डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

शरीरातील अवयव , विविध पेशी, स्राव यांबरोबरच योग्य अन्न आणि व्यायाम रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करतात. चौरस आहारातली प्रथिनं ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोलाची ठरतात. त्यामुळे उत्तम प्रतीची प्रथिनं आलटूनपालटून आहारात हवीत. परंतु ‘फू ड अ‍ॅलर्जी’ ही फक्त प्रथिनांची असल्यामुळे एकदम नवीन वा परदेशी धान्य खाण्यापूर्वी अ‍ॅलर्जीविषयी खात्री करणं आवश्यक. शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी काय करायला हवं हे सांगणारा हा लेख दुसरा..

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

मानवी रक्तामध्ये लाल आणि पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. प्राणवायूची देवाणघेवाण करणाऱ्या हिमोग्लोबिनयुक्त लाल रक्तपेशी (‘आरबीसी’) आणि रोगजंतूंशी लढतात त्या सफेद रक्तपेशी (‘डब्ल्यूबीसी’). याशिवाय खूप लहान लाल पेशींना ‘प्लेटलेट्स’ म्हणतात.  रक्त गोठण्यासाठी त्यांची गरज असते. गर्भाची वाढ मूळ पेशींपासून (‘स्टेम सेल्स’) पासून होते- ज्यापासून पुढे या ३ प्रकारच्या पेशी निर्माण होतात. एकूण रक्तापैकी ४० ते ४५ टक्के  लाल पेशी असतात, तर श्वेतपेशी फक्त १ टक्का असतात. लाल पेशी ४ महिने जगतात, तर श्वेतपेशी काही मिनिटे, तास अथवा काही दिवस. परंतु काही विशिष्ट श्वेतपेशींना स्मरणशक्ती असते. म्हणून लहानपणी जर गोवर, कांजिण्या झाल्या, तर जन्मभर त्या विषाणूला नष्ट करण्याची प्रतिकारशक्ती शरीरात या स्मरणशक्ती असलेल्या श्वेतपेशींमुळे निर्माण होते.

विविध रोगांवरच्या लसी याच तत्त्वावर कार्य करतात. परंतु रोगजंतूदेखील हुशार असतात. बहुरूप्याप्रमाणे ते रूप बदलून, ‘म्यूटेट’ होऊन शरीरात प्रवेश करतात आणि अशा वेळी तो रोग पुन्हा होऊ शकतो. ‘करोना’ भयकारी आहे याचं आणखी एक कारण असं, की तो सहज रूप बदलतो आणि रोगी बरा झाल्यावरही त्याला तो परत होऊ शकतो. काही रोगामध्ये, तसंच ‘ऑटोइम्यून’ रोगांमध्ये प्लेटलेट्स कमी होतात. या आजारात आपलं शरीर स्वत:च्याच पेशींना शत्रूपक्षाची प्रथिनं समजून नष्ट करतं. अल्कोहोल, क्रॅनबेरीचा रस आणि इतर काही पदार्थ प्लेटलेट्स कमी करतात, तर ‘व्हिटॅमिन के’ असलेले खाद्य पदार्थ प्लेटलेट्स वाढवायला मदत करतात- उदा. पालेभाज्या, किवी आणि डाळिंब. तसंच ‘फोलेट’, ‘व्हिटॅमिन डी’ आणि ‘बी’युक्त अन्नपदार्थ, म्हणजे पालेभाज्या, ब्रोकोली, चवळी, सोया, भात, अंडी, मासे हेदेखील उपयोगी आहेत.

पेशीविरहित रक्त म्हणजे ‘प्लाझ्मा’ (रक्तद्रव) मुख्यत: पाणी, क्षार, मीठ आणि एन्झाइम्स यांनी बनतो, शिवाय त्यामध्ये अनेक प्रतिपिंड (‘अँटीबॉडी’) रेणू तरंगत असतात. अँटीबॉडी कोणत्या यावर रक्तगट हा ‘ए’, ‘बी’, ‘एबी’, तसंच धन वा ऋण ‘आरएच’ हे ठरतं. समान रक्तगट असल्याशिवाय एकमेकांना रक्त देता येत  नाही. ‘ओ’ रक्तगट म्हणजे कोणत्याच अँटीबॉडी नाहीत. (कृपया ‘करोना’ किंवा इतर रोगांविरुद्ध निर्माण होणाऱ्या अँटीबॉडींशी याचा संबंध जोडू नये.) पूर्वी ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट ‘युनिव्हर्सल डोनर’ आहे असा समज होता. पण जसजसं शरीरशास्त्र विकसित होत गेलं तसा देणारा आणि घेणारा यांचं रक्त जास्तीत जास्त सारखं असावं असा प्रयत्न केला जातो. प्लाझ्मा हा लाल पेशीविरहित असतो. ‘करोना’ होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील करोना अँटीबॉडीयुक्त प्लाझ्मा दुसऱ्या रुग्णाला देऊन लवकर बरं करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अर्थात त्यासाठी प्लाझ्मा देणारा आणि घेणारा यांचा रक्तगट सारखा असावा लागतो.

श्वेतपेशींचे तीन प्रकार आहेत, ‘लिम्फोसाइट’, ‘मोनोसाइट’, ‘ग्रॅन्यूलोसाइट’. प्रतिकारशक्ती निर्माण करण्यामध्ये लिम्फोसाइट सर्वांत महत्त्वाच्या. त्यांचं कार्य समजून घेण्याआधी शरीरातील ‘लिंफ’ द्रव, त्यांची केंद्रं आणि अभिसरण प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. पूर्वी शाळेमध्ये आरोग्य तपासणी करताना डॉक्टर दोन्ही कानांच्या खाली, जबडय़ाखाली, मानेजवळ  हात ठेवून तिथल्या ग्रंथींना सूज आहे का हे तपासत. सर्दी झाल्यावर त्या जागी दुखतं.  लिंफ द्रव वाहतो त्या नलिकांना ‘लसा’ असं म्हणतात. त्या म्हणजे जणू शरीरामधली लष्करी दलाची वाहनं आणि रस्ते. ते मोकळे नसतील, अडथळा असेल, तर रोगजंतूंबरोबरची लढाई कशी जिंकणार? रोगाला प्रतिकार करणारे सैनिक म्हणजे श्वेतपेशी. पण त्यांना रसद पुरवली पाहिजे, जखमी आणि मृत पेशींना बाहेर काढलं पाहिजे, तरच आणखी फौज शत्रूवर तुटून पडेल. शरीरात त्यांच्या जागोजागी महत्त्वाच्या छावण्या आहेत. घशात ‘टॉन्सिल्स’, छातीत ‘थायमस’, पोटात प्लीहा (‘स्प्लिन’) आणि आंत्रपुच्छ  (‘अ‍ॅपेंडिक्स’). याखेरीज शरीरभर छोटय़ा-छोटय़ा ‘नोड्स’ म्हणजे केंद्रं आहेत, जिथे प्रत्यक्ष लढाई होते. शुद्ध आणि अशुद्ध रक्त वाहून नेतात त्या नलिकांना अनुक्रमे रोहिणी आणि नीला (‘आर्टरी’ आणि ‘व्हेन’) म्हणतात आणि रक्तप्रवाह सुरळीत चालावा म्हणून हृदयरूपी उत्तम पंप दिला आहे. परंतु लिंफ द्रव वाहतो त्या लसिकाप्रणालीमधला प्रवाह गुरुत्वाकर्षणामुळे होतो. त्यासाठी कोणताही पंप नाही. म्हणून श्वेतपेशी योग्य प्रमाणात वाढण्यासाठी पौष्टिक आहार जितका महत्त्वाचा, तितकीच स्नायूंची हालचालसुद्धा आवश्यक आहे. शारीरिक हालचाल, ऊठबस, वाकणं, चालणं आणि योग्य व्यायाम करून लिंफ द्रव शरीरभर खेळत ठेवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रोज १ तास थोडा तरी घाम येईल असा व्यायाम करत असाल, तर लिंफ द्रव वाहण्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. हे शक्य नसेल त्यांनी करण्याचे साधे-सोपे व्यायाम म्हणजे कानाच्या पाळया ओढणं वा गोल फिरवणं, मानेचे व्यायाम, कपालभाती- भस्त्रिका  प्राणायाम, जमिनीवर बसून दोन्ही पावलं नमस्काराप्रमाणे जोडून जमेल तेवढी पोटाकडे घेऊन फुलपाखराप्रमाणे गुडघे हलवणं, आलटून पालटून चवडा आणि टाचेवर उभं राहाणं किंवा तसं चालणं इत्यादी. या सोप्या हालचालींचा देखील खूप उपयोग होतो.

प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार महत्त्वाचा. परंतु ‘फूड अ‍ॅलर्जी’ ही फक्त प्रथिनांची असते, म्हणून एकदम नवीन आणि परदेशी धान्य खाण्यापूर्वी आपल्याला त्याची अ‍ॅलर्जी नाही ना याची खात्री करावी. पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणात वरण, भात आणि पोळी- म्हणजेच डाळ, तांदूळ आणि गहू रोज खाल्ले जातात. शाकाहारी जेवणामध्ये दूध, दही, उसळी, डाळी आणि गहू हे प्रथिनांचा पुरवठा करतात. अनेक लोकांना विविध प्रथिनांची अ‍ॅलर्जी असते. हल्ली काही जणांना गव्हातील प्रथिन ‘ग्लुटेन’ची अ‍ॅलर्जी असते. म्हणून बाजारात ‘ग्लुटेन फ्री’ खाद्यपदार्थ मुबलक दिसतात. गहू, बार्ली आणि राय (राई/मोहरी नव्हे! राय हे एक बारीक दाण्यांचं धान्य आहे. त्याचा पाव परदेशात मिळतो.) या धान्यांमध्ये ग्लुटेन हे प्रथिन असतं. भारतात सामान्यत: बार्ली आणि राय खाल्लं जात नाही. त्यामुळे आपल्याकडे गहू वापरला नाही की झालं ‘ग्लुटेन फ्री’ खाणं. जेवणात चपाती ऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, चहाच्या वेळी पाव / बिस्किटं वा कणीकयुक्त पदार्थ टाळून जर चिवडा, चकली, थालीपीठ खाल्लं तर झाला ‘ग्लुटेन मुक्त’ आहार!

कोणत्याही एका धान्यामध्ये शरीराला लागणारी सर्व अत्यावश्यक ‘अमिनो आम्लं’ नसतात. म्हणून ‘मल्टीग्रेन’ खाद्यपदार्थ चांगले. चणा डाळीचीही अ‍ॅलर्जी खूप जणांना असते. मूग डाळीमध्ये ‘अ‍ॅलर्जन’ म्हणून ओळखली जाणारी प्रथिनं अजिबात नसतात आणि म्हणून आयुर्वेदात सर्व रुग्णांना, तसंच पंचकर्म केल्यावर मूगडाळ सार घ्यायला सांगतात. तसंच आजारी व्यक्तीला मूगडाळ खिचडी देतात. सध्याची आहारासंबंधित लाट आहे, ती म्हणजे ‘मिलेट्स’. महाराष्ट्रात पिकणारी मिलेट्स म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी (भगर). इतर प्रदेशात कोडू, कुट्टू ऊर्फ ‘बक-व्हीट’, प्रोसो इत्यादी धान्ये आहेत. ही सर्व पिके तृणधान्य या सदरात मोडतात, कारण त्यांची रोपं गवतासारखी असतात. राजगिरा आणि हल्ली परदेशातून आयात होणारं ‘किनवा’ यांना अन्नशास्त्र ‘खोटं धान्य’ (‘स्यूडो सिरियल’) म्हणतात, कारण ही गवतासारख्या रोपाच्या बिया/दाणे नाहीत. राजगिरा तर पालेभाजी म्हणूनदेखील खाल्ली जाते. आरोग्याच्या दृष्टीनं राजगिरा अतिउत्तम. पण तो लाही स्वरूपात खाल्ला तर हलका असतो आणि चांगला पचतो कारण त्याचं वरचं आवरण खूप कडक असतं.

ज्यांना दूध पचत नाही ते बहुधा त्यातील ‘लॅक्टोज’ ही साखर न पचल्यामुळे. अ‍ॅलर्जी ही प्रथिनामुळे येते, म्हणून दूध न पचण्याला ‘अ‍ॅलर्जी’ न म्हणता ‘सहन न होणं’ (‘लॅक्टोज इनटॉलरन्स’) असं नाव आहे. अशा लोकांसाठी ‘लॅक्टोज फ्री’ दूध परदेशात मिळतं. असे लोक दही-ताक खाऊ शकतात, कारण दुधाचं दही बनताना विरजणाचे मित्रजंतू दुधाची साखर खाऊन टाकतात. शेंगदाणे आणि ‘नट्स’, तसंच अंडी, कोळंबी, खेकडे, शिंपले यांची अ‍ॅलर्जी कधी कधी खूप धोकादायक असू शकते. अ‍ॅलर्जीचा सर्वांत जास्त आढळणारा प्रकार म्हणजे ‘हिस्टमाइन’ तयार होऊन अंगावर पुरळ येणं, अचानक दम लागून श्वास घ्यायला त्रास होणं, उलटय़ा, ताप इत्यादी लक्षणं.  खाद्यपदार्थातील निरूपद्रवी प्रथिनाच्या रेणूला रक्तामधील श्वेत पेशी रोगजंतूचं- म्हणजे शत्रूचं प्रथिन आहे असं समजून हल्ला करतात. त्यामुळे अचानक गरज नसताना खूप अँटीबॉडी तयार होतात आणि त्याचा त्रास म्हणजे त्या विशिष्ट अन्नाची अ‍ॅलर्जी. पचनाचे विकार, वारंवार डाएट करून जैविक घडय़ाळात झालेला बिघाड, पोटावर शस्त्रक्रिया, रक्तातील विषारी द्रव्यांचं वाढलेलं प्रमाण आणि प्रतिकारशक्तीमधील कमतरता यामुळे अन्नाची अ‍ॅलर्जी निर्माण होऊ शकते. ‘जेनेटिक मेकअप’ अर्थात जनुकीय घडणीमुळे जन्मत: अ‍ॅलर्जी असल्यास ती सहसा कमी होत नाही. अशा वेळी तो खाद्यपदार्थ न खाणं हाच उपाय असतो.

‘प्रिक टेस्ट’मध्ये विविध अ‍ॅलर्जनचे थेंब मनगटापुढच्या त्वचेवर टोचून पुरळ येतं का हे बघणं, ही झाली जुनी पद्धत. आता रक्ताची गुणसूत्र चाचणी करून कोणकोणत्या जैविक / रासायनिक साधम्र्य असलेल्या पदार्थाची अ‍ॅलर्जी असावी हे शोधता येतं. भाज्या आणि फळं यामध्ये प्रथिनं अगदी कमी असतात. तरीदेखील काही लोकांना त्यांची अ‍ॅलर्जी असते. शिजवणं, तळणं, भाजणं अशा प्रक्रियांमुळे प्रथिनांचं रेणू स्वरूप बदलतं आणि बऱ्याच भाज्याची अ‍ॅलर्जी येण्याचं टळतं. पण ज्याला इतर अ‍ॅलर्जी आहे त्यानं नवीन प्रकारची भाजी कच्ची खाताना काळजी घ्यावी. पालक, सिमला मिरची, टोमॅटो, भेंडी एका गटात आहेत आणि त्यापैकी एकाची अ‍ॅलर्जी असेल तर दुसऱ्या भाजीची अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते. याला ‘क्रॉस अ‍ॅलर्जी’ म्हणतात. ज्यांना अ‍ॅलर्जी आहे अशा लोकांनी ‘अँटी हिस्टमाइन’ औषध नेहमी जवळ ठेवावं आणि अ‍ॅलर्जी येत आहे असं जाणवलं तरच ते औषध घ्यावं. ते आधी घेऊन उपयोग नसतो. त्रास होऊ लागला आणि रक्तात हिस्टमाइन वाढायला लागलं की घ्यावं लागतं. त्यामुळे नकळत अ‍ॅलर्जी असलेला अन्नपदार्थ खाल्ला तर थोडा तरी त्रास भोगावा लागतो. दुर्दैवानं आपल्या देशात या विषयावर खूपच अज्ञान आहे.

थोडक्यात, योग्य आणि प्रमाणात खा, नीट चर्वण करा, जमेल तितका व्यायाम करा, आवश्यक तेवढं झोपा आणि आनंदी राहा. निसर्गानं आपलं शरीर ही जणू एक ठेव म्हणून दिलं आहे. त्यामुळे शरीरावर अत्याचार न करता आरोग्याची चांगली निगा राखा. मग रोगप्रतिकारशक्ती आपोआप वाढेल आणि तुम्ही ‘करोना’विरुद्धची लढाई नक्की जिंकू  शकाल.