News Flash

अविरत कष्टांचं फळ

आर्थिक गरजेसाठी दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी व्यवसायाचे आव्हान स्वीकारले. बरोबरीने सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटाही उचलतेय. पण यासाठी पूजाअर्चा आणि टी.व्ही. मालिकांना फाटा दिला.

| January 17, 2015 05:12 am

आर्थिक गरजेसाठी दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी व्यवसायाचे आव्हान स्वीकारले. बरोबरीने सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटाही उचलतेय. पण यासाठी पूजाअर्चा आणि टी.व्ही. मालिकांना फाटा दिला. आळस, अवेळी झोप यांना हद्दपार केले. आज या त्यागाचे आत्मिक समाधान मिळतेय.

आ ईबाबांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी २४ वर्षांपूर्वी लहान वयातच नोकरी सुरू झाली आणि मग लग्नही लवकरच झाले, तेही आंतरजातीय! त्या वेळी संसारात येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करता आली ती नोकरीमुळेच. अभ्यासाची, नावीन्याची प्रचंड ओढ आणि ध्यास. त्यामुळे लहान बाळ, नोकरी आणि सासरकडून कोणताही आधार नसताना केवळ पतीच्या पािठब्यामुळे पदवीचे शिक्षण, तांत्रिक विषयांच्या परीक्षा, संगणक शिक्षण, विणकाम, पेंटिंगपासून अनेक गोष्टींचा सुरुवातीच्या काळात आनंद घेतला.
२००० साली नवऱ्याने कंपनीमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने पुन्हा संसाराचा रथ ओढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. अर्थात न खचता त्यांना व्यवसायात पाय रोवून उभे राहण्यासाठी सर्वार्थाने मदत तर केलीच आणि एकीकडे अडखळत का होईना संसाराचा गाडा पुढे ढकलला. त्यासाठी नोकरी करून आपल्यावर जादा कामे पडली तरी चालतील, असा पवित्रा घेत कुटुंबावरचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न केला. कालौघात अधिकारी होण्याची, पदोन्नती घेण्याची स्वप्ने खुणावत होती! स्वत:च्या पाच-सहा छोटय़ा-मोठय़ा शस्त्रक्रिया आणि पतीच्या तीन किडनीशी संबंधित शस्त्रक्रिया. आई-बाबांचे आजारपण, मुलाच्या करिअरची सुरुवात असे सारे असूनही या कठीण काळात, द्विधा मन:स्थितीत अतीव इच्छेने मी पदोन्नतीचा निर्णय घेतला. रोजचा १२० कि.मी.चा बसचा खेडेगावातला प्रवास. पहाटे साडेपाचपासून सुरू होणारा दिवस, अडचणींचे डोंगर यामध्ये साडेतीन वर्षे संपली. मूळ गावी थोडी उशिराच बदली झाली. पण प्रवासात अनेक ओळखी झाल्या आणि अनुभवांची शिदोरी हाती आली.
या सर्वात झालेले मानसिक खच्चीकरण, आर्थिक, शारीरिक नुकसान अपरिमित. पण सकारात्मक दृष्टिकोन, ईश्वरी कृपा, आई, मित्र-मैत्रिणींची साथ यामुळे या यातनांतून बाहेर पडणे थोडे सुकर झाले. व्यायाम आणि ताजा आहार यातून शारीरिकदृष्टय़ा कणखर झाले, पण न भरून काढता येणारे आर्थिक नुकसान पतीच्या व्यवसायात झालेले. अशा वेळी सतत येणाऱ्या नैराश्यातून मार्ग काढणे आवश्यक होते. नोकरीमुळे माझ्यापासून सहा वर्षे दूर राहिलेला माझा मुलगा मनाने प्रगल्भ होऊनच आला. त्याने चक्क माझे प्रबोधन केले. नोकरी सांभाळून व्यवसायात लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित केले. आज वयाच्या ४२ व्या वर्षी सकाळी ६ वाजता सुरू होणारा दिवस अविरत कष्टांमुळे रात्री ११ वाजता संपतो. लेखन, वाचन, जगप्रवास, समाजकार्य, लोकसंग्रह सगळय़ाचीच आवड. पण आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट मॅनेजमेंट आणि मार्केटिंग हे आव्हान याही वेळी स्वीकारले. निराश न होता माझ्या आवडीनिवडींची सांगड व्यवसायाशी घातली. गरीब मुलांना संगणक शिकवणे, त्यांच्याशी संवाद साधणे, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर घेणे, त्यावर आधारित लेखन, वाचन करणे, संगीत मैफिलीत निवेदन करणे, शाळा-कॉलेजमधून करिअर गाइडन्स करणे आणि मार्केटिंग करता करताच सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलणे या आवडीच्या गोष्टीही करू शकले. आई-वडिलांची सेवा करण्याचे भाग्यही लाभले. पण यासाठी पूजाअर्चा, हळदीकुंकू सारखे समारंभ आणि टी.व्ही. मालिकांना पूर्णत: फाटा दिला.
थोडक्यात, संसारामध्ये स्वार्थ आणि परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला. आळस, झोप या शब्दांना हद्दपार केले. आज माझ्या नोकरीबरोबरच पतीचा व्यवसायही बहरतोय आणि मला कुटुंबासाठी केलेल्या त्यागाचे आत्मिक समाधानही मिळतेय. कर्तव्य आणि प्रेम यामध्ये कधी गफलत होऊ दिली नाही. माझ्या त्यागाची जाणीव मुलाला आणि पतीलाही आहे. माझ्या कलागुणांना वेळ, संधी आणि प्रेरणा देण्याचे, माझ्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे, मोठे काम ही दोघे करतायत. एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आणखी काय हवे?
मीरा पोतदार, चिपळूण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2015 5:12 am

Web Title: women telling their experiences how they take financial responsibility of family
Next Stories
1 गाऊ त्यांना आरती
2 बहुरूपी लिंगव्वा..
3 मुलांची ‘माणसं’ करताना..
Just Now!
X