03 April 2020

News Flash

सुत्तडगुत्तड : बबन्या

काळ साधारण ऐंशीच्या सुमाराचा. एका हायस्कुलात मास्तर होतो. बबन नावाचा एक विद्यार्थी सहावीच्या वर्गात होता.

(संग्रहित छायाचित्र)

राजन गवस

बबन्याला नंतर मी कधी हात लावला नाही. पण त्याच्याशी दोस्ती जमली. रविवारचा संपूर्ण दिवस त्याच्याबरोबर जायला लागला. जंगलातल्या प्रत्येक दारूभट्टीचा शोध, तिथं काम करणारे लोक, त्यांची यंत्रणा, त्यांचे पोलिसांशी असणारे व्यवहार, कच्चा माल, दारू गाळण्याची संपूर्ण प्रक्रिया हे समजून घेत गेलो. संपूर्ण जगच वेगळं. तिथंच बबन्याची आई भेटली. तिच्या बेडरपणाच्या अनेक कथा-दंतकथा ऐकल्या. तिला वाटायचं तिच्या मुलानं शिकलं पाहिजे. अनेक भट्टय़ांचे तळ बघितले, पण अशी बाईच भेटली नाही. त्यामुळे बबन्यावर अधिक जीव बसला. अखेर बबन्या ‘मोठा’ झालाच.

काळ साधारण ऐंशीच्या सुमाराचा. एका हायस्कुलात मास्तर होतो. बबन नावाचा एक विद्यार्थी सहावीच्या वर्गात होता. कधी तरी शाळेत उगवायचा. ‘गैरहजर का होतास?’ असं विचारलं की बोलायचा काहीच नाही. काही केलं तरी त्याच्या तोंडातून ‘ब्र’ निघायचा नाही. खूप बडवायचो, तुरकाठीसारखे माझे हात दुखायचे पण पठ्ठय़ाच्या चेहऱ्यावर रेघ नाही. कंटाळून गप्प बसायचो.

बबन्या एकदम बुद्धिमान. कधी तरीच यायचा, तरीही पहिल्या पाचांत नसला तरी बऱ्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचा. तो नियमित वर्गात आला तर पहिल्या पाचांत असणारच याची खात्री होती. म्हणून माझे सगळे प्रयत्न चाललेले असायचे. पण तो दादच द्यायला तयार नव्हता. त्याच्या घरच्यांना गाठावं, त्यांना समजून सांगावं असं मनात आलं आणि त्याच्याविषयी चौकशी सुरू केली. तर तो तीन मल दूरच्या तळावर राहतो. फक्त पायवाट आहे पण सायकल जाते, असं पोरांनी सांगितलं. एक-दोन पोरं बरोबर यायला तयार झाली. शाळेच्या वेळेत जाणं शक्य नव्हतं म्हणून शनिवारचा दिवस ठरवला. शाळा सुटल्या सुटल्या रस्त्याला लागलो. बरोबरच्या पोरांनी भाडय़ाच्या सायकली घेतल्या होत्या. त्यावेळी तासावर भाडय़ाने सायकली मिळायच्या. गाव सोडून डोंगराचा रस्ता धरला. कच्चा रस्ता संपला आणि पायवाटेला सायकली लागल्या. भोवती किर्र झाडी आणि शेंबाटीच्या जाळ्या. शेंबाटीत शर्ट अडकला की फाटल्याशिवाय निघतच नाही. दोन माणसं कशीबशी चालत जातील अशी पायवाट. एक-दीड किलोमीटर गेल्यावर सायकल चालवणं कठीण झालं. बरोबरची पोरं म्हणाली, ‘‘सर सायकल इथंच ठेवून चालत जाऊ.’’ हा पर्याय एकदम आवडला. सायकली वाटेच्या आतल्या बाजूला झाडाला टेकवल्या. चालायला सुरुवात केली. पण वाट आटपायला तयार नव्हती. भोवती पक्ष्यांचे विविध आवाज आणि पाचोळ्यात कसलीबसली सळसळ. कोणाचा सासुलही नाही. बरोबरची पोरं चालता चालता या तळाच्या विविध भयकथा सांगत होती. हे लोक ठरवून दरोडा घालतात. हाणामारीत एकदम निब्बर. एखाद्याला ठरवून मारून टाकतात. अमक्याला असा मारला, तमक्याला तसा मारला. असं बरंच काय काय. वाट सरायला ते उपयोगी होतं.

तळावर पोहोचलो. तर चिटपाखरू नाही. आठ-दहा घरं. त्यातली तीन-चार पक्क्या भिंतीची. बाकी सगळी खोपटं. फक्त वर खापऱ्या. पाल्यानं शेकरलेले मांगर. सगळी दारं बंद. कोणच कसं वस्तीत नाही? बरोबरच्या पोरांनी मोठय़ानं बबन्याला हाक मारली. काहीच प्रत्युत्तर नाही. नंतर पोरांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. तर एक दार किलकिलं झालं. म्हातारी बाहेर आली. म्हणाली, ‘‘कुनचा बबन्या रं बाबांनू? संतीचा की लखमीचा?’’ आली का पंचायत? तरी पोरांनी ‘शाळा शिकतोय तो,’ असं सांगितलं. त्याला भेटायला मास्तर आल्यात म्हटल्यावर एकदम सगळी दारं उघडली. एक थोराड बांध्याची म्हातारी पुढं येतच म्हणाली, ‘‘त्यो भट्टीवर असंल.’’ आणि तिनं जोराची शिट्टी घातली. तिकडून दोन शिट्टय़ांचे आवाज आले. थोराड म्हातारीनं घरातलं पोतं पटकन आणून वट्टीवर अंथरलं. म्हणाली, ‘‘टेका. येतंयच आता.’’

दहा-पंधरा मिनिटांत बबन्या हजर. आम्हाला बघितल्यावर मेल्याहून मेल्यासारखा एकदम दगड! म्हटलं ‘‘तुझं घर कोणतं?’’ त्यानं बोटानं खोपाट दाखवलं. ‘‘घरात कोण आहे?’’ त्यानं नकारार्थी मान हलवली. थोराड म्हातारी म्हणाली, ‘‘बापूस लईंदी गेला वर. ो आनि ह्यची आई दोघंच हायती. आई आनि ो असत्यात भट्टीवर.’’ ‘त्याच्या आईशीच बोलायचं होतं,’ म्हटलं तर बबन्या माझ्याकडं बघतच राहिला. थोराड म्हातारीनं पुन्हा जोराची शिट्टी घातली. मला कळेना. फक्त शिट्टीवर निरोप कसा पोहोचतो? विचारलं तर बबन्यानं सांगायला सुरुवात केली. आमच्या दारूच्या भट्टय़ा हाईत. पोलीस लईच त्रास देत्यात. त्यामुळं आमचा सगळा व्यवहार शिट्टीवरच चालतो. तुम्ही रस्ता सोडून आत घुसला तेव्हाच आम्हाला कळलं कोन तरी आलंय. सगळी जंगलात दबा धरून बसली होती. लोक ओळखीचे असा शिट्टीतून निरोप पोचला. सगळ्यांनी नि:श्वास सोडला. भट्टीवर आले. माझ्या चेहऱ्यावरचं आश्चर्य बघून त्याने सांगितलं, ‘‘आमचं सगळंच आयुष्य पोलीस लोक बरबाद करतात. म्हणून सगळी दक्षता सगळेजण घेत असतात.’’ मग ती काय काय असं तो सगळं सांगत होता. तोवर त्याची आई आली. मी ‘बबन्यानं शाळंत यायला हवं, हुशार आहे’ असं सगळं काय काय सांगत होतो. बिचारी सगळं ऐकून डोळं पुसत म्हणाली, ‘‘तो शाळेत गेल्यावर पोटाला काय खायचं? त्याला भट्टीवर थांबावं लागतं. इन्नरी रस्त्यापर्यंत पोच करायच्या असतात. तेव्हा कुठं भाकरी. त्यातून पोरगं शिकतंय, घ्या सांबाळून.’’ म्हणत त्या बाईनं हात जोडले. तेव्हा गलबलूनच गेलो. तिनं खोपटातनं चुलीवर केलेला काळ्या गुळाचा चहा आणला. तोवर डोकं भणाणलं होतं.

नंतर बबन्याला कधी कारण विचारलं नाही. हात लावला नाही. पण त्याच्याशी दोस्ती जमली. रविवारचा संपूर्ण दिवस त्याच्याबरोबर जायला लागला. जंगलातल्या प्रत्येक दारूभट्टीचा शोध, तिथं काम करणारे लोक, त्यांची यंत्रणा, त्यांचे पोलिसांशी असणारे व्यवहार, कच्चा माल, दारू गाळण्याची संपूर्ण प्रक्रिया हे समजून घेत गेलो. संपूर्ण जगच वेगळं. एक भट्टीवाला दिवसाला किमान तीन-चार इन्नरी दारू गाळायचा. असे पाच-सहा भट्टीवाले एकत्र. त्यांची वीस-पंचवीस इन्नरी गावठी दारू. ती गावोगाव पोचवायला आठ-दहा तरणीबांड पोरं सायकलवर इन्नरी बांधून सायकली रेटत आजूबाजूच्या गावात तिथल्या गुत्तेवाल्याकडं इन्नरी पोहोचत्या केल्या की त्यांची आठवडय़ाला मजुरी. त्या मजुरीवर त्यांच्या घरच्यांचे संसार. प्रत्येक भट्टीत काम करणारे पाच-सहा लोक एका तळावर पाच-सहा भट्टय़ा. त्याही अंतरा-अंतरावर. पोलिसांना पोहोचणं कठीण अशा जागी. टेहेळणीला प्रत्येक वाटेवर एक तीक्ष्ण नजरेचा पुरुष किंवा बाई. तिचीही मजुरी ठरलेली. एका तळावर पन्नासभर माणसांचा हा कुटिरोद्योग. असे किमान वीसभर तळ तरी पालथे घातले. त्या सगळ्यांशीच जिवाभावाची दोस्ती झाली.

त्या सगळ्यात बबन्याची आई एकटीच बहाद्दर बाई. बबन्या पोटात असतानाच नवरा साप चावून मेला. आभाळ कोसळलं. माहेरला जायचं नाही असा निश्चय केला पण जगायचं कशावर? ना जमीन ना कुणाचा आधार. नवऱ्याची भट्टी पुन्हा पेटवली. बाकीच्या भट्टीवाल्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी ठाकली. बबन्या भट्टीभोवतीच खेळता खेळता कळता झाला. त्याला शाळेचा उंबरा तिनंच ओलांडायला लावला. आकांक्षा एकच, या पोरानं आपल्यासारखं जगू नये. वस्तीतलं एकमेव पोरगं शाळेचा उंबरा ओलांडून अक्षरं गिरवू लागलं. पोलिसांच्या धाडी पडल्या, वाकडय़ा नजरेचे पोलीस भेटले, बहाद्दरीण नमली नाही. नंतर तालुक्यात एकच दहशत. त्यातून धंदा वाढला. गुत्तेवाले अधिक मालाची मागणी करू लागले. कारण या बाईंच्या नादी पोलीस लागत नाहीत. बबन्याची शाळा चुकायला लागली. हे सगळं एकदा तिनं सांगितलं. तिच्या बेडरपणाच्या अनेक कथा-दंतकथा पण तरीही तिला वाटायचं तिच्या मुलानं शिकलं पाहिजे. अनेक भट्टय़ांचे तळ बघितले, पण अशी बाईच भेटली नाही. त्यामुळं बबन्यावर अधिक जीव बसला.

बबन्या एकदम मोकळा होत या धंद्यातल्या हजार गोष्टी सांगाय लागला. पोलिसांचं कमिशन केवढं. कच्चा माल एवढय़ाचा. इन्नरची किंमत एवढी. मजुरी एवढी. उरतात एवढे. सगळा व्यवसाय एकदम प्रामाणिक. कुठंच कुणाला फसवणं, बुडवणं नाही. अनेक बेकार पोरांना रोजगार. पोट भरायची सक्ती. असं भयंकर ज्ञान तो मला देत होता आणि मी चक्रावून जात होतो. अशातच त्या शाळेतली नोकरी मी सोडली. महाविद्यालयात आलो. पण बबन्या सोबतच. चळवळीतल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला म्हटलं, ‘‘तीन-चारशे दारूभट्टीवाले माझे मित्र आहेत. सरकार लायसन देऊन दारूची दुकानं सुरू करत आहे. आपण या भट्टीवाल्यांना परमिट देण्याची मागणी करू. यात अनेकांचं आयुष्य गुंतलेलं आहे.’’ वरिष्ठ चळवळकर्त्यांनी मला जवळजवळ खुळ्यातच काढलं. ‘‘आपण कशाचं समर्थन करतोय? काही नैतिकता आहे की नाही?’’ म्हटलं, ‘‘मी बबन्याच्या आईचं समर्थन करतोय.’’ तर त्यांना काहीच कळलं नाही.

वरिष्ठ महाविद्यालयामधील प्राध्यापक होऊन मी भलताच बुळा होऊन गेलो. भूतकाळ विस्मरणात गेला. चाकरीतील हांजी हांजी रक्तात भिनत गेली. बबन्या विस्मृतीत गेला. त्याच्या आईच्या आठवणीनं कधी कधी रात्री-अपरात्री जाग यायची. ठरवायचो, हे सगळं आपण इतकं बघितलंय की या बाईच्या आयुष्यावर कादंबरी लिहायची. पुन्हा बुळे उद्योग, भंपक कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, पगाराच्या चर्चा, फ्लॅटचे व्यवहार, बधिरच झालं डोकं. यात बबन्याची आई कोठून आठवणार? पण झालं असं, परवा पनवेलला जायचं म्हणून मोटरसायकल बाहेर काढली. कणकवलीमाग्रे निघालो. वाटेत घाट आला. माझं आपलं निवांत गाडी हाकणं सुरू होतं. पोलिसानं हात केला. थांबलो. त्यानं साहेबाकडं अंगुलीनिर्देश केला. त्यांच्यासमोर जाऊन थांबलो. साहेब म्हणाले, ‘‘हेल्मेट?’’ मी म्हटलं, ‘‘दंडाची पावती करा.’’ तो म्हणाला ‘‘लायसन्स?’’ त्याच्या स्वाधीन लायसन्स केलं. त्याचा दगड झाला. तो काहीच न बोलता त्याच्या डोळ्यातलं पाणी मुक्त करत होता. मी आपला बिचारा. रक्कम सांगितली की द्यायची. तर तो बोलतच नव्हता. एकदम वैताग. म्हटलं ‘‘पावती करा.’’ त्याचे वाहते डोळे आवरत आवंढा गिळत म्हणाला, ‘‘सर, मी बबन्या. आईनं मरतेवेळी फक्त तुमचंच नाव घेतलं हुतं.’’ ही कोणासही रचित कहाणी वाटण्याची शक्यता आहे. कल्पित जगणाऱ्यांना तसं म्हणण्याचा अधिकारही आहे. हरकत नाही. पण मी या पोरासोबत जगलोय. कोणीतरी लिहा हो, यावर कादंबरी. माझ्या हातून निसटत चाललंय हे सारं..

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2019 1:19 am

Web Title: suttadguttad babanya article rajan gavas abn 97
Next Stories
1 सरपंच! : कायापालट
2 आभाळमाया : मायेचा पैस
3 भूमिकन्यांची होरपळ
Just Now!
X