सरपंच : साधना तिप्पनाकजे

सीमाताईंनी ‘राष्ट्रीय पेय जल योजना’ गावात येण्याकरिता प्रयत्न सुरू केले. योजना मंजूर झाल्यावर ३२ लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यातून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. नळयोजनेद्वारे घरोघरी पाणीपुरवठा होतो. या वर्षी उन्हाळ्यातही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्यांनी विकासकामे हाती घेत प्रौढांकरिता रात्रशाळा सुरू केली. प्राथमिक शाळा ‘डिजिटल’ केली. ‘राष्ट्रीय पेय जल योजना’ कार्यान्वित केली. त्यांच्या कामाची एक्स्प्रेस धावतेच आहे. परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातल्या वाघलगावच्या सरपंच सीमा घनवटे यांच्या कामाची ही ओळख..

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला देशभरात ‘प्रौढ साक्षरता अभियान’ मोठय़ा प्रमाणात राबवण्यात आलं होतं. काही ठिकाणी त्याला चांगलं यशही मिळालं; पण आपल्याकडे आजही कित्येक ज्येष्ठ नागरिकांना लिहिता-वाचता येत नसल्यामुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येतात. परभणीतल्या गंगाखेड तालुक्यातल्या वाघलगावच्या सरपंच सीमा घनवटे यांनी ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण दूर करण्याचं ठरवलं. स्वत:ची कागदपत्रं स्वत:ला वाचता यावीत, ती नीट तपासून त्यावर सही करता यावी, बसचा फलक स्वत:लाच वाचता यावा यासारख्या बाबींमध्ये ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी झालेच पाहिजेत, अशी कळकळ सीमाताईंना वाटत होती. सकाळच्या वेळेत शेती आणि घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नसल्याने सीमाताईंनी प्रौढांकरिता रात्रशाळा सुरू केली. आज या शाळेत गावातल्या बावीस स्त्रिया आणि बारा पुरुष शिक्षण घेत आहेत. साक्षर होत आहे.

सीमाताई लग्नानंतर वाघलगावात आल्या; पण पतीच्या व्यवसायामुळे त्यांचं कुटुंब आठ किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी, गंगाखेडमध्ये स्थायिक झालं. सीमाताईर्ंच्या सासूबाईंनी त्यांच्याकडे आग्रहच धरला, ‘‘तुझं शिक्षण झालंय, घरात अडकून नको राहूस, स्वत:ची ओळख निर्माण कर.’’ सीमाताईंच्या यजमानांचंही हेच म्हणणं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी अखेर सासूबाईंचं म्हणणं सीमाताईंनी गांभीर्याने घेतलं. त्यांना शिवणकाम येत होतंच. त्यांनी गंगाखेडमध्ये शिवणकामाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. याच वेळी स्त्रियांचा बचतगट बनवण्याचं त्यांनी ठरवलं. शिवणवर्गाला येणाऱ्या स्त्रियांमधूनच २००५ मध्ये सीमाताईंच्या नेतृत्वाखाली दहा जणींचा पहिला बचतगट तयार झाला. मात्र त्यांनी स्वत:ला फक्त बचतगटापुरतं मर्यादित ठेवलं नाही. गंगाखेड तालुक्यात स्त्रियांना येणाऱ्या कोणत्याही अडचणीला हा बचतगट धावून जायचा. आसपासच्या गावांतील स्त्रियांना सीमाताई आणि त्यांच्या सहकारी आधार वाटू लागल्या. यामुळे हळूहळू सीमाताईंचा हुरूप वाढू लागला. सीमाताई हुंडय़ाविरोधात, स्त्री अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या. गंगाखेडला राहत असल्या तरी त्यांचं वाघलगावला नियमित जाणं-येणं होतंच. तिथल्या स्त्रियांचे प्रश्नही त्या सोडवू लागल्या. पती-पत्नीमधील भांडणं सोडवणं, दारू किंवा हुंडय़ामुळे होणाऱ्या त्रासातून स्त्रीची सुटका करणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं, घरात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळेल याकरिता प्रयत्न करणं, ही कामं त्या वाघलगावातही करत होत्याच.

सीमाताईंच्या या सगळ्या कामांची दखल घेत परभणी जिल्हा पोलीस आयुक्तालयाने २०१२ मध्ये त्यांची ‘गंगाखेड तालुका महिला दक्षता समिती’त सदस्या म्हणून निवड केली. सीमाताईंनी स्थापन केलेल्या पहिल्या बचतगटाला गंगाखेडला २०१३ मध्ये रेशन दुकान चालवायला मिळालं. वाघलगावातल्या स्त्रियांच्या तीन बचतगटांचे हिशोब तपासून देणे, त्यांच्या नोंदी करणे, त्यांना प्रशिक्षण देणे ही कामंही त्या करून द्यायच्या. या बचतगटांच्या माध्यमातून स्त्रियांनी म्हशी, शेळ्या खरेदी केल्या. शहरातील दुकानांना मिरच्या कुटून देणे, काळा मसाला तयार करून देणे ही कामं करण्यासोबतच काहींनी स्वत:चं रांगोळी, खेळण्यांचं दुकानही सुरू केलं. सीमाताईंच्या कामाची एक्स्प्रेस अशा प्रकारे वेगाने धावतच होती. २०१३ मध्ये वाघलगावात ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. सरपंचपद अनुसूचित जमातीच्या स्त्रीकरिता राखीव होतं.

बचतगटाच्या स्त्रिया सीमाताईंना निवडणूक लढा म्हणून आग्रह करू लागल्या. सीमाताईंनाही ते पटलं. निवडून आल्यावर अधिकार मिळतील आणि लोकांची कामं करणं अधिक सोपं होईल, या विचाराने त्यांनी निवडणूक लढवली. त्यांचे यजमानही निवडणुकीला उभे राहिले. दोघंही पती-पत्नी निवडून आले. सीमाताई सरपंचपदी निवडून आल्या. आणि पहिलं काम शाळेचं केलं. गावात सहावीपर्यंत शाळा, पण कमी पटसंख्येमुळे सहावीचा वर्ग बंद झाला होता. आता गावात पाचवीपर्यंत शाळा आहे. शाळेत दोन शिक्षक; पण दोन्ही शिक्षकांचं शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलं जात होतं. सीमाताईंनी त्या दोन्ही शिक्षकांना सुरुवातीला तंबी दिली; पण त्यांच्यात काही सुधारणा झाली नाही. मग प्रशासनाकडे त्यांची तक्रार केली. त्या दोघांच्याही बदल्या झाल्या. शाळेत नवीन शिक्षक रुजू झाले. नवीन शिक्षकांच्या योग्य शिकवण्यांमुळे मुलांना शिक्षणाची गोडी वाटू लागली. शाळा ‘डिजिटल’ करण्यात आली. शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावं, मुलांना आणि शिक्षकांनाही काही अडचणी येऊ नयेत याकरिता सीमाताईंनी पालकांची समिती निर्माण केली.

पालक समितीचे सदस्य शाळेला नियमित भेट देतात. त्यामुळे शिक्षकांवरही उत्कृष्ट काम करण्याचा दबाव राहतो. शाळेच्या पायाभूत सुविधांकडेही सीमाताईंनी लक्ष दिलं. चौदाव्या वित्त आयोगातून इमारतीची फरशी बदलली, पत्रे बदलण्यात आले, रंगकाम करण्यात आलं आणि मुलांसाठी वजनकाटा घेण्यात आला. अंगणवाडीतही खेळणी, खुच्र्या घेण्यात आल्या. शाळेचं मदानही मुलांच्या दृष्टीने सपाट करून घेण्यात आलं. परभणी-नांदेड मुख्य रस्त्यापासून वाघलगाव अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे; पण हायवेपासून गावात येण्याकरिता नीट रस्ता नव्हता. दीड किमीचं अंतर पार करायला एक तास लागायचा. गरोदर स्त्रिया, रुग्णांचे खूपच हाल व्हायचे.

सीमाताईंनी २०१३ मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना याबाबत अर्ज लिहिला. त्यांनी याची तात्काळ दखल घेत त्यांच्या खासदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून या दीड किमी अंतरावर मुरूम, गिट्टी टाकून रस्ता मजबूत करून घेण्यात आला. आता याच रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता रामदास आठवले यांनी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. हे काम सध्या सुरू आहे. वाघलगावची लोकसंख्या अवघी सहाशे. मराठवाडय़ातील बहुतांश गावांप्रमाणेच वाघलगावातही पाऊस नाही. त्यामुळे शेती नाही. बरेचसे लोक कामधंद्याकरिता मुंबई-पुण्याकडे गेलेत. गावचं उत्पन्नही खूप मर्यादित आहे. सीमाताई यातून वाट काढत गावात विकासकामे करत आहेत. दलित वस्तीतल्या नाल्याच्या कामांकरिता आणि अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाकरिता परभणी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतींकडून पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आणि ही कामेही २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली.

परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या निधीतून प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. गावापासून दोन किमी अंतरावर ग्रामपंचायतीची विहीर आहे, पण तिला फारसं पाणी नसायचं. पाणी असलं तरी गावची नळयोजना नसल्यामुळे रोजच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची. विहिरीपासून काही अंतरावरच मासोळी नदी वाहते. २०१८ मध्ये सीमाताईंनी या विहिरीचं खोलीकरण करून घेतलं आणि ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पध्रेत भाग घेण्याकरिता गावकऱ्यांचं मन वळवलं. या स्पध्रेअंतर्गत नदीपासून विहिरीपर्यंत सोळा बांध बांधण्यात आले. त्यामुळे विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी जमा होऊ लागलं.

सीमाताईंनी ‘राष्ट्रीय पेय जल योजना’ गावात येण्याकरिता प्रयत्न सुरू केले. योजना मंजूर झाल्यावर ३२ लाखांचा निधी मिळाला. त्यातून गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. विहिरीपासून टाकीपर्यंत पाइप टाकण्यात आला. आता टाकीत पाणी जमा होतं आणि नळयोजनेद्वारे घरोघरी पाणीपुरवठा होतो. स्त्रिया आणि लहान मुलांच्या तोंडावर हास्य आलं. या वर्षी उन्हाळ्यातही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही.

सीमाताईंची इतर कामंही सुरूच होती. समाजकल्याण निधीचा वापर करत त्यांनी संपूर्ण दलित वस्तीत सौर पथदिवे बसवले. राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या खासदार निधीतून मंदिर प्रांगणात ८० हजारांचा ‘मिनी हाइट स्मार्ट लाइट’ बसवण्यात आला आहे. यामुळे आसपासच्या परिसरात रात्री चांगला उजेड पसरतो.

सीमाताईंच्या प्रयत्नांतून गावात पंचायत समितीमार्फत अडीचशे शौचालये बांधण्यात आली. संपूर्ण गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये असली तरी बरेचसे लोक उघडय़ावरच शौचालयाला बसत. समजावून सांगूनही ते शौचालयांचा वापर करत नव्हते. याला आळा बसवण्यासाठी सीमाताई आणि बचतगटातील स्त्रियांनी ‘गुड मॉर्निंग  कँपेन’ सुरू केलं. पंचायत समिती अधिकाऱ्यांचीही साथ मिळाली. उघडय़ावर शौचाला बसणाऱ्या लोकांना ‘गुड मॉर्निंग  शुभेच्छापत्र’ देऊन गुलाबाचं फुलं देऊन सत्कार करायला त्यांनी सुरू केली. या कँपेनमुळं गावात चांगलाच फरक पडला. लोकांनी उघडय़ावर शौचाला जाणं बंद केलं आणि संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झालं. ‘रमाई योजने’तून आठ घरकुलं झालीत. दोन वर्षांपूर्वी ‘वरंगळा बालाविकास संस्थे’ने गावाला पाणी शुद्धीकरणाकरिता मशीन दिलं. हे मशीन सुरू झाल्यानंतर गावकऱ्यांनी लोकवर्गणीद्वारे संस्थेला मशीनची संपूर्ण रक्कम दिली. तीन रुपयांना वीस लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

गावात सीमाताईंची पूर्वीपासूनच उत्साहात कामं सुरू होती; पण सरपंचपदाच्या सुरुवातीला गावातील काही प्रस्थापितांकडून त्यांना विरोध होत होता. कारण त्यांच्या कारकीर्दीत गावात कामं झाली नव्हती. ग्रामसेवकही कामात चालढकल करत होते. गावात येतच नव्हते. सीमाताईंनी तक्रारअर्ज करून ग्रामसेवकाचीही बदली करवली. सीमाताई सरपंच होण्यापूर्वी गावात कधीही ग्रामसभा होत नव्हत्या. सीमाताईंमुळे गावात कामं वेगाने होऊ लागली होती. सीमाताईंचा मान गावात आणखी वाढू लागला. हे सहन न झाल्यामुळे सीमाताईंच्या कामात अडथळे आणले जाऊ लागले. ग्रामसभेतही या विरोधकांकडून अडचणी निर्माण केल्या जायच्या. सीमाताईंनी कोणाशीही वाद न घालता यावर तोडगा काढला. ताईंनी विरोधकांना मोठेपणा द्यायला सुरुवात केली. ताई समस्या मांडत आणि सरळ ग्रामसभेतच या लोकांच्या समस्यांचं निराकरण विचारू लागल्या. हे लोक जर ग्रामसभेत आले नाहीत तरी त्यांना ग्रामसभेवेळी आवर्जून बोलावणं पाठवलं जायचं.

सीमाताईंच्या या प्रयत्नांमुळे हळूहळू विरोध मावळू लागला. आज सर्व गाव एकजुटीने गावविकासाची कामं करत आहे. गावात शंभर टक्के तंटामुक्ती आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाणही शून्यावर आलंय. पूर्वी ग्रामसभाच होत नसल्यामुळे महिलासभाही नव्हत्याच. सीमाताईंनी गावातल्या प्रत्येक स्त्रीशी वैयक्तिक संपर्क साधून महिलासभेचं महत्त्व पटवून दिलं. बचतगटांना हाताशी धरलं. आज बचतगटातील दबावगटामुळे महिलासभाही चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.

स्त्रिया महिलासभांसोबतच ग्रामसभेतही चांगल्याच सक्रिय आहेत. सीमाताई गावात राहत नसल्या तरी दोन दिवसांआड त्यांची गावात फेरी असते. गंगाखेडच्या त्यांच्या कार्यालयात त्या रोजच उपस्थित असतात. त्यामुळे गावकऱ्यांना पंचायत समितीतल्या कामांना मदत होते. अवघ्या एकतीस वर्षांच्या सीमाताई अतिशय उत्साहात आपल्या कामाची, गावाची माहिती सांगतात. अजूनही त्या गावातील स्त्रियांकरिता शिवणवर्ग घेतात. आपलं वैयक्तिक काम सांभाळून, दक्षता समिती, ग्रामपंचायतीचं काम करणाऱ्या सीमाताई सतत व्यग्र असतात. सीमाताईंना कोणती गोष्ट समाधान देते, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी सरपंच होण्यापूर्वी स्त्रिया फक्त पाण्याकरिता आणि शेतीच्या कामाकरिता बाहेर पडत असत. घरातही दबक्या आवाजात बोलत. त्या इतक्या सक्षम झाल्यात की, कोणत्याही अधिकाऱ्यासमोर आत्मविश्वासाने बोलतात, स्वयंपूर्ण झाल्यात. त्यांनी गावाला एकसंध केलंय.’’

सीमाताईंना यापुढेही स्त्री सक्षमीकरण आणि राजकारणात बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. ताईंना त्यांच्या कामात अधिकाधिक यश लाभावं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन गावागावांमध्ये अशा सीमाताई निर्माण व्हाव्यात, हीच सदिच्छा.-  sadhanarrao@gmail.com chaturang@expressindia.com

सीमाताईंचं विशेष कौतुक करावंसं वाटतं, ते यासाठी, की गावचं उत्पन्न कमी असलं तरी गावात विकासकामं थांबली नाहीत. त्यांनी त्याकरिता पंचायत समिती सदस्य व स्थानिक खासदारांसोबतच राज्यसभा खासदारांकडे पाठपुरावा करून गावातल्या कामांकरिता निधी मिळवला. योग्य प्रकारे, चांगल्या दर्जाने ही कामं पूर्ण केली.