नोकरी सोडल्यावर नुसतं घरकाम न करता काय वेगळं करता येईल या विचारातून त्या अनोळखी दोघी एकत्र आल्या आणि आपल्या पाककलेलाच व्यवसायाचं रूप देऊन ‘सुरुची’  कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा व्यवहार कोटय़वधी रुपयांच्या आकडय़ात गेला आहे. प्रामाणिकपणा व सचोटीने यश मिळवता येतं ते असं. आयुष्यात कष्टाने कोटींपर्यंत झेप घेता येते, याचा वस्तुपाठ या दोघींनी,सुजाता परांजपे आणि भाग्यश्री प्रभुघाटे यांनी घालून दिला आहे.
दो घीही सामान्य-मध्यमवर्गीय कुटुंबातील. एकाच बंगल्यात खाली-वर राहणाऱ्या. ना रक्ताच्या नात्याच्या, ना ओळखीच्या. दोघीही मुंबईत नोकरी करणाऱ्या. सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातून ८-३० किंवा त्या पुढची लोकल पकडणाऱ्या. नोकरी करता करता घरात मुलं आली. त्यांच्या शाळा. कुटुंबाचा वाढता पसारा आवरता आवरता दोघींची दमछाक होऊ लागली. मग दोघींनीही मुलांचे, त्यांच्या शाळा, शिक्षणाचे, घरच्यांचे कोणत्याच बाबतीत हाल नको म्हणून नोकऱ्या सोडून सगळा वेळ घरासाठी देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सगळं ठीक होतं . पण नंतर नंतर काम करून उरलेला दिवस कसा घालवायचा हा प्रश्न दोघींनाही छळू लागला आणि काही तरी करायला हवं, हा विचार दोघींच्याही मनात स्वतंत्रपणे घोळू लागला. विचार करणाऱ्या व्यक्ती दोन असल्या तरी तो विचार एकच असल्याने त्यांची भेट होणं अपरिहार्य होतं, तसंच घडलंही.
एक दिवस दोघीही आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी येत असताना आपल्या राहत्या बंगल्याच्या पायरीपाशी भेटल्या. जुजबी गप्पा झाल्यावर एकीने मी घरासाठी नोकरी सोडल्याचे सांगितले. दुसरीनेही त्याचीच री ओढली. घरात दिवस जाता जात नाही, हा एकच सूर दोघींच्या तोंडून बाहेर पडला. काही तरी घरबसल्या करावं असाही विचार एकदम व्यक्त झाला. झालं, दोघींचं टय़ुनिंग इथंच जुळलं. घरबसल्या दोघींनीही भोजन, मिष्टान्न, खाद्याच्या सेवा (कॅटरिंग) देण्यासाठी  प्रयत्न करायचे, असा विचार व्यक्त करून कॅटरिंग व्यवसायाचा श्रीगणेशाही केला.
कष्ट, मेहनत, सचोटी, विश्वासाह्र्रता या बळावर या दोघींचा घरात सुरू झालेला कॅटरिंग व्यवसाय दरवाजा, गाळे ओलांडून चार माळ्यांच्या भव्य वातानुकूलित सभागृहांत कधी पोहचला ते या दोघींनाही कळले नाही. त्या दोघी आहेत, सुजाता विवेक परांजपे आणि भाग्यश्री प्रज्ञेश प्रभुघाटे.
या दोघींशी गप्पा मारताना शून्यातून उभ्या राहिलेल्या कॅटरिंग व्यवसायाची अनेक गुपिते उघड झाली.
कॅटरिंगमध्ये येण्यापूर्वी दोघींनीही काही वेगळं करायचा विचार केला होता, परंतु त्यात यश आलं नाही. पण जेव्हा कॅटरिंगमध्येच काही तरी करायचं हे नक्की झालं तेव्हा त्यांच्या मदतीला आल्या त्या आत्तापर्यंतच्या ओळखी. ओळखीच्या लोकांशी फक्त बोलून त्यांना जेवणाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. घरबसल्या भोजन, मिष्टान्न पदार्थांच्या १० जणांच्या, २० जणांच्या जेवणाच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. हे भोजन घरी तयार करायचे आणि कार्यक्रमस्थळी घेऊन जायचे असा शिरस्ता दोघींनी पाळला. छोटय़ा छोटय़ा खाद्यपदार्थांच्या ऑर्डर सुरू असतानाच सुजाता आणि भाग्यश्री यांना नमिता जोशी यांच्याकडून ३०० मेथीच्या पराठय़ांची ऑर्डर मिळाली. ही ऑर्डर या दोघींच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरली. त्यानंतर तीनशे हा आकडा वाढत वाढत पाचशे, हजारापर्यंत गेला. पसारा वाढतच गेला..
या साऱ्या यशामागे त्यांची काही तत्त्वे होती. ती कठोरपणे पाळण्यात त्यांनी कसूर केली नाही. जेवण असो वा मिष्टान्न, त्याच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड केली नाही. या बाबतीत तक्रार येता कामा नये, हा कटाक्ष असल्याने त्यांच्या भोजनाचा स्वाद घेणाऱ्या मंडळीकडूनच आपसूकपणे  त्यांच्या कॅटरिंगची जाहिरात होऊ लागली. या प्रसिद्धीमधून घरबसल्या विविध प्रकारच्या कॅटरिंगच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. वाढता व्यवसाय घराच्या चौकटीपलीकडे वाढू लागला, म्हणून त्यांनी डोंबिवलीत टंडन रोडवरील जागेत आपलं कार्यालय सुरू केलं. रस्त्यालगत असल्याने येता जाता नागरिकांच्या चौकशा सुरू झाल्या. लग्न, वाढदिवस, डोहाळजेवण, बारसं अशा विविध प्रकारच्या ऑर्डरचा दररोज खच पडू लागला. या धबडग्यातच डोंबिवलीतील चित्तपावन ब्राह्मण संघ हॉल, माधवाश्रम या ठिकाणची भोजनाची कंत्राटे मिळाली. सुग्रास भोजनाच्या लज्जतीची जाहिरात कर्णोपकर्णी झाली. खाद्यपदार्थांच्या मुरुड-जंजिरा येथील प्रदर्शनात जाहिरातीचा एक भाग म्हणून सहभागी होण्याचा दोघींनी निर्णय घेतला. आपल्या स्टॉलला नाव काय द्यायचे असा प्रश्न उभा राहिला. आता नव्यानेच व्यवसाय सुरू केलाय म्हणून व्यवसायाला ‘सुरुची’ नाव देण्याचा निर्णय पक्का झाला. गेल्या सात वर्षांपासून ‘सुरुची कॅटरिंग’ या नावाखाली सुजाता आणि भाग्यश्री यांचा व्यवसाय सुरू आहे.
डोंबिवलीत ब्राह्मण सभेच्या नवीन वास्तूचे जूनमध्ये उद्घाटन झाले. चार सभागृह असलेल्या या कॉपरेरेट इमारतीत आपल्याला कधी वाव मिळेल असे कधी या दोघींना वाटले नव्हते. ब्राह्मण सभेतील भोजनव्यवस्था, देखभाल व इतर सेवांचे नियोजन करण्यासाठी निविदा पद्धतीने ठेकेदारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यात दिग्गज १६ भोजन कंत्राटदार होते. या स्पर्धेत आपण सावलीलाही टिकणार नाही, असे दोघींना वाटत होते. पण निविदा भरून बघू असा विचार करून या दोघींनी मोठय़ा धाडसाने ब्राह्मण सभेचा ‘ठेका’ मिळण्यासाठी निविदा भरली आणि त्यांच्या कामाचं चीज झालंच. ब्राह्मण सभा व्यवस्थापनाने मोठय़ा विश्वासाने या दोघींना या कामाचा ‘ठेका’ देऊन या दोघींच्या कामाप्रती आदरभाव व्यक्त केला. गेल्या सात-आठ वर्षांपासूनचा अनुभव पाठीशी असल्याने मोठय़ा धाडसाने या दोघींनी ब्राह्मण सभेचे सुमारे कोटय़वधी रुपयांचे कामाचे कंत्राट घेतले आहे. ब्राह्मण सभेत दररोज दहा कर्मचारी काम करीत आहेत. चारही सभागृहांमध्ये एकाच वेळी कार्यक्रम असतील तर दररोज ७०-८० कर्मचारी राबत असतात. प्रसंगी स्वत: वाढपी म्हणून काम करण्यापासून देखरेख करण्यापर्यंत सगळीच कामे त्या करतात. यामुळे भोजनाचा स्वाद घेणारा हात धुतल्यानंतर वाढपींजवळ हळूच ‘व्वा भोजन सुंदरच होते’ अशी पावती देऊन या दोघींच्या कामाचे कौतुक करतात.
 केवळ मराठी वा नेहमीचे भोजन वा खाद्यपदार्थ देणाऱ्या या दोघींनी आता आपल्या व्यवसायाचा परीघ वाढवलाय. गुजराथी, दाक्षिणात्य, कोणत्याही जात, धर्म, पंथांच्याही ऑर्डर्स् स्वीकारल्या जातात. कार्यक्रम असेल त्या पद्धतीने सर्व व्यवस्था केली जाते.
हा सगळा कामाचा व्याप सुरू असतानाच दोघींची ‘सरस्वती भोजनालय’ नावाने खानावळ सुरू आहे. अर्थात आजही एकाच स्कूटरवरून या दोघी व्यवसायाचं गणित सांभाळत आहेत. त्यात त्यांचे कष्टही प्रचंड आहेत. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दोघींचा हा रहाटगाडा सुरू असतो. त्यांच्या या कामात नियोजन असल्याने सर्व आघाडय़ांवर पळापळ करूनही या दोघीही संध्याकाळच्या वेळेतही तितक्या ताज्यातवान्या असतात. या वैशिष्टय़ाविषयी सुजाता आणि भाग्यश्री यांनी सांगितले, कार्यक्रमासाठी आलेल्या ग्राहकांचे समाधान, त्यांच्याकडून मिळणारी कामाची पावती हेच आमचे शक्तिसामथ्र्य आहे. दोघींच्याही घरातील सासू, सासरे, पती आणि मुलांच्या पाठिंब्यामुळे हे सहज शक्य झाले आहे. घरात मुलांना डबा देण्यास उशीर झाला, त्यांना शाळेच्या बससाठी सोडण्यास उशीर झाला तर ही कामे सासू, सासरे,पती करीत असतात. आई नाही म्हणून जेवण नाही, अभ्यास नाही असा मुलांचा कधी आमच्यासाठी हट्ट नसतो. या सगळ्या पाठबळामुळे आम्ही या व्यवसायात वाटचाल करीत आहोत, असे या दोघींचं म्हणणं आहे.
 प्रामाणिकपणा व सचोटीने यश मिळवता येते ते असे. आयुष्यात कष्टाने कोटीपर्यंत झेप घेता येते, याचा वस्तुपाठ या दोघींनी घालून दिला आहे.

Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ
various social and farmers organizations sacrifice food against government farmer policies
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग….