करण्यासाठी जेव्हा कमी खावं लागतं अथवा काही पदार्थ खाण्यापासून वंचित राहावं लागतं, त्या वेळी मानसिक उपासमार होते. मग चिडचिड करणं, विक्षिप्तपणे वागणं, जगाला नावं ठेवणं,  जगणं निरस वाटणं, इतरांचा हेवा वाटणं, गरज नसताना खरेदी करणं, अशा अनेक प्रकारे मानसिक ताण बाहेर पडू शकतो. याचं कारण केवळ कमी खाणं नसून त्या व्यक्तीला खाण्याचं समाधान आणि तृप्ती मिळत नाही हे आहे. भूक, आहार आणि समाधान या तीन शब्दांचा अर्थ वेगळा आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ शरीर आणि उदरभरणासाठी नाही. आता आपण यज्ञ करत नसल्यामुळे ‘वदनी कवळ घेता’ या श्लोकामधल्या ‘जाणिजे यज्ञ कर्म’ या वाक्याला विशेष अर्थ राहिला नाहीये.  खाणं या क्रियेमध्ये केवळ समोरचा अन्नपदार्थच महत्त्वाचा असतो असं नाही, तर त्याबरोबर मित्रपरिवाराचा सहवास, आजूबाजूच्या इतर सामाजिक गोष्टी, आपली आर्थिक सुस्थिती या सर्व गोष्टींचा या क्रियेवर परिणाम होत असतो. भूक लागणं म्हणजे नेमकं काय होतं? मेंदूच्या मागच्या खालच्या बाजूस ‘हायपोथॅलॅमस’ हा जो मेंदूचा छोटा भाग आहे त्यात आपल्याला लागणारी भूक, खाल्ल्यानंतर पोट भरल्याची होणारी भावना किंवा अचानक काही कारणामुळे भूक मरून जाणं या सगळ्या गोष्टींची केंद्रं आहेत. त्यांचं संचालन करणं आणि नियंत्रण करणं, योग्य वेळ राखणं, यासाठीची ही केंद्रं आहेत.

आपल्याला भूक लागली आणि पोट भरून तृप्ती झाली हे आपल्याला कसं समजतं? पोटामध्ये जेव्हा खाणं जातं तेव्हा पोटावर एक दडपण येतं किंवा पोट जड होतं. ही भावना मेंदूकडे कळवली जाते. म्हणून पोट भरण्याची भावना येऊ शकते. तसंच पोटामध्ये अन्न जायला सुरुवात झाली, की ते हळूहळू पचायला लागतं आणि रक्तामध्ये जी साखर आहे तिचं प्रमाण वाढतं. तो एक संकेत त्या मेंदूच्या भागाला मिळतो. भूक लागणं या क्रियेत साधारण पोटाच्या- म्हणजे जठराच्या स्नायूंचं आकुंचन आणि प्रसरण व्हायला लागतं आणि ठरावीक वेळेला पाचक रस तयार होतात. खूप भूक लागली तर आपण म्हणतो, की माझ्या पोटात भुकेनं पिळवटतंय किंवा  पोटात कावळे ओरडत आहेत. स्नायूंची हालचाल जाणवायला लागते, म्हणजे आपली खायची वेळ झाली आहे. आपल्या शरीरात जैविक घडय़ाळ आहे. हे जैविक घडय़ाळ प्राण्यांनासुद्धा असतं; परंतु मानवाकडे एक बाहेरचंसुद्धा घडय़ाळ असतं. त्यामुळे कचेरीमध्ये जेवणाची वेळ झालेली असते तेव्हा किंवा रोज दुपारी १ वाजता जेवतो म्हणून त्या वेळेला आपण जेवायला बसतो, मग भूक असो वा नसो.

भूक लागण्याचा मानसशास्त्राशीही संबंध असतो. जर मुलं घराबाहेर खेळत असतील किं वा सुट्टीच्या दिवशी सगळ्या मुलांबरोबर बागडत असतील तर भुकेची वेळ झाली आणि टळून गेली तरीसुद्धा त्यांना भूक लागल्याची भावना होत नाही किंवा झाली तरी कळत नाही; पण अशा वेळेला त्यांना आपण दामटवून  जेवायला बसवलं तर ती व्यवस्थित जेवतात. म्हणजेच भुकेची भावना आणि आहार या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ज्याला ‘अ‍ॅपेटाइट’ म्हणतात तो तुमचा आहार.

काही असेही लोक असतात, की त्यांना भूक तीव्र असते, भूक लागल्यावर ते  बेचैन होतात आणि जर मधुमेहासारख्या आजारांचे रुग्ण असतील तर त्यांना रक्तातली साखर- ‘ग्लुकोज’ची पातळी एकदम कमी झाल्यामुळे आणखी समस्या निर्माण होतात. सामान्य आणि आरोग्य व्यवस्थित असलेल्या व्यक्तीलासुद्धा भूक लागली आणि त्यांना अन्न मिळालं नाही, तर पोटात कसं तरी व्हायला लागतं, कामात लक्ष लागत नाही, काही जणांचं डोकं दुखायला लागतं, तर काहींना चक्कर येते. तर अशी तीव्र भुकेची लक्षणं नसतानासुद्धा सर्व जण जेवायला बसलेत, मस्तपैकी गरम पोळ्या भाजल्या जात आहेत किंवा  छानसा पदार्थ किं वा आवडती भाजी शिजल्याचा वास येत आहे किंवा चमचमीत कांदाभजी तळल्याचा वास येतो आहे, तेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे सगळे पाचक स्राव स्रवू लागतात आणि भूक लागल्याची भावना होते.

ज्याला खरी भूक लागलेली नाही अशा माणसाला आपण जेवायला बसवलं तर ते कित्येकदा इतरांच्या एवढंच नेहमीसारखंच जेवतात. म्हणजे काही माणसं अशी असतात, की त्यांना तीव्र भूक लागतेच असं काही नाही. मागेपुढे जेवण झालं तरी  चालतं, पण एकदा का ते जेवायला बसले, की मात्र  पोटभर जेवतात. तिसऱ्या प्रकारची माणसं असतात त्यांना ‘अतिपचन’ हा विकार आहे. खाल्लं तरी कुठे जातं कळत नाही. ज्यांची भूक खूप तीव्र असते आणि आहार बेताचा असतो अशांना अतिपचन हा विकार असण्याची शक्यता आहे. पाचक रसाचा ‘पीएच’ बदलून थोडय़ा  प्रमाणात यावर नियंत्रण मिळवता येतं. म्हणजे ज्यांना भूक खूप आहे, पण खाल्लेलं अंगी लागत नाही, अशांनी जेवणाच्या आधी किंवा जेवत असताना थोडंसं पाणी पिऊन सावकाश जेवलं पाहिजे. तर ते अन्न नीट व हळूहळू पचेल आणि अंगी लागेल. ज्यांची भूक तीव्र नाही, पण आहार चांगला आहे, अशी व्यक्ती नेहमी स्थूल होण्याची शक्यता असते. जे नेहमीसारखे खाऊन, पिऊन किंवा जास्त खाऊन स्थूल आहेत त्यांनी मात्र जेवताना किंवा जेवायच्या आधी अजिबात पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर एका तासानं पाणी प्यावं.

भूक प्रज्वलित होण्यासाठी जसे स्वादिष्ट अन्नाचे वास महत्त्वाचे, तसंच ताटात अन्नपदार्थ योग्य पद्धतीनं वाढणंही महत्त्वाचं. त्याबरोबर बाजूला चांगले चमचे, भांडी, छान वातावरण, फुलं किंवा उदबत्तीचा सुवास, असं असेल तर आणखीनच चांगलं.  समजा, आपण वरणभाताचा पहिला घास घेतला आणि ‘अरेच्च्या, पानात तर मीठ वाढलेलंच नाही आणि वरणातसुद्धा मीठ नाही’ असं झालं तर? एकदम तोंडाची चवच निघून जाते. अशा वेळी एखादी व्यक्ती इतकी नाराज होते, की तिची भूक मरून जाते. पहिल्या घासालाच ‘अरे वा, मस्त!’ असं वाटलं तर अन्नग्रहणाचं समाधान व तृप्ती मिळेल. असं म्हणतात, की आपण पंचेंद्रियांनी अन्न ग्रहण करतो. कुरकुरीत पापड मऊ झालेला असेल तर त्याची आहारमूल्यं बदलत नाहीत, पण खाण्याचा आनंद? खायला लागल्यावर चव लागल्यामुळे  जठराग्नी प्रज्वलित  होऊन अधिक चांगली भूक लागते आणि आपण जे खातो त्याचा पुरेपूर आनंद मिळतो. पोट भरल्यावर समाधान होतं आणि शेवटी आपण तृप्त होऊन म्हणतो, ‘आता पुरे!’

थोडक्यात तीन मुद्दे लक्षात घ्यावेत. खाण्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा मेंदू हिशेब ठेवतो. काय खातो, कधी खातो आणि कसं खातो, यावर ‘हायपोथॅलॅमस’ या मेंदूच्या भागात खाण्याचं समाधान दडलं आहे. आतडय़ामधील मित्रजंतू,  शरीरातलं मेदाचं प्रमाण, बालपणापासून खाण्याच्या असलेल्या सवयी हेदेखील महत्त्वाचं. वय वाढतं तसं पचन मंद होतं, शारीरिक हालचाल आणि व्यायामही कमी होतो. ‘लेप्टिन’, ‘इन्शुलिन’ अशी संप्रेरकं कमी-जास्त झाल्यामुळे शरीर स्थूल होण्याचा संभव असतो. आर्थिक सुखवस्तूपणा आला की राहणीमानात बदल होतो.  या सगळ्यामुळे वजन वाढणं आणि राहणीमानामुळे येणारे आजार हळूहळू शरीरावर कब्जा करू पाहतात.

मनपसंत प्रेयस आणि पोटभर खाऊनदेखील वजन आणि आरोग्य कसं राखता येईल, हा प्रश्न आहे. बिरबलाची एक गोष्ट  अनेकांना माहीत असेल. शेळीचं वजन जरादेखील कमी किंवा जास्त होऊ न देण्याची जबाबदारी बिरबलावर सोपवली जाते. तो शेळीला दिवसभर पोटभर गवत खाऊ घालतो, त्यामुळे तिचं वजन कमी होत नाही आणि रात्री वाघाचं चित्र तिच्यासमोर लावून ठेवल्यानं तिचं वजन वाढतही नाही. म्हणजेच भरपूर खाणं मिळूनसुद्धा महिन्याभरात शेळीचं वजन जराही वाढलं नाही.

आपल्यासमोर  हे  आव्हान आहे,  निरोगी  राहायचं, आहार  पुरेसा घ्यायचा  आणि खाण्याचं समाधान व तृप्तीही  मिळवायची. त्यासाठी वर सांगितलेलं भूक, आहार आणि तृप्ती यातलं नातं समजून घ्यायला हवं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 1:01 am

Web Title: starvation diet satisfaction jeevan vidnyan dd70
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : ‘नासा’तल्या मानवी संगणक!
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : पणती जपून ठेवा..
3 अपयशाला भिडताना : ऋण
Just Now!
X