नाशिकसारख्या वातावरणात वाढलेली मी लग्नानंतर बोरिवलीला आले. शिकवण्या, शिवण, दूध केंद्र, पोस्टाची एजन्सी एवढीच क्षेत्रे मला माहीत होती. त्याप्रमाणे मी सुरुवातही केली. माझ्या धाकटय़ा दिराचे शिक्षण संपून त्यांना सुरत येथे बडोदा रेयॉन कंपनीत नोकरी लागली. त्यांची व्यवस्था लावण्यासाठी आम्ही दोघे तेथे गेलो. त्यांच्या कार्यालयातील एका मित्राने घरी बोलावले म्हणून गेलो, तर तेथील दृश्य पाहून मी थक्कच झाले. बाहेरच्या खोलीत बिडिंग मशीन्स लावली होती. घरातील बायका काम करता करता बॉबिन्स भरून मशीनवर लावीत होत्या. त्यातून सुंदर नक्षी असलेल्या लेस बाहेर पडत होत्या. मित्राची आई म्हणाली, ‘‘हे तू करू शकशील. मागणी पुष्कळ आहे. इतर काही करण्यापेक्षा हे कर.’’ त्यांचे बोलणे माझ्या डोक्यात पक्के रुजले. विचार नक्की करून तशी मशीन्स घ्यायचे निश्चित केले. हाच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट होता.
बोरिवलीला आल्यावर जागेच्या शोधार्थ निघालो, पण हवी तशी जागा मिळेना. दहिसर ते विरारही शक्य नव्हते. शेवटी पालघरला पोचलो. तेथे स्टेशनजवळच ‘शुक्ल कंपाऊंड’मध्ये जागा मिळाली. शेजारी सर्व कारखानेच होते. तेथली माणसंही खूप चांगली. त्यांनी महाराष्ट्र बँकेची महिलांसाठीची कर्ज योजना सांगितली. त्याप्रमाणे आम्ही अर्ज केला. अहमदाबाद येथील श्रीचंद कंपनीकडे ऑर्डर नोंदवल्याची कागदपत्रे दिली. कर्ज मंजूर झाले. मन उत्साहाने भरले. मशीन्ससाठी स्टँड करून घेतले. चरखे, लाकडी बॉॅबिन्स, मोटारही घेतली. बॉबिन्स भरण्यासाठी काही जणींची नेमणूक केली. मी साकीनाका येथे जाऊन इंडस्ट्रिअल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कॉटेज इंडस्ट्रीचा सरकारी कोर्स होता. काथा बझारमधील व्यापाऱ्यांनी तयार माल घेण्याचे आश्वासन दिले. कारखान्याचे नाव ‘प्रसाद बिडिंग’  निश्चित करून कारखाना सुरू केला. कच्चा माल काथा बाजारचे व्यापारी पाठवू लागले व तयार माल लॉरीमधून आम्ही त्यांना पाठवू लागलो.
एक दिवस एक कोळीबंधू आले व म्हणाले, फिलॅमेंट लावा. तयार झालेला सगळा गोफ मी जाळे विणण्यासाठी घेईन. तेही काम सुरू केले. बँकेचे हप्ते वेळेवर जाऊ लागले. त्यामुळे मला मान व प्रतिष्ठा मिळू लागली. आता स्लिव्हिंगच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. सगळे छान चालले होते. मी ‘सौराष्ट्र’ने येत-जात असे, पण पुढे प्रकृती साथ देईना. धाकटा मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्याने एलआयसीची एजन्सी घेतली. तो पूर्णवेळ काम करू लागला. त्याचा व्यवसाय उत्तम चालू लागला. मात्र आम्हाला तयार माल पाठवायला ट्रक मिळेना. दहिसर चेकनाक्यावर त्रास होऊ लागला. बँकेचे हप्ते थकले. शेवटी कारखाना विकायचे ठरले. खूप वाईट वाटले, पण इलाजच नव्हता. आता प्रत्येक गोष्टीत साथ देणारा निघून गेल्याचं दु:ख वगळता मी मुला नातवंडांत तृप्त आहे.  एका टर्निग पॉइंटने दिलेल्या या २० वर्षांच्या अनुभवाने आयुष्य समृद्ध झाले हे नक्की.