सुमित्रा भावे

वास्तूंचंही समाजशास्त्र असतं. मुळातच वास्तुशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. वास्तू नुसत्या श्रीमंत, मध्यम आणि गरीब अशा वर्गवारीने ठरत नाहीत. वास्तुरचनेने अवकाशाला भिंती दिल्या. त्याच्यात राहणाऱ्या माणसांचं मनही आपल्याला कळू लागतं. कथेतल्या पात्रांचा व्यवसाय, जीवनशैली, कथानकाच्या काळातली त्यांची संस्कृती, या सगळ्यांच्या तपशिलाने वास्तू सजलेली असते.. त्यातून चित्रपट सामाजिक इतिहास मांडत जातो..

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

आपल्याकडे असा एक वाक्प्रचार आहे, की ‘वास्तू म्हणत असते तथास्तु.’ आमच्या ‘वेलकम होम’मधल्या एका प्रसंगात सौदामिनी ही चित्रपटाची नायिका (मृणाल कुलकर्णी) स्वत:च्या घरात येऊन, त्या घराकडे बघून म्हणते, ‘‘हे घर म्हणजे काय फक्त यातल्या वस्तू आहेत का?’’

‘दोघी’ चित्रपटात, दोघींपैकी थोरली बहीण गौरी (रेणुका दफ्तरदार) मुंबईच्या भडक जगण्यातून परत गावी येते आणि धाकटी बहीण कृष्णाला (सोनाली कुलकर्णी) म्हणते की, ‘‘आपल्या घरात, आपल्या माणसांत, किती बरं वाटतं नाही?’’ ‘नितळ’मध्ये डॉ. नीरजा कौशिक (देविका दफ्तरदार)आपला मित्र डॉ. अनन्य रानडे (डॉ. शेखर कुलकर्णी) याच्या घरी पाहुणी म्हणून आलेली आहे. ती त्याचं घर बघून, मोठं एकत्र कुटुंब बघून, त्याला म्हणते, ‘‘हे कसं घर वाटतं आहे.. नाही तर मी आपली नुसती खोल्यांमध्ये राहते.’’ तोपर्यंतचं तिचं आयुष्य वसतिगृहामधे गेलेलं आहे.

घर ही नुसती चार भिंती आणि वर छप्पर असणारी राहण्याची वस्तू नसते. त्या चार भिंतींना, त्यात राहणाऱ्या माणसांच्या गोष्टीचं सोयरसुतक असतं. त्या घरातल्या माणसांच्या आयुष्यात घडणाऱ्या आंबट, गोड, तुरट चवी भिंतींनी मुरांब्यासारख्या मुरवून घेतलेल्या असतात. घराविषयी माझ्या अशा भावना असल्यामुळे, आमच्या चित्रपटात ज्या वास्तू दिसतात, त्या मी खूप काळजीपूर्वक निवडलेल्या असतात. या वास्तूंचंही समाजशास्त्र असतं. मुळातच वास्तुशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. वास्तू नुसत्या श्रीमंत, मध्यम आणि गरीब अशा वर्गवारीने ठरत नाहीत. वास्तुरचनेने अवकाशाला भिंती दिल्या. त्याच्यात राहणाऱ्या माणसांचं मनही आपल्याला कळू लागतं. कथेतल्या पात्रांचा व्यवसाय, जीवनशैली, कथानकाच्या काळातली त्यांची संस्कृती, या सगळ्यांच्या तपशिलाने वास्तू सजलेली असते.

‘दोघी’तला वाडा, मराठा कुटुंबाचा, सधन शेतकऱ्याचा. त्याची रचना वेगळी. तोही तसा चौसोपी होता; पण ‘वास्तुपुरुष’मधला वाडा हा इनामदारीवाडा होता. त्या वाडय़ाची आणि ‘दोघी’तल्या वाडय़ाची गरज वेगळी होती. ‘दोघी’तल्या वाडय़ाला धान्यधुन्य साठवण्याची ऐट होती. तर ‘वास्तुपुरुष’मधल्या वाडय़ाला भिंतीवर काढलेल्या पौराणिक चित्रांची, मोठय़ा देवघरांची आणि नक्षीदार खिडक्यांची शान होती. कथानकातल्या माणसांनी चकचकीत भिंतीसमोर किंवा शेजारी-शेजारी चमकदार सोफ्यावर बसून संवाद म्हटल्याने चित्रपट बनत नाही. त्या भिंती, छप्पर यांचं आणि कथानकातल्या माणसांचं सजीव नातं तयार व्हावं लागतं. त्या वास्तूतल्या प्रत्येक वस्तूवर, त्या घरातल्या माणसांचा रंग आणि हात असायला हवा. ‘दिठी’तला पोटमाळा, जो एका वाण्याच्या दुकानावर आहे, त्याच्यावर बसून गावातले चार मित्र दर आठवडय़ाला ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’ अशा पोथ्यांचं वाचन करत असतात. नेमका या चौघांना शोभेल असा माळा शोधण्यासाठी मी किती तरी दिवस अस्वस्थ होते आणि शेवटी तो सापडल्यावरच पोथी वाचणारे माळकरी खरे होऊन एकमेकांच्या सुख-दु:खात सामावले गेले.

‘बाधा’ हा धनगरांच्या जीवनावरचा चित्रपट. त्या धनगर वस्तीवर एकच फौजीचं (जयंत तारे) घर असतं. फौजी दलित, वृद्ध, आता अंथरुणाला खिळलेला. त्याचा मुलगा तोही फौजेत, बॉर्डरवर. सून (देविका दफ्तरदार) वस्तीवरची एकुलती एक शिकलेली बाई. वस्तीवरच्या मुलांच्या शिकवण्या घेणारी, त्यांना जीव लावणारी. कुटुंबाच्या वाटचा जमिनीचा छोटा तुकडा मनापासून कसणारी. तर धनगरांची वस्ती आणि असा छोटा शेताचा तुकडा हवा होता. धनगरांची वस्ती बघितली आणि तिथली टेकडी चढून जाताना सगळ्या उजाड डोंगरावर एकच छोटा, हिरवा शेताचा तुकडा दिसला. मी म्हटलं, ‘‘हे लोकेशन आपल्याला हवं.’’ त्या शेताच्या मालकांचा शोध काढत गेलो, तर काय आश्चर्य, तो एका दलित फौजीचा शेताचा तुकडा होता आणि फौजीचा मुलगा-सून तो तुकडा कसत होते. त्या शेताच्या हिरवेपणात, त्या फौजी कुटुंबाचा स्वाभिमान उतरला होता. चित्रपटातली फौजीच्या सुनेची व्यक्तिरेखा दाखवताना तोच मला हवा होता, मिळाला.

‘दहावी-फ’च्या वेळी पहिल्यांदा पांढरपेशा शाळांमधे चित्रीकरण करण्याची परवानगी मागायला गेलो; पण श्रीकृष्णाचं बोट कापल्यावर सत्यभामेकडे जसे सगळे शालूच असल्यामुळे चिंधी सापडली नाही, तसंच या शाळांनी सुट्टीच्या काळात आपली शाळा लग्नकार्याला वगरे दिलेली असल्यामुळे शैक्षणिक चित्रपटाला ते देऊ शकले नाहीत. मग झोपडपट्टीच्या जवळ चालणाऱ्या ‘सानेगुरुजी विद्यालया’त गेलो. त्यांना आमचं कथानक पटलं, आवडलं. त्यांनी त्यांच्या शाळेच्या गच्चीवर नेऊन, मुलांनी शाळेवर संतापून तोडफोड केलेल्या बाकांचा, वस्तूंचा ढीग दाखवला. ते म्हणाले, ‘‘असा चित्रपट फार आवश्यक आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करू.’’ आम्ही ‘फ’ तुकडीतल्या कष्टाळू, हळव्या, दुर्लक्षानं गांजलेल्या, ज्या मुलांविषयी चित्रपट करणार होतो, तशीच तर बहुसंख्य मुलं या शाळेत शिकत होती. त्या शाळेला त्या मुलांच्या निराशेचे, कष्टाचे आणि आकांक्षांचे चटके बसलेले होते. या शाळेत हा चित्रपट करताना आम्हाला आपसूकच समाधान मिळत होतं.

‘एक कप च्या’मधला काशीनाथ (किशोर कदम), बस कंडक्टर आहे. त्याचा दहावीतला मुलगा अबीर, याचं नाव आज वर्तमानपत्रात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने यंदा बोर्डात येऊ शकतील असे आमचे विद्यार्थी म्हणून ज्यांची नावं दिलीत, अशा तीन-चार मुलांत अबीर आहे. काशीनाथ साधा कंडक्टर, पण त्याचा उर अभिमानाने भरून आलेला आहे. बसमध्ये तिकीट देताना एका पॅसेंजरशेजारी त्याला त्याच्या मुलाएवढा मुलगा दिसतो. काशीनाथ विचारतो, ‘‘कितवीला रे?’’, मुलगा म्हणतो, ‘‘दहावीला.’’ काशीनाथ ‘‘अरे वा!’’ म्हणून नुसताच हसतो. आता या प्रसंगाला घाटातली, चालती एस.टी. हेच ‘लोकेशन’हवं होतं. अगदी छोटा प्रसंग पण नेमक्या ‘लोकशन’ने खुलतो.

‘जिंदगी झिंदाबाद’मधला एड्स रुग्णांचा ‘वॉर्ड’ ससूनमधला खरा ‘वॉर्ड’ होता. तिथल्याच ‘ओपीडी’च्या गर्दीत डॉक्टरांबरोबरची (ओम पुरी, नीना कुलकर्णी, प्रमोद काळे) दृश्यं घेतली. सरकारी रुग्णालयात येणारी गरीब माणसं, त्यांचे चिंतेने झाकोळलेले चेहरे, हे कृत्रिमरीत्या तयार करणं किती अवघड झालं असतं..

‘मुझे घर चाहिये’ ही आमची एक छोटीशी फिल्म. त्यातला मक्या (पार्थ उमराणी) आई गेल्यामुळे आणि मावशीला परवडत नसल्यामुळे ‘रिमांड होम’मध्ये राहतो आहे. त्या ‘रिमांड होम’चा मोठा दरवाजा, तिथलं ओटय़ांवर, पंगतीत केलेलं जेवण आणि सामूहिक आंघोळी, हे सगळं खऱ्या ‘रिमांड होम’मध्ये शूट केलं. ते एका मक्याचीच गोष्ट सांगत नाही तर गरिबीपायी आणि मायेचं माणूस जवळ नसल्यामुळे मनात उदासीचा काळोख भरून ठेवलेल्या असंख्य मुलांची गोष्ट सांगते.

‘कासव’मधला देवगडचा खरा मासळी बाजार, तिथे चाललेले लिलाव किंवा ‘घो मला असला हवा’ मधला किनाऱ्यावरचा बाजार आणि छोटय़ा-छोटय़ा जहाजांचा धक्का, हे सुरमईच्या कथेला किंवा ‘कासव’मधल्या यदूच्या लाघवीपणाला अधिकची किनार देतात. आम्ही केरळमध्ये एक माहितीपट केला होता. केरळचं शांत ‘बॅकवॉटर’ आणि तिथे स्वत:चं सगळं काम सावकाश, थंडपणे, शांत चेहऱ्याने करणारी, नव्व्याण्णव वर्षांची रोझा. ते ‘लोकेशन’ आणि ती, अगदीच एकजीव झालेले.

‘दोघी’तली थोरली मुलगी, गौरी (रेणुका दफ्तरदार) मुंबईहून घरी आलेली आहे. गौरी मुंबईला कुठलं काम करते आहे, याकडे आईने (उत्तरा बावकर) डोळेझाक केलेली आहे. महिन्याच्या महिन्याला पैसे येतात. खरं तर, आई अपराधीपणाच्या भावनेने पछाडलेली आहे. गौरी आल्यावर पहिली भावना येते, ते लेकरू खूप दिवसांनी भेटलेल्या समाधानाची; पण दुसऱ्याच क्षणी तिच्यासमोर आपण तिचा गुन्हा केल्याचा ताण. गौरीच्या डोळ्याला डोळा भिडवणं शक्य होत नाही. मग आई स्वत:च, ‘‘मी आलेच गोदात्त्याकडे जाऊन,’’ असं म्हणून देवळात जाऊन, रडवेली होऊन, एकटीच बसते. शेजारून चाललेली, जगण्याचा आटापिटा करणारी, मुंग्यांची रांग. या भावनेसाठी दुसरं कुठलंचं ‘लोकेशन’ शोभलं नसतं. तसं ‘अस्तु’मधल्या स्मृती गेलेल्या आप्पांचं (मोहन आगाशे). खरं तर ते हरवले आहेत. प्रसन्न चेहऱ्याने, नदीकाठी आभाळात उडणारी पाखरं बघणं, या केवळ त्या क्षणाच्या निरागस दृष्टीला, असं निरभ्र आकाश आणि चुबूळ-चुबूळ आवाज करणाऱ्या नदीच्या प्रवाहाचा काठ, हीच पार्श्वभूमी हवी होती.

चित्रपट असा माणसांच्या छोटय़ा-छोटय़ा अनुभवांच्या साखळीतून, गोष्ट सांगताना जिथे तो अनुभव साकार होतो, त्या स्थळाशी एकरूप झाला, तर त्याचं रूपांतर चित्रपटीय प्रतिमेत (सिनेमॅटिक इमेज) होतं. आणि चित्रपटाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, सूक्ष्म, तरल, अस्वस्थ करणारी, संदिग्ध, तरी न विसरता येण्याजोगी, सखोल अनुभव देण्याजोगी भाषा तयार होते.

‘मल्हार’लघुपटात दीप (मोहित टाकळकर) पावसाळ्यातल्या महाबळेश्वरच्या जंगलात कॅमेरा घेऊन भटकत असतो. आणि  भावाला ‘थॅलेसीमिया’ आहे म्हणून जिच्यावर विनाकारण नकाराचा शिक्का बसलेला आहे, तिला स्वीकारण्यासाठी ती हवा, तो निसर्ग दीपचं मन ‘मऊ-मऊ’ करतो. स्वत:च्याच बेताल वागण्यामुळे ‘जिंदगी झिंदाबाद’मध्ये मन्नाला (अभिराम भडकमकर) एड्स झाला आहे. सर्वानीच त्याला आपल्या जीवनातून काढून टाकलं आहे; तरीही एका प्रिस्टच्या (सुनील सुकथनकर) सौजन्याने मन्नाला भंगाराच्या दुकानात आश्रय मिळतो.

‘जिंदगी झिंदाबाद’मध्येच स्वत:ची कोणतीही चूक नसताना, एचआयव्हीची लागण झालेला नायक (मिलिंद गुणाजी) म्हणतो, ‘‘पोएटिक जस्टीस नामका एक न्याय होता है और वो शायद आखिरमें मिलता है.’’ चित्रपट ज्या तऱ्हेने जगण्याच्या अनेक विरोधाभासांवर प्रकाश टाकतो, त्याचाच एक भाग म्हणजे त्यात वापरलेले भिंतीआडचे आणि भिंतीबाहेरचे सगळे अवकाश, जे वास्तूप्रमाणे चित्रपटकर्त्यांला ‘तथास्तु’म्हणत असतात, त्याने मनात पाहिलेल्या चित्रांना, कथेतल्या माणसांशी (कर्त्यांशीही) एकजीव होऊन मूर्त घडवत असतात. म्हणून ‘लोकेशन’चा शोध जीव तोडून करावासा वाटतो. खऱ्या वास्तूंचा पोत, खऱ्या वस्तूंप्रमाणेच चित्रपटातून सामाजिक इतिहास नोंदवत असतो.

sumitrabhavefilms@gmail

chaturang@expressindia.com

आवाहन तरुण कथालेखिकांसाठी

मराठी साहित्यात कथेचं समृद्ध दालन आहे. आत्तापर्यंत अनेकांनी दर्जेदार कथा लिहीत मराठी साहित्याचं हे दालन जिवंत ठेवलं, नव्हे वाढवलं, मोठं केलं. आजच्या तरुण कथालेखिका, ज्यांचं वय चाळिशीच्या आत आहे,  पाठवू शकतात आपल्या कथा आमच्याकडे. २०२० च्या ‘चतुरंग’ पुरवणीत असेल त्यांच्या दर्जेदार कथांचं दालन, जे असेल मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारं!  कथेला विषयांची मर्यादा नाही, की शैलीचं बंधन नाही. कथा कुठेही घडणारी, कुठल्याही काळातली असली तरी चालेल, मात्र माणसाच्या अस्सल जाणिवांना हात घालणारी असावी. जगण्याच्या वास्तवाला भिडत कल्पनेच्या रंजकतेून उतरलेल्या रसरशीत अनुभवगाथा आम्ही प्रसिद्ध करू शनिवारच्या अंकांतून. शब्दमर्यादा १५०० ते १८०० शब्दांपर्यंत. पाठवा chaturangnew@gmail.com किंवा चतुरंग, ई एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० या पत्त्यावर.  पाकिटावर वा सब्जेटमध्ये – ‘कथा चतुरंग’ लिहिणे आवश्यक.