22 November 2019

News Flash

शंभर वर्षांची ‘चविष्ट’ कहाणी

उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र बेडेकरांचा’’ ही कॅचलाइन असणारे ‘बेडेकर मसालेवाले म्हणजेच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ ही १०० वर्षे जुनी

| May 4, 2013 01:01 am

‘‘उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा, दुसरा मात्र बेडेकरांचा’’ ही कॅचलाइन असणारे ‘बेडेकर मसालेवाले म्हणजेच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ ही १०० वर्षे जुनी अर्थात मुरलेली कंपनी. गरजेतून निर्माण झालेल्या या व्यवसायात आता चार पिढय़ा रमल्यात. त्यांची ही चविष्ट कहाणी ..
गरज ही शोधाची तशीच व्यवसायाचीही जननी असते. गरज हेरून ती व्यवस्थित पूर्ण करणारा व्यवसाय हा चाललाच पाहिजे यात शंका नाही. गोष्ट थोडी गमतीची आहे.. साधारण १९२१ साल असावं. गिरगावात किरणामालाचं दुकान चालवणारे विश्वनाथ बेडेकर गावी गेले होते.. कोकणात! इकडे दुकान त्यांचा मुलगा वासुदेव बघत होता. वासुदेव पडला तापानं आजारी. तोंडाला चव नाही, कंटाळला.. घरच्या जेवणाची.. लोणच्याची आठवण यायला लागली. माधवबाग, ठाकूरद्वार, क्रॉफर्ड मार्केट इथं त्या वेळी लोणची मिळायची. पण आवडायची नाहीत. शेवटी एका कुटुंबमित्रानं घरून थोडंसं मुरलेलं लिंबाचं लोणचं आणून दिलं. त्या साताठ फोडी वासुदेवानं महिनाभर पुरवून खाल्ल्या. ताप उतरल्याबरोबर वासुदेवरावांनी बाजारातून २०० लिंबं आणली आणि स्वत: साफ करून, काळजी घेऊन त्याचं लोणचं घातलं. दोन पैशाला एका लिंबाचं लोणचं या दरानं ते लोणचं लगेच संपलं. पुन्हा २०० लिंबं आणली. पहिलं लोणचं संपायच्या आत दुसरं मुरलेलं तयार पाहिजे. म्हणजे २-३ महिने आधीच घालायला हवं. हे अनुभवातून उमगलं. तेव्हा सुरू झालेलं हे लोणचं ‘घालणं’ आता हजारात नाही तर शेकडो टनात घातलं जातंय.
१९१० साली कै. विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सकाळी घरोघरी जाऊन काय हवंय विचारायचं आणि संध्याकाळी माल घरपोच करायचा. नंतर रात्री दिवसभराचे हिशेब लिहीत बसायचे. काही कुटुंबं ४-५ महिन्यांची उधारी थकवीत असत. मोठा जिकिरीचा काळ होता. भांडवल होतं ते म्हणजे सचोटी, प्रामाणिकपणा, स्वच्छ व्यवहार आणि मालाचा उत्तम दर्जा. या गुणांच्या जोरावरच बेडेकरांनी हा कसोटीचा काळ पार केला.
तशी वैश्यवृत्ती या घराण्यात पूर्वापार चालत आलेली होती. त्यामुळेच पौरोहित्य न करता त्रिंबक सदाशिव बेडेकर यांनी १८३० च्या सुमाराला भाताचा व्यवसाय केला. कुलाबा जिल्ह्य़ात भात भरपूर व्हायचा. तो भात आपल्या गावी नेऊन विकायचा. यासाठी त्यांनी चक्क स्वत:ची दोन गलबते बांधून घेतली. त्यांच्या गावी गोवळ परिसरात तागाच्या हातविणीच्या गोणी बनत. गावातल्या गोणी, लाकडी वस्तू तिकडे कुलाबा जिल्ह्य़ात आपटे – पनवेलला पोहोचवायच्या आणि भात घेऊन यायचा.
याच घराण्यातलं विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी मुंबईत गिरगावात पुढे दुकान सुरू केलं. त्यांचा मुलगा वासुदेव यानं तिखट – मसाले कुटून आपल्या दुकानात ठेवायला सुरुवात केली ते काही विश्वनाथरावांना फारसे आवडले नव्हते. पुढे विश्वनाथराव कोकणात परतले आणि वासुदेवानं तिखट, मसाल्याला ब्राह्मणी गोडय़ा मसाल्याची जोड दिली. लिंबाचं लोणचं लोकप्रिय केलं, कैरी तर त्यांच्याकडे आपणहून चालत आली.
एक दिवस कोकणातून बेडेकरांचे एक परिचित गिरगावात आले. त्यांनी कुणासाठी तरी घरच्या १५-२० हिरव्याकंच कैऱ्या आणल्या होत्या. ती मंडळी भेटली नाहीत घरात.. कैऱ्याचं ओझं पुन्हा कुठे वागवणार म्हणून, आता तुम्हीच संपवा, असं सांगून ते कैऱ्या दुकानात ठेवून निघून गेले.
वासुदेवराव खरे व्यापारी वृत्तीचे. त्यांनी त्या कैऱ्यांचं ताबडतोब लोणचं घातलं. पण नंतर स्वत: कैऱ्या विकत आणून विनायकरावांच्या परिचितांकडे पोहचवल्या तेव्हाच ते लोणचं विकलं. घराण्याचे मूल्यसंस्कार किती प्रभावी असतात.. नाही का?
मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर वासुदेवरावांनी दुकानांच्या शाखा काढायला – वाढवायला प्रारंभ केला. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये (पूर्वीच्या कोटात बझारगेट इथं) माणकेश्वर मंदिराजवळ. बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करून त्यानुसार व्यवहार सुरू राहिला.
योगायोगाने सुरू झालेल्या.. गरजेतून जन्मलेल्या या लोणच्यांमध्ये आता बेडेकरांनी चांगलंच नाव कमावलं आहे. लोणची – मसाले पापड-कुरडयांपासून आज आधुनिक जीवनाच्या गरजांप्रमाणे दिवाळीचा फराळ, बेसनलाडू, रेडी मिक्स ही सुद्धा लोकप्रिय उत्पादनं ठरली आहेत.
शंभराहून अधिक वर्षांच्या या वाटचालीचं रहस्य काय? दर्जा आणि चव हेच त्याचं उत्तर आहे. अत्युत्तम प्रतीचा कच्चा माल वापरणं, परंपरागत.. घरगुती अशीच उत्पादन प्रक्रिया आणि सुरक्षित आकर्षक पॅकिंग ही त्यांची व्यवसायाची त्रिसूची आहे. कैरीच्या लोणच्यात कोयी न घेणं.. रासायनिक पदार्थ न वापरता मीठ आणि तेलावर लोणचं टिकवणं हे एखाद्या गृहिणीच्या निगुतीनं बेडेकर सांभाळतात.
उत्तम आणि मनाचा ठाव घेणारी जाहिरात हे बेडेकरांचं वैशिष्टय़ं आहे. मन जिंकण्याचा मार्ग पोटातून जातो म्हणतात. पण पोटापर्यंत पोहचण्यासाठी जाहिरातीची आवश्यकता ओळखून    कै. वासुदेवरावांनी १९२१ पासूनच जाहिरातीची कास धरली. त्या काळात त्यांनी ‘श्रीलोकमान्य’ दैनिकात रोज एक इंचाची जाहिरात देण्याचा वर्षांचा करार केला. त्या काळाच्या मानानं हे पुढचं पाऊल होतं.
पुढे त्यांच्या चिरंजीवांनी वसंतरावांनीसुद्धा स्वत: जाहिरात विभागात लक्ष घातलं. ‘बेडेकर मसालेवाले.. लोणच्यात मुरलेले अन् मसाल्यात गाजलेले’ असं नाव त्यांनी गाजत ठेवलं. ‘‘उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर तुमचा दुसरा मात्र बेडेकरांचा’’ ही कॅचलाइन लिहिताना वसंतरावांनी प्रत्येक गृहिणीचा आत्मसन्मान छान फुलवला आहे. ‘‘मला येत नाही म्हणून बेडेकरांचा माल असं नाही, मला वेळ नाही म्हणून बेडेकर उत्पादनं आणतो’’ ही भूमिका प्रत्येक गृहिणीला सुखावणारी आहे.
आज जगात ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे अर्थातच बेडेकर उत्पादनंही पोहचली. बेडेकरांच्या चौथ्या पिढीनं पॅकिंगमध्येच नाही तर उत्पादन पद्धतीतही संपूर्ण आधुनिक यंत्रप्रणाली आणली आहे. अजित, अतुल आणि मंदार यांना उत्पादन, मार्केटिंग आणि अकौंट्स असे विभाग वाटून घेतले आहेत. वसंतरावांचं लक्ष चौफेर आहे.
पूर्वी गिरगावात पळसाच्या पानावर दोन पैशाला एक लिंबू विकलं गेलं. लाकडी पिंपात लोणच्याची साठवण.. पुढे काचेच्या बरण्या आल्या. पण हाताळायला अवघड त्यामुळे विस्तार महाराष्ट्रापुरताच. १९६० साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं.
आज कर्जतच्या फॅक्टरीत ६०० टन लोणचं सीझनला बनतं. आणि ही संपूर्ण प्रक्रिया यंत्रांद्वारे होते.
गेल्या काही वर्षांत बेडेकरांनी दिवाळीच्या फराळात प्रवेश केला अन् अनेक गृहिणींनी डोळे मिटून ऑर्डर्स नोंदवल्या. या टप्प्यावर वसंतरावांनी प्रथमच व्यवसायात आपल्या पत्नीची मदत घेतली. मुलं म्हणाली, आईसारखाच चिवडा बनवू या. आजीसारखाच लाडू हवा. मग काय.. उषाताईंनी सामान काढून द्यायचं.. वसंतरावांनी ते मोजायचं आणि प्रमाण लिहून कारागिरांकडे सोपवायचं. स्त्रियांच्या परंपरागत अनुभवाचं असं आगळं प्रमाणीकरण झालं. एरवी घरच्या स्त्रियांनी व्यवसायात लक्ष घालण्याची पद्धत बेडेकरांकडे मुळीच नव्हती. आता मात्र सुना म्हणजे सौ. अपर्णा, सौ. शिल्पा आणि सौ. अनघा या सीझनला मदत करतात. अन् घरातल्या समाजसेवी उपक्रमांमध्ये खूप लक्ष घालतात.
कोकणातल्या मूळ गावी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापासून ते शिकणाऱ्या मुलांना शिष्यवृत्या ज्ञानप्रसारासाठी व्याख्यानमाला, मंदिरांमधले उत्सव, कलांना प्रोत्साहन..
बेडेकरांचा हात देता आहे. उषाताई स्वत: संतवाङ्मयाच्या उपासक, सून सौ. अपर्णा संतसाहित्यात संशोधन करते आहे. कै. वासुदेवरावांची एक गोष्ट सांगतात.. लहानग्या वासुदेवाला कुणी दक्षिणा देऊ लागलं, त्यानं ती नाकारली. म्हणाला, ‘‘आजीनं शिकवलंय उताणा हात पसरायचा नाही. हात नेहमी पालथा पुढे यावा’’ म्हणजे हात देता हवा.
बेडेकरांच्या चार पिढय़ांनी आपल्या साऱ्यांना विविध चवींचं खायला घालून संतुष्टता दिली आहे. सातासमुद्रापलीकडे वसलेल्यांना मराठी चवीशी जोडून ठेवलं आहे. गेल्या पन्नास वर्षांत  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात असंख्य पुरस्कार मिळवले आहेत.. मराठी माणसाला कीर्ती मिळवून दिली आहे. यंदा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर उंबरगाव इथं बेडेकरांची आणखी एक नवीन सुसज्ज फॅक्टरी उभी राहते आहे. त्यातून टनावारी लोणचं रोज बाहेर जाईल आणि बेडेकरांवरचा खवय्यांचा विश्वासही वृद्धिंगत होत राहील. अशी ही शंभर वर्षांची कहाणी !

First Published on May 4, 2013 1:01 am

Web Title: story of v p bedekar family
टॅग Spices
Just Now!
X