15 August 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : चित्रपट तिच्या नजरेतला…

सर्व आव्हानं पेलत जगभर स्त्री दिग्दर्शक नवनवीन विषय सामर्थ्यांनं पडद्यावर आणत आहेत.

‘गोल्डन ग्लोब’च्या एका अहवालानुसार अमेरिकेत एकूण दिग्दर्शकांपैकी स्त्री दिग्दर्शक केवळ ८ टक्के आहेत.

प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

‘गोल्डन ग्लोब’च्या एका अहवालानुसार अमेरिकेत एकूण दिग्दर्शकांपैकी स्त्री दिग्दर्शक केवळ ८ टक्के आहेत. प्रगत देशांमध्येही अशी स्थिती असताना सर्व आव्हानं पेलत जगभर स्त्री दिग्दर्शक नवनवीन विषय सामर्थ्यांनं पडद्यावर आणत आहेत. स्त्रियांनी केवळ स्त्रीकेंद्री विषयच हाताळावेत ही अपेक्षा चुकीची आहे, असंही अनेक जणी ठामपणे मांडताहेत. ‘चित्रपट समाजाचा आरसा असतो,’ असं म्हणताना निम्म्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांचं या क्षेत्रात पडलेलं प्रतिबिंब नजरेआड करून चालणारच नाही.

असं म्हणतात, की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्याच नाही, तर दुसऱ्या कोणत्या देशाची, तिथल्या समाजाची तोंडओळख व्हायला हवी असेल तर तिथले, तिथल्या भाषेतले चित्रपट पाहावेत. त्यातून भाषेचीच नाही तर समाजाचीही ओळख होते. मी महाविद्यालयात फ्रें च शिकत असताना अनेक फ्रें च चित्रपट पाहिले, म्हणजे ते चित्रपट पाहून त्यावर लिखाण करणं, त्यातल्या प्रसंगांची तुलना भारताशी करणं हा अभ्यासक्रमाचाच भाग होता. माझा मित्र पहिल्यांदा शिकायला न्यूयॉर्कला गेला तेव्हा तो म्हटल्याचं आठवतंय, ‘‘हॉलीवूडनं आपली गोची केली राव! न्यूयॉर्क किंवा सारी अमेरिका आपण इतक्या वेळा चित्रपटांमधून, मालिकांमधून पाहिली आहे, तर ती ओळखीची असणार असं वाटत होतं. पण न्यूयॉर्क फक्त ‘चकॉक’ नाही गं. खूप खूप वेगळं आहे. सुंदर, भव्य आहे, तसं ते गलिच्छही आहे.’’ तेव्हा आमच्यातला ‘फिल्म स्टडीज’वाला मित्र म्हणाला, ‘‘तू कोणत्या दिग्दर्शकाचे चित्रपट बघतोस त्यावर हे अवलंबून आहे. तू ‘बाँड’च बघितलास कायम, किंवा ‘फ्रें ड्स’ किंवा ‘सेक्स अ‍ॅण्ड द सिटी’सारख्या मालिकाच बघितल्यास, तर तुला आणखीन काय वेगळं दिसणार ?’’ चित्रपटात आपण एक गोष्ट दिग्दर्शकाच्या नजरेतून अनुभवत असतो. म्हणूनच स्त्री दिग्दर्शकांनी या क्षेत्रात आणलेला वेगळेपणा बारकाईनं बघावा असं वाटलं.

यातून पहिलं नाव समोर आलं ते भारतातल्या पहिल्या स्त्री चित्रपट दिग्दर्शक फातिमा बेगम यांचं. १९२०च्या दशकात, जेव्हा भारतात चित्रपटनिर्मिती बाल्यावस्थेत होती तेव्हा फातिमा बेगम यांनी दिग्दर्शनाकडे वळायचं ठरवलं. त्यांनी १९२२ पासून चित्रपट क्षेत्रात आर्देशीर इराणी आणि नानूभाई देसाई यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. त्या काळी स्त्री तंत्रज्ञ तर सोडाच, पण चित्रपटांत नायिकाही मुख्य  भूमिकेत दिसायच्या नाहीत. दादासाहेब फाळके यांचा दुसरा चित्रपट ‘भस्मासूर मोहिनी’- यामध्ये पहिल्यांदा नायिकांनी मुख्य भूमिका बजावल्या. अशा काळात फातिमा बेगम यांनी ‘बुलबुल-ए-परिश्तान’ चित्रपट दिग्दर्शित केला. १९२६ मध्ये त्यांनी ‘फातिमा फिल्म’ सुरू केलं- ज्याचं नाव नंतर ‘व्हिक्टोरिया-फातिमा फिल्म्स’ असं ठेवण्यात आलं. ‘बुलबुल-ए-परिश्तान’ हा काल्पनिक ढाच्याचा आणि ‘ट्रिक फोटोग्राफी’ वापरलेला चित्रपट होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांच्या फिल्म उपलब्ध नाहीत.

सई परांजपे हे नाव आपल्या खूप जवळचं आणि खूप महत्त्वाचंही. रंगकर्मी, लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांचं शिक्षण पुण्याच्या ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मध्ये आणि दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये झालं. क्लिष्ट कथानक सोप्या पद्धतीनं उलगडून सांगणं हे त्यांचं वैशिष्टय़. त्यांचे चित्रपट खूप गाजले. ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी’च्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केलं.  एका मुलाखतीमध्ये त्या सांगतात, की त्यांच्यावर स्त्री दिग्दर्शक असूनही स्त्रीप्रधान चित्रपट केले नाहीत म्हणून टीका व्हायची. त्यांच्या मते, दिग्दर्शक हा दिग्दर्शक असतो. त्यात स्त्री-पुरुष विभागणी कशाला करायची? त्या म्हणतात,‘‘मी स्त्री आहे, पण मी माणूसदेखील आहे की! ‘माणसा’च्या भूमिकेतून लिहिलं तर काही चुकलं का? कुठल्याही क्रियाशील कलाकारानं दुसऱ्याच्या भूमिकेत शिरायची कला अवगत केली पाहिजे. म्हणजे मग तुम्ही त्या विषयाला न्याय देऊ शकता.’’ खरोखर, स्त्री किंवा पुरुष यांनी केलेली कलाकृती कला म्हणून बघितली जायला हवी.

सई परांजपे यांच्या बरोबरीच्या अपर्णा सेन यांनी अभिनेत्री म्हणून असलेल्या त्यांच्या कारकीर्दीनंतर १९८१ मध्ये  ‘३६ चौरंगी लेन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी प्रामुख्यानं बंगाली आणि इंग्रजी भाषेत चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. अपर्णा सेन यांचे चित्रपट गुंतागुंतीची स्त्री पात्रं आणि क्लिष्ट भावनांच्या खेळामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.  त्यानंतर दीपा मेहता यांनी ‘फायर’ या चित्रपटातून दोन जावांमधील समलिंगी संबंध, ‘१९४७ अर्थ’ चित्रपटात भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यानचं चित्रण, तर ‘वॉटर’ चित्रपटात वाराणसीमधल्या बालविधवांच्या आयुष्याचं चित्रण असे विषय मांडले.  मीरा नायर यांचे ‘सलाम बाँबे’, ‘मान्सून वेडिंग’, ‘द नेमसेक’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी भारतीय समाजाचं चित्रण करणारे ठरले. सध्याच्या काळात गौरी शिंदे, किरण राव, रीमा कागती, अनू मेनन या हिंदी चित्रपटसृष्टी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनी गाजवत आहेत. गौरी शिंदेच्या ‘इंग्लिश-विंग्लिश’मधलं श्रीदेवीनं साकारलेल्या शशी गोडबोले या गृहिणीचं एक वाक्य पक्कं  लक्षात राहातं, ‘स्वयंपाक जर एका पुरुषानं केला तर ती कला. जर बाईनं केला तर ती तिची जबाबदारी.’ स्त्रीवर ‘स्त्री’ म्हणून कधी भूमिका लादल्या गेल्या आहेत आणि कधी त्या स्त्रीनं स्वत:च्या मर्जीनं स्वीकारल्या आहेत. यामधला फरक करणं अनेक वेळा सोईस्कररीत्या टाळलं जातं. त्यातून बाईला- मग ती आई असो वा बायको किंवा सून असो, तिला गृहीत धरलं जातं. या गुंतागुंतीच्या विषयाला ‘इंग्लिश-विंग्लिश’नं उत्तम न्याय दिला.

‘गोल्डन ग्लोब’नं प्रसिद्ध केलेला एक अहवाल असं सांगतो, की अमेरिकेत एकूण दिग्दर्शकांपैकी केवळ ८ टक्के  स्त्रिया आहेत. हा अहवाल हेही सांगतो, की जेव्हा एखादी स्त्री चित्रपटाचं दिग्दर्शन करत असते तेव्हा अधिक स्त्री तंत्रज्ञ, लेखक यांना संधी दिली जाते. ‘गोल्डन ग्लोब’चा इतिहास पाहिला तर आजपर्यंत फक्त एका चित्रपट दिग्दर्शिकेला सर्वोत्तम दिग्दर्शनासाठी पारितोषिक मिळालं आहे, बार्बरा स्ट्रासँड यांना ‘येंट्ल’ या चित्रपटासाठी. तर पारितोषिकाच्या ७५ वर्षांंच्या इतिहासात केवळ सात वेळा स्त्रियांना दिग्दर्शनासाठी नामांकन मिळालं आहे. ‘अ‍ॅकॅडमी अवॉर्ड’मध्येही परिस्थिती सारखीच आहे.

तरीही हॉलीवूडमध्ये स्त्री दिग्दर्शक वेगळे प्रयोग करत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘अ‍ॅपल टीव्ही’वर प्रसिद्ध झालेली ‘द मॉर्निग शो’ ही वेब मालिका. ही अप्रतिम टीव्ही मालिका जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि रीझ विदरस्पून यांची निर्मिती आहे. यात पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांमध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण समान आहे. एवढंच नाही, तर ‘आफ्रिकन अमेरिकन्स’चंही प्रमाण समान आहे. यामधील चार दिग्दर्शकांपैकी तीन स्त्रिया आहेत. मालिकेच्या एका भागात अ‍ॅलेक्स लिव्ही (टीव्ही होस्ट जेनिफर अ‍ॅनिस्टन) तिच्या मुलीला म्हणते, ‘‘स्त्रियांना कुणी संधी, अधिकार, प्रसंगावरचा ताबा द्यायला उभं नसतं. हा अधिकार आपण आपलाच घ्यायला हवा. आपल्या आयुष्यावर ताबा आपल्यालाच मिळवायला हवा.’’ शेवटी स्त्रियांच्या विविध प्रश्नांचा गाभा हाच आहे, नाही का? आपल्या आयुष्याबद्दलचे निर्णय स्वत:च घेण्याचा लढा.

स्त्री दिग्दर्शकांचे चित्रपट हे स्त्रीकेंद्री, प्रमुख भूमिकेत स्त्रिया असणारे, सामाजिक प्रश्न किंवा भावनिक गुंतागुंत हाताळणारे असतील, असं मानलं जातं. यामध्ये कॅथरिन बिगेलो ही एक अपवाद आहे.  तिच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी अनेकदा असतो तो संहार. मग संहाराला धरून राजकारण, संहाराचा लिंगभाव असे विषय ती हाताळते. तिचे दोन अतिशय गाजलेले चित्रपट म्हणजे ‘द हर्ट लॉकर’ आणि ‘झीरो डार्क थर्टी’. ‘द हर्ट लॉकर’ या चित्रपटासाठी ‘डिरेक्टर्स गिल्ड’ पारितोषिक मिळवणारी ती पहिलीच स्त्री ठरली. या चित्रपटात तिनं अमेरिकेनं इराकवर हल्ला केल्यानंतरचा इराक दाखवला आहे. त्यात एक सुरुंग निकामी करणारा गट आहे. प्रत्येक जण या युद्धाकडे, संहाराकडे कसा बघतो याचं सुरेख चित्रण त्यात आहे. काही जण या अपरिचित जागेला कंटाळले आहेत, काहींना परत घरी जायची काही घाई नाही, तर काहींना संहाराचं व्यसन लागलं आहे, असे हे लोक. माणसाच्या मनात युद्ध कसं प्रकट होतं याचं हे चित्रण. या चित्रपटानं ‘अवतार’ला मागे टाकून सवरेत्कृष्ट चित्रपटाचं ‘ऑस्कर’ मिळवलं तेव्हा कुणाला फार आश्चर्य वाटलं नसावं. कॅथरिनचा दुसरा नावाजलेला चित्रपट म्हणजे ‘झीरो डार्क थर्टी’. यात ११ सप्टेंबर २००१ नंतर अमेरिकेनं ‘अल्कायदा’ आणि ओसामा बिन लादेनचा केलेला शोध आणि नंतर त्याला पाकिस्तानात घुसून कसं ठार केलं, याचं चित्रण आहे. तिला तिच्या चित्रपटांसाठी जेव्हा-जेव्हा पारितोषिकं मिळाली, तेव्हा तिनं स्वत:ला कधीही स्त्री-दिग्दर्शक म्हणून संबोधलं नाही. ती म्हणते, ‘‘स्त्रियांनी चित्रपट दिग्दर्शन किंवा निर्मिती करायला इथे अमेरिकेतही एक छुपा विरोध आहे. मी एक स्त्री आहे म्हणून मी स्त्रीकेंद्री चित्रपट करणार नाही आणि मी अशा विरोधाला महत्त्वही देत नाही. याची दोन कारणं आहेत. एक- मी माझं लिंग बदलू इच्छित नाही आणि दोन- मी चित्रपट दिग्दर्शनही थांबवू शकत नाही. चित्रपट कसा, कुणी बनवला  हे महत्त्वाचं नाही. तो चित्रपट तुम्हाला भावला का, तुम्ही त्याला कसा प्रतिसाद दिलात हे महत्त्वाचं आहे. कलाकृतीला प्रतिसाद द्यावासा वाटला तर द्या, नाही तर सोडून द्या. माझं ध्येय हे मला भावलेल्या विषयांवर चित्रपट तयार करणं हे आहे. ‘जेंडर रोल्स’ अर्थात लिंगाधारित भूमिका मोडून पाडणं नाही.’’ ती असं म्हणत असली तरी चित्रपटाच्या इतिहासात तिची नोंद ‘ऑस्कर’ मिळवणारी पहिली स्त्री दिग्दर्शिका अशी के ली जाईलच.

भारतातही आता अनेक स्त्री दिग्दर्शक वेगळ्या विषयांवरचे चित्रपट घेऊन येत आहेत. त्यामध्ये लीना यादव हिचा ‘पाच्र्ड’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी तिच्यावर फक्त स्त्रीकेंद्री चित्रपट करणारी दिग्दर्शिका म्हणून टीका केली. त्यानंतरचा तिचा ‘नेटफ्लिक्स’वरचा ‘राजमा चावल’ हा थेट स्त्रियांच्या आयुष्यावर नसलेला, पण महत्त्वाचं स्त्रीपात्र असलेला चित्रपट आला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘अनेक दशकं स्त्रियांना चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका दिल्या जात आहेत. हे बदलायलाच हवं आणि हे आम्ही स्त्री दिग्दर्शक बदलणार नाही, तर कोण बदलणार?’’ ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ (अलंक्रिता श्रीवास्तव), ‘फिराक’,‘मंटो’ (नंदिता दास), ‘राझी’ (मेघना गुलझार) आणि इतर अनेक चित्रपटांनी दाखवून दिलं, की भारतात स्त्री चित्रपट दिग्दर्शक खूप सकस ‘कंटेंट’ घेऊन येत आहेत. पण हे झालं हिंदीमध्ये. अजून इतर भारतीय भाषांमध्ये स्त्री दिग्दर्शकांचं प्रमाण खूपच कमी आहे. सुमित्रा भावे, श्रावणी देवधर, चित्रा पालेकर आदी अपवाद वगळता अगदी मराठीतही ते वाढायला हवं. नाही तर स्थानिक भाषेमधला, स्थानिक ‘कंटेंट’ कोण सांगणार? नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 1:03 am

Web Title: women movie directors yatra tatra sarvatra dd70
Next Stories
1 व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘थोर’वयाचा ‘थोर’खेळ
2 अपयशाला भिडताना : मानगुटीवरचं भूत
3 निरामय घरटं : नेमकी निवड
Just Now!
X