News Flash

व्यर्थ चिंता नको रे : ‘असा मी, कसा मी?’

‘असा मी, कसा मी?’ हा शोध कायम चालू राहणारा आहे. स्वत:ला स्वत:च्या मनाचा थांग लागेल याचीही शाश्वती नाही

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. आशीष देशपांडे

‘असा मी, कसा मी?’ हा शोध कायम चालू राहणारा आहे. स्वत:ला स्वत:च्या मनाचा थांग लागेल याचीही शाश्वती नाही. असं असलं तरी मनोशास्त्रज्ञांनी माणसांच्या वागण्याच्या तऱ्हा ओळखून त्यामागचा कार्यकारणभाव जोडून पाहिला. आजच्याही लेखात वागणं, स्वभाव आणि त्याची संभाव्य कारणं, यातील संबंध शोधायचा प्रयत्न आहे. या आपल्याच घरात आणि आजूबाजूला दिसणाऱ्या माणसांच्या गोष्टी आहेत. सुप्त मनाच्या ज्या तऱ्हा वारंवार डोकं  वर काढतात, रोजच्या जगण्याचा तळ ढवळून टाकतात त्यांच्या विषयी..

गेल्या लेखात (१३ फे ब्रुवारी) आपण सुप्त मनाच्या ३ तऱ्हांबद्दलच्या कहाण्या पाहिल्या. ‘भ्रम प्रक्षेपण’ (अनिकेत- रवी नायरची ‘ती’), ‘रूपांतर’ (हमीदची अचानक गेलेली वाचा), ‘नाकारणं’ (स्वातीचं स्वत:ला दोष देणं). फ्रॉइडच्या मते जेव्हा या प्रक्रिया जाणिवेला स्पर्शून जातात तेव्हा त्या समजत नाहीत, पण अस्वस्थ मात्र नक्की करतात.

प्रेम-व्यभिचार, भाषेतील उच्चारांचं वास्तव/अवास्तव महत्त्व, पुरुषप्रधान समाजातली नातं जपण्याची स्त्रीवरची जबाबदारी, हे आपल्या नैतिकतेत (सुपर इगो) इतकी कोरलेली असते की त्यांपासून वेगळा विचार असह्य़ बनतो. ती अस्वस्थता कमी करण्यासाठी सुप्त मन करामती (डिफेन्स मेकॅनिझम) करून स्वत:ची सुटका करून घेतं. या करामती आपण सर्वच वापरत असतो. पण जेव्हा एखाद्या विशिष्ट करामतीचा अतिरेक होतो, तेव्हा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. नाती, शरीरस्वास्थ्य, निर्णयक्षमतांवर परिणाम होऊ शकतो. त्यातून चिंता, बेचैनी, काळजी वाढू लागते. आज आपण परंपरेतील कविकल्पनांत हरवलेला अवधूत, बालपणीच्या आठवणीत हरखून जाणारा निशाचा ‘तो’ आणि मैत्रीच्या आडून ईर्षेत अडकलेले जोशी सर यांच्या कहाण्या वाचणार आहोत.

४) विरूपण (डिस्टॉर्शन), अवमूल्यन (डीव्हॅल्युएशन) सर्वशक्तिमानपणा (ओम्निपोटेन्स), आदर्शीकरण (आयडिअलायझेशन) –

अवधूत आता थकला होता. नाही म्हटलं तरी गेली १४ वर्ष, म्हणजे बाबा गेल्यापासून घराला एकत्र ठेवायचा प्रयत्न एकटय़ानं आणि नेटानं तो करतच होता. पण हट्टी काका नि मुलांचे वाढते अभ्यासाचे खर्च महिना कठीण करत होते. तशी काकांना शेती कधीच करायची नव्हती. मुंबईतल्या कॉर्पोरेट नोकरीत ते रमले होते. वडिलोपार्जित जो काही हिस्सा त्यांचा होता तो त्यांना हवा होता. तोडलेल्या जमिनीनं उत्पन्न कमी होणार होतं, पण त्यांना त्याचं फारसं देणंघेणं नव्हतं. याच जमिनीनं आपल्याला भरवलं, वाढवलं, शिकवलं, हे ते बाबांच्या पश्चात लगेच विसरले होते. शहरं असतातच अशी. गावांपासून नि आपल्या माणसांपासून एकेकाला दूर नेणारी. जमीन म्हणजे आई असते शेतकऱ्याची. पैशांसाठी विकायची का? बाबा होते तोपर्यंत काका काहीच कसे बोलले नाहीत? बाबांचं वजनच होतं तसं. आपलं वयही नाही आणि वजनही नाही! गेली १४ वर्ष केवळ बाबांसाठी त्यानं शहरात राहून जमीन जपली होती. दर पंधरा दिवसांतनं बसचा प्रवास, गावातल्या अडचणी, कामचुकार माणसं, येणारा थकवा आणि घरच्यांचे बोल सहन करत गेली ही वर्ष. बाबांच्याच वयाची काही माणसं कौतुक करायची अधूनमधून. बाकीच्यांना फारशी पडली नव्हती या सगळ्या फरफटीची. दिलेल्या पगारावर संसार चालवणारेसुद्धा कामचोर होताना पाहिले की त्याचा तिळपापड व्हायचा. त्याचा चिडका स्वभाव आता कोणाच्याच पचनी पडत नव्हता. कामावरची माणसंदेखील आताशा उलटी उत्तरं द्यायला लागली होती. शरीर थकायला लागलं होतंच पण मनही थकलं होतं. पूर्वीचा उत्साह राहिला नव्हता की उमेद राहिली नव्हती. घरी, कामावर मन लागत नव्हतं. गेल्या महिन्यांतच मधुमेहाचं निदान झालं, नि अजून एक चिंता सुरू झाली.

बऱ्याच वेळा ‘परंपराग्रस्त’ समाजात वर्तणुकीच्या अपेक्षा आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीवर लादल्या जातात नि कधी कधी ओढवूनही घेतल्या जातात. घराणं, कुटुंब, वडिलकीच्या मानमरातबात हिस्सा मिळवण्यासाठी किंवा त्यांच्यात जम बसवण्यासाठी लहानपणापासून तशा वागण्याचं केलेलं किंवा झालेलं आदर्शीकरण अवधूतचं वागणं ठरवत आहे. स्वत:वर ओढवून घेतलेल्या कर्तव्यपालनात अवधूत काकांचीसुद्धा अडचण असू शकते ही शक्यताच नाकारत आहे. किंबहुना काकांबद्दलचा त्याचा पूर्वग्रह विरूपणानं दूषित झालेला आहे. बदलत्या परिस्थितीत आणि काळातसुद्धा बाबांच्या आचरणाला काळ्या दगडावरील रेष मानून, व्यावहारिक अडचणी नि आदर्शीकरणाच्या कचाटय़ात तो सापडला आहे. काहीही करून गावची जमीन वाचवण्याचे त्याचे प्रयत्न सर्वशक्तिमान बनण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न दाखवतात. बाबांच्या स्वकल्पित स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी केलेला आटापिटा आता शरीराला आणि मनालाही सोसत नाहीये.

५) काल्पनिक स्वरंजन (ऑटिस्टिक फँटसी), प्रक्षेपणीय ओळख (प्रोजेक्टिव्ह आयडेंटिफिके शन), विभक्तीकरण (स्प्लिटिंग)

– नेहमीसारखा तो सकाळच्या  ‘८:४४’ मध्ये घुसला. अगदी आत आत जाऊन त्यानं दरवाजातल्या गर्दीपासून आपली सुटका करून घेतली. सकाळपासून काहीच नीट झालं नव्हतं. निशाबरोबर उडणारे हे खटके फारच त्रास द्यायचे त्याला. अशा खटक्यांची कारणंदेखील बालिशच असायची म्हणा! पण निशाला कधीच तसं वाटायचं नाही. तो नाही बोलला काही, तर    तीन-तीन दिवससुद्धा अबोला खेचायची ती. मुलांना त्रास नको म्हणून शेवटी तोच बोलायला सुरुवात करायचा. काहीच न झाल्यासारखी तीही विषय विसरून क्षण पुढे ढकलायची. हे नेहमीचंच झालं होतं. आजही असंच काही घडलं होतं. आठवायचाही कंटाळा आला त्याला नक्की काय झालं ते! अशा वेळी तो नेहमीच त्याचं डोकं गच्च धरायचा. डोळे मिटून घेऊन, ‘आता काय करायचं, आता काय करायचं..’ असं परत परत म्हणायचा. गाडीच्या ठेक्यात स्वत:ला अडकवून घरच्या आठवणींतून सुटू पाहायचा. बंद डोळ्यांसमोर लहानपणीच्या आठवणी आपसूक तरळायच्या.. सगळ्या नाहीत, एक विशिष्ट! सहावी-सातवीच्या वर्गात सईनं तिच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना गोळी दिली होती. गणवेशातली सई त्या दिवशी अजूनच मोहक दिसत होती तिच्या नव्या हेअरबँडमुळे! प्रत्येकानं दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गोड हसून स्वीकारत हळूहळू त्याच्या बाकाजवळ येणारी सई त्यानंतर त्याच्या मनावर अशी काही कोरली गेली, की त्यानंतर आजतागायत आयुष्यातल्या उतारचढावांत बरोबर याच आठवणीत तो हरखून जायचा.

नवरा-बायकोतली धुसफु स नेहमीचीच! पण त्यातसुद्धा काही विशिष्ट पुनरावृत्ती असतात. भांडणांची कारणं जरी बदलती असली, तरी त्यांतील मुद्दय़ाबद्दलचे विचार, वैयक्तिक वागण्याच्या तऱ्हा, भांडणाच्या पद्धती, मिटवण्याचे प्रयत्न साधारणपणे सारखेच असतात. नव्याची नवलाई संपेसंपेपर्यंत एकमेकांबद्दलचे कल, मतं बनत जातात आणि ओळखीला ‘दिसण्या’पलीकडल्या ‘असण्याचं’ कोंदण यायला लागतं. कठपुतळ्यांसारखं पुढच्या भांडणात आपला ठरलेला सहभाग घेत आयुष्य लढत राहातात. भांडणाची कारणं बालिश होती, तर तोदेखील तीन-तीन दिवस का खेचायचा? म्हणजे त्याला ती कारणं महत्त्वाची वाटायची आणि त्याची प्रक्षेपणीय ओळख तो निशात पाहायचा. विभक्तीकरणानं भांडणाच्या आठवणीतलं दु:ख बदलून कंटाळवाणं होत होतं. काल्पनिक स्वरंजनासाठी वेगळं विश्लेषण हवं का?

६) अविचारी उत्स्फूर्तता (अ‍ॅक्टिंग आउट) आणि छुप्या कुरापती (पॅसिव्ह-अग्रेसिव्ह) –

विद्यापीठाच्या सभागृहात बऱ्यापैकी गर्दी जमली होती. जुने-नवे विद्यार्थी, अध्यापक, शहरातले मान्यवर, इतर गावचे नि बाहेरचे लेखक आणि रसिकगण. जगदंबे सरांची लेखणीच तशी जोडणारी होती. बालसाहित्यापासून सुरू झालेला त्यांचा निबंध, ललित लेख, कादंबऱ्या, भाषांतरं, कविता, असा प्रवास स्वत:च्या शोधापर्यंत आला होता नि तेव्हाच त्यांना आजारानं घेरलं. गेली

१५ वर्ष त्यांच्याबरोबर सहअध्यापन करणारे जोशी सर रीतसर कार्यक्रमाची देखरेख करत होते. हे दोघं जितके त्यांच्या लिखाणासाठी प्रसिद्ध होते, तितकेच त्यांच्या मैत्रीसाठी! जगदंबे-जोशी जोडगोळी फक्त त्यांच्या कॉलेजातच नाही, तर साहित्यक्षेत्रातही नेहमीची होती. दोघांनाही भाषांची प्रचंड आवड, भाषेच्या आंतरिक सौंदर्याची नेमकी ओळख. दोघांनाही एकमेकांबद्दल मनापासून आदर आणि प्रेमसुद्धा. लेखणी वरदहस्त आणि विचारांची झेपही भारदस्त. फरक होता तो त्यांच्या जिव्हणीत! त्यामुळेच कदाचित रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनीही जगदंबे सरांनाच पसंतीची माळ घातली. जगदंबे लेखक-शिक्षक झाले, नि जोशी समीक्षक/ टीकाकार- शिक्षक झाले. पण गेल्या सहा-सात वर्षांत जोशी सरांच्या टीकेची धार जरा वाढलीच होती. खासकरून जगदंबे सरांच्या लिखाणावरची! जगदंबे सरांच्या ‘मृगनयनी’ मधल्या कोतम्माच्या स्त्रीत्वाच्या संघर्षांला मातृत्वाच्या वांझोटय़ा निकषांनी निष्प्रभ ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न कोणालाच समजला नव्हता. कार्यक्रमाची वेळ होईपर्यंत जमलेली मान्यवरांची गर्दी पाहून जोशी सर विषण्णावस्थेत स्वत:ला शोधत होते.

वाढत्या वयाबरोबर ऐन उमेदीत प्रत्येकानं पाहिलेली स्वप्नं कमी-जास्त प्रमाणात पूर्ण होतात. यशाचं माप कोणाला जास्त मिळतं, तर कोणाला कमी! त्यातूनच आयुष्याच्या वाटचालीत कधी गर्व जडतो, तर कधी असूया. जपलेली नाती तोडता येत नाहीत, कारण भूत-वर्तमानात फारच एकमेकांच्या आठवणी, सवयी आणि ‘असण्याचे’ गुंते असतात. अशा वेळी या आतल्या भावना व्यक्त होत नाहीत आणि आडून सरशी करतात. जगदंबे सरांबरोबरचं साहचर्य जोशी सरांसाठी असंच क्लेशदायक झालं होतं. मैत्रीच्या नि समीक्षणाच्या आडून असूया व्यक्त होऊन राहिली होती. जोशी सरांची टीका साहित्यनिगडित राहिली नव्हती. कुठेतरी ईर्षां/असूया समीक्षणाला व्यक्तिसापेक्ष करत होती. त्याच्या पश्चात मात्र तीच असूया मैत्रीनं दिलेल्या ‘समयवेचक’ महतीत मग्न होत होती, कार्यक्रमाच्या देखरेखीत जातीनं लक्ष घालण्यास भाग पाडत होती. पण जगदंबे सरांच्या साहित्यानं प्रभावित झालेल्यांची संख्या समारंभाच्या सुरुवातीच्या जोशी सरांच्या अविचारी उत्स्फूर्ततेला तडा देत गेली.

‘असा मी, कसा मी?’च्या शोधात फ्रॉईडच्या असामान्य बुद्धीनं माणसाला पहिल्यांदा मनाच्या पाऊलवाटा दाखवायला सुरुवात केली.  विविध उदाहरणांमधून त्या मनोभावनांची आंदोलनं समजून घेत पुढच्या लेखात आपण गुंडगिरीत होरपळलेला फरश्या, स्त्रीद्वेष्टा सुंदर राजन नि काश्मीरला जायची स्वप्नं हळूहळू विरताना पाहून विषण्ण होणारे एक विस्थापित, यांच्या आयुष्यात डोकावणार आहोत.

dr.deshpande.ashish@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 12:33 am

Web Title: vyarth chinta nako re article on how i am abn 97
Next Stories
1 मी, रोहिणी.. : ‘रा.ना.वि.’ची सुरुवात!
2 वसुंधरेच्या लेकी : पाण्यालाच जीवनदान
3 गद्धेपंचविशी : ‘स्व’च्या शोधात..
Just Now!
X