13 July 2020

News Flash

स्वत:ला बदलताना : शहाणपणाच्या दिशेने जाताना..

स्वत:कडे, स्वत:च्या गुणदोषांकडे, स्वत:च्या पूर्वग्रहांकडे, आपल्या विचारधारेकडे तटस्थपणे पाहणे ही कष्टदायक गोष्ट आहे. ही एक शस्त्रक्रियाच की आपल्या मनाची! याविषयी मला डॉक्टर एकदा म्हणाले होते,

| August 16, 2014 01:01 am

स्वत:कडे, स्वत:च्या गुणदोषांकडे, स्वत:च्या पूर्वग्रहांकडे, आपल्या विचारधारेकडे तटस्थपणे पाहणे ही कष्टदायक गोष्ट आहे. ही एक शस्त्रक्रियाच की आपल्या मनाची! याविषयी मला डॉक्टर एकदा म्हणाले होते, ‘‘ही शस्त्रक्रिया हा पहिला टप्पा आहे. तुझं अंतिम उद्दिष्ट तुझं चारित्र्य आणि पर्यायाने तुझी नियती घडवणे आहे. अनेक जण इथेच ही बदलाची प्रक्रिया या टप्प्यावर अर्धी सोडतात. पण स्वत:त बदल करायचे असतील तर चिकाटी, जिद्द आणि सातत्य या बाबी कौशल्यानं आत्मसात करायला हव्यात.’’

म ध्यंतरी मी आणि बायको पुस्तकाच्या दुकानात गेलो होतो. तिथे ‘थिंकिंग, फास्ट अॅण्ड स्लो’  हे डॅनिअल कानह्मन या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाचे जाडजूड पुस्तक मला सापडले. ते पुस्तक मी चाळले. मला त्यात शिकण्यासारखे बरेच काही असेल याची खात्री पटली, परंतु त्याची किंमत हजाराच्या वर होती. विचार आला, ‘हे पुस्तक विकत घेतले तर?’ लगेच या विचारात असलेल्या सामर्थ्यांचा मी हिशेब केला. एक हजार रुपये किमतीपेक्षा जास्त किमतीचे ज्ञान मला नक्कीच मिळेल याची खात्री परत एकदा करून घेतली. मला हे पुस्तक विकत घेण्यात काय अडथळे आहेत याचा अंदाज केला. आता केवळ मला उत्सुकता वाटते म्हणून मी हजार रुपये खर्च करावेत का? हा प्रश्न विचारला. पूर्वी मोहात पडून अशी अनेक महागडी पुस्तके विकत आणून ‘कपाटाची धन’ झाली आहेत हे आठवले. हे दोन्ही मुद्दे बायको नक्की विचारणार म्हणून तिला कोणत्या शब्दात पुस्तक खरेदीचे बोलून दाखवायचे यासाठी शब्द निवडू लागलो. सहसा माझी बायको पुस्तकं विकत घ्यायला विरोध करीत नाही. पण मी अनेक चांगली पुस्तकं हरवली आहेत- म्हणजे कुणाला तरी वाचायला दिली आहेत आणि कुणाला दिली ते विसरलो आहे हा तिचा अनुभव आहे. अशा पाश्र्वभूमीवर तिच्याकडून पुस्तक घेण्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ लगेच मिळवण्यासाठी शब्द आणि स्वर यांची निवड अखेर साधली आणि जणू काही उत्स्फूर्तपणे म्हणालो, ‘‘गौरी, हे पुस्तक इतकं वेगळं आणि विचार करायला लावणारं आहे की मला लगेचच त्यातलं शिकायला आवडेल आणि पुस्तक महाग असल्यामुळे मी ते कोणालाही देणार नाही!’ ती म्हणाली, ‘पुढच्या वेळी घेऊ .’  
आता मी इतका विचार करून तिला प्रश्न विचारला तरी तिने ‘हो’ का म्हटलं नाही? मला  प्रश्न पडला, ‘मी विचार करतो म्हणजे नेमके काय करतो?’ अनेकदा आसपासची माणसं म्हणायची ‘विचार करून सांगतो.’ म्हणजे ते खरोखर या गोष्टीचा विचार करत राहतात का? का ताबडतोब उत्तर सुचत नाही म्हणून वेळ देण्यासाठी किंवा वेळ मारून नेण्यासाठी ‘विचार करतो’ या शब्दप्रयोगाचा आसरा घेतात? या प्रश्नांचा शोध घ्यायचाच असं ठरवलं आणि हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला.
मी, जी कल्पना मनात असते त्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतो आणि आपलं लक्ष त्या कल्पनेवर केंद्रित झालं की त्या कल्पनेत असलेल्या सामर्थ्यांचा मी हिशेब करतो आणि त्यानंतर मी फारच अधीर झालो नसलो तर त्या कल्पना प्रत्यक्षात आणायच्या असतील तर त्यात कोणते अडथळे असू शकतात याची नोंद घेतो. अडथळे मी आपल्या कुवतीनुसार पार पाडू शकतो का याचा अंदाज घेतो. हे सारे मनात घडत असते..ऑक्सफर्ड डिक्शनरी ‘थॉट’ या शब्दाचा अर्थ सांगताना म्हणते, ‘मनात असलेल्या कल्पना.’ आणि इतके सगळे संपल्यानंतर आपल्या कल्पनेला योग्य असे शब्द निवडायचे हे महत्त्वाचे काम करतो. भाषा हे आपले व्यक्त करण्याचे महत्त्वाचे साधन आहे, आणि मला योग्य वाटतात ते शब्द निवडून मी ते बोलून किंवा लिहून व्यक्त करतो.
थोडक्यात, मी विचार करतो म्हणजे माझ्या मनात असलेल्या कोणत्या तरी कल्पनाचित्राबद्दल विविध अंगांनी स्वसंवाद करतो! हा स्वसंवाद, जर त्या कल्पनेचा अनुभव पूर्वी घेतला असेल, दुसऱ्याचा अनुभव ऐकला असेल, त्याबद्दल कुठे काही वाचलं असेल, ते मला नीट समजलं असेल, आपल्या आठवणीत असेल आणि लगेच ते आठवेल तेव्हा माझा विचार क्षणार्धात होईल आणि मी पटकन व्यक्त होईन. आणि जर या सगळ्या क्रियेमध्ये काहीतरी गडबड असेल तर मला विचार करायला अवधी द्यावा लागेल. माझ्या तोंडून उत्तर येईल, ‘विचार करून सांगतो.’ हे जेव्हा सगळं मला थोडं थोडं कळू लागले तेव्हा समोरच्या माणसाने ताबडतोब उत्तर द्यावं, हा माझा आग्रह कमी झाला.
म्हणून मी बायकोवर रागावलो नाही, उलटपक्षी तिला माझ्या मागणीचा अधिक साकल्याने विचार करण्याची गरज असेल असे वाटून घेऊन मी प्रश्न सोडून दिला. त्यानंतर किमान दोनदा आम्ही त्या दुकानात गेलो. माझी नजर वारंवार त्या पुस्तकाकडे जाई. परंतु तिने विषय काढला नाही म्हणून मी गप्पच राहिलो. पण तिसऱ्या वेळी आम्ही त्या दुकानात गेलो, तेव्हा आत शिरतानाच ती म्हणाली, ‘अरे तुझं ते पुस्तक आधी घे..’
मला राहवलं नाही, मी म्हणालो, ‘इतके दिवस झाले तरी तुझ्या लक्षात होतं?’ ती म्हणाली, ‘अरे, मला वाटलं तुझ्या नेहमीच्या स्वभावानुसार घाईघाईने पुस्तक घेतोयस. पण मागच्या दोन्ही वेळा तू त्याच पुस्तकात गुंतलेला पाहिलं आणि तुला खूपच आवडलंय असं जाणवलं..”  
म्हणजे आपण जे मनात आणतो तसंच समोरचा माणूस विचार करेल असं नाही. समोरचा माणूस आपल्याला कोणत्या प्रकारे उत्तर देईल? त्याच्या मनात आपल्याबद्दल कोणते पूर्वग्रह असू शकतात? काय असेल त्याचे स्वगत? अशा प्रकारची काही घटना यापूर्वी घडली होती का? त्यावेळी काय घडलं? हेही भाग लक्षात घेऊन व्यक्त होणं योग्य रीतीने होईल.
माणसानं जर नेहमी शांतपणे आपल्या मनात चालू असलेल्या घटना लिहून काढल्या तर लक्षात येईल की आपल्या आवडत्या गोष्टींबाबत व्यक्त होण्याची आपली एक पठडी तयार होते, आणि नापसंत गोष्टी व्यक्त करण्याचीही एक पठडी बनते. एकदा का या दोन रीती वारंवार वापरून झाल्या की ती त्याची विचारधारा बनते आणि क्षणाचाही विलंब न लावता माणूस व्यक्त होतो.
माझा एक मित्र आहे रवी. त्याला कुठलीही गोष्ट सांगितली की त्याच्यात काय कमतरता आहेत हे तात्काळ लक्षात आणून देतो. एकदा मला पांढराशुभ्र लिननचा शर्ट घ्यायचा होता. अनायासे त्या रविवारी तो आला म्हणून त्याला बाईकवर बसवून आम्ही दोघे बाजारात गेलो. दोन-तीन दुकानात विचारून पाहिलं, पण मला हवा तसा पांढरा शर्ट लिनन कपडय़ाचा नव्हता. मग मी थोडं लांब जाऊन बघायचं ठरवलं. बाईकवर बसल्याबसल्या लिनन हे कापड कसे उगाचच महागडे असते, त्याची किती निगा राखावी लागते, दरवेळी धोब्याकडे टाकून कडक करणे किती आवश्यक असते अशी यादीच तो बडबडत होता. तरीही मी माझा आग्रह पुरवलाच. मी घेतलेल्या शर्टाची किंमत बरीच होती. तसा दुकानाबाहेर पडताच म्हणाला, ‘अरे हे दुकान भलतेच महागडे आहे बुवा! गंडलास. अजून किमान ५०० रुपये वाचले असते, अमुक-तमुक दुकानात गेलो असतो तर..’ असा आमचा रवी. त्याची सवयच ही की प्रत्येक बाबतीत आधी नकारात्मक बाजूच दिसतात त्याला. आणि अशी असंख्य मंडळी आपल्या अवतीभवती वावरत असतात. परंतु त्यांच्या बोलण्याचा रचनात्मक टीका असं करून घेतला तर ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या म्हणीचा उपयोग करता येऊ शकतो.
मला डॉक्टरांनी सांगितले होते, ‘तूसुद्धा अनेकदा चुकीचा विचार करतोस. तुझे कोणते विचार चुकत आहेत ते लिहून काढ. कोणकोणत्या बाबतीत तू यंत्रवत आणि आततायी विचार करतोस ते लिहून काढ. म्हणजे नेमका प्रश्न काय आहे ते तुला कळेल. हा थोडा वेळ घेणारा भाग असला तरी तो करायलाच हवा. आपल्यात नेमका बदल कोणता किंवा कोणते बदल करायचे आहेत तेही तुझे तुलाच कळेल. आणि हा गृहपाठ केला नाही तर इतरांच्या दृष्टीने तुझ्यात ज्या कमतरता आहेत, त्या पुरतेच बदल घडवून आणण्याचा तू प्रयत्न करशील. मग ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ अशी परिस्थिती होईल.’
मी हा उपक्रम हाती घेतला, पण लक्षात आलं, वाटतं तेव्हढं सोपं नाही. स्वत:कडे, स्वत:च्या गुण-दोषांकडे, स्वत:च्या पूर्वग्रहांकडे, आपल्या विचारधारेकडे तटस्थपणे पाहणे ही कष्टदायक गोष्ट आहे. ही एक शस्त्रक्रियाच की आपल्या मनाची! मला डॉक्टर म्हणाले होते, ‘‘ही शस्त्रक्रिया हा पहिला टप्पा आहे. तुझं अंतिम उद्दिष्ट तुझं चारित्र्य आणि पर्यायाने तुझी नियती घडवणे आहे. अनेकजण इथेच ही बदलाची प्रक्रिया या टप्प्यावर अर्धी सोडतात. पण स्वत:त बदल करायचे असतील तर चिकाटी, जिद्द आणि सातत्य या बाबी कौशल्यानं आत्मसात करायला हव्यात.’’    
मी प्रयत्न चालू ठेवले आणि अचानक मला कळलं, ‘महेंद्रजी, हे सगळे करताना जगण्यासाठी तू कोणती मूल्ये जपण्याचे पक्के केले आहेस का? तसं नसेल तर तुझ्या बोलण्या-वागण्यात फरक पडेल’  हे मला समजल्यावर माझ्या मनात एक द्वंद्व सुरू झालं-माझी विचारधारा ही माझ्या मूल्यांशी बांधीलकी ठेवणारी नव्हती. माझी मूल्ये परिस्थितीनुसार स्वार्थापोटी बदलती आहेत हे माझ्या लक्षात आले. हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी मी मेणबत्ती लावून उभा होतो. पण तिसऱ्याच दिवशी मी चुकीच्या पार्किंगचा दंड होऊ  नये म्हणून लाच दिली होती. प्रामाणिक आहे असे सांगून अनेक वेळा खोटे बोललो होतो. अशी विसंगती जीवनात असू शकते, परंतु विनाकारण निव्वळ स्वत:चा बचाव करण्यासाठी किंवा फायद्यासाठी मी माझ्याच जाहीर केलेल्या मूल्यांशी तडजोड करीत गेलो होतो.
माझ्या चुकीच्या विचारधारेचा आणि मूल्यविसंगत वर्तनाचा माझा भूतकाळ मला मी कोणत्या दिशेला जायचे नाही याचा मार्गदर्शक ठरला आहे. मी त्या वाटाडय़ाची मदत घेत चुकतमाकत शहाणपणाच्या दिशेने प्रवास करीत आहे. या प्रवासात जेवढे साथीदार मिळतील तेवढे ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असे म्हणता येईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: while changing yourself
Next Stories
1 हिऱ्याची शीतलता
2 मी शाळा बोलतेय! मुलांची पुस्तकं
3 ‘मी’ मला सापडले
Just Now!
X