पाणी विषयक आजच्या दुसऱ्या भागात पाणी कसे प्यावे, याबद्दल आयुर्वेद शास्त्रोक्त मत जाणून घेऊ या. आयुर्वेद म्हणतो, तहान लागली की पाणी प्यावे. तहान, भूक, मल-मूत्र विसर्जन अशा तेरा वेगांचे धारण करू नये. त्यांचे धारण केल्यास त्यामुळेही काही आजार निर्माण होऊ  शकतात. सकाळी उठून उपाशीपोटी, ब्रश न करता पाणी पिऊ  नये. जास्त तर बिलकुलच पिऊ नये. गरज नसताना, कफाचे आजार नसताना वैद्याचा सल्ला घेतल्याशिवाय गरम पाणी अथवा लिंबूपाणी अथवा मध आणि गरम पाणी पिऊ  नये.  चहाच्या आधी किंवा नंतर पाणी पिऊ  नये. झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी खाणे-पिणे संपले पाहिजे. रात्री-अपरात्री उठून पाणी पिऊ  नये. गरज नसताना, शरीराची मागणी नसताना उगीच वेटर देतोय म्हणून पाणी पिऊ  नये. बैठा व्यवसाय असेल तर पाणी कमी प्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात, हिवाळ्यात पाण्याची शरीराची गरज कमी असते. उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज वाढलेली असते. ते ओळखून आपले पाण्याचे प्रमाण ठरवावे. थंड देशात पाणी कमी प्यावे, उष्ण देशात पाणी जास्त प्यावे. ए.सी.मध्ये काम असल्यास पाणी कमी प्यावे. दिवसभर फिरता व्यवसाय असल्यास, उन्हात अथवा उष्णतेच्या संपर्कातील काम असल्यास पाणी जास्त प्यावे. व्यायाम करणाऱ्यांनी व्यायाम झाल्या झाल्यावर लगेच जास्त पाणी पिऊ  नये. त्यांना शरीरातून घाम जास्त गेल्याने पाण्याची जास्त गरज असते. कमी व्यायाम करून जास्त पाणी पिऊ  नये.

पाणी पिण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. सर्व शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात व मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात. माणूसच असा प्राणी आहे जो कसेही पाणी पितो. काही लोक तांब्या तोंडावर चार बोटे वर धरून उभे राहून, वरून, गटगट आवाज करीत पाणी पिताना दिसतात. यांच्यामध्ये दोन पाण्याच्या घोटात हवा अडकल्याने पोट गच्च होते व नंतर फार ढेकर सुटतात. तर असे पाणी पिऊ नये. पाणी शांतपणे एका जागी बसून, प्रसन्न चित्ताने, ओठ लावून प्रत्येक पाण्याच्या घोटाची चव घेत प्यायले पाहिजे. पाणी फार हळुवार व फार भरभर पिऊ नये. माणसाने पाणी खावे व अन्न प्यावे असे आमचे आजोबा म्हणायचे. म्हणजे पाणी असे प्या की ते आपण खातोय असे वाटले पाहिजे व अन्न असे खा म्हणजे चावून चावून बारीक करा कीते आपल्याला गिळता आले पाहिजे. असे करणाऱ्यांची वाढलेली रक्तातील साखरसुद्धा जागेवर येते असेही संशोधनातून आता सिद्ध झाले आहे. म्हणजेच चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने ‘प्रमेह’ म्हणजेच आताचा मधुमेह हा आयुर्वेदातील मूत्र व जल तत्त्वाशी संबंधित असा आजार होतो. मग विचार करा, असे किती आजार चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने होत असतील. पाणी हे फोडले पाहिजे असे इस्रायलचे शेतकरी म्हणतात. त्यांनी तसे संशोधनही केले आहे. आपण पाण्याच्या प्रत्येक थेंबाला जेवढे वेगवेगळे करू तेवढे विज्ञानाच्या नियमाप्रमाणे त्याचा ‘सरफेस एरिया’ वाढेल व त्यात जास्तीत जास्त प्राणवायू मिसळेल. म्हणून तर झऱ्याचे पाणी शुद्ध व साचलेले पाणी अशुद्ध. झऱ्यातून वाहताना प्रत्येक दगडावर पाणी फुटते, त्यात जास्तीत जास्त प्राणवायू मिसळतो म्हणून ते जिवंत वाटते. त्यात चैतन्य अधिक असते. ते पाणी पिल्यावर जे सुख मिळते ते साचलेले पाणी पिऊन मिळत नाही. म्हणून वनस्पतींना ठिबक, तुषार सिंचनाने पाणी दिल्यास त्यांची वाढ अधिक चांगली होते. यालाच पाणी फोडणे असे म्हणतात. पाणी जेवणापूर्वी पिल्यास अग्निमांद्य होते, जेवणानंतर प्यायल्यास कफ जास्त वाढून आम तयार होतो. म्हणून पाणी जेवणाच्या मध्ये मध्ये थोडे थोडे प्यावे. काही अन्नाचे घास खाऊन झाल्यावर जिभेवर आलेला थर निघून जावा व पुढील अन्न अजून रुचकर वाटावे म्हणून थोडे दोन घोट पाणी मध्ये मध्ये प्यावे. अधिक पिऊ नये. जेवण झाल्यानंतर २-३ तासांनी तहान असेल तेवढे पाणी प्यावे. पाणी जास्त प्यायले तरी अन्नपचन प्रक्रिया बिघडते व पाणी कमी घेतले तरी अन्न प्रक्रिया बिघडते. म्हणून आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन पाणी प्यावे. जसे की, आपण भात शिजवताना पाणी किती टाकावे हे ठरवतो अगदी तसेच. नवा भात, जुना भात, बासमती, इंद्रायणी या प्रत्येकानुसार पाण्याचे प्रमाण बदलते. अगदी तसेच शरीरातील पोटाच्या कुकरचे आहे. याच्या पाण्याचे गणितही जमले पाहिजे नाही तर अन्न कच्चे राहते, शिजत नाही. मग पोटात वात वाढतो व शिटय़ा जास्त होतात.

harishpatankar@yahoo.co.in

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to drink water
First published on: 15-10-2016 at 01:26 IST