दुसऱ्याच्या मनात आपण चांगलं राहावं ही भावना चांगलीच, पण त्याचीच लाचार धडपड होऊन आपण स्वत:लाच विसरायला लागलो तर ही धडपड वाटते तेवढी निरुपद्रवी राहात नाही आणि जे तथाकथित ‘चांगलं’ बनण्यासाठी आपण सगळे एवढं धडपडतो, ते या गुळमुळीतपणाच्या रस्त्यानं साध्य होतं का? इतक्या सगळय़ा कुचंबणेतून गेल्यानंतर जे काही जपण्याची धडपड आपण करत असतो ते जपलं जातं का?
मा झ्या आत एक शहाणी मुलगी आहे. ती स्वत:चा विचार करतच नाही. समोरचा खूश कसा राहील यासाठीच धडपडत राहते. ‘समोरचे’ बदलत राहतात. समोरच्यांनी ‘शाब्बास’ म्हणावं, ती ‘चांगली’ आहे, ‘शहाणी’ आहे म्हणावं, एवढंच ध्येय आहे तिचं. त्यासाठी ती काहीसुद्धा करू शकते. स्वत:ची कुचंबणासुद्धा. जेव्हा जेव्हा तिच्या मनात स्वत:चा विचार येतो, तेव्हा तेव्हा ती स्वार्थी आहे असं वाटतं तिला. फक्त समोरच्याचा विचार म्हणजेच ‘चांगलं’ असणं असं वाटतं तिला. ती काही आवडलं नाही तर तसं नि:शंकपणे म्हणू शकत नाही. कधी स्वत:वर मात करून केलंच तिचं खरं मत तिनं व्यक्त, तर ती ‘वेडी’, ‘वाईट’ मुलगी वाटते तिला. ती ‘नाही’ असं निर्मळपणे म्हणू शकत नाही. नाइलाजानं म्हणावं लागतं ‘नाही’ तेव्हा खूप दडपण येतं तिला. त्याआधी आणि त्यानंतरही बराच काळ कोसते ती स्वत:ला. ती बऱ्याचदा समोरच्याप्रमाणे स्वत:ला बदलत, मुडपत राहते. तिच्या विरोधात जाऊन मी जेव्हा केव्हा स्वत:च्या इच्छेप्रमाणे वागू पाहिलं आहे, तेव्हा कित्येकदा तिचं माझं जोरदार भांडण लागलं आहे, आतल्या आत. मला कधी कधी तिची भीती वाटते. सगळय़ांना खूश करताना कधी कधी ती आणि मी दमून जातो. दुसऱ्याला ‘खूश’ करत राहणं आणि ‘नाही’ न म्हणणं हे एकदा आम्हा दोघींना खूप भयंकर परिस्थितीत घेऊन गेलं आहे. त्यातून नशिबानं आम्ही वाचलो.
कुठल्याशा नाटकासाठी कुठल्याशा गावी गेलेले आम्ही सगळे कलाकार. तालमीसाठी त्या सुंदर गावी तळ ठोकून राहिलेलो. आमच्यामधल्या ‘त्या दोघींनी’ राहण्यासाठी नेमकी माझ्याच खोलीची निवड केली. कारण मी खूप ‘चांगली’ मुलगी अशी माझी ख्याती होती. त्यांना ‘नाही’ म्हणणार नाही, त्या जाणून होत्या. ‘त्या दोघीं’विषयी आसपासचे सगळे खूप काही बोलत असलेले. त्या दोघी सतत बरोबर. हातात हात. इतरही बरंच काही.. त्या माझ्या खोलीत राहणार म्हणून इतर सगळय़ांच्यात खसखस पिकलेली. पण मी त्याकडे लक्षं दिलं नाही. कारण मला ‘चांगलं’ राहायचं होतं. त्या दोघींसमोरही, इतरांसमोरही. शिवाय त्या समलिंगी आहेत ही फक्त ऐकीव माहिती होती. त्या दोघींच्या बोलण्यातून त्यांच्या त्यांच्या प्रियकरांचे उल्लेख यायचे. त्यांची लग्नं ठरलेली होती. त्यांचं वागणं वेगळं काही म्हणत होतं. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्या जे काही असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता. केवळ त्या कारणासाठी ‘त्या माझ्या खोलीत नकोत’ असं कसं म्हणायचं, असं मला वाटलं. इथपर्यंत सगळं ठीक.
पण नंतर मी त्यांचा कैवारच घेतला. त्यांची इतर जण टर उडवायचे, तर मी हिरिरीनं त्यांना ‘त्या दोघी तशा नाहीत’ असं सांगत राहायचे. त्या दोघी एका पांघरुणात झोपायच्या, पण मी त्याकडेही ‘भावंडं नाही का एका पांघरुणात झोपत’ म्हणून दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारी गाढ झोपायचे. त्या दोघी आमच्या खोलीतल्या न्हाणीघरात एकत्र अंघोळीला जायच्या. त्याकडेही मी काणाडोळा करून चक्क ‘भावंडं नाही का एकत्र अंघोळ करत’ असं म्हणत राहिले मनातल्या मनात. त्या दोघी आणि इतर सगळे यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत होती. त्याला एक छोटा दरवाजा होता, ज्यातून फक्त मलाच प्रवेश होता. मी त्यातून प्रवेश करून त्या दोघींनाही सांभाळायची आणि दरवाजातून बाहेर येऊन भिंतीपलीकडच्या इतर जगालाही.. ओढाताण होत होती. शेवटी न राहवून एक दिवस त्या दोघींना विचारलं, ‘‘तुमच्याविषयी असं बोलतात, ते खरं आहे का?’ त्यांच्यापैकी एक शांतपणे मला म्हणाली, ‘तुला काय वाटतं?’ खरंतर मला म्हणायचं होतं, ‘हो, मलाही आत कुठंसं वाटतं तसं आणि तसं असलं तरी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मग तुम्ही ते मला सांगा तसं खरंच काय आहे ते.. कारण आपण तिघी एकत्र एका खोलीत राहतो, म्हणून मला ते जाणणं गरजेचं वाटतं, आवश्यक वाटतं. आपण मैत्रिणी आहोत. आपल्यात खरेपणा हवा.’ पण हे काहीही न म्हणता मी एकदम कसनुशी होऊन म्हणाले, ‘नाही, तसं काही नाही वाटत मला!’ यावर ती कोऱ्या  चेहऱ्यानं म्हणाली, ‘झालं तर मग!’ तो विषय तिथेच संपला. मी त्यांच्यासमोर आणि इतरांसमोरही कसनुशी का होत होते.. मी जे मला दिसतं आहे ते बघणं का टाळत होते.. मी चालढकल का करत होते.. ती करत असताना त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आधी कळलं नाही. पुढे जे काही घडलं, त्यानं खूप काही शिकले. खूप मोठा धडा!
त्या सकाळी आम्हा तिघींनाही उठायला उशीर झाला होता. तालमीची वेळ येऊन ठेपली होती. एकदम गडबड उडाली होती. मी त्या दोघींना म्हटलं, ‘एकच बाथरूम आहे, मी पटकन अंघोळ करून टॉवेल गुंडाळूनच बाहेर येते. मग तुम्हीही तुमचं पटपट आवरून घ्या, चला चला!’ वेगात आत गेले. तिप्पट वेगात अंघोळून टॉवेल गुंडाळून बाहेर आले. त्या दोघींपैकी एक जण कपडे हातात घेऊन तयारच होती. ती आत जाऊन कपडे बाथरूमच्या दांडीला अडकवायला लागली. दुसरी समोरच्या बिछान्यावर असावी. माझं लक्ष नव्हतं. अचानक कॅमेऱ्याचा फ्लॅश उडतो तसा उडाला. मी दचकून समोर पाहिलं तर दुसरीच्या हातात कॅमेरा होता आणि ती चक्कमाझे फोटो काढत होती! हादरले! टॉवेल गुंडाळला. घाबरून, किंचाळत तिच्या दिशेनं धावले. तोवर आत कपडे लटकवणारी बाहेर आली. माझा एवढा आरडाओरडा त्यांना अपेक्षित नसावा. त्या दोघीही ‘मी खूपच जास्त करते आहे, आपण मैत्रिणी आहोत ना, गंमत म्हणून काढलेत फोटो, कुणाला दाखवणार नाही’ म्हणायला लागल्या. ते कॅमेऱ्यात ‘फिल्म’ असायचे दिवस होते. मी किंचाळत ओरडून म्हणाले, ‘अगं, दाखवणार नाही म्हणजे.. ती फिल्म डेव्हलप करणार..’ माझ्या तोंडून शब्द फुटेना. एका झडपेत तो कॅमेरा घेतला. त्यातला रोल काढून घेतला. त्याच दिवशी खोली बदलून घेतली. खूप राग आला. खूप रडायला आलं. एकटंही वाटलं. आता त्या सगळय़ाकडे पाहते तेव्हा वाटतं, माझ्या गुळमुळीतपणामुळे, भाबडा विश्वास टाकण्यामुळे मी त्यांना तसं वागू दिलं. आपल्या आसपासची माणसं आपल्या वागण्यातून आपल्याला जोखत असतात. त्यावरून ती माणसं त्यांच्या अंतर्मनात ठरवत असतात, आपल्याशी कसं वागायचं ते. माझ्या गुळमुळीतपणामुळेच त्यांची तसे फोटो काढण्याची हिंमत झाली. माझ्या भाबडय़ा, भोळसटपणामुळेच त्यांनी राहण्यासाठी माझ्या खोलीची निवड केली. जर त्यांच्या बोलण्यापुढे दबून मी त्यांच्यासमोर ‘चांगलंच’ राहण्याचा माझा खेळ पुढेही चालूच ठेवला असता आणि ते फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात तसेच राहू दिले असते, तर नंतर ते वापरून त्या कुठल्याही थराला जाऊ शकल्या असत्या, कुठल्याही.
हे सगळं आठवलं आत्ता, कारण तशीच एक मुलगी केवळ दुसऱ्याला खूश ठेवायला गेल्यामुळे, ‘नाही’ न म्हटल्यामुळे, एका विचित्र परिस्थितीत अडकल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचली. तिला मी व्यक्तिश: ओळखत नाही. ती मला एक छान अभिनेत्री म्हणून माहीत आहे. पडद्यावर आपलं शरीर विकायचं का नाही, विकलं तर किती विकायचं, हा प्रत्येक अभिनेत्रीचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तिच्याविषयी बोलायचं झालं तर तिनं ते कधीच केलं नाही. ती नेहमीच तिच्या उत्तम अभिनयातून, उत्साही वावरण्यातून, निर्मळ हसण्यातून विविध भूमिकांमधून दिसत राहिली. अशा ‘ती’चा एक विवस्त्र एम.एम.एस. एके सकाळी लाखो, करोडो क्लिक्सनी जगभर पसरवला गेला. तिनं खुलासा केला, ती ‘ती’ नाही म्हणून. नक्कीच ती ती नसेल. पण ते सगळं वाचून, ऐकून उद्विग्न व्हायला झालं. माझा एक मित्र हळहळत म्हणाला, ‘ती आधी पाठमोरी आहे गं त्या व्हिडीओत. तिच्या स्वयंपाकघरात काहीतरी काम करते आहे. वळते त्या क्षणी तिला कळतं, आपला व्हिडीओ घेतला जातो आहे. एक क्षण तिच्या डोळय़ांत भीती, राग, अनपेक्षितता येते.. पण समोरचा कुणीतरी खूप विश्वासातला असणार. कारण क्षणात ते सगळं मावळून ती हसते. लहान मुलीसारखी, निरागस आणि मग त्या समोरच्याला न अडवता तशीच घरभर फिरत राहते. एखादं लहान पोर आपल्या विश्वासाच्या माणसासमोर फिरतं त्या हक्कानं. मध्येच गंमत म्हणून डोळे मारते. तेसुद्धा निष्पापच वाटतं. कारण ते जिवाभावाच्या कुणासमोर लाडात येऊन खटय़ाळ प्रेमानं केलेलं आहे असं वाटतं. तिच्या आधीच्या प्रियकरानं घेतला होता म्हणे तो व्हिडीओ.. त्यानंच तो पसरवला असेल असंही नाही, पण हल्ली काय गं, आपण शॉटमध्ये असतो तेव्हा आपले फोन्स कुणाकुणाकडे ठेवायला दिलेले असतात. ब्लुटूथनं एका क्षणात सगळा डाटा ट्रान्सफर होऊ शकतो आणि सध्या तर मोबाइल्सच्या बाबतीत ‘डीलीट’ या शब्दालाही फारसा अर्थ उरलेला नाही. काही मॉडेल्समध्ये डाटा ऑटोमॅटिक सेव्हडच असतो. तुमच्यासमोर ‘डीलीट’ बटण दाबलेलं दाखवलं तरी तो डाटा कुठेसा सेव्हड असतोच. तो पुन्हा रीव्हाइव्ह करता येतोच. त्यामुळे मुळात हे असं होऊ देणंच किती धोक्याचं आहे!’ एकदम अस्वस्थ व्हायला झालं. तिला ज्या क्षणी कळलं, ‘ती ज्याला जिवाभावाचा समजते आहे तो असं काहीसं करतो आहे’ तेव्हाच तिनं ते थांबवलं का नाही. तिच्या व्यक्तिगत प्रेमाच्या त्या अलवार, कोवळय़ा उन्हाच्या, विश्वासू दिवशी ती विसरूनच गेली की तिच्या घरातलं तिचं ‘पोर’, ‘खासगी’, ‘निष्पाप’ ‘विवस्त्रपण’ एका क्लिकनं लाखो डोळय़ांसमोर ‘बाजार’ होऊ शकतं. हे कुठलं प्रेम आहे, ज्यात फक्त दोघांमधलं असं काहीसं सुंदर चव्हाटय़ावर आणावंसं वाटतं. अशा या प्रेमावर विश्वास टाकून, त्याच्या हातातनं मोबाइल न हिसकावता, त्याला ‘थांब, हे करू नको..’ न म्हणता उलट ते सगळं हसत सहन करून त्या गोड गोंडस जिवानं केवढी मोठी किंमत मोजली आहे हे त्याला त्याच सोनेरी दिवशी कळलं असतं तर.. ती म्हणते, ती ‘ती’ नाहीच. नसेलच. पण आता प्रश्न तो नाहीच. आता प्रश्न आहे तिच्या आतल्या, माझ्या आतल्या, आसपास त्या दृष्टीनं पाहिलं तर कित्येक जणींच्या आतल्या त्या ‘चांगलं’, ‘शहाणं’ बनवण्यासाठी धडपडणाऱ्या मुलींचा.. दुसऱ्याच्या मनात आपण चांगलं राहावं ही भावना चांगलीच, पण त्याचीच लाचार धडपड होऊन आपण स्वत:लाच विसरायला लागलो तर ही धडपड वाटते तेवढी निरुपद्रवी राहात नाही. आतली कुचंबणा चव्हाटय़ावर यायला वेळ लागत नाही हे त्या बातमीनं पुन्हा एकदा तोंडात मारल्यासारखं जाणवून दिलं.
आणि या सगळय़ाहूनही उद्विग्न करणारा प्रश्न हा आहे, की जे तथाकथित ‘चांगलं’ बनण्यासाठी मी, ती किंवा आपण सगळे एवढं धडपडतो, ते या गुळमुळीतपणाच्या रस्त्यानं साध्य होतं का? इतक्या सगळय़ा कुचंबणेतून गेल्यानंतर जे काही जपण्याची धडपड आपण करत असतो ते जपलं जातं का? माझी आणि त्या दोघींची मैत्री कायमची तुटली. तिच्या-त्याच्यातलं सगळंच कायमचं अंतरलं. तर मग स्वत:च्या या कुचंबणेनं आपण खरंच नेमकं काय साधतो आहोत?

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…