01 October 2020

News Flash

रक्तातल्या समुद्राचं उधाण

कोऱ्या कागदाची हाक तुम्हाला लिहितं करते, अस्वस्थ करते, तुमच्या रक्तातल्या समुद्राला त्यामुळे उधाण येतं. तुम्ही मग लिहिताच, तुमची, माझी आणि सर्वाची कथा-माणसाची कथा.

| November 30, 2013 01:01 am

‘‘ कोऱ्या कागदाची हाक तुम्हाला लिहितं करते, अस्वस्थ करते, तुमच्या रक्तातल्या समुद्राला त्यामुळे उधाण येतं. तुम्ही मग लिहिताच, तुमची, माझी आणि सर्वाची कथा-माणसाची कथा. माणसाचे माणूसपण कशात आहे हे शोधत असताना त्याच्या जीवनसंघर्षांतून, त्याच्या जगण्यातून, छोटय़ा-मोठय़ा लढायांतून, कथेमागची कथा दिसत असते. त्यातूनच कलाकृती निर्माण होत असते. त्या निमित्ताने, हा आत्मशोधही असतोच लेखकाचा.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे.
गांभीर्यपूर्वक लिखाण करणारा लेखक जेव्हा लिहितो तेव्हा लिहिताना त्याने स्वत:चीच साक्ष काढलेली असते. त्याला माहीत असतं की तुमचा संवाद तुमच्याशीच असतो आणि स्वत:च्याच डोळ्यात डोळे घालून तुम्हाला बोलायचं असतं. त्यामुळे अर्थात, स्वत:ला स्वत:शीच खोटं बोलता येत नाही. तुम्ही लिहिता तेव्हा तुम्ही पणाला लागता. कोणतीही लपवाछपवी न करता तुम्ही आवश्यकतेनुसार व आवश्यक तेवढे अंत:करण स्पष्ट करता. लेखकाचे अस्तित्व त्यामुळे पणाला लागते. हे अर्थात मी, आत्मनिष्ठ आणि प्रामाणिक अशा लेखनाबद्दल सांगतो आहे.
अस्सल निर्मितीच्या प्रक्रियेत ‘धीर धरण्याची तयारी’सुद्धा अभिप्रेत असते. लेखकाच्या अंत:करणातील गाव कसं वसत जातं याचं कोणतंही एक गणित उपलब्ध नाही. लेखक लिहिता लिहिता लिहू लागतो आणि लिहिता लिहिता लेखक होतो. आपल्या अंतरातील गाव वसत जाताना पाहणं व धीर धरणं हे गुण लेखकाला आवश्यक असतात. अशाच पेशन्समधून लेखक म्हणून तुम्ही आकाराला येता. तुम्ही आपल्या छातीतलं वेदनेचं गाव अस्तित्वात येताना पाहता आणि त्या घटनेचे साक्षीदार होता.
लेखकाला नेहमीच बहुधा विचारलं जातं की ‘तुम्ही का लिहिता’?
आपल्या लेखनाच्या अपरिहार्यतेबाबत अनेक प्रतिभावंतांनी साक्षी नोंदविलेल्या आहेत. कोणताही लेखक लिहितो तेव्हा त्याला काहीतरी अपार आणि अनिवार असं सांगायचं असतं, नसता त्याने लिहिलंच नसतं. जे काही सांगायचं आहे ते अपरिहार्य होऊन प्रकट होऊ लागतं तेव्हा लेखन केल्याशिवाय साहित्यिकाला-लेखकाला दुसरा पर्याय उरत नाही. हे जे उतरून येणं आहे त्याला अनेकांनी प्रतिभेचे अवतरण, असं म्हटलं आहे. अचानक खूप जोराने वारा वाहतो व दारे-खिडक्या थरथरू लागतात, याला बा. भ. बोरकरांनी ‘आला अद्भुत वारा’ असं काही म्हटलं आहे. हे प्रतिभेचं अवतरणच आहे. प्रतिभावंतांनी आपल्या अंतर्गत असलेल्या व ‘कोठून तरी येणाऱ्या’ अनिवार्य ऊर्जेच्या प्रकटीकरणाबाबत असंच काही नोंदवून ठेवलं आहे. संतकवींच्या साक्षीदेखील निर्मितीप्रक्रियेबाबत बोलतात. मोत्याची माळ जशी गुंफली जावी तशी अक्षरे एकामागोमाग एक अनावरपणे उमटत आहेत, असं संत रामदास यांनी म्हटलं आहे, तर कविता झऱ्यासारखी, त्यातल्या पाण्यासारखी सरसर वाहते आहे, असं तुलसीदास यांनी लिहून ठेवलं आहे. जे सांगायचं आहे ते सांगणं विविध माध्यमांतून प्रकट होऊ लागलं की त्या प्रकटीकरणाबद्दल प्रतिभावान मंडळी आपले अनुभव नोंदवतात. बुधकौशिकऋषीनेदेखील स्वप्नातून कविता स्फुरली, असं रामरक्षेच्या संदर्भात लिहून ठेवलं आहे.  
आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली, अनेक पातळ्यांवरून, अनेक पद्धतीने, अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काहीएक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व अनेकांच्या वेदना स्वीकारून आणि सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागधेय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागं शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रिबदू मानून अशा माणसाचा शोध माझ्या लेखनातून मी घेत आलेलो आहे. जगभरातील सर्वच चिंतनशील लेखकांनी अशीच साक्ष नोंदवलेली आहे.
सर्वसामान्य माणूस हा नेहमीच आस्थेचा आणि कुतूहलाचा विषय लेखकांसाठी राहिलेला आहे. कारण हा माणूस लेखकाच्या आतदेखील दडलेला असतो आणि बाहेर, बाहेरच्या जगत्व्यवहारात तर तो सर्वत्र व्यापून राहिलेलाच असतो. मला अशा सर्वसामान्य माणसाच्या शोधाबाबत आस्था आहे. त्याच्या जगण्याबद्दल, त्याच्या छोटय़ा छोटय़ा लढायांबद्दल आस्था आहे. ज्याच्या शोधासाठी लिहायचं त्या सर्वसामान्य माणसाच्या जाणवणाऱ्या सध्याच्या अवस्थेबद्दलही काही सांगितलं पाहिजे. मला वाटतं, सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेत आहे. त्याचा आंधळा प्रवास सुरूच असून कोणती तरी अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून आहे. परिवर्तन त्याला हवं आहे. शोषणमुक्त समाज त्याला हवा आहे. भ्रष्टाचारातून पिळवटून निघणं त्याला नको आहे. पण आपल्या दु:खाचा परिहार कसा होणार हे मात्र त्याला समजलेलं नाही. कोणी तरी मसिहा येईल आणि परिस्थिती बदलेल, आपली सुटका करेल असं त्याला वाटतं आहे. पण असा कोणी मसिहा येत नाही आणि त्याचं वाट पाहणं थांबत नाही. द्रष्टय़ा कवींनी ‘ती उद्याची सकाळ उजाडेल’ असा दिलासा जरी दिला असला तरी त्याचबरोबर तीव्र उपहासदेखील नोंदवलेला आहे, कारण उद्याचा दिवस उजाडणारच नसतो, त्यामुळे भवितव्याची सोनेरी सकाळ- ‘वो सुबह’- कधीच येणार नसते. वाट पाहणं केवळ या सर्वसामान्य माणसाच्या नशिबी आहे.  हा माणूस भयभीत आहे. त्याच्या भयमुक्तीची घोषणा कधी व कोणत्या पीठावरून केली जाईल याची आपण वाट पाहतो आहोत.
दांभिकता नाकारून प्रामाणिकपणे लिहायचं असेल तर ‘भूमिका’ घेऊन लेखन करण्याची  आवश्यकता नसते. भूमिका तुमच्यातून स्वभावत: व अंत:स्थ करुणेतून उगवून यावी लागते. ‘भूमिका घेऊन’ लेखन करणाऱ्याबाबत मला नेहमी कुतूहल वाटत आलं आहे. भूमिकावाद्यांचे गट आपल्यातल्या फुटकळ आणि सुमार साहित्यिकाला मोठं करण्याचा प्रयत्न करीत राहतात. मात्र, असा साहित्यिक श्रेष्ठ व कालजयी म्हणून ओळखला जात नाही, टिकूनही राहत नाही. त्याची पराभूत निराशा त्याच्या डोळ्यात दिसू शकते आपल्याला. असा काही समूहवाद भोवताली असतानाही तुम्हाला तुमचा अथक प्रवास चालूच ठेवायचा असतो. हा प्रवास तुम्हाला उपलब्धीच्या दिशेने घेऊन जातो हे मात्र खरं. याचा अर्थ लेखकाला स्वत:ची काही भूमिका नसते असं मात्र नाही.
विसंगती अशी आहे की आत्मनिष्ठ लेखकाला दांभिक भूमिकावादी-समूहवादी व्यक्तींपासून स्वत:ला दूर ठेवायचे असले तरी सर्वदूर पसरलेल्या सर्वसामान्य माणसांबाबत अम्लान अशी आस्था टिकवावयाची असते. हे करीत असताना लेखकाला तुम्ही कोणते ‘वादी’ आहात या प्रश्नाचा पाठलाग चुकवता येत नाही. तुमच्या वाचकांना मात्र तुम्ही कोणत्या गटाशी संबंधित आहात याबाबत काही देणं-घेणं नसतं. एक तर त्यांना तुमचं लेखन आवडतं किंवा आवडत नाही. त्यामुळे तुमचा वाचक तुम्हाला नेहमी जिवंत ठेवतो, लिहितं करतो, पत्र लिहितो, फोन करतो, बळ देतो, परीक्षा घेतो, तुमची कथा-तुमचे लेखन हे आमचेच असल्याचं सांगतो. लेखकाला इतकी पावती पुरेशी असते.
माझ्या लेखनामध्ये दोन प्रवाह आहेत असं माझ्या लक्षात येतं. या दोन प्रवाहांची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. वाचकाला तुमच्या कथा ‘भावतात’ तेव्हा त्या हृदयगम्य असतात. वाचकाला तुमच्या कथा ‘समजतात’ तेव्हा त्या बुद्धिगम्य असतात. हृदयगम्यतेचा आणि बुद्धिगम्यतेचा झगडा हे माझ्या लेखनातलं वास्तव. याचा उलगडा हळूहळू पुढे होत गेलेला आहे. मानसशास्त्राने अंतर्मुखी आणि बहिर्मुखी प्रवृत्ती सांगितलेल्या आहेतच. बुद्धिमान समीक्षकांनीदेखील आंतरवर्तुळातील साहित्य व बहिर्वर्तुळातील साहित्य असे दोन भेद साहित्याच्या संदर्भात केलेले आहेत. आता, या दोन वर्तुळक्षेत्रांमध्ये जीवनाशी संबंधित असे कोणकोणते घटक समाविष्ट होतात याचा आपण शोध घ्यायला लागतो. अंत:स्फूर्ती, प्रेरणा, सहानुभूती, दया, क्षमा, त्याग, सेवा, प्रेम नावाची अमूर्त वस्तू, मानवता, अंतिमत: ईश्वर, असे काही घटक अांतरवर्तुळातील साहित्यात समाविष्ट होताना दिसतात. या घटकांची यादी आणखी सूक्ष्म व विस्तारित होऊ शकते. ही सगळी चिरंतन मूल्ये आहेत. त्याउलट, बहिर्मुखी साहित्याच्या वर्तुळात युद्ध, रक्तपिपासा, सत्तासंघर्ष, उपासमार, मारामाऱ्या, राजकारण, विश्वासघात, दारिद्रय़, बेकारी, जगण्याबाबतच्या चिंता, लैंगिक क्रौर्य आणि विकृती व ईश्वराला नाकारणे इत्यादी घटक समाविष्ट होताना दिसतात. चांगले साहित्य आणि श्रेष्ठ साहित्य असा भेद जाणकार करीतच असतात. आंतरवर्तुळातील साहित्य श्रेष्ठ साहित्य असू शकतं.
आंतरवर्तुळातील घटक आणि बाह्य़वर्तुळातील घटक या दोन्हींचा लेखकाला साकल्याने विचार करावा लागतो. त्याची लेखणी, त्याचा अंत:स्वभाव कोणत्या वर्तुळाशी जास्त जोडला जातो आहे हे पाहून त्याला आत्मप्रकटीकरण करावं लागतं. हे करीत असताना वास्तव नावाच्या एका अवघड अशा गुंत्याशी सामना करावा लागतो.
आता, एकच एक वास्तव कधीच नसतं. माझं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं, असं म्हणतात. वास्तव बदलत राहतं आणि मुळातून ते बदलतसुद्धा नाही. उदाहरणार्थ चिरंतन मूल्ये किंवा ईश्वरी सत्ता बदलत नाही. आंतरवर्तुळाशी संबंधित घटकांमध्ये समाविष्ट असलेले वास्तव बदलत नाही. बाह्य़ घटक बदलत राहतात. समाज बदलतो, मान्यता बदलतात, गरिबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची प्रामुख्याने बाह्य़वर्तुळातल्या साहित्याने जास्त दखल घेतली आहे. आंतरवर्तुळातील साहित्य मात्र जास्त जीवनदर्शी असते. मनुष्यजीवनाबद्दल सखोल आस्था दाखविण्याकडे या आंतरवर्तुळातील साहित्याचा कल दिसून येतो. म्हणजे, आंतर्तुळातील साहित्य जास्त जीवनदर्शी व संवेदनशील असून असं साहित्य चिरंतन मूल्याचा विचार करते तसेच अपरिवर्तनीय वास्तवाशी जवळीक साधते त्यामुळे ते श्रेष्ठ साहित्याची गुणवत्ता प्राप्त करण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यास पात्र ठरते. लेखकाला या घटनेची दखल घ्यावी लागते. यामुळे माणसाच्या दु:खाचा मागोवा घेता येतो व हेच लेखकाचं कार्य असतं. माझे लेखन आंतरवर्तुळातील घटकांशी, अर्थात जीवनाच्या चिरंतन मूल्यांशी जवळीक साधते आहे असं लक्षात आल्यानंतर व त्यामुळे आपले लेखन कदाचित श्रेष्ठ दर्जाचेसुद्धा होऊ लागलं आहे असं लक्षात आल्यानंतर त्यातल्या जबाबदारीची जाणीव होऊन मी त्वरेने सजग होऊन गेलो आहे. स्वत:ला उन्मत्त होऊ न देण्याची ही दुर्मिळ अशी संधी त्या निमित्ताने मला प्राप्त झाली.
‘चिरतरुण दु:खांचे बुरूज’ ही माझी एक आवडती दीर्घकथा आहे. मी एकदा एक पाण्याखाली जाणारे गाव पाहायला गेलो होतो. त्या छोटय़ाशा गावात फक्त एकच दोन मजली इमारत होती. एक वृद्ध डॉक्टर तिथे राहत. घरासमोर िपपळाचे झाड होते. पट्टय़ापट्टय़ाच्या कापडाचा पायजमा घातलेले ते डॉक्टर जुन्या ध्वनिमुद्रिका ऐकत बसत. त्यांच्याकडे बालगंधर्वाच्या आवाजातली गाणी होती. वीज असेल तेव्हा त्यांचा ग्रामोफोनवरच्या मजल्यावरून वाजायला लागे आणि सगळा भूतकाळ िपपळाच्या सळसळत्या सावलीच्या साक्षीने त्या घराभोवती गोळा होई, साकाळला जाई. मला नेहमी तिथे कालप्रवाह गोठला आहे असं दिसू लागे. कालप्रवाह एखाद्या नागिणीसारखा असून नदीच्या रूपाने त्या सगळ्या गावाला गिळंकृत करीत आहे, ही वस्तुस्थिती त्या गावात जाणवू लागे. त्या डॉक्टरांशी मला कामानिमित्त बोलावं लागे. ते म्हणत की, गावावर पाणी जरी आलं तरी गाव सोडून, घर सोडून त्यांना जायचं नाही, पाण्यातच बुडून जायचं आहे. माझ्या नोकरीच्या निमित्ताने त्या गावी मी अनेकदा गेलो. तिथला पाण्याखाली जाणारा बुरूज पाहिला, त्यावरची पक्ष्यांची वसाहत पाहिली. ही वसाहतसुद्धा पाण्याखाली जाणार होती. म्हणजे पुनर्वसन फक्त गावाचे नव्हते, सर्व जीवांचे होते. काळ ही संकल्पना सापेक्ष आहे. गावावर पाणी लवकर येऊ नये, असं वाटत असल्यामुळे त्या गावातील काळ स्तब्ध होऊन गेल्यासारखा वाटे. जणू, तिथली घडय़ाळं हळूहळू टिकटिकत आहेत. ‘चिरतरुण दु:खांचे बुरूज’ ही दीर्घकथा अशाच एका गावाची आहे. एक वृद्ध डॉक्टर, त्यांची तरुण मुलगी, घरातच आणून ठेवलेला एक पेशंट, डॉक्टरच्या घराभोवती फिरणारी एक वेडी वृद्धा, गावकरी, सरपंच, सायकलवर फिरणारा तरुण डॉक्टर या सगळ्यांमधून ही कथा वाहते. केवळ गावावरच नाही, घरावरच नाही तर माणसांच्या सगळ्या जन्मावर, त्यांच्या जगण्यावर, भूतकाळावर पाणी पसरून राहणार आहे, ही भावना मूळ कथेत भयभीत करतेच, परंतु या कथेच्या आतमध्ये प्रवेश करून मनाने पात्रांच्या सोबत राहायला लागल्यानंतर अधिक भयभीत करते याचा अनुभव मला आला. अस्तित्व संपवणारा पाण्याचा प्रवाह सबंध गावावर पसरून राहणार असतो तेव्हा ती वेळ लवकर येऊ नये म्हणून गावातील घडय़ाळे मंदावतात, असा संदर्भ कथेत आलेला आहे. कालप्रवाह गोठणे ही संकल्पना भयभीत करणारी आहे. या दीर्घकथेने मला लेखनाचा आनंद दिला आहे.
कथेमागची कथा बघण्याची लेखकाची क्षमता असेल तर समर्थ कथा लिहिता येते. कथेमागची कथा सतत शोधावी लागते व कथेमागची कथा आपल्याभोवती सतत घडत असते. ती पाहण्याची नजर मात्र असावी. लेखकाचे हेच मोठे आव्हान असते व ते तो कसे पेलतो यावर त्याचे यश अवलंबून असते. माझे लेखन म्हणजे न संपणारी शोधयात्रा असून सर्वसामान्य माणसाच्या सुखदु:खांचा शोध गांभीर्यपूर्वक घेणे मला आवडते. कोऱ्या कागदाची हाक तुम्हाला लिहितं करते, अस्वस्थ करते, तुमच्या रक्तातल्या समुद्राला त्यामुळे उधाण येतं. तुम्ही मग लिहिताच, तुमची, माझी आणि सर्वाची कथा-माणसाची कथा. माणसाचे माणूसपण कशात आहे हे शोधत असताना त्याच्या जीवनसंघर्षांतून, त्याच्या जगण्यातून, छोटय़ा-मोठय़ा लढायांतून, कथेमागची कथा दिसत असते. त्यातूनच कलाकृती निर्माण होत असते. त्या निमित्ताने, हा आत्मशोधही असतोच लेखकाचा.    
bjsasne@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2013 1:01 am

Web Title: well known literary bharat sasane
Next Stories
1 सरप्राइज .. एक महासोहळा
2 युवाशक्ती सावरताना..
3 ऋणानुबंधांचा भावइतिहास
Just Now!
X