News Flash

आहारभानाचं जागतिकीकरण

वेध भवतालाचा

(संग्रहित छायाचित्र)

अर्चना जगदीश

डॅनिएला निरेंबर्गने ‘फूड टँक’ हा विचारप्रवाह एक सामाजिक स्वयंसेवी संस्था म्हणून रुजू केला. त्यांचा मूळ उद्देश होता जगातल्या लोकांनी चांगलं, सकस आणि आरोग्यपूरक अन्नं खावं. आज ‘फेसबुक’वर ‘फूड टँक’चे बारा लाखांहून अधिक चाहते आहेत. त्यांच्या ब्लॉग-वार्तापत्राचे १९० देशांमध्ये साडेतीन लाख सभासद आहेत. जगभरात त्यांच्या लोकप्रियतेची कमान सतत चढती आहे, कारण अन्न हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे, हेच ती ओरडून सांगते आहे, त्यावर उपाय सुचवते आहे. आहारभान जागवणाऱ्या डॅनिएलाविषयी..

‘फूड टँक’ या ‘थिंक टँक’वरून मला पहिला मेसेज कधीतरी २०१३ मध्ये आला. बहुधा आम्ही तेव्हा डोंगरशेती आणि त्यातल्या पारंपरिक जाती, आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांचं त्याबद्दलचं ज्ञान यावर काम करत होतो म्हणून असेल. पहिल्यांदा हे काहीतरी नवीन अमेरिकन फॅड दिसतंय म्हणून मी नजर फिरवून सोडून दिलं होतं. पण दर आठवडय़ाला नियमितपणे डॅनिएला निरेंबर्गचा ब्लॉग यायला लागला आणि मी त्याची वाट कधी पहायला लागले मला कळलंही नाही.

पुस्तक हातात घेऊन वाचायचं ही गोष्ट आता खूपच कमी कमी होत चालली आहे. पूर्वी वर्तमानपत्रातले लेख, व्याख्यानं आणि पुस्तकं या सगळ्यातून विचार मांडले जायचे. माहिती मिळवण्याबरोबरच विश्लेषण व्हायचं आणि या सगळ्यातून वाचकांवर परिणाम व्हायचा. जनमत तयार व्हायला मदत व्हायची. निदान काही लोक तरी कृती करायला उद्युक्त व्हायचे. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेले ब्लॉग्ज, यूटय़ूब मालिका आणि व्हिडीओज् आज हेच काम करतात. हे ब्लॉग्ज विचारांवर प्रभाव टाकतात, त्यांचा मागोवा घेणारे (फॉलोअर्स) असतात

आणि समाजात बदल होण्यासाठी, विशेषत: तरुणांवर याचा प्रभाव चटकन पडतो. डॅनिएला निरेंबर्गचा ‘फूड टँक’ हा असाच अतिशय लोकप्रिय ब्लॉग आहे.

२०१३ मध्ये डॅनिएला निरेंबर्गने बर्नार्ड पोलॉकबरोबर ‘फूड टँक’ हा विचारप्रवाह एक सामाजिक स्वयंसेवी संस्था म्हणून रुजू केला. त्यांचा  मूळ उद्देश होता जगातल्या लोकांनी चांगलं, सकस आणि आरोग्यपूरक अन्न खावं. अर्थात, याबद्दल नुसती माहिती पुरवून चालणार नव्हतं तर लोकांना त्यात सहभागी करून घेणं आवश्यक होतं. सुरुवात छोटय़ाशा मेल्स आणि थोडय़ा माहितीने झाली. पण आज ‘फेसबुक’वर ‘फूड टँक’चे बारा लाखांहून अधिक चाहते आहेत आणि ते सातत्याने तिच्या पोस्ट्स बघत-वाचत असतात. दर आठवडय़ाच्या त्यांच्या ब्लॉग-वार्तापत्राचे १९० देशांमध्ये साडेतीन लाख सभासद आहेत. अमेरिकेतील सर्व प्रमुख वृत्तपत्रं आणि साप्ताहिकं तिच्या प्रयत्नांची दखल घेतात. लोकांनी इतकं भजनी लागावं असं काय असतं त्यामध्ये?

पारंपरिक खाद्य संस्कृती, त्यातला स्त्रियांचा सहभाग, पोषक आहाराबद्दल आई मंडळींना असलेली काळजी, ताजे जेवण म्हणजे काय आणि सकस अन्न-धान्य कुठे तयार होतं अशा सगळ्या विषयांवर त्यात आवर्जून लिहिलं जातं. हे सगळे प्रश्न आरोग्याचे प्रश्न आहेत हे अमेरिकन लोकांना लक्षात यायला बराच वेळ लागला होता. खरंतर एक प्रकारे हे प्रश्न तयारही तिथेच झाले होते. फास्ट फूड म्हणजे झटपट तयार होणारं, जास्त टिकणारं आणि चवीपेक्षा रसायनांतून माणसाला गुलाम बनवून टाकणारं अन्न. पण आता या घटक रसायनांचे वेगवेगळे परिणाम मुख्यत: आरोग्यावरचे परिणाम सतत जगासमोर येत आहेत. रसायनाचा अतिवापर, जनुक सुधारित पिकांच्या जाती या सगळ्याचे पर्यावरणावर परिणाम होतातच, पण आपल्या शरीरावर होणारे भीषण परिणाम म्हणजे नवनवे रोग, लठ्ठपणा, कर्करोग, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम. हे लक्षात आल्यावर लोकांना सकस, ताजे शुद्ध अन्न कसे, कुठे मिळेल, सेंद्रिय शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ कशी मिळेल यावर अमेरिकेत विचार सुरू होताच; पण तो हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम डॅनिएलाच्या ब्लॉगने गेली अनेक वर्षे चालवले आहे. ही नुसती कागदावरची जाणीव जागृती नाही तर जमिनीवरही भरपूर काम या ‘फूड टँक’च्या माध्यमातून केलं जातं. कारण प्रश्न कोणते आहेत हे थोडासा अभ्यास करून सांगता येतात, पण ते कसे सोडवायचे याची उत्तरे मात्र फार कमी संशोधक आणि सामाजिक माध्यमावर प्रसिद्ध असणाऱ्यांकडे असतात. म्हणूनच वाचकांना, सभासदांना सतत प्रत्यक्ष कामाशी जोडणं आणि बदल घडवण्यासाठी नवनवीन कल्पनांवर अनुभवी शेतकरी, आदिवासी आणि स्थानिक लोक यांच्याबरोबर सतत काम या ‘फूड टँक’च्या माध्यमातून केलं जातं

‘फूड टँक’तर्फे दरवर्षी अमेरिकेत आणि अमेरिकेबाहेरही वार्षिक संमेलनं आयोजित केली जातात. पीकपाणी, अन्नधान्याची विविधता इत्यादींवर खाणाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एखादा विषय निवडून चर्चा केली जाते. प्रत्यक्ष जमिनीवर उगवलेले अन्न आणि त्याचे महत्त्व, सकस पारंपरिक आहार हे विषय आता फक्त अमेरिकाच नाही तर इतर विकसनशील देशांमध्येही फार महत्त्वाचे बनले आहेत. आपल्याकडे देखील शेतीत होणारा रसायनांचा मुक्त वापर आणि त्यामागचे राजकारण, स्वस्त दरात मिळणारे धान्य, त्यामुळे तरुणाईची शेतीबद्दलची उदासीनता, शेतकऱ्याला सबसिडी ऐवजी प्रोत्साहन आणि उत्तम भाव देण्याची गरज हे प्रश्न आहेतच आणि ते सगळे आरोग्यापाशी येऊन थांबतात. भारत तसेच अनेक आफ्रिकी देशांतही स्थानिक, पूर्वापार चालत आलेले पारंपरिक खाद्यजीवन संपत चाललं आहे. या सगळ्याबद्दल लोकांना सांगण्यासाठी, पारंपरिक खाद्य संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी डॅनिएला जगभर फिरत असते. अर्थात नुसतं परंपरेचं महत्त्व सांगण्यात अर्थ नाही म्हणून ती जगभरात अशी शेती करणारे लोक, या विषयातले तज्ज्ञ, स्लो फूड चळवळ अशा गोष्टींची सतत प्रत्यक्ष माहिती पुरवत असते. सेंद्रिय शेती, प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरातल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तिच्या ब्लॉग, वार्तापत्रात आणि पॉडकास्टवर असतात. गेल्या वर्षी ‘फूड टँक’चा अडीचशेवा ब्लॉग लेख प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या लोकप्रियतेची कमान सतत चढती आहे. कारण अन्न हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे हेच डॅनिएला ओरडून सांगते आहे, त्यावर उपाय सुचवते आहे.

गेल्या पाच दशकांपासून स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या, त्यांनी नवनवी क्षितिजे पादाक्रांत केली आणि कुटुंब ही जबाबदारी थोडय़ाफार प्रमाणात पुरुषदेखील समजू लागले. पण या संक्रमणकाळात स्वत: स्वयंपाक करणं आणि जेवू घालणं अशा गोष्टी हळूहळू कमी होऊ लागल्या. विशेषत: मध्यमवर्गात! मग सतत हॉटेलमध्ये जाणं, नव्या सदनिकांमधील स्वयंपाकघराचा आकार कमी-कमी होत जाणं आणि फास्ट फूडची सवय लागणं ओघानेच आलं. आता काळाचं चाक उलटं फिरवून पुन्हा बायकांना स्वयंपाकघराची जबाबदारी घ्यायला लावणं किंवा तशी अपेक्षा ठेवणं चूकच आहे. पण मग अशा  बाहेरच्या सततच्या खाण्यामुळे होणारी आरोग्याची हेळसांड कशी थांबवायची? हॉटेल्समध्ये चांगलं सकस अन्न मिळेल अशी व्यवस्था तयार करता येईल का यावर विचार आणि अशा कृती करणाऱ्यांची माहिती मिळवत त्यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न डॅनिएलाने सुरू केलेत. म्हणूनच तिच्या माध्यमातून अनेक लोकांना आपल्या सवयी बदलणं शक्य आहे, बाहेरही सकस अन्न मिळू शकेल अशी आशा निर्माण झाली.

कदाचित भारतात अशा चर्चाची काय गरज असं काही लोकांना वाटेल. आपल्याकडे तर इडलीपासून पोहे -उपमा आणि प्रत्येक राज्याची खासियत असलेलं पारंपरिक अन्न हॉटेल्समधेही मिळतंच की, हा विचार त्यामागे आहे. पण हे अन्न तयार करताना वापरले जाणारे पदार्थ, विशेषत पाम ऑइल आणि सरकी तेल, स्वच्छतेचा अभाव आणि निकस धान्य यावर फारसं नियंत्रण नसतं. आपली लहान मुलं, तरुण पिढी यांच्यात वाढत जाणारं फास्ट फूडचं वेड आणि त्यामागची भक्कम होत जाणारी अर्थव्यवस्था हे खरे प्रश्न आहेत. म्हणूनच सकस अन्नपुरवठा करणारी हॉटेल्स, या क्षेत्रातले घरगुती व्यावसायिक, सेंद्रिय शेती करणारे, स्थानिक वाण लावणारे शेतकरी, त्याचा उपलब्ध आणि खात्रीचा बाजार या सगळ्या माहितीची देवाणघेवाण करण्याची आपल्याकडेही गरज आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विचार आणि चर्चा-संवाद, एकत्रित कृती गरजेची आहे. सध्याच्या डिजिटल युगात हजारो लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य आहे. म्हणूनच असे सर्वव्यापी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. अन्यथा देशी वाणांच्या संवर्धनासाठी कार्यरत ‘सीड मदर’ राहीबाई पोपेरे आणि स्थानिक जातीचं संवर्धन- प्रसार करणाऱ्या देशभरच्या कानाकोपऱ्यातले अनेक जण सर्वदूर पोचणार नाहीत. शिवाय माहिती एकदा पुरवून चालत नाहीतर समाजमन बदलण्यासाठी त्याचा सतत पाठपुरावा करावा लागतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॅनिएलाचा ‘फूड टँक’ मला प्रेरणादायी वाटतो.

आपल्याकडेही असे छोटे-मोठे प्रयत्न सुरू आहेत कितीतरी शहरांमध्ये पारंपरिक पदार्थ पुरवणारी, सेंद्रिय पदार्थ पुरवणारी उपाहारगृहे आहेत. पण त्याचा प्रसार तितकासा होत नाही आणि अशी उपाहारगृहे परवडत नाहीत असाही गैरसमज आहे. म्हणूनच लोकांना सतत त्याबद्दल सांगणं, चर्चा करणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा आहे की डिजिटल क्रांतीचा भाग बनलेला साक्षर समाज सुशिक्षित होऊनही हे सगळं वाचून उपयोग करण्याइतके आपण खरंच सुधारलो आहोत का? बाजारप्रणीत अर्थव्यवस्थेमध्ये आरोग्य विमा काढण्याइतकंच आपलं खाद्यजीवन हे आपलं प्राधान्य बनणार आहे का? आयुर्वेद आणि आजही त्याचा उपयोग करणारे जुने-जाणते लोक सांगतात, की ‘‘तुमचं  शरीर म्हणजे  तुम्ही काय खाता, त्यात पोषण किती याचा आरसा आहे. निसर्गाने तयार केलेलं हे अप्रतिम यंत्र आहार-विहार यांच्यावर नियंत्रण ठेवलं तर १२५ वर्षे चालू शकेल.’’

आपल्याला माणूस म्हणून इतकं जगायचं आहे की नाही हा वेगळा मुद्दा पण आहार-विहार मात्र जगताना विचारांइतकाच महत्त्वाचा मुद्दा आहे हे विसरून चालणार नाही .

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:06 am

Web Title: vedh bhavtalcha article by archana jagdish 5
Next Stories
1 शांततेचं गढूळ सावट
2 आत्मभान येणे गरजेचे
3 रंगभूमीवरील अमीट छाप
Just Now!
X