News Flash

आणि मी लेखक झालो

कधी-कधी वाटतं मुंबईतच राहिलो असतो तर इंग्रजीमुळे माझ्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असता. मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे मी वाचनाकडे वळलो नसतो, कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नसता.

| July 26, 2014 04:09 am

कधी-कधी वाटतं मुंबईतच राहिलो असतो तर इंग्रजीमुळे माझ्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असता. मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे मी वाचनाकडे वळलो नसतो, कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नसता.  मी शालान्त परीक्षा तरी पास झालो असतो की नाही कुणास ठाऊक!
गिरगावच्या हायस्कूलमधून १९६५ साली आठवीची परीक्षा दिल्यानंतर मी पुन्हा माझ्या गावी परतलो तोच माझ्या आयुष्यातील टर्निग पॉइंट ठरला.
त्याचं असं झालं की, कणकवली तालुक्यातील आमच्या कळसुली गावात मी शिकत होतो. मी पाचवीत गेलो. त्या वर्षांपासूनच पाचवीपासून इंग्रजी शिकवायला सुरुवात झाली, पण शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले तरी इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकाची नेमणूकच झालेली नव्हती. आम्ही इंग्रजीचं पुस्तक घेऊन ठेवलं होतं. वेळ मिळेल तेव्हा आम्ही ते उघडून त्यातली चित्रे पाहात असू. त्यातला मजकूर हा आमच्यासाठी ‘काला अक्षर भैंस बराबर’ होता. दोन-तीन महिन्यांनी इंग्रजीचे शिक्षक आले. त्यांनी आमची आणि एबीसीडीची ओळख करून दिली. लवकरच ते आम्हाला शब्द रचना वगैरे शिकवणार एवढय़ात त्यांची तातडीने बदली झाली. त्यानंतर आम्हाला अगदी सातवीपर्यंत इंग्रजीचे शिक्षक मिळालेच नाहीत. साहजिकच आम्हाला इंग्रजी शिकवलं गेलं नाही.
सातवीची म्हणजे व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा दिल्यानंतर वडिलांनी मला मुंबईत आणलं आणि गिरगावच्या हायस्कूलमध्ये दाखल केलं. तिथे इंग्रजीचं चौथं पुस्तक चालू होतं. मला त्यातलं काही कळत नव्हतं. मला एक शब्दसुद्धा येत नव्हता तर बाकीची मुलं इंग्रजीत निबंध लिहायची. इंग्रजीच्या शिक्षकांनी मला काही विचारलं की, मी खाली मान घालून उभा राहायचो. शिक्षकांची बोलणी खायचो. वर्गातले सगळे माझ्याकडे पाहून हसायचे. खूप अपमानास्पद वाटायचं. गावच्या शाळेत पहिल्या तीन-चार नंबरांत असणारा मी इथे इंग्रजीमुळे ‘ढ’ ठरलो होतो. वर्गातल्या मुलांचा चेष्टेचा विषय झालो होतो. त्यामुळे माझा आत्मविश्वास डळमळला होता. इंग्रजीच्या अभ्यासात मी माझ्या परीने प्रयत्न करीत असलो तरी इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर मी येऊ शकत नव्हतो. हरवलेल्या आत्मविश्वासामुळे शेवटच्या बाकावर बसू लागलो होतो. वार्षिक परीक्षेचा निकाल लागला, इतर विषयांत मला बऱ्यापैकी गुण मिळाले असले तरी इंग्रजीत मी नापास झालो होतो. माझ्या प्रगतिपुस्तकावर उत्तीर्ण या शेऱ्याऐवजी ‘पुढच्या वर्गात घातला’ असा शेरा होता. ही धोक्याची घंटा मी ओळखली. गावात हायस्कूल असताना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मला मुंबईला आणणाऱ्या माझ्या वडिलांनाही एव्हाना वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. माझी रवानगी पुन्हा गावी करण्यात आली. आमच्या गावच्या हायस्कूलमध्ये मी नववीत प्रवेश घेतला. इथे दुसरं रीडर चालू होतं. म्हणजे इंग्रजीचा पाया मी शिकूच शकलो नाही. पण मुंबईत मला पाचवं रीडर शिकावं लागणार होतं तर इथे दुसरं रीडर शिकावं लागत होतं म्हणजे त्या मानाने ही सोपी गोष्ट होती. पुढे मी इंग्रजीत बऱ्यापैकी जम बसवला, इतका की शालान्त परीक्षेत शाळेतून दुसरा आलो. पण विशेष म्हणजे इंग्रजीत पहिला आलो होतो. मला वाचनाचीही आवड होती.
१९७७-७८ सालापासून मी लिहूही लागलो. १९८३ साली माझ्या दोन कादंबऱ्या एकाच वेळी प्रकाशित झाल्या. सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी त्यांचं परीक्षण नामांकित दैनिकाच्या ‘रविवारच्या पुरवणीत’तून ‘अस्सल ग्रामीण जीवनावरील दोन वाचनीय कादंबऱ्या’ या मथळ्याखाली केलं होतं. ती मोठी शाबासकीची थाप होती. त्यानंतर मी बरंच लेखन केलं. आतापर्यंत माझ्या आठ कादंबऱ्या, दहा कथासंग्रह, एक ललित लेखसंग्रह, एक नाटक आणि ‘आवाज’, ‘जत्रा’, ‘मेनका’, ‘वसंतश्री’, ‘मार्मिक’, ‘गार्गी’ इत्यादी दिवाळी अंकांमधून दीडशेच्या वर कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘जत्रा’ साप्ताहिकात ‘मुंबई दिनांक’ हे सदर मी साडेतीन वर्षे लिहिलं. ‘मार्मिक’मधून ‘मालवणी खाजा’ हे सदर नऊ वर्षे लिहिलं. अनेक दैनिकांमध्येही माझे पन्नास एक लेख प्रसिद्ध झाले. आतापर्यंत माझ्या दोन कथासंग्रहांना व एका कादंबरीला को.म.सा.प.चे पुरस्कार मिळाले आहेत. अ.भा.म. नाटय़ परिषदेतर्फे आयोजित केलेल्या नाटय़लेखन स्पर्धेत माझ्या नाटय़ संहितेला पुरस्कार मिळालेला आहे.
मात्र, शहरातील शिक्षणच चांगले, या प्रस्थापित विचारधारेला चिकटून राहिलो असतो व गावी शिक्षणासाठी माघारी गेलो नसतो तर? एकूण सारेच अशक्य होते. गावी परतल्यामुळे माझा अभ्यासातला आत्मविश्वास वाढला, वाचन लेखनाची गोडी लागली. शिक्षकांचं प्रोत्साहन मिळालं म्हणून मी लेखक होऊ शकलो.
कधी-कधी वाटतं मुंबईतच राहिलो असतो तर इंग्रजीमुळे माझ्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असता. मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे मी वाचनाकडे वळलो नसतो, कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नसता. माझ्यातील गुण कुणाच्या लक्षात आले नसते. मी शालान्त परीक्षा तरी पास झालो असतो की नाही कुणास ठाऊक!   पण मी परत गावी गेलो आणि माझ्यातला मी मला सापडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 4:09 am

Web Title: turning points and become writer
Next Stories
1 शिक्षिका होण्याचं स्वप्न
2 क्लिक!
3 सोरिअ‍ॅसिस
Just Now!
X