||ऐश्वर्य पाटेकर
‘‘माझ्या आईला लागोपाठ चार मुली झाल्या म्हणून आपली चूल वेगळी मांडून बाप आमच्यातून बाजूला झाला. अडाणी आणि अशिक्षित आईनं आमची जबाबदारी झटकली नाही, पण तरी तिच्या कर्तृत्वाला महत्त्व नाहीच. काहीही न करता बापाच्या वाट्याला आमच्या असण्याचं श्रेय गेलं. पुरुषप्रभावित संस्कृतीच्या नावाखाली समाजाने अशा अनेक मेखा मारून ठेवल्या आहेत. त्यातच एक शोध लागला, की आपण पुरु ष आहोत आणि पुरु षाप्रमाणे वागलं पाहिजे! एकदा माझ्या बहिणीनं हातावर मेंदी काढली म्हणून मीही माझ्या हातावर काढली.  काकांना विचारलं, ‘‘सांगा मेंदी कुणाची छान आहे?’’ काका माझ्या सणसणीत मुस्काटात देत रागावून म्हणाले, ‘‘तू मुलगी आहेस का मेंदी काढायला?’’ तेव्हापासून मी हातावर पुन्हा मेंदी काढली नाही.

एखादा दयाळू माणूस भेटला की

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

आम्ही भावंडं, म्हणजे चार बहिणी

अन् एक  मी, म्हणायचो की, आपला बाप

असाच असायला हवा होता.

डोक्यावरून हात फिरवत अलाबला

घेणारी म्हातारी भेटली

की आम्ही भावंड म्हणायचो,

आपली आजी हीच असायला हवी होती!

जत्रेत चुकामूक झाल्यावर आपला हात धरून

आपल्या आईकडे आणून सोडणारा

म्हातारबाबा पाहिला की वाटायचं

हाच आपला आजोबा असायला हवा होता

मात्र खूप प्रेम करणारी एखादी बाई भेटली तर

आम्ही बिलकूलही असं म्हणत नव्हतो की

आपली आई अशीच असायला हवी होती!

कारण आमच्या आईसारखी आई कुठेच

असणार नाही याची खात्रीच

आम्हा भावंडांना असायची…

एक बहीण जेव्हा कालवण करायची

तेव्हा म्हणायची, ‘बघा मी केलं आईच्या

कालवणासारखं कालवण;

चव घ्या, जसं आईनंच बनवलं कालवण!’

दुसरी एक, धुणं धुतलं की म्हणायची,

‘बघा, धुतलं की नाही आईसारखं धुणं…

निघालेत नं कपडे लख्खं!’

तिसरी एक, भुई सारवायची शेणानं;

अन् म्हणायची,

‘बघा सारवली की नाही आईसारखी भुई!’

आम्हाला जगात कुणासारखंच व्हायचं

नसायचं!

व्हायचं असायचं ते फक्त आईसारखं

जगात तिच्यासारखं दुसरं कुणी असू तरी

शकणार होतं का?

हेच बापाविषयी

आजीविषयी

आजोबाविषयी

का वाटायचं नाही…?

या कवितेला लेखाच्या शिरावर ठेवण्याचं कारण आणि निमित्त माझ्याकडे आहे. ही कविता जितकी आईची आहे, तिच्याही काही पट तिच्यातल्या बाईची आहे. ते ओघानं मी स्पष्ट करणारच आहे. तवरुत (त्या अनुषंगानं) हेही मला सांगावं लागेल, की एक आई अन् चार बहिणी मिळून पाच जणी, आणखी दोन चुलत बहिणी, एक बायको, एक मुलगी अन् सहा भाच्या मिळून झाल्या पंधरा जणी. या पंधरा जणींत मी राहतो. पुरुष नसलेल्या घरात मी वाढलो,  पण पुरुषाचा म्हणून जो धाक स्त्रीवर सतत असतो तो धाक आई-बहिणीवर मीही धरायचो. म्हणजे तसे संस्कारच झाले माझ्यावर. स्त्रीच्या भावविश्वाच्या अवकाशात माझी जडणजडण झाली. म्हणून तिचं मन मला पूर्णपणे कळलं असंही नाही, पण पुरुषाचा खरा चेहरा हरघडी समोर आला.

नवऱ्यानं टाकून दिलेल्या बाईला (शिवाय जर का ती अडाणी, अशिक्षित असेल तर) समाजात कोणत्या दिव्याला; नव्हे रामायण-महाभारताला सामोरं जावं लागतं, हे आईच्या रूपानं मी पाहात आलो. तिच्यावर चारशे पानांचं ‘जू’ नावाचं पुस्तक लिहूनही असं वाटतं की, अजूनही तिच्यावरची एकही ओळ मला धडपणे लिहायला जमली नाही. खरं सांगायचं तर मी  मातृहृदयी आहे. जराशाही दु:खानं माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं अन् जीव गहिवरून येतो. अर्थात हेही काही प्रमाण नाहीये स्त्रीला समजून घेण्याचं! सांगायचं हेच, की बाईचं हृदय माझ्याजवळ आहे. असं असलं तरी आतमध्ये पुरुष असतोच की दबा धरून. त्याचं काय करायचं? मी लेखक, कवी असल्यामुळे शब्दांच्या आडून आडून कितीही सांगायचा प्रयत्न केला तरी तो फोलच ठरणार आहे. बाईपणाच्या भोगापासून आणि जाळभाजापासून बाईची सुटका नाही ती नाहीच. करोडोत चार-दोनाच्या अपवादाला विशेष काही महत्त्व नाही. त्यामुळे माझ्यातला पुरुष कितीही वगळायचा प्रयत्न मी केला तरी त्यास मी वगळू शकत नाही.

एकूण पंधरा स्त्रियांच्या गराड्यात श्वास घेत आलोय म्हणून ती मला विशेष उमगलीय अशी टिमकी मी मिरवणार नाही. बाईची बाजू घेऊन तिची वकीलकी करण्याचा कांगावाही मी करणार नाही! मात्र बाईचे ‘स्ट्राँग पॉइंट’ नजरेत आल्यानंतर तिच्याविषयी काही एक ठाम विधान मी नक्कीच करणार आहे. त्यास कुणाचा आक्षेप नसावा. साऱ्या विश्वाचा पसारा बाई आपल्या पदरात गुंडाळून असते. नुसता पदरात गुंडाळून असते असं नाही, तर त्यास बैजवार आकार देते. जिवाच्या आकांतानं तो निटनाट करण्याचा प्रयत्न करते. तरीही बाईला कमी समजून तिच्यावर अतोनात अन्याय केला जातो. तिच्या पदराला पुरुष सतत हात घालत असतो. जेवढे काही वाभारे पदराचे गेलेले असतात, ते पुरुषाचंच कर्तृत्व असतं. तरीही बाई तिच्या पदराला टाके घालून तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करतच राहाते आणि काय गंमतय बघा, आपण स्त्री-पुरुष समानतेचा डंका वाजवत फिरतो आहोत. स्त्री-पुरुष समानता बिमानता हे लेखात वाचायला ठीक वाटतं. पुरुष पुरुषच आणि बाई बाईच असते, हे पुरुषानं पुन:पुन्हा सिद्ध करून आपल्यासमोर ढिगानं पुरावे उभे केले. आजही घराघरांतून बाईच जाळली जाते; पुरुष नाही! बाईवरच बलात्कार होतो, पुरुषावर नाही! अग्निपरीक्षा बाईलाच द्यावी लागते; पुरुषाला नाही! कशी आणि कुठून आली ही समानता? बाई शिकली म्हणून तिला आत्मभान आलं, ती घराच्या बाहेर पडली, वगैरे. हेही काही खरं वाटत नाही. स्त्रीला जन्मता-जन्मताच आत्मभान आलं बहुधा म्हणूनच लोकगीतांत फार पूर्वीच तिनं म्हणून ठेवलं आहे –

‘राम म्हणू राम, नाही सीतेच्या तोलाचा

हिरकणी सीतामाई, राम हलक्या दिलाचा’

असं म्हणून पुरुषसत्तेचा प्रतिनिधी असलेल्या रामाची अन्यायी वृत्ती चव्हाट्यावर मांडली ती अडाणी, अशिक्षित स्त्रीनं. शिक्षणाशिवाय तिला हे आत्मभान आलं तरी कसं? हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. असे लाखो दाखले लोकगीतांतून दिले आहेत. ते सगळेच्या सगळे कसे समोर ठेवणार? यात दोष कुणाचा? पुरुषाचा की बाईचा? दोष असेल, तर तो पुरुषप्रभावित संस्कृतीचा. त्या संस्कृतीनंच पुरुषसत्ताक व्यवस्था उभी केली. याच पुरुषसत्ताक व्यवस्थेनं संस्कृतीच्या नावाखाली मेख मारून ठेवली आहे. त्याचीच परिणती की काय, बाईचं बाईपण कधीच सुटलं नाही, सुटणार नाही. सलमान खानमधला पुरुष आपल्या अंगावरचा सदरा काढून फेकत अर्धनग्न नाचतो, पण त्याच्याच सोबतीच्या आत्तापर्यंतच्या एकाही अभिनेत्रींमधल्या बाईला तसं करता आलेलं नाही, येत नाही. थोडक्यात, पुरुष उघडा नाचला तरी त्याची अब्रू जात नाही. स्त्रीची मात्र जाते. अब्रूचा ठेका फक्त बाईच्याच वाट्याला का? पुरुषाच्या का नाही? ही संस्कृतीनं मारून ठेवलेली मेख नाही तर दुसरं काय आहे. अशा हजारो मेखा आहेत. त्यांचं काय करायचं?  थोडक्यात सांगायचं तर पुरुष व्यवस्थेचा जोरकस पगडा असलेल्या सत्तेनं बाईची गाय संस्कृतीच्या गव्हाणीत पक्की खुंट्याला जखडून घातली. तिनं दावं तोडून जाऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्थाही लोढण्याच्या रूपानं करून ठेवली. माझ्या या मताला मराठीतील प्रख्यात कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या एका कवितेचा भक्कम पुरावा माझ्याकडे आहे. तो इथे ठेवतो-

त्यांनी होते ना केले बहाल स्वातंत्र्य

दोरी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत

परिघात कुठेही फिरण्याचे?

आता त्यांनी आवळली दोरी

आखडला तुझा परिसर

आणून ठेवला हिरवा चारा समोरच

तर काय चुकले त्यांचे?

तू तर त्यांचे दावेच तोडू मागत होतीस!

आपण स्वातंत्र्याच्या गप्पा खूप मारतो, परंतु

‘तू बाहेर कुणीही असलीस तरी बाईच्या जातीप्रमाणेच वागलं पाहिजे’ अशी बाईकडून अपेक्षा. पुरुषाचा वळू मात्र मोकाट. ना त्याच्या नाकात वेसण घातली, ना त्यास कोलदांडा दिला. पुरुष नामानिराळा होतो. बाईला तसं करता येत नाही. ती गुंतून पडते इथल्या पसाऱ्यात. म्हणून तिला सतत वेठीस धरलं जातं. बाईनं विमानात नोकरी करू दे किंवा शेतात मोलमजुरी, तिला बाईचं बाईपण झेलावंच लागतं. ते फेडून ठेवता येत नाही. एखादी पोलीस स्त्री गुन्हेगाराला दंडुका दाखवते अन् घरी येऊन दुबळ्या नवऱ्याचा मार खाते. बाहेरचं उदाहरण कशाला, माझ्या घरातही परिस्थिती फार वेगळी नव्हती.

माझ्या आईला लागोपाठ चार मुली झाल्या म्हणून आपली चूल वेगळी मांडून बाप आमच्यातून बाजूला झाला. सुशिक्षित आणि हाताशी नोकरी असलेल्या बापानं गाव सोडलं, पण अडाणी आणि अशिक्षित आईनं आमची जबाबदारी झटकली नाही. तिनं मला अन् माझ्या चार बहिणींना मोलमजुरी करून बापाच्याच गावात वाढवलं. बापानं त्याच्या सातबाऱ्यावर आम्हास येऊ दिलं नाही, पण आईनं बापाचं गाव आमच्या नावावर करून टाकलं म्हणूनच त्याला आम्ही आज आमचं गाव म्हणू शकतो. असा जन्मभर न संपणारा गावाचा सातबारा मला बहाल केला म्हणूनच मी शब्द रेखाटू शकतो. नाही तर मी कुठला लेखक झालो असतो. तरी तिच्या कर्तृत्वाला तसं महत्त्व नाहीच. काहीही न करता बापाच्या वाट्याला आमच्या असण्याचं श्रेय गेलं. पुरुष असण्याचे फायदे हे आपोआप बापाच्या वाट्याला गेले. हे मला खटकायचं. तेच फायदे माझ्याही वाट्याला आले. माझ्यापेक्षा माझ्या चार बहिणी मोठ्या असूनही अन् त्यांचं कर्तृत्व मोठं असूनही मला महत्त्व दिलं गेलं. आई म्हणाली, ‘‘पोरा, तुझ्या जन्मामुळे या गावात माझा पाय रोवला गेला, न्हायीतर या लोकांनी मला हुसकावून लावलं असतं!’’

ज्या बहिणींनी आईचा संसार तोलला, पुढे आपलाही संसार मोठ्या जिद्दीनं उभा केला, तरी त्यांना त्याचं श्रेय नाहीच. हे कशामुळे? तर पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे. पुरुषाला पुरुषाप्रमाणे वाढवलं जातं आणि बाईला बाईप्रमाणे. मी मांडी घालून जेवायला बसायचो. माझ्याबरोबर माझी बहीणही बसलेली असायची. तेव्हा आई तिला म्हणायची, ‘काय दादेमाणसासारखी जेवायला बसलीस? मांडी मोड!’ मी मांडी घालून जेवायला बसायचो ते आईला चालायचं. कारण मी पुरुष आहे. बहिणीनं तसं बसलं तर चालायचं नाही. हे आईनं ठरवलं असंही नाही, तर चालत आलेली परंपरा आणि नियम तो होता. बरं एखाद्यानं आपल्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवायचं ठरवलं तर वाढवू शकतात, मात्र समाजाचं काय? तिथे तिला पुन्हा बाईपणाचीच वागणूक मिळणार अन् आपण पाहातो की, हे नियम बऱ्याचदा बाईच बाईवर लादत असते, कारण तेव्हा ती बाई नसते, तर व्यवस्थेचा एक भाग असते. म्हणजे बाईसाठी काही वेगळे नियम आणि पुरुषासाठी वेगळे. पुरुषाला जसं सतत सांगितलं जातं, की तो एक पुरुष आहे. तसंच स्त्रीलाही सांगितलं जातं, की तू बाई आहेस. हेही पुन्हा मी माझ्या घरातच अनुभवलं. माझ्या बहिणीनं हातावर मेंदी काढली. मीही माझ्या हातावर मेंदी काढली. चौथी-पाचवीच्या वर्गात असेन मी तेव्हा. बहीण आणि मी आमच्या काकांच्या समोर हात करत म्हणालो, ‘‘काका, सांगा मेंदी कुणाची छान आहे?’’ काकानं बहिणीच्या मेंदीचं कौतुक केलं अन् माझ्या सणसणीत मुस्काटात देत रागावून म्हणाले, ‘‘तू मुलगी आहेस का मेंदी काढायला?’’ तेव्हापासून मी हातावर मेंदी काढली नाही; पण एक शोध लागला, की आपण पुरुष आहोत आणि पुरुषाप्रमाणे वागलं पाहिजे! असं जरी असलं तरी माझ्या बहिणींमधल्या बाईचं दमन हे माझ्या आत काट्यासारखं सलत राहातं. त्या माझ्या बहिणी आहेत म्हणून नाही, तर एकूण स्त्रीजातीच्या दु:खाचा वस्तुपाठ मला त्यांच्या रूपानं दिसत असतो.

तर सारांश असा- मी आधीही कबूल केलं की मी मातृहृदयी आहे. तरीही माझ्यातला पुरुष इतर पुरुषांसारखा वर डोकं काढतोच. हे जरी असलं तरी बाईविषयीचा आस्थाभाव मी माझ्या आत टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.

जाता जाता सांगायचं इतकंच आहे, की या विश्वाला बाईच्या अस्तित्वानंच गूढत्व लाभलं. तिच्या सामथ्र्यानं, सौंदर्यानं, ममत्वानं, वात्सल्यानं विश्वाला रंगरूप आलं. त्या बाईच्या सान्निध्यात मी श्वास घेतोय याचा मला अतीव अभिमान आहे. आपल्यातला खरा पुरुष न्याहाळायचा, तर बाईपणाच्या तळ्याइतका खात्रीशीर दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नाही. म्हणूनच आपल्यातल्या पुरुषाला जोखायचं असेल, तर बाईपणाच्या तळ्यात डोकावल्याशिवाय गत्यंतर नाही!

oviaishpate@gmail.com